दादरी आणि गोवंशहत्त्या बंदी कायदा- एक निरीक्षन...
दादरी येथील घटनेने गोवंशसंरक्षण च्या माध्यमातून राबविला जाणारा धर्माध अजेंडा समोर आला. अमुक व्यक्तीच्या घरात गोमांस असल्याच्या संशयावरून त्याचा खून करणे ,ही कृती अत्यंत धोकादायक आहे. वैद्यकीय चाचणीत ते गोमांस नसल्याचेही सिद्ध झाले ,आणि समजा ते गोमांस असते ,तरीदेखील अशी हत्त्या समर्थनीय ठरते काय ? मात्र सत्ताधारी पक्षाचा आशीर्वाद असणारे नेते ,मात्र सर्रास गायीच्या जिवापेक्षा माणसांचा जीव स्वस्त झाल्याची विधाने करत आहेत आणि सरकारी पातळीवरील मौन ,या उन्मादाला ,हिंसेला आपसूकच बळ देणारे ठरत आहे.
एकंदरीत गेल्या सात आठ महिन्यापासून गोवंश हत्त्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीत मानवी वंशाचा विचार करणे बंद झाले कि काय ,अशी शंका घेण्यास वाव आहे . म्हणून या गोवंशाबद्दल असणाऱ्या पूज्य भावनेचे आणि व्यवहारात आलेल्या अनुभवाच्या अनुषंगाने निरीक्षण नोंदविण्याचा प्रयत्न करत आहे .
गाय हिंदुसाठी पवित्र म्हणून म्हणा किंवा भुतदया म्हणून म्हणा किंवा धर्मश्रद्धा म्हणा, शेतकरी गाय कोणीही कधी खाटकाला विकत नाहीत. सांभाळणे होत नसेल तर, आणि पैसे मिळत असतील तरीही ती विकत नाहीत, तशीच सांभाळण्यासाठी कोणालातरी देऊन टाकतात. परंपरेतून कांहीनी हे स्वेच्छेने बंधन स्विकारलेले असते. त्यासाठी कायद्याची गरज नाही. शिवाय आपल्याकडे गाय हि दुभ्त्यासाठी आणि बैल हा शेतकामासाठी पोसतात, कोणीही मांस विक्रीसाठी बैल पोसत नाही .
नव्या सरकारने भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ४८ मधील मार्गदर्शक तत्वांचा हवाला देवून गोवंश हत्त्याबंदी कायदा पारित केला आहे. गोवंश म्हणजे गाय आणि बैल दोन्हीही आले . या कायद्यात गोवंश म्हटल्यामुळे अकार्यक्षम बैलांचे काय करायचे ही मुख्य अडचण आहे. या अनुछेद्दातील तरतुदीबाबत यापूर्वी सर्वोच्च न्यायलयाने कुरेशी वि . बिहार सरकार प्रकरणात ,ही तरतूद भाकड आणि अकार्यक्षम गाय आणि बैलांना लागू नसल्याचे म्हटले आहे ( AIR 1958 SC Page No.731) . मात्र एखाद्या सरकारला असा कायदा करण्याचा अधिकार असल्याचेही नमूद केले आहे. घटनेमधील अनुच्छेद ४८ बाबत विचार केला तर, आपली घटना २६ नोव्हेंबर १९४९ ,पूर्ण झाली तेव्हा देशात केवळ देशी गाई होत्या, विदेशी नव्हत्या. त्यामुळे घटनेतील या अनुछेदात उल्लेख असलेला COW हा शब्द केवळ देशी गाईसाठी आहे असे म्हणता येईल . पण आज देशात विदेशी गाई सुद्धा आहेत ,मग हा कायदा विदेशी गाईंच्या बाबत देखील आहे काय याबद्दल संदिग्धता आहे. भारतीय समाज मान्यतेनुसार केवळ देशी गायच पुजनीय आहे. विदेशी नाही. कारण माझ्या घरी आलेल्या एका वारकरी संप्रदयातील महाराजांनी जर्सी गाईचे दुध पिण्यास नकार दिला होता. त्यांना फक्त देशी गाईचे दुध चालत होते. यावर ते म्हणाले सुद्धा कि केवळ देशी गाईचं पूजन करावे , जर्शी गाईचे नाही .
