साहित्य, साहित्यिक आणि समाज
साहित्य अकादमीच्या पदाचा राजीनामा देणाऱ्या , पुरस्कार परत करणाऱ्या आणि राज्य सरकारचे इतर पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची संख्या आजपर्यंत पन्नास पर्यंत पोचली आहे, सरकार ने सुरवातीला या बाबीकडे राजकीय दृष्टीकोनातून केलेल्या टीकेच्या अनुषंगाने पहिले मात्र ,एकापाठोपाठ अनेक लेखकांनी घेतलेल्या या निर्णयाची दखल केवळ राष्ट्रीय स्तरावर नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा घेतली गेली. मात्र हा विषय राज्यांचा आहे ,त्यात केंद्र सरकारची कांही जवाबदारी नाही अशी संभावित भूमिका, केंद्र सरकारने घेतली आहे. लेखकांवरील गेल्या दोन वर्षात वाढलेले हल्ले आणि दाभोलकर,पानसरे , कलबुर्गी सारख्या पुरोगामी विचारांच्या लेखकांच्या झालेल्या हत्त्या, त्यावर सरकारचे मौन आणि उलट एका मंत्र्याचे ' लेखकांनी लिहायचे बंद करावे ' असे वक्तव्य ,एकूणच देशातील स्तिथी बिकट बनल्याचे हे प्रतिक आहे.
सत्ताधारी गोटातून पुरस्कारासोबत पैसेही परत करा, आणीबाणी वेळी , दंगली वेळी पूर्वी पुरस्कार परत का दिला नाही ? मग पुरस्कार घेतलाच कशामुळे असले उथळ आणि बाळबोध प्रश्न उपस्थित केले गेले. गेल्या तीन चार दिवसात विविध न्यूज चानेल्स, सोशल मेडिया मधून टीका टिप्पणी भरपूर झाली आहे. काहींनी पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना कॉंग्रेस सरकार गेल्यामुळे वैधव्य आले असल्याची अभिरुचीहीन टीका करून, या लेखकांचा उल्लेख 'विधवा विचारवंत' असा केला. वास्तविक पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना विधवा विचारवंत म्हणणाऱ्या या लोकांनी नवीन सरकार आल्यामुळे कोणाला न्हान येवून ,कोणाच्या सौभाग्यला उधान येवून कोण सवाष्ण झाले आहे ,याची माहिती मात्र सांगितली नाही . कांही काही लोक तर असेही आहेत की ,ज्यांनी या साहित्यिकांच्या साहित्यीक मुल्यांवर देखील न वाचता टीकाटिप्पणी केली. काहींनी पुरस्कार परत करणार्यांचे कौतुक करून पुरस्कार परत न करणाऱ्यांवर टीका केली . खरेतर पुरस्कार परत करण्यास ज्यांनी नकार दिला, त्यांची भुमिका देखील समजून घ्यायला हवी आणि तीचाही सन्मान व्हावा. ज्यांनी निषेध म्हणून पुरस्कार परत केले किंवा राजीनामे दिले त्यांचीही कृती योग्य आहे. राजीनामा देणा-या साहित्यीकांचे स्वागत करताना, राजीनामा न देणा-या किंवा पुरस्कार परत न देणा-या साहित्यीकांवर टीका व्हायला नको . लेखकांवर होणारे हल्ले गेल्या दिडदोन वर्षात गुणाकाराच्या पटीत वाढले आहेत, ही वस्तुस्थिती असली तरी याबाबतचे प्रत्येकाचे आकलन स्वतंत्र असू शकते.या झुंडशाहीचा दडपशाहीचा आणि सरकारच्या मुक संमतीचा निषेध आवश्यकच मात्र त्या निषेधाचा मार्ग कोणता निवडायचा हा ज्याचा त्याचा विवेकपुर्ण अधिकार आहे. ते लेखक आहेत ,मोर्चा काढू शकत नाहीत ,आंदोलने ,धरणे करू शकत नाहीत ,त्यांच्या कडे असलेल्या पुरस्कारास प्रतीकात्मक निषेध म्हणून परत करत आहेत. एवढी साधी गोष्ट न समजून घेण्या इतपत देखील समाज आज सहिष्णू राहिलेला नाही,एवढे राजकीय ध्रुवीकरण गेल्या दोन वर्षात निर्माण झाले आहे. वाचनसंस्कृती आणि वाचक चळवळ संपल्यामुळे ऐकीव बाबीवर उथळ विचार करणारे लोक समाजात वाढले आहेत. फेसबुक ,वाटस अप , ट्विटर वर अजिबात वाचन नसलेल्या भक्तांची संख्या वाढल्याचे हे परिणाम आहेत.
