म्यानमार मध्येही प्रकाशपर्वाची सुरुवात.............


भारतात प्रकाशाचा उत्सव दिवाळीची धामधूम असताना कधीकाळी  भारताचाच एक भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मदेशात म्हणजे आजच्या म्यानमार मध्ये देखील प्रकाश पर्वाची सुरुवात झाल्याचे आशादायक चित्र आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सान स्यू कि यांच्या  National Democratic League या पक्षाने एकूण ४९१ जागांपैकी १६३ जिंकल्या असून विरोधी पक्षास केवळ १० जागा मिळाल्या आहेत . आंग सान स्यू कि यांच्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी लढलेल्या जागांपैकी ६७ % जागांवर विजय मिळवणे आवश्यक असून आज त्यांना  ९०% पेक्षाही जास्त जागा मिळाल्या असल्यामुळे आंग सान स्यू कि  यांच्याच हातात सत्ता येणार याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत . याच कारणास्तव त्यांनी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख यांना पत्रे लिहून चर्चेचे आमंत्रण दिले आहे.
अद्यापही निवडणूक आयोगाने एनएलडी पक्षास अधिकृतरीत्या विजयी घोषित केलेले नाही, परंतु देशातील एकंदर स्तिथी पाहता लोकशाही व्यवस्थेसाठी आसुसलेल्या  म्यानमारच्या जनतेने दिलेला कौल निश्चित सनमनित होईल असे आशादायक चित्र सध्या तरी दिसत आहे. कदाचित हा लेख प्रकाशित होईपर्यंत आंग सान स्यू कि यांना पूर्ण बहुमत मिळून त्या विजयी म्हणून घोषित देखील झालेल्या असतील ! 
स्यू कि या म्यानमारमधील जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतिक आहेत. त्या १९८९ ते २०१० या कालखंडात एकूण दहा वर्ष स्थानबद्ध अवस्थेत होत्या. आजपासून बरोबर पाच वर्षापूर्वी १३ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांची साडे सात वर्षाच्या  स्थानबद्धतेतून सुटका झाली होती त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून त्यांनी म्यानमारचे भवितव्य काय असेल याची चुणूक दाखवली होतीच !
भारत आणि म्यानमार यांचा संबंध हजारो वर्षाचा आहे कारण म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश भारताचाच एक भाग होता. बौद्ध साहित्यात स्वर्णभूमी उल्लेख असणारा हा देश लोकमान्य टिळकांच्या 'गीतारहस्य' या ग्रंथाची जन्मभूमी आहे . इंग्रज विरोधात झालेल्या १८५७ च्या बंडाचा प्रमुख नेता  बहाद्दुरशहा जफर (दुसरा) याची समाधी देखील रंगून मधेच आहे. सरावत महत्वाची बाब अशी की स्वतः आंग सान स्यू कि यांचा भारताशी खूप घनिष्ट संबंध आहे. त्यांचे वडील आंग सान यांनी बर्माच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातूनच घेतली होती. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांच्या प्रकाशात आंग सान यांनी बर्मी जनतेच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. जवाहरलाल नेहरू यांचा प्रचंड प्रभाव आंग सान यांच्या राजकीय धोरणावर होता ,एवढेच नव्हेतर १९४० सालच्या रामगढ येथील कॉंग्रेस अधिवेशनात आंग सान बर्मी जनतेचे प्रतिनिधी म्हणून हजर होते.
दुसऱ्या महायुद्धातील घडामोडीत १९४२ साली म्यानमार जपानच्या अधिपत्याखाली आला ,त्यावेळी १ ऑगस्ट १९४३ ला म्यानमार स्वतंत्र झाल्याची घोषणा करून आंग सान यांची युद्धमंत्री म्हणून नियुक्ती केली, पुढे ते पंतप्रधान बनले .बर्मी जनतेच्या भल्यासाठी जपानबरोबर सहकार्याचे धोरण त्यांनी आखले होते. मात्र जपानच्या वाढत्या दडपशाहीला विरोध म्हणून नेहरूंच्या सल्ल्यानुसार त्यांनी इंग्लंड चे पंतप्रधान  क्लेमेंट एटली यांची भेट घेतली. त्यानंतर मार्च १९४७ मध्ये  भारतात येवून जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत पत्रकार परिषदेत म्यानमारच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा याच भारत भूमीवरून केली होती. पुढे एप्रिल १९४७ मध्ये झालेल्या निवडणुकात ' Anti Fascist peoples Freedom league ' या पक्षास २० जागांपैकी १७६ जगावर बहुमत मिळाले होते मात्र त्यानंतर झालेल्या यादवीत १९ जुलै १९४७ रोजी आंग सान यांची रंगून च्या सचिवालयात हत्त्या करण्यात आली. आंग सान यांच्या हत्त्येचे पडसाद अंतरराष्ट्रीय  राजकारणाच्या पटलावर उमटले. भारतीय उपखंडातील जवळपास सर्वच देश त्यावेळी स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होते आणि या पैकी एखाद्या देशातील अंतरिम सरकारच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीची अशी हत्त्या होणे चिंताजनक बाब होती, कारण भारतात देखील त्यावेळी असेच वातावरण होते. जवाहरलाल नेहरूंनी २१ जुलै १९४७ भारतीय जनतेतर्फे आंग सान यांना श्रद्धांजली अर्पण करून बर्मी जनतेस शोक संदेश पाठवला होता.