देशी गायी पासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला तर , महत्वाची बाब अशी की, कोणतीही देशी गाय सरासरी 3 ते 4 लिटरच्या वर दुध देत नाही.गाय असो म्हैस जर रोज कमीत कमी 5 लिटर च्या वर दुध देत नसेल तर ती परवडत नाही. वैरण, पाणी, झाडलोट करायला स्वतंत्र राखणदार ठेवावा लागतो. त्याची मजुरी आणि, शिवाय गाईच्या दुधाला फँट डीग्री व्यवस्थीत मिळत नाही. त्यामुळे ते डेअरी मधे स्विकारले जात नाही. घरगुती वापराबद्दल बोलायचे तर, गाईचे दुध पुरवणी पडत नाही अशी गृहिणींची तक्रार असते. कारण त्यावर साय येत नाही, लोणी तुप मिळत नाही म्हणून लोकही दुधवाल्याजवळ म्हशीच्या दुधाची मागणी करतात. शिवाय दुधवाल्यांना देखील पाणी जास्त घालता य़ेते म्हणून म्हैस संभाऴणे परवडते. महत्वाची बाब ही कि, म्हशीचे दुध जास्त काळ टिकते ,गाईचे त्या मानाने टिकत नाही. यामुळे देशी गाय म्हणजे आतबट्ट्याचा व्यापार ठरतो. एकतर वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे गुरांना पाजायला पाणी मिळणे अवघड झाले आहे . त्यामुळे हल्ली कोणी गुरे ठेवताच नाहीत. पुन्हा पशुखाद्य महाग झाले आहे, आणि महत्वाचे म्हणजे जेसीबी, ट्रँक्टर मुळे बैलापेक्षा कमी वेळात शेतातली सर्व कामे होतात. म्हणून बैल संभाळणे देखील अवघड झाले आहे. काही लोक म्हणतील गाई सांभाळणे पुण्याचे काम आहे , पण पुण्याने आर्थिक नफा काहीच होत नाही,ही वस्तुस्थिती आहे . अगदी काहीजण याबाबत थेट शेतकऱ्यांचा आई वडिलांचा उल्लेख करून म्हणतात कि , भाकड गाय आणि अकार्यक्षम बैलाबबत काय करावे विचारता मग तुमच्या म्हाताऱ्या झालेल्या आई वडिलांना अनाथ आश्रमात ठेवणार काय ? पण महत्वाची गोष्ट अशी, अनाथ आश्रमाचा सर्वे केला तर लक्षात येईल , तिथे राहणाऱ्या कोणाचीही मुले शेतकरी नाहीत आणि फायद्याचे बोलायचे तर फायदा उद्योजक, नोकरदार सर्व पाहतात ,मग शेतकऱ्यांनी फायदा तोट्याचा विचार का करू नये ?
पुण्यात एका एनजीओ तर्फे आयोजित एका शिबिरात सार्वजन चहा पीत असताना , अचानक दुध खराब झाल्याचे समजले म्हणून ,त्यांनी लोकांसाठी बिनदुधाचा चहा ठेवला होता . आपल्याकडे बिनदुधाचा चहा क्वचित पिला जातो ,उलटपक्षी भरपूर दुध घालून केलेला चहा म्हणजे फक्कड चहा समजला जातो . पण त्या शिबिरास आलेले चंद्रपूर जिल्ह्यातील काही सहकारी मात्र खूप कौतुकाने हा चहा पीत होते . सहज बोलत विषय निघाल्यावर त्यांनी सांगितले कि,जंगलातील आदिवासी समाजाचे लोक आवर्जून असा चहा पितात . मी म्हटले त्यांच्याकडे दुध नसते काय ? ते म्हणाले , ते असे मानतात कि गाईचे दुध हे तिच्या वासरासाठी आहे ,आपल्यासाठी नव्हे ,मग आपण का प्यायचे ? हा प्रश्न मला खरेच निर्रुत्तर करणारा होता . प्रत्येक सस्तन प्राण्याचे दुध हे त्याच्या संतती असणार हे सांगण्यास कोण्या वेद शास्त्राची काय गरज ?
गाय ही आमची माता आहे आणि तिच्यात ३३ कोटी देव निवास करतात आणि म्हणून ती वंद्य ,प्रिय आणि पूजनीय आहे आणि तसी ती वंद्य आणि पूजनीय असण्यास कोणाचा काही आक्षेप असायचे काही कारणही नाही. परंतु वंदन आणि पूजन करून गाईच्या भावनेशी मात्र सर्रास खेळले जाते ,ही बाब मला धार काढण्याच्या पद्धती पाहून वारंवार जाणवली ! धार काढण्यापूर्वी खरे गाईच्या वात्सल्य भावनेशी खेळले जाते असेच म्हणावे लागेल . तिचे वासरू पिण्यासाठी सोडायचे ,दोन ते चार मिनिट त्याने पिले कि गाय वात्सल्य भावनेतून पान्हा सोडते . लगेच त्या वासराला खेचत लांब घेवून जायचे आणि सड धुवून धार काढायची . गाईने स्रावलेला पान्हा हा तिच्या वासारासाठीच असतो . शिवाय तिला याची जाणीव होवू नये म्हणून तिच्या समोर पीठ ,कळना किंवा तत्सम पशुखाद्य असणारे टोपले ठेवले जाते. पूजनीय आणि वंद्य असणाऱ्या गाईच्या वात्सल्य भावनेची ही क्रूर चेष्टा सतत होत आली आहे आणि एवढे करूनही तीला अजून वंद्य मानली जाते !
