तुळजापूरची तुळजाभवानी !


मानवी वृत्ती आणि विविध दैवतांची रूपे यांचा अतिशय जवळचा संबंध आहे.कदाचित चरचर सृष्टी व्यापून टाकणार्‍या दैवतांनी मानवी मनावर अधिराज्य गाजवून मानवाच्या चिंतनात खोल रुतून बसेल असे स्थान निर्माण केले ते यामुळेच ! सत्व, रज आणि तम या गुणांनी युक्त असणारा समाज आणि मानवी समूह या तीन गुणांच्याच आधारे उत्क्रांत होत आलेला आहे. त्यामुळे विकासाच्या प्रक्रियेत ज्या प्रमाणे सात्विकता वृद्धिंगत होत गेलेली दिसते, त्याचवेळी संघर्षाच्या कालखंडात तामसी वृत्ती हीच शौर्याचा आणि पराक्रमाचा मूलाधार बनलेली दिसून येते. म्हणूनच आदिमाया, आदिशक्ती, आदिमाता या स्वरुपात शक्तीदेवतेचे पूजन केले जाते.
महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तीपीठ मानली जातात. त्यात तुळजापूर हे आदिशक्तीपीठ म्हणून ओळखले जाते, तर माहुरची रेणुका, कोल्हापूरची अंबाबाई आणि अर्धे पीठ म्हणून वणी येथील सप्तशृंगीचे वर्णन अध्यात्मिक परंपरेनुसार केले जाते. या सर्व पीठात तुळजापूरच्या तुळजाभवानी या शक्तीपीठाचे महत्व सर्वात जास्त आहे ! कारण ती खर्‍या अर्थाने महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे ! कारण ती शक्तीदेवता आहे आणि प्रत्यक्ष महिषासुर मर्दिनी आहे !
बालाघाट डोंगर रांगांना यमुनाचल या नावाने ओळखले जाते, हे यमुनाचल नाव ‘यम्मन गुड्डू’ या कन्नड नावाचे संस्कृतीकरण आहे. म्हणूनच ही देवता यल्लमा, अम्मा, अंबा ,यमाई, मातंगी, रेणू अशा कित्येक नावांनी देखील ओळखली जाते. शक्तीची उपासना ही मानवी समूहाच्या संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेतील सर्वात आदिमकाळापासून आढळणारा उपासना संप्रदाय आहे. जगभरात दैवते वेगवेगळी असतील परंतु मानवाला शक्तीसंपादन करण्याची ओढ नैसर्गिक आहे ! सामर्थ्यवान, शक्तिमान, बलशाली व्हावे आणि शत्रूंवर विजय संपादन करावा यासाठी त्याच्या मनात नित्य वास करणारी देवता ही शक्ती देवताच असणार यात शंकाच नाही !
तुळजाभवानीच्या या शक्तीदायिनी, महिषासुर मर्दिनी आणि दुर्गेच्या रूपाने अनेकांना प्रेरणा दिलेली आहे. आद्य शंकराचार्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेक संत, महापुरुष, राजे-राजवाडे, वीर पुरुष यांनी अदम्य उर्जेचा स्रोत या स्वरूपात प्रत्यक्ष आई तुळजाभवानीचा आशीर्वाद अनुभवलेला आहे. तिचे वर्णन एका अर्थाने वात्सल्य भावनेतून करून ती माता, जगन्माता, आई, अम्मा, अंबा, जगदंबा, अंबिका या नावाने ओळखली गेली आणि त्याचबरोबर शक्तीदायिनी म्हणून असणारे तिचे सामर्थ्य व भक्ताला संहारक शक्ती प्रदान करण्यासाठी ती दुर्गा, भवानी, महिषासुरमर्दिनी, चामुंडा, चंडिका, काली, महाकाली, तारा, छिन्नमस्ता, भुवनेश्वरी, धूमावती, भैरवी, हिंगुला या विविध नावाने ओळखली जाते. शाक्त, कपालिक, नाथ, दसनामी, संन्याशी, गोसावी नागा, तंत्रोपासक, अशा विश्व व्यापक साधना परंपरेला कवेत घेण्याचे काम गेल्या हजारो वर्षांपासून तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील ,मंदिर परिसरातील, इथल्या मठ-मंदिरातील देवतांच्या पुजाविधीतून, साधनेतून सातत्याने होत आलेले आहे ! भारतभर लोकप्रिय झालेल्या भक्ती संप्रदायातील समर्पण भाव आणि त्याचबरोबर शक्ती संप्रदायातील कठोर उपासना याचा सुवर्ण मध्य इथल्या प्रथा, परंपरा, रूढी, पूजाविधीमध्ये निरंतर आढळून येतो.
