राष्ट्रीय नीचपणा
देशात मोदींचे सरकार सत्तेत येवून वर्ष उलटून गेले ,पण मोदी यांच्या विचाराचे युग, त्यांची भाजपच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली तेंव्हाच सुरु झाले होते आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यास उधान आले होते. भास्कर वृत्त समूहाला ऑक्टोबर २०१४ दिलेल्या मुलाखती दरम्यान पंधरा वर्ष एका राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या आणि पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी ,सरदार पटेलांच्या अंत्यविधीला जवाहरलाल नेहरू हजर नव्हते अशी धादांत खोटी माहीती सांगितली. खरे तर अंत्यविधीमध्ये सहवेदना महत्वाच्या असतात ,परंतु अंत्यविधीमधील उपस्थिती वा अनुपस्थिती बद्दल उल्लेख आणि तो ही धादांत खोटा ! असे द्वेषपूर्ण वक्तव्य करणारे मोदी पंतप्रधान झाल्यावर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याबद्दलची गरळ देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याची अनुभूती गेल्या वर्षभरात दिसून येत आहे .
पंडित नेहरूंच्या पन्नासाव्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येस स्थापन झालेले नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत स्थापन झाल्यापासून नेहरू यांच्या बद्दलचा विद्वेष कळसाला पोचला आहे. सरदार पटेल यांच्या ऐवजी नेहरू यांना पंतप्रधान करून गांधीजीनी चूक केली, इथपासून सुरु झालेल्या द्वेषाचा प्रदूषित प्रवाह,संघाच्या केरळ मधील शाखेने जानेवारी २०१५ च्या मासिकात ,नथुराम गोडसे यांने गांधी ऐवजी पंडित नेहरूंना ठार मारायला हवे होते इथपर्यंत पोचला, पुढे संघाच्या मुळ शिकवणुकी प्रमाणे. काश्मीर च्या ३७० कलमा पर्यंत पोचून, काश्मीर बाबत नेहरूंच्या चुका,चीन युद्धातील अपयश, नियोजन आयोग , समाजवादी मिश्र अर्थव्यवस्था , धर्मनिरपेक्षता यांच्यावर हल्ले करत करत ,नेहरू हे अय्याश होते, शान शौक मध्ये राहायचे , सिगारेट ओढायचे या व्यक्तिगत पातळीवरील टिकेपर्यंत पोचला ! नेहरू हिंदू विरोधी होते , मुस्लिमांचे हित पाहणारे होते ,असे आरोप करत करत , तो थेट नेहरू हिंदूच नव्हते तर ते चक्क मुस्लिम होते ,अशा नीचपणा पर्यंत देखील पोचला. नीचपणाची ही सर्वोच्च पातळी एवढ्या वेगाने, अल्प काळात गाठली गेली ती गेल्या साठ-सत्तर वर्षात पोसलेल्या द्वेषाच्या शिदोरी मुळेच !
आधुनिक भारताचे निर्माते , ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेवून साडेनऊ वर्ष कारावास भोगला, संसदीय लोकशाही ची पायाभरणी या देशात करून , विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रोवली. अशा जागतिक स्तरावरील महान तत्वज्ञ लोकशाहीवादी नेत्याची अशा स्वरुपात निंदा नालस्ती खूप उद्विग्न करणारी आहे आणि सर्वात उद्विग्न करणारी बाब म्हणजे ,ज्या ठिकाणाहुन ही छेडछाड झालेली आहे,त्याचा आयपी एड्रेस हा स्वाभाविक पणे नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय माहिती केंद्र या केंद्र शासनाच्या संस्थेचा आहे . याचाच अर्थ सरकार सरकारी यंत्रणाचा वापर करून आपला नेहरू द्वेषाचा मुळ एजेंडा बेमुर्वतपणे राबवीत आहे.
जवाहरलाल नेहरुंचे आजोबा गंगाधर नेहरू यांचे मुळ नाव गियासुद्दीन गाझी होते आणि त्यांनी इंग्रजांच्या भीतीने हिंदू धर्म स्वीकारला , अशी धादांत खोटी , खोडसाळपणाची माहीती, जवाहरलाल नेहरू यांच्या विकिपीडिया वरील पेजमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेहरूंना या पद्धतीने आवर्जून लक्ष्य करण्या पाठीमागची कारणे खूप स्पष्ट आहेत.