भाजप ,संघ या सारख्या सत्ताधारी विश्वातून पुरस्कार परत देणाऱ्या ,राजीनामा देणाऱ्या या सर्व लेखकांवर ते काँग्रेसी ,समाजवादी आणि डावे असल्याची टीका केली गेली. ही लेखक मंडळी राजकीय दृष्ट्या काँग्रेसी आहे कि समाजवादी कि डावी की मुक्त विचारांची हा विचार वेगळा! मात्र ती भाजप किंवा संघ विचारांची नक्कीच नाहीत .साहित्य ,गीत ,संगीत ,चित्रपट,चित्रकला ,शिल्पकला , नाटय, विज्ञान ,तंत्रज्ञान, संशोधन, अर्थशास्त्र, पत्रकारिता, क्रीडा , समाजकारण , राजकारण, या क्षेत्रात असे उल्लेखनीय कार्य केले आहे की, त्या कार्याला संपूर्ण देशभर आणि जागतिक स्तरावर देखील गौरविले आहे ! असे कर्तृत्व असणाऱ्या २० व्या शतकातील निवडक ५० भारतीय लोकांची यादी काढली तर या यादीतील अशी एकही व्यक्ती आताच्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय व सामाजिक विचाधारेची नाही. साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात पुरस्कार देताना किंवा विविध सांस्कृतिक संस्था वरील नेमणुकीच्या वेळेस , सर्वत्र म्हणजेच राष्ट्रीय व जागतिक स्वीकृती असणारी एकही व्यक्ती सत्ताधाऱ्यांकडे नसणे हे वास्तव आहे. म्हणून FTII,ICHR,ICCR यावरील नेमणुका वरून वाद होतो आणि मग गजेंद्र चौहान यांच्यासारखे कलाकार हेच पुन्हा सत्ताधार्यांच्या सांस्कृतिकतेचे ,कलेचे त्यांना मान्य असलेले व्यक्तिमत्व म्हणून समोर येते! संकुचित विचारसरणीतून सर्वांना कवेत घेणारे आणि वैश्विक दृष्टीकोन असणारे साहित्य कसे निर्माण होणार. जगाचा इतिहास आणि वर्तमान अभ्यासले तर लक्षात येईल की, चित्रकला, साहित्य, नाट्य, नृत्य, या क्षेत्रात जगभरात उदारमतवादी, पुरोगामीच लोक आहेत. कारण द्वेषाची बीजे मनात रूजवून साहित्याचा नि कलेचा बगीचा कधीच फुलवता येत नसतो.धार्मिक तत्वज्ञानात लिप्त संघटना उत्तूंग प्रतिभेचे सत्यान्वेषी साहित्यीक कसे निर्माण करू शकतील? हा भारतातला नव्हे तर जगातील अनुभव आहे !