अष्टभुजा असणारी शिरावर सयोनीशिवलिंग धरून करून महिषासुराचे मर्दन करणार्‍या या मूर्तीच्या हातात त्रिशूल, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र असून एका हातात महिषासुराची शिखा तिने धारण केली आहे. डाव्य उजव्या बाजूला चंद्र आणि सूर्य हे शाश्वत अस्तित्वाची प्रतीके आहेत. ही मूर्ती चल असून भाद्रपद वद्य नवमी ते सर्वपित्री अमावास्या अर्थात भाद्रपद अमावस्या, अश्विन शुद्ध एकादशीपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आणि त्यानंतर पौष शुद्ध द्वितीयेपासून सप्तमीपर्यंत शेजघरात निद्रिस्त असते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी या कालावधीत शारदीय नवरात्र महोत्सव तर पौष शुद्ध अष्टमीपासून पुढे नऊ दिवस शाकंभरी नवरात्र महोत्सव असतो. नवरात्राची ही कल्पना मूळ वैष्णव प्रभावातून आली असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. असे असले तरी तुळजाभवानीचे नवरात्र हे पूर्णतः अवैदिक आणि त्यातील प्रामुख्याने कृषी संस्कृतीशी निगडीत असणार्‍या प्रथा, परंपरांनी आणि पुजाविधीनी सजलेले आढळून येते.
अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे शारदीय नवरात्राचा पहिला दिवस ! मृदा (माती), विविध धान्य बीजासह सजल कलश पूजनाचा विधी असतो. यालाच आपण घटस्थापना म्हणतो. घटस्थापना करून नवरात्राची सुरूवात होते. ही खर्‍या अर्थाने सृजनाची पूजा होय ! कारण यात मृतिकेची पूजा असते. मृतिका ही माता या शब्दाशी साधर्म्य सांगणारी आहे आणि घट हा एका अर्थाने मातृशक्तीच्या गर्भाशयाचे प्रतीक आहे. सृजनशक्ती ही जशी मृतिकेची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, त्याचप्रमाणे गर्भाशय हे नवनिर्मितीचे पवित्र प्रतिक आहे. शक्तीची उपासना ही संतानदायी सामर्थ्यावर आधारलेली असते. कारण आजही संतती हीच संपत्ती आणि शक्ती सामर्थ्याचे प्रतिक म्हणून ओळखली जाते. देवीच्या नवरात्रातील नऊ दिवस चालणारे विविध पूजाविधी आणि नैमित्तिक उपासना यात सृजनशक्तीचे मंगलदायक आणि मंगलकारक स्वरूप स्पष्ट होते. ललिता पंचमी, षष्टी, दुर्गा सप्तमी आणि दुर्गाष्टमी या दरम्यानही याच प्रकारचे विधी नवरात्रात केले जातात. महानवमीचा उत्सव हा अजाबळी या विधीने केला जातो. यालाच बकरा बलिदान असे म्हणतात. महिष अर्थात बकरा हा महिषासुराचे प्रतीक ! त्याचा संहार म्हणून नवमी साजरी केली जात असली तरी महानवमीचे सर्व पूजाविधी आणि संस्कार हे शौर्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणून पाहिले जातात. देवीच्या प्रदक्षिणापथ हा कुंकूमिश्रीत पाण्याने भरून टाकला जातो. वास्तविक कुंकू हे जसे सौभाग्याचे प्रतीक म्हणून पाहिले जाते, तसेच ते रक्ताचे देखील रूप आहे. मानवी रक्त हे शौर्याच्या अनुषंगाने पाहिले जात असले तरी मानवी रक्ताचा संबंध हा युध्दाशिवाय येतो तो सृजनाच्या अनुषंगानेच. स्त्रीयोनीचे रजस्वला होणे अर्थात स्त्रीयांना पाळी येणे यामधील रक्तस्त्राव हा सृजनाचे प्रतीक म्हणून समोर येतोे. कारण स्त्री रजस्वला होणे म्हणजे तिच्यात संतानदायी सामर्थ्य आल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंदिराभोवती असणारा कुंकाचा सडा हा एकाचवेळी युध्दातील पराक्रमाचा शौर्याचा आणि त्याचबरोबर सृजनाच्या उत्सवाचा मानबिंदू अधोरेखित करणारा आहे.