सुधारणावादी,आधुनिक विचाराचे पं. नेहरू सनातनी लोकांना पंतप्रधान म्हणून नकोच होते. म्हणून तर पटेल यांच्या ऐवजी नेहरू पंतप्रधान झाले , ही महात्मा गांधींची चूक असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. या देशातील संसदीय लोकशाही, सर्वसमावेशक राजकीय व्यवस्था, धर्मनिरपेक्षता ही गांधी - नेहरू - आंबेडकर युगातील मुल्ये आहेत. ही मुल्य भारतीय जनमानसात खोलवर रूजलेली आहेत, ज्यामुळे धर्माधिष्ठित राजकारण करणारे स्वातंत्र्यानंतर सातत्याने सत्तेबाहेर राहीले. आज सत्ता येऊनही मुल्ये डावलता येत नाहीत, उलट विदेशात गेल्यावर गांधी -नेहरू यांच्या मुल्यांचे आम्हीही पाईक आहोत म्हणून वरकरणी का होईना पण, सांगण्याची वेळ सध्याच्या सत्ताधा-यांवर आली आहे. यातून आलेले वैफल्य त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत.म्हणून गांधी नेहरूंचे विचार संपवणे किंवा त्यांची बदनामी करणे किंवा त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करणे, याचे प्रयत्न चालू आहेत. सध्या नेहरूंविषयी अवमानकारक मजकूर पसरविण्याचा झालेला हा प्रयत्न त्या मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. या प्रयत्नातून त्यांना अनेक गोष्टी सिद्ध करायच्या आहेत. प्रथम नेहरूंच्या चुकामुळे देशाचे वाट्टोळे झाले म्हटले गेले ,त्यानंतर नेहरू देशद्रोही होते ,नेहरू मुस्लिम धार्जिणे होते आणि मुळात नेहरू मुस्लिमच आहेत कारण मुस्लिम देशभक्त नसतात. हाच कुतर्क मनात बाळगून भारतीय समाजात सोशल मेडिया वरून मते बनविणाऱ्या नथुरामला राष्ट्रपुरुष मानणाऱ्या विद्वान पिढीला अधिक शहाणे करण्याचा हा लज्जास्पद प्रकार आहे .
पंडित जवाहरलाल नेहरू हिंदूही होते शिवाय ते जन्मानं ब्राह्मण आणि पंडीतही होते. सनातन्यांची हीच मुख्य अडचण होती. शेवटी त्यांनी नेहरु ब्राह्मण तर नाहीतच तर ते हिंदुही नाहीत, असा कुत्सीत प्रसार सुरू केला आहे. ब्राह्मणी हिताचे रक्षण करणारा ब्राह्मणेतरही राजकारणात सोईचा असला की वापरून घेतला जातो आणि ब्राह्मणी तत्वज्ञानाच्या विरोधी भुमिका घेणा-या ब्राह्मणाला तर आवर्जून बदनाम केले जाते. कधी ज्ञानेश्वराप्रमाणे छळले जाते, आगरकरांप्रमाणे बहीष्कृत करून त्यांची जीवंतपणी प्रेतयात्राही काढली जाते, दाभोळकरांप्रमाणे हत्याही केली जाऊ शकते ! मग अहिंदू किंवा मुस्लीम ठरवून नाहक बदनामी करणे ही तर सनातन्यांसाठी खूप सोपी गोष्ट आहे. दुसरी बाब अशी की महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू ही सॉफ्ट टार्गेट आहेत . कारण अशा प्रकारे आरोप गांधी नेहरूंवर केले तरी कोणाच्या तोंडाला काळे लावले जात नाही किंवा कुठल्या रिसर्च सेंटर वर हल्ला होत नाही, किंवा कुठे मोर्चा निघत नाही, याची जाणीव बेछूट आरोप करणा-या नक्कीच आहे. त्यामुळे नेहरूंवर टिका करण्यात संघ आणि तथाकथित विद्रोही देखील गळ्यात गळे घालून असतात. नेहरू जन्माने ब्राह्मण म्हणून दलितांनी शिव्या द्यायचा, ब्राह्मणांनी ते मुसलमानांचे लांगुनचालन करतात असा आरोप करून शिव्या द्यायचा आणि ते थेट मुस्लीम आहेत म्हणून संभ्रम निर्माण करायचा, समाजवाद्यांनी त्यांना एकाधिकार शाहीचे पुरस्कर्ते किंवा लोकशाहीविरोधी म्हणावे, डाव्यांनी त्यांना भांडवलदारांचे हस्तक म्हणून टिका करावी, तर भांडवलदारांनी त्यांना समाजवादी म्हणावे, संघाने मुस्लीमांचे हित पहाणारे म्हणावे तर मुस्लीमांनी त्यांना कट्टर सनातनी हिंदू म्हणावे!! आधुनिक भारताच्या निर्मीतीचे महान कार्य करताना त्यांचे सर्वच विरोधक एक होऊन टिका करतात तेंव्हा पंडितजींच्या कार्याचे मोठेपण अधिक खुलून दिसते.
