बालिश बहु बायकांत बडबडला.............


स्वपराक्रमाच्या प्रचंड मोठ्या वल्गना करणाऱ्या व्यक्तीस अचानकपणे खजील होऊन मौन होण्याचा समय येतो ,तेंव्हा त्याची खूप फजिती होते . विदुर नीती सांगते की, नेतृत्व करणाऱ्या शासकाचे वर्तन आणि बोली स्वबळ समजून असावी आणि सर्वसामान असायला हवी, कथनी आणि करणी मध्ये विसंगती नसावी.
स्वकर्तृत्वाच्या, ,स्वपराक्रमाच्या घोषणांनी आकाशपाताळ दणाणून टाकणारा राजपुत्र उत्तर कुरु सैन्य पाहून अचानक पणे मौन झाला. त्यावेळी त्याची क्षमता त्याला स्वतःच्या मनाच्या आरशात त्याला स्वच्छ दिसलेली होती . एवढा वेळ पराक्रमाच्या मोठ्या गप्पा मारणारा उत्तर बाळाची सत्याचा सामना करताना मात्र बोबडीच वळाली. पराक्रमांच्या घोषणांनी आकाश दणाणून सोडणारा त्याचा आवाज, शौर्याच्या गाथांनी ओथंबून गेलेली त्याची स्वस्तुतीची प्रदीर्घ स्तोत्रे अचानकपणे लोप पावली आणि त्याच्या तोंडातून मोजके दोन चार शब्द बाहेर पडले. स्वपरबळाबळ समजल्यामुळे त्याची ही अशी गलितगात्र अवस्था झालेली असते.
उत्तर हा मत्स्य नरेश विराट राजाचा मुलगा ! याच विराट राजाच्या आश्रयास राहून पांडवांनी अज्ञातवासाचा कालावधी व्यतीत केला होता. अर्जुन म्हणजे ब्रहन्नडा, सैरंध्री म्हणजे द्रौपदी आणि उत्तरा ,जी पुढे अभिमन्यूची पत्नी आणि अर्जुनाची सून झाली, या सर्व बायकांत बसून उत्तर पराक्रमाच्या मोठ्या मोठ्या घोषणा करू लागला, उथळ बडबड
करू लागला ,मात्र भीष्म ,द्रोण ,कर्ण यांच्यासारखे योद्धे पाहून एकदम त्याची वाणी बदलली आणि फजिती झाली . ब्रहन्नडा म्हणजे अर्जून त्याचा सारथी, घाबरून तो तीला म्हणाला, रथ माघारी वळवावा. अशाप्रकारे त्याच्या पराक्रमाच्या मोठ्या मोठ्या घोषणा म्हणजे एखादे 'शिशुभाषण' च जणू !
याचे वर्णन मोरोपंतांनी आर्या या वृत्तात खूप मार्मिक पणे केले आहे.........
कुरुकटकासि पहातां तो उत्तर बाळ फार गडबडला,
स्वपरबळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला .
पुढे हाच उत्तर अंतिम युद्ध्याच्या पहिल्याच दिवशी पांडव सैन्याकडून लढताना शल्य राजाकडून कुरुक्षेत्रावर धारातीर्थी पडला, असे महाभारत सांगते .............
दहावीला असताना कुमारभारतीच्या पुस्तकात अभ्यासक्रमातील कविता म्हणून अभ्यासली होती ,आज अचानक पुन्हा तिची आठवण झाली ,म्हणून आज काव्यदिंडीत ही कविता आपल्या सर्वांसाठी ......
उत्तर म्हणे, 'असें जरि मीं एकाकी लहान, परि सवतें
यश जोडितों चि असता सारथि तरि, कथन मज न परिसवतें ll १ ll
होता परम निपुण, परी त्या ख्यात रणांत सारथि गळाला,
झांको छिद्र भलतसा; अडले म्हणतात 'सार' थिगळाला ll २ ll
कर्णादिकांसि देता समरीं वैराटिकेसरी करिता,
जिष्णुपुढें असुरजनीं कोण्ही वैरा टिके सरी करिता ? ll ३ ll
मिळवा कोण्ही तरि, हो ! धैर्याचा मात्र उदधि सारथि जो,
कुरुभटसमूह पावुनि मज, जेंवि हिमासि सुदधिसार थिजो' ll ४ ll
ऎसे बहुत चि बोले तो बालिश बोल बायकांमाजी,
चित्रपटकटकसें शिशुभाषण येईल काय कामा ? जि ! ll ५ ll
तें परिसुनि एकांतीं पार्थ म्हणे, 'देवि ! कृष्णसखि ! जावें
उत्तरसारथि होवुनि म्यां, त्वां मजवरि कदापि न खिजावें' ll ६ ll
त्या उत्तरासि सांगे, 'सारथ्य बृहन्नडा करिल; यातें
सूत करुनि, विजयानें नेले बहु खांडवीं अरि लायातें' ll ७ ll
कुरुकटकासि पहातां तो उत्तर बाळ फार गडबडला,
स्वपरबळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला ll ८ ll
बोले, 'बृहन्नडे ! हें कुरुबळ कल्पांतसिंधुसें गमतें,
ने रथ पुरात, माजें मन नयन हि पाहतां बहु भ्रमतें ll ९ ll
दुर्योधन, दु:शासन, कर्ण, कृप, द्रोण, भीष्म ज्या कटकीं
त्यांत मरेन चि शिरतां, काट्यांवरी घालितां चिरे पट कीं' ll १० ll
— कवी मोरोपंत
महाभारतातील एका प्रसंगावर आधारित कविता ,नितांत सुंदर आहे , 'सारथि गळाला' आणि ''सार' थिगळाला' या शब्दातून मोरोपंतांनी जी श्लेष साधला आहे ,तो खूप मार्मिक आहे.
रामायणात जे आढळून येते ते समाजात कुठे पाहायला मिळत नाही म्हणतात ,कारण रामायण आदर्शवाद मांडते. पण महाभारत मात्र तसे नाही ! महाभारतात ते सर्व आहे ,जे आजही समाजात आपल्याला पाहायला मिळते. प्रसंग तेच असतात ,फक्त पात्र बदलतात. म्हणूनच अशा ग्रंथांच वाचन ज्ञानवर्धनासाठी महत्वाचे असते .
राज कुलकर्णी

Comments

  1. घाटगे, माने, पिसाळ, शिर्के, मोरे, निंबाळकर, घोरपडे ही स्वराज्य द्रोही घराणी आहेत. ही घराणी चाटू आणि लालची होती. आणि परकीय लोकांची धुनी धोत त्यांना फितूर होत स्वराज्य सेवकांना दगा देत आणि त्यांचा घात करत असत. आताच्या पिढ्या दोषी नाहीत मात्र आताच्या पिढ्यांनी महिमा मांडणं न करता चूक कबूल करावी.

    ReplyDelete

Post a Comment