साहीत्यीकांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुल्य आधुनिक कालखंडात लोकशाही व्यवस्थेने दिलेले आहे. त्यामुळे लोकशाहीच्या अस्तित्वातच साहित्याचे अस्तित्व, आणि त्याच बरोबर साहित्यीकांचे अस्तित्व सामावलेले आहे. त्यामुळे लोकशाहीच्या संरक्षणाची जवाबदारी आणि लढाई साहित्यीकांच्या स्वसंरक्षणाची, स्वअस्तित्वाची लढाई आहे, केवळ पुरस्कार परत देण्याच्या कृती पर्यंत न थांबता ,मुन्नवर राणा यांनी म्हटल्याप्रमाणे लेखनातून जनजागृती करणे अधिक गरजेचे आहे ,हे सर्वच सारस्वतांनी समजून घ्यायला हवे. जगात जीथे जीथे धर्माच्या नावाने राजकारण करणारे सत्ताधिश निर्माण झाले, सत्तेवर तीथे तीथे पहिला हल्ला साहित्यावर झालेला आहे. मध्ययुगातील विचारवंत स्पिनोझा म्हणाला होता ' लोकांच्या जीभेवर नियंत्रण मिळवता आले तर जगातील सर्व राजेशाह्या निश्चिंत होतील ' त्याच्या समोर त्या काळात राजेशाही व्यवस्था होती. सध्याच्या काळात स्पिनोझा असता तर त्यांने जीभेवरील नियंत्रणा ऐवजी साहित्य, अभिव्यक्ती आणि राजेशाही ऐवजी सरकारे हा शब्द वापरला असता.
अभिव्यक्त होणारे मानवी मन आणि ते होण्यास असणारे स्वातंत्र्य, निर्भयी मन ,मुक्त विचार ,सर्व शृंखला ,बंधने, परंपरा, रूढी ,नियम ,चौकटी झुगारून देवून सत्याशी अवगत होणे म्हणजे साहित्य आणि कला ! मग ती चित्रकला ,नृत्य ,नाटय, गीत ,संगीत, शिल्प किंवा इतर कोणतीही असेल. ठराविक पंथाच्या किंवा धर्मविचारांच्या जोखडाखाली दबलेल्या कोणत्याही मानवी समूहाला उत्तुंग साहित्य निर्मिती करणे शक्य झालेले नाही. धार्मिक साहित्य हे साहित्य नव्हे कारण त्यात सर्व जगातील मानवाच्या कल्याणाचा अभाव आहे. म्हणून जगातील सर्व साहित्यिक हे धर्माच्या ,पंथाच्या विरोधात बंड करणारे आढळून येतील. साहित्यिकाला मानवतावादी विचारांची बैठक असावी लागते ,तेंव्हाच सकस आणि सजग साहित्य निर्माण होवू शकते. समाजातील विषमतेविरुद्ध ,अमानुषतेविरुद्ध आणि यांचे समर्थन करणाऱ्या एकूणच व्यवस्थे विरुद्धची बंडखोरी साहित्यातून अभिव्यक्त होते . कारण लेखकाला सत्य सांगण्याचा अधिकार असून तो कोणीही हिरावून घेवू शकत नाही ,त्याचे अविष्कार स्वातंत्र्य अबाधित राहील ,अशी राजकीय स्थिती निर्माण कशी होईल ,ती टिकेल आणि त्या राजकीय स्थितीचे संवर्धन कसे होईल, याची काळजी साहित्यिकांनी घ्यायला हवी ! साहित्यिकांनी चळवळीत काम करावे असा याचा अर्थ नव्हे, पण ज्या चळवळी समाजाला सतर्क ठेवतात ,त्या चळवळीच्या अस्तित्वासाठी मात्र लेखकाने स्वअस्तित्वाचा प्रश्न म्हणून सतत प्रतिसाद द्यायला हवा. संवेदनायुक्त समाजात ,लेखकांना हे कार्य थोडे सोपे आहे ,मात्र ज्या समाजाची संवेदनाच नष्ट झाली आहे ,अशा समाजातील लोकांच्या उध्वस्त झालेल्या आशांना त्यांनी लेखनातून पल्लवित केले पाहिजे. जनसामान्याच्या आशा, आकांक्षा यांचे प्रतिबिंब ज्यांच्या कार्य कर्तृत्वात पडले ,अशी महान मानवतावादी व्यक्तिमत्वे या देशात होवून गेली. त्यांच्या स्वप्नांना समाजात जाग ठेवण्याच काम लेखक करत असतो आणि ते काम लेखकांनी करायला ही हवे . लेखकाने समाज बदलासाठी लिहावे कि नाही ,हा प्रश्न बाजूला ठेवला तरी ,समाज बदलासाठी पोषक वातावरण साहित्यामुळे निर्माण होवू शकते.