तुळजापूरची तुळजाभवानी ही शस्त्रधारिनी आहे आणि ती असुरांचा संहार करणारी आहे. म्हणूनच ती क्षात्रदेवता आहे. ती क्षत्रीयांना प्रेरणा देणारी आहे कारण युध्ददेवता देखील आहे. नवरात्र हा नऊ दिवस चालणार्‍या युध्दाचे प्रकटीकरण आहे. त्यामुळे तिच्या पुजाविधीत अनेक रणवाद्यांचा समावेश आहे. तुळजाभवानीच्या गाभार्‍यात या दरम्यान वाजविण्यात येणारे संभळ, नगारा, तुनतुनं ही वाद्ये रणवाद्याशी साधर्म्य सांगतात. नैवेद्यातील पदार्थ स्वाभाविकपणे क्षत्रियांच्या आहारातील मांसाहाराचे म्हणजेच तामसी आहाराचे महत्व स्पष्ट करणारे आहेत. महाराष्ट्र हा प्रदेश लष्करी जमातींचा देश आहे. महाराष्ट्रातील सर्वच जातीचे लोक वृत्तीने क्षत्रिय आहेत. याचाच उल्लेख काही संशोधकांनी ‘मार्शल रेसेस’ असा केलेला आहे. क्षात्रवृत्ती, युध्दखोरी याचा संबंध शौर्य आणि पराक्रमाशी तर आहेच, शिवाय तो तामसी वृत्तीचा निदर्शक आहे. म्हणून तुळजापूरच्या सर्व पुजार्‍यांना आणि त्याचबरोबर तुळजाभवानीच्या भक्तांना मांसाहार निषिध्द नाही, तर तो अनिवार्य आहे.
समाज मानसशास्त्राच्या अनुषंगाने पाहिले तर समाजाला युध्दाची, पराक्रमाची व शौर्याची प्रेरणा देण्याचे काम तुळजाभवानी मंदिरातील अनेक विधींनी केलेले आहे. प्राचीन काळात सैन्याची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नसे. शेतात काम करणारा शेतकरी हाच त्यावेळी सैन्यातील सैनिक असायचा. त्यामुळे सैनिकांच्या मनाची जडणघडण खंबीरपणे व्हावी व रक्त पाहून त्यास युध्दाची प्रेरणा मिळावी, त्याच्यातील क्षात्रवृत्ती सतत जागृत रहावी, यासाठी अशा पुजाविधींचे आणि प्रथेचे महत्व तुळजाभवानीच्या उपासनेदरम्यान अधोरेखित केले असावे. कारण सतत रक्त पाहिल्याशिवाय क्षात्रवृत्तीची जोपासना मानवी मनात होणे अशक्य आहे. युध्दासाठी आवश्यक असणारा उन्माद हा मानवी मनात निर्माण व्हावा यासाठी सुध्दा तुळजाभवानीच्या पुजाविधीमध्ये आवश्यक ते सर्व घटक आढळतात. ‘महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण’ या ह. श्री. शेणोलीकर आणि प्र. न. देशपांडे यांच्या ग्रंथात १८ व्या शतकापर्यंत तुळजापुरातील तुळजाभवानीच्या पुजाविधीमध्ये मद्याभिषेकाची प्रथा असल्याचे म्हटले आहे. शाक्त संप्रदायात या पुजाविधींना अनन्य साधारण महत्व असले तरी महाराष्ट्राची भावभूमी मध्ययुगीन कालखंडात वारकरी सांप्रदाय, महानुभाव सांप्रदाय, वीरशैव सांप्रदाय, अशा भक्तीसांप्रदायाने भारावलेली असल्यामुळे इष्ट असणारे पुजाविधीचे संस्कार वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत अनिष्ट ठरले असावेत. त्यातूनच पेशवे काळात मद्याभिषेकाची प्रथा बंद करण्यात आली. असे असले तरी तुळजाभवानीचे क्षेत्रपाळ म्हणून ज्या काळभैरव आणि टोळभैरवांचा उल्लेख केला जातो त्या काळोबा आणि टिळोबा या दैवतांच्या पुजाविधीमध्ये आजही मद्य, मांस, मत्स्य याबरोबरच गांजा यासारख्या उन्मादक पदार्थांचा वापर चालू आहे.