भारतातल्या कांही क्षुद्र मनोवृत्तीच्या लोकांना हा आधुनिक जगातील महामानव कधी समजलाच नाही. नेहरूंच्या राजकीय धोरणावर टीका, टिप्पणी करता येईल किंवा त्यांच्या धोरणाचे समीक्षण होवू शकते आणि अशी टीका लोकशाहीस अधिक प्रगल्भ बनवते. परंतु एखाद्या व्यक्तीच्या जन्मावरून ,वंशावरून,जाती-धर्मावरून टीका सर्वथा गैर आहे. शेवटी कोणी कोणत्या जातीत जन्मास यावं हे कोणाच्याही हातात नाही. अमुक जातीचा व्यक्ती अमुक जातीचा असण्यात, त्या व्यक्तीचे कर्तृत्व काय? तर शुन्य! कोणत्याही व्यक्तीचे मोठेपण हे तो व्यक्ती कोणत्या जातीत किंवा धर्मात जन्मास आली यावरून ठरत नाही. व्यक्ती मोठी ठरते ती तीच्या विचाराने आणि कर्माऩे. त्यामुळे विचारांवरील टिका स्वागतार्ह ठरते. ज्यांच्या जीवनात विचारांना स्थान नसते आणि केवळ त्यांचा जन्मच त्यांची उपलब्धी असते, अशा व्यक्तीच ईतरांच्या जन्मावरून टिका करण्यात पुढे असतात, हे आपण जेम्स लेन प्रसंगातही अनुभवले आहेच! जेम्स लेनला विनोद म्हणून माहिती पुरवणारे आणि नेहरूंच्या आजोबाना मुस्लिम ठरविण्याचा नीच प्रयत्न करणारे लोक एकाच मनोवृत्तीचे आहेत. एखाद्या व्यक्तीच्या जन्मावरून किंवा पितृत्वावरून केली जाणारी टिका, उपहास, लेखन अथवा वक्तव्य म्हणूनच हिणकस अभिरूचीच्या मनोवृतीचं प्रतिक असते.
या प्रसंगी उपनिषदातील एक कथा खूप उदबोधक आहे. ज्ञानार्जन करून आत्मशोध घ्यावा म्हणून एक दहा वर्षाचा मुलगा गुरूच्या शोधात निघाला आणि तो गौतम ऋषींच्या आश्रमात पोचला. ज्ञानसाधनेसाठी आलो आहे म्हटल्यावर गौतम ऋषींनी त्याला गोत्र आणि पित्याचे नाव विचारले.तो म्हणाला, पिता कोण आहे हे मला माहित नाही , माझ्या आईनेच माझा संभाळ केला आहे, तिला विचारून मी तुम्हास सांगतो. घरी जाऊन त्याने आईस पित्याचे नांव व गोत्र विचारले तेंव्हा ती म्हणाली " मी तरूणपणी गणिका म्हणून उपजीवीका केली, अनेक पुरूषांशी माझा शरीरसबंध आलेला आहे, त्यामुळे तु कोणाची संतान आहेस, हे मला नक्की सांगता येणार नाही " हा मुलगा गुरूपाशी गेला आणि सांगीतले की माझी आई गणिका होती , तीने चरीतार्थासाठी अनेक पुरूषांशी संग केला असल्यामुळे, माझा पिता नक्की कोण आहे, हे सांगता येणार नाही. गौतम ऋषी या उत्तराने प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यास त्याच्या आईचे नाव विचारले. त्याच्या सत्यनिष्ठेने प्रभावित होऊन त्याला त्यांनी सत्यकाम हे नाव दिले आणि म्हणाले "तुझ्या सत्यकथनाने मी प्रभावित झालो आहे. तुझ्या आईचे नाव जाबाला हेच तुझे गोत्र असेल" हाच तो सत्यकाम जाबाला!
छंदोग्य उपनिषदात सत्यकामाचा उल्लेख सर्वोच्च ब्रह्मर्षी म्हणून केला आहे. याच उपनिषदात सत्यकामाचा गौरव करताना 'जो सत्य बोलतो, तोच ब्राह्मण असतो 'असे गौतम ऋषींनी म्हटले आहे. एका गणिकेच्या मुलाला ब्राह्मण मानून मंत्रदृष्टा ऋषीचा सन्मान देणा-या या भारत देशात, संस्कृतीक राष्ट्रवादाच्या नावाखाली असत्य कथन करणारे दांभिक आज जन्मास आले आहेत, त्यांची ही कृत्ये राष्ट्रीय नीचपणाची आहेत. विचार, ज्ञान, विद्वत्ता, कार्य कर्तृत्व न पाहता जन्म आणि पितृत्व शोधणारे आणि पूर्वजांबद्दल कुत्सित भावनेने अफवा पसरवणारे हे तथाकथित हिंदुत्ववादी लोकच भारतीय संस्कृतीचे खरे मारेकरी म्हणावे लागतील.
राज कुलकर्णी.
हा व्यक्ती ही मोदींचा द्वेष करणाराच दिसतो.
ReplyDelete