आंग सान यांची हत्त्या झाली तेंव्हा आंग सान स्यू कि अवघ्या दोन वर्ष एक महिन्याच्या  होत्या! ब्रिटिशांनी ५ डिसेंबर १९४७ जाहीर केले कि बर्माला ४ जानेवारी १९४८ रोजी स्वातंत्र्य देण्यात येईल. त्यावेळी बर्माचे मनोनीत पंतप्रधान थाकीन नू यांनी भारतात येउन जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली आणि बर्मा मधील घडामोडीवर चर्चा केली आणि बर्मा हे भारताशी खास नाते असणारे राष्ट्र स्वतंत्र झाले . तेंव्हापासून म्हणजे १९४८ पासून   १९६२ सालापर्यंत बर्मा  एक लोकशाही राष्ट्र म्हणून कायम राहिले.
याच काळात आंग सान यांच्या पत्नी, आंग सान स्यू कि यांच्या आई  खिन की या बर्माच्या भारतातील राजदूत म्हणून दिल्लीत वास्तव्यास होत्या. साहजिकच आंग सान स्यू कि देखील त्यांच्या बरोबर होत्या आणि दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेज मधून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी संपादन केली. उच्च शिक्षणासाठी पुढे त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात गेल्या. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६९ मध्ये न्यूयार्क इथे गेल्यानंतर १९७२ मध्ये डॉ. मिशेल यांच्याबरोबर विवाह झाला. लंडन विद्यापीठातून १९८५ साली  पीएचडी संपादित केल्यावर त्या भारतात परतल्या आणि दोन वर्ष भारत राहून त्यांनी  सिमला येथील संस्थेतून फेलोशिप पूर्ण केली. त्या भारतात असतानाच त्यांनी महात्मा गांधी आणि जवाहरलाल  नेहरू यांच्या विचारातून प्रेरणा घेवून मायदेशात परतून कार्य करण्याचे ठरवले ,त्यानुसार १९८८ साली त्या पुन्हा म्यानमार मध्ये परतल्या त्या कायमच्याच !
म्यानमार मध्ये परतल्यावर त्यांनी ८ ऑगस्ट १९८८ रोजी लोकशाही साठी 'रायझिंग ८८८८' या घोषणेच्या म्यानमार मधील जनतेमध्ये चैतन्य निर्माण केले . याच वेळी त्यांनी National Democratic League या पक्षाची स्थापना केली मात्र लष्कराने पुन्हा सत्ता हस्तगत करून १९८९ साली आंग सान स्यू कि यांना स्थानबद्धतेत ठेवले ते १३ नोव्हेंबर २०१० पर्यंत. तेंव्हापासून सुरु झालेला त्यांचा लढा आज पूर्णत्वास पोचण्याची आशा निर्माण झाली आहे.
या दरम्यानच्या कालखंडात लष्कराने त्यांनी देश सोडून जाण्याची वारंवार संधी दिली मात्र देशात पुन्हा परतणे अशक्य होईल या कारणामुळे त्यांनी पतीचे अंत्यदर्शन देखील टाळले एवढेच नव्हेतर १९९५ सालापासून त्यांनी त्यांच्या अलेक्झांडर आणि किम या मुलांची भेट घेण्याचे देखील टाळले. त्यांना १९९१ मध्ये जेंव्हा नोबेल पारितोषिक मिळाले तेंव्हा ते त्यांच्या मुलांनी स्वीकारले आणि पारितोषिकाची संपूर्ण रक्कम १.३ मिलियन डॉलर त्यांनी म्यानमारमधील नागरिकांना शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या सुविधा मिळाव्या म्हणून देवून टाकली. तेंव्हापासून आंग सान स्यू कि यांना जगभरातून पाठींबा मिळतो आहे. त्यानंतर १९९३ साली त्यांना जवाहरलाल नेहरू स्मृती पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले . सयुंक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी म्यानमार मध्ये जावून २००९ साली आंग सान स्यू कि यांची भेट घेण्याचा प्रयत्न करूनही जनरल थान स्वे यांनी भेटण्याची परवानगी नाकारली. तेंव्हापासून म्यानमारच्या लष्करावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढू लागला आणि २०१० मध्ये त्यांची स्थानबद्धतेतून सुटका झाली . त्यानंतर त्यांनी  लोकशाही आंदोलनाच्या माध्यमातून जनमानसात स्थान निर्माण केले आणि २०१२ साली झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पक्षाने यश संपादन केले .