एकदा तर लहानपणी एका नातेवाईकाच्या वास्तुशांतीच्या सोहळ्यास गेलो होतो . तेंव्हा पूजेसाठी गोमुत्र हवे होते म्हणून ते आणण्याचे काम आम्हा मुलांना सांगितले . आम्ही बाटली घेवून शेतात गेलो. शेतातल्या गड्याला घरी पूजेसाठी गोमुत्र हवं असल्याचे सांगितले आणि आम्ही एका आंब्याच्या झाडाखाली थांबलो . तो गडी ती बाटली घेवून गेला आणि जवळपास १५ ते २० मिनिटे त्याने त्या गाईचे जननेन्द्रिय हलवून मिळालेले गोमुत्र आम्हास आणून दिले. तेंव्हा ७/८ वर्षाचा असल्यामुळे गड्याच्या त्या कृतीबद्दल कांही गैर वाटले नाही . पण पूजनीय आणि वंद्य गाईच्या लैंगिक भावनाशी केलेला हा छळ म्हणावा लागेल. आणि हा छळ केवळ पूजनीय गाईच्या वाट्याला येतो , हे वास्तव आहे !
आता नवीन कायदेशीर तरतुदीमुळे , गाई बरोबर गोवंश म्हणजेच बैल देखील आपसूकच पूजनीय आणि वंद्य बनला आहे . परंतु बैल शेतीच्या कामासाठी वापरण्यापूर्वी बैलाच्या कान्या तोडणे नावाचा एका प्रकार ग्रामीण भागात सर्रास चालतो आणि तो बैलांसाठी खूप वेदनादायक असतो. आता त्यासाठी विविध उपकरणे आणि इंजेक्शन उपलब्ध असतील परंतु बैलांच्या लैंगिक भावनांचे वेदनादायक दमन हे कोणत्या पुजनियतेमध्ये अन्युसुत होते ,हे मला आजपर्यंत समजू शकले नाही. नवीन कायद्यानुसार गाय ही माता म्हणून आणि बैल हा गोवंश म्हणून त्याचे संरक्षण करण्याच्या पवित्र आणि मंगलमय कार्यात, त्यांचा असा लैंगिक छळ करू नये म्हणून काही तरतुदी या कायद्यात आवर्जून कराव्या लागतील ! अन्यथा या गोमाता पित्यांचे पूजन आणि वंदन निव्वळ दांभिक पणाचे ठरेल .
मला बाबत विचार करताना एका गोष्टीचे मात्र खूप आश्चर्य वाटले कि , आपल्या देशात गाय पुजली तिला वंद्य मानले जाते , पण आपल्या देशातील गाईंच्या हजार पट जास्त गाईंची संख्या गोमांस खाणा-या कँनडा, नेदरलँड देशात आहे. गोमाता म्हणून खरे तर आपल्या देशात गाईंची संख्या जगात सर्वात जास्त असायला हवी. पण या नव्या कायद्यामुळे भिती अशी आहे की गाय आणि बैल नामशेष होईल की काय? भविष्यात पुजण्यासाठी तर गाय मिळेल की नाही शंकाच आहे ! कायद्यातील शिक्षेमुळे, नको ते झंझट म्हणून लोक गाोवंश संभाळायचे टाळू लागले तर, गाय आणि तीचा वंश कोणी संभाळणारच नाही. आजच शेतक-याला तरी गाय़ बैल सांभाळणे न परवडणारे आहे. भविष्यात तर हे अधिकच कठीण होईल. शिवाय यामुळे बोकड, मेंढा आणि कोंबड्या यांच्या मांसविक्रीवर परीणाम होऊन किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेळी ला गरिबाघरची गाय म्हणतात ,म्हणजे श्रीमंता घरच्या गाईचे अच्छे दिन,गरिबाघरच्या गाईच्या जीवावर संकट !
भाकड असली तरी गाय वंद्य वा पुजनीय आहे म्हणून ती संभाळतील तरी काहीजण पण अकार्यक्षम बैलांचे काय ? हा कायदा म्हणूनच अव्यवहार्य आहे म्हणून रद्द करावा लागेल . नाहीतर याच कायद्यात काही दुरुस्त्या करून सरकारला निदान अशा बैलांना संभाळण्यासाठी अनुदान देण्याची एखादी योजना तरी अंमलात आणावी लागेल. सरकारला गोवंशपालन शाळा काढाव्या लागतील. अर्थात सरकारला हे तसे अवघड नाही कारण बहुमत टिकविण्यासाठी तसा प्रत्येक सरकारला अकार्यक्षम बैलं सांभाळण्याचा अनुभव असतोच ना !
©राज कुलकर्णी .
Comments
Post a Comment