साहित्यात समाजातील वास्तवाचे चित्रण थांबले की साहित्य समाजापासून दूर जावू लागते आणि साहित्यिक देखील ! म्हणून
साहित्याची ही ताकद, लेखकांनी ओळखली पाहिजे. केवळ पुरस्कार परत देवून किंवा राजीनामा देवून थांबणे योग्य नव्हे तर सकस सर्वंकष साहित्याची निर्मिती आणि वाचनाची चळवळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण अविष्कार स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या कुजट,धर्मांध ,अमानवी, हिंस्र ,उन्मत्त विचारधारा सत्तेपासून कशा दूर राहतील याची काळजी साहित्यिकांनी, स्वतःच्या अस्तित्वाची काळजी म्हणून घेतली पाहिजे .
दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रांस पूर्ण बेचिराख झाला होता . फ्रेंच साहित्यिक आंद्रे मारोईस याची आणि चर्चिल यांची परिस येथे एका कार्यक्रमाच्या वेळी भेट झाली . मोठा कथाकार ,कादंबरीकार म्हणून आंद्रे यांचा नावलौकिक होता. कथा आणि कादंबरी ऐवजी एखादा विषय फ्रेंच जनतेसमोर अभ्यासपूर्ण मांडा असे चर्चिल यांनी सुचवले पण ते कथा कादंबरी शिवाय काहीच बोलायला तयार नव्हते . ते पाहून चर्चिल म्हणाले " साहित्य संस्कृती महत्वपूर्ण असतेच पण त्यासोबत जबरदस्त इच्छाशक्ती नसेल ,तर संस्कृती रसातळाला जाते" फ्रेंच साहित्यिकाचे डोळे उघडले आणि त्यांनी प्रदीर्घ अभ्यास करून ग्रंथ लिहिला ' Why France Fell' . फ्रांस ने त्यानंतर घेतलेली भरारी , सर्व जगाच्या समोर आहे . साहित्याची आणि साहित्यिकांची ही क्षमता आहे . म्हणून केशवसुतांनी म्हटले आहे'
पद्य पंक्तीची तरफ आमच्या करी विधीने,दिली असे.
टेकुनि ती जनताशिर्षावरी जगउलथूनिया,देवू कसे.
भयमुक्त समाजाची निर्मिती ही लोकशाहीची आणि स्वातंत्र्याची खरीखुरी व्याख्या! अशा समाजाच्या निर्मिती साठी सहिष्णू ,उदार आणि विशाल दृष्टीकोन असणारा मानवी समाज आवश्यक असतो. मानवी समाजाला, मानवी मनाला अशी दिशा देण्याचे काम वाचन संस्कृतीच्या संवर्धनातून आणि सकस साहित्य निर्मित्तीतून साहित्यिकांनी करावे ,जेणे करून धर्माच्या नावावर दडपशाही करणारे, भय पसरवणारे ,स्वांतत्र्याचा संकोच करून , मानवाच्या जीवनविषयक श्रद्धेपेक्षा धर्मश्रद्धेला महत्व देणारे लोक जगात कुठेच सत्तेत येवू शकणार नाहीत .
लेखन .राज कुलकर्णी .
Good
ReplyDelete