तुळजाभवानी मंदीर परिसरात अनेकविध दैवतांचे वास्तव्य आहे. त्यात काळभैरव, टोळभैरव, उन्मत्तभैरव, बटभैरव, रक्तभैरव, अशा एकूण अष्टभैरवांची मंदिरे आहेत. त्याचबरोबर गरीबनाथबुवा मठ, अरण्यगोवर्धन मठ, भारतीबुवा मठ इत्यादी मठे आहेत. पापनाश तीर्थ, मंकावती तीर्थ यांसारखे पाणवठ्याचे देखील ठिकाणे आहेत. तुळजाभवानीच्या पुजाविधीत प्रत्यक्ष मंदिराबरोबरच प्रत्येक मठाचे देखील विविध पूजाविधी यांचा समावेश आहे. कार्तिक महिन्यातील पाडव्याच्या दिवशी काळभैरव मंदिरातून निघणारी भिंडोळी ही प्रत्यक्ष युध्दाची अनुभूती देणारा उत्सव आहे. ज्यामध्ये आगीचा प्रचंड लोळ हा काळभैरव मंदिरापासून तुळजाभवानी मंदिरात आणला जातो.
वैष्णवीकरणाच्या प्रक्रियेत तुळजाभवानीच्या उपासना पध्दतीतील अनेक शब्दांंचा वापर उपहासाच्या अनुषंगाने केला गेला. भवानी हे तुळजाभवानीचे आद्य नाम ! भवानी म्हणजे भवस्वरूप म्हणजेच अग्निस्वरूप. परंतु हे नाव उपहासाने वापरले जाऊ लागले. त्यातूनच भटकभवानी, काय गं भवाने, यासारखे वाक्यप्रचार मराठी भाषेत रूढ झाले. गोंधळ हा तुळजाभवानीच्या उपासनेचा प्रमुख पुजाविधी. प्रत्यक्ष परशुराम हा पहिला गोंधळी. महाराष्ट्राच्या लोककलांचा आढावा घ्यायचा झाला तर सर्वप्रथम नाव घ्यावे लागेल गोंधळाचे. वृत्रासुराला मारल्यानंतर परशुरामाने त्याचे शीर परशुवर खोवले आणि त्याच्या शिरातील स्नायू परशुच्या दांड्याला ताणून बांधला आणि त्यातून जे तंतूवाद्य तयार केले ते आजच्या तुनतुन्याचे प्राथमिक स्वरूप. तुनतुनं हे त्यामुळेच या पूजाविधीतील महत्वाचे वाद्य. तरीही आजच्या भाषेत तुनतुनं वाजविणे याचा अर्थ निरर्थक काही करणे, असा घेतला जातो आणि त्याचबरोबर तुळजाभवानीच्या उपासनेत असणारा गोंधळ हा पुजाविधी आणि तो शब्द उपहासाने अव्यवस्थेचे, अनागोंदीचे प्रतीक म्हणून वापरला जातो. कवडी ही सृजनाचे प्रतीक. तिच्या आकारावरून ती स्त्रीच्या योनीचे प्रतीक ठरते. एकेकाळी सृजनाची ही प्रतीके गौरवाने अलंकार म्हणून वापरण्याची सामाजिक धारणा होती. यावरून तत्कालीन समाजाची उन्नती व आकलन किती वास्तववादी होते, याचा प्रत्यय येतो. सृजनोत्सवाचे प्रतीक असणारे अलंकार अभिमानाने मिरविणे आणि पुजाविधीमध्ये समाविष्ट करून त्याला मांगल्याचे स्वरूप देणे हे तत्कालीन समाजाच्या उन्नतावस्थेचे बोलके उदाहरण. परंतु नंतरच्या काळात पुजाविधीचे अर्थ समजून न घेता केवळ आंधळेपणाने ज्या क्रिया केल्या गेल्या त्यातून मूळ अर्थ लोप पावला आणि स्वाभाविकपणे अभिमानाने मिरविल्या जाणार्‍या सृजनाचे