जवाहरलाल नेहरूंच्या १२३ व्या जन्मशताब्दी वर्षानिम्मित निमंत्रित व्याख्यात्या म्हणून बोलताना आंग सान स्यू कि यांनी भारत म्यानमार मधील जनतेपासून दुरावला असल्याबद्दल खंत व्यक्त केली. नेहरू माझ्यासाठी प्रेरणेचा चिरंतन स्रोत असल्याचे व्यक्त करून त्या म्हणाल्या नेहरूंनी माझ्या वडिलांना भेट म्हणून दिलेला ड्रेस आजही माझ्या स्मरणात आहे. माझ्या वडलांची हत्त्या झाल्यावर नेहरूंनी माझे पालकत्व स्वीकारून मला आणि माझ्या आईला खूप मदत केली . मी सोळा वर्षाची असताना दिल्लीच्या स्टेशन वर त्यांना  भेटल्याचे मला आठवते. त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाने मला बंदिवासात असताना लढण्याची प्रेरणा दिली. त्यांच्याच विचारांच्या प्रकशात आम्ही आमच्या देशातील जनतेची स्वातंत्र्याची चळवळ पुढे घेवून जात आहोत. खरोखरच भरताने गेल्या कांही वर्षात म्यानमार बद्दल घेतलेली भूमिका पूर्वीच्या भूमिकेच्या विपरीत म्हणावी लागेल. म्यानमार मधील नैसर्गिक वायू व तेलाचे साठे यांच्यावर नजर ठेवून भारताने तिथल्या लष्करी राजवटीला अजिबात नाराज केलेले नाही. त्यामुळे आंग सान स्यू कि बाबत भारताने केंव्हाही म्यानमारच्या लष्करी राजवटीसोबत चर्चा केली नाही आणि स्यू की यांना पाठींबा दिलेला नाही . भारताची ही कृती खरेतर बर्मी जनतेच्या भारताबद्दल असणाऱ्या आस्थेला तडा देणारी आहे.
निवडणुकात विजय मिळवून देखील स्यू कि यांची वाट बिकटच राहणार आहे कारण म्यानमारच्या संसदेतील २५% जागा अद्यापही लष्करासाठी राखीव आहेत. त्यामुळे लष्कराचा हा हस्तक्षेप स्यू की यांना अडचणीचा ठरणार आहे. म्यानमारच्या घटनेतील तरतुदी प्रमाणे स्यू की यांचा विवाह ब्रिटीश व्यक्तीशी झाल्यामुळे त्यांना राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारता येणार नाही. त्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल ,तेंव्हाच त्या राष्ट्राध्यक्ष होवू शकतात.  युरोपियन राष्ट्रांनी १९९० पासून म्यानमार वर निर्बंध लादले आहेत ,जोवर लष्करशाही आहे तो पर्यंत हे निर्बंध उठणे अशक्य आहे आणि याचा सर्वाधिक फटका म्यानमारच्या जनतेस बसत आहे. त्यामुळे स्यू की यांनाच राष्ट्रध्यक्ष केले तरच जगातील राष्ट्रे म्यानमारच्या जनतेसाठी निर्बंध उठवतील याची जाणीव देखील लष्कराला आहेच !
बर्मी भाषेत आंग म्हणजे विजय , सान म्हणजे आश्चर्य ,स्यू म्हणजे संगठन  आणि  कि म्हणजे प्रकाश ! पंडित नेहरूंच्या जनशताब्दी वर्षी म्हणजेच १९८९ साली आंग सान स्यू कि यांना स्थानबद्ध केले होते, नेहरूंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येस १३ नोव्हेंबर २०१० साली त्यांची सुटका झाली आणि नेहरूंच्या १२५ व्या जनशताब्दी वर्षाच्या अखेरीस त्यांच्या पक्षाने विजय संपादित करून देशाने लोकशाही शासनाच्या निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगले आहे. ही घटना म्यानमार आणि भारत या दोन्ही देशासाठी ऐतिहासिक म्हणावी अशीच आहे ! म्यानमार मधील प्रकाश पर्वाची ही सुरुवात म्हणावी लागेल.
राज कुलकर्णी .

Comments