प्रतीक असणार्‍या कवडीला आपण कवडीमोल ठरवू लागलो. तशीच अवस्था परडीची देखील आहे. हातात परडी येणे याचा अर्थ आज भिकेला लागणे असा जरी घेतला असला तरी हातात परडी असणे हे देवीचा निस्सीम भक्त असल्याचे मानले जाते. सर्वच धर्मक्षेत्रे ही तीर्थक्षेत्रे असतात. तुळजाभवानी मंदिरासमोर असणारे कल्लोळतीर्थ हे मांगल्याचे द्योतक मानले जाते. मात्र कल्लोळ हा शब्द देखील संशयकल्लोळ, विचारकल्लोळ या अर्थाने सर्रास वापरला जातो. तुळजाभवानी मंदिराला घालण्यात येणारी प्रदक्षिणा ही खेटा या नावाने ओळखली जाते. मात्र आज खेटे मारणे हा वाकप्रचार कशा अर्थाने समजून घेतला जातो, हे सर्वज्ञात आहे.
मानवी मन विविध उत्सवांनी आनंदीत होते. आनंद हा जगातील सर्वच धर्मसंप्रदायातील मूळ प्रेरणास्त्रोत आहे. तुळजाभवानीच्या पुजाविधींचे आणि प्रथा-परंपरांचे निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येते की, त्यातील प्रेरणांचे प्रमाण हे अलौकिकतेपेक्षा लौकिकतेकडे जास्त झुकणारे आहे. मोक्ष मिळावा, जन्माच्या फेर्‍यातून सुटका व्हावी, अशी अलौकिक मागणी देवीच्या खर्‍या भक्तांत आढळून येत नाही. त्यापेक्षा भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी, धनधान्य मुबलक व्हावे, रोगराई नष्ट व्हावी, संतती प्राप्त व्हावी आणि भौतिक जीवनातील अपेक्षित ध्येये साध्य व्हावीत, अशीच धारणा देवीभक्तांत आढळून येते. मोक्षासारख्या संकल्पनांचे आकर्षण न ठेवता भौतिक जगातील सकाम उपासना ही मानवी जीवनाचे महत्व अधोरेखित करणारी आहे. म्हणूनच तिची उपासना ही मानवी मनाला अधिक उन्नत आणि अधिक शाश्‍वत स्वरूपातील आनंद देणारी आहे. म्हणूनच तिच्या चरणी जात, पंथ, भेदाभेद विसरून दरवर्षी लाखो भाविक नतमस्तक होतात. कारण ती सर्वांची माता आहे, जगन्माता आहे ! अंबा आहे, जगदंबा आहे ! भक्तांसाठी ती वात्सल्याचे प्रतीक असणारी माता आहे. तर संघर्षाच्या कालखंडात संहाराची शक्ती देणारी शक्तीदेवता देखील आहे. ती जगाची शास्ती आहे. म्हणूनच तिच्या मंदिराला दरबार असेही संबोधले जाते. ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. ती सर्जक आहे, संगोपक आहे, आणि संहारक आहे ! मानवी जीवन सतत संघर्षरत आहे. त्यामुळे ही देवता अनादी काळापासून प्रत्येक टप्प्यावर निर्माण होणार्‍या मानसिक, शारीरिक वा सामाजिक द्वंद्वात चराचराला सातत्याने ऊर्जा, सामर्थ्य आणि शक्ती देत आली आहे.
© राज कुलकर्णी, उस्मानाबाद.

Comments

  1. सूंदर विश्लेषण आहे. 👍👍👍

    ReplyDelete

Post a Comment