आणि नेहरूंनी मुसोलिनी-हिटलरच्या भेटीचे आमंत्रण नाकारले ….
मोंट्रो येथे असताना लोसेल येथे राहणारा एक इटालियन कॉन्सल जवाहरलालजी यांच्या भेटीला आला ,तो मुसोलिनीचा संदेश घेवून आला होता आणि त्याने मुसोलीनीस आपणास भेटण्याची इच्छा असल्याचे कळवले. याचे मोठे आश्चर्य नेहरूंना वाटले, कारण मुसोलिनीची आणि नेहरूंची पूर्वी कधी भेटगाठ झाली नव्हती . मात्र त्यावर नेहरूंनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. कमलाजींचे नुकतेच निधन झाले होते आणि भारतात परतायचे होते १९३६ च्या मार्च महिन्याचा पहिला आठवडा चालू होता. पुढे त्याच महिन्याच्या अखेरीस भारतात परतत असताना पुन्हा एकदा निरोप आला ,आणि हा निरोप रोम मधील त्यांच्या एका मित्रामार्फत आला होता आणि खूप अगत्याने आणि आग्रहाने आला होता. नेहरूंनी याविषयी लिहिले आहे " सामान्य काळ असता आणि काही विलक्षण घडामोडी होत नसत्या तर ,तो तिटकारा बाजूस ठेवून मुसोलिनी ही काय चीज आहे ,ते पाहायला मी गेलो असतो. परंतु त्याचवेळेस तिकडे अबिसिनीयावर इटली ची स्वारी सुरु होती, आणि माझ्या भेटीपासून नानाप्रकारचे तर्क जगात काढण्यात आले असते ,यात शंकाच नाही! फासिस्तांच्या प्रचार तंत्रात त्या गोष्टीचा खूप उपयोग केला गेला असता . इटली पाहायला गेलेल्या कांही भारतीय विद्यार्थ्यांचा आणि इतर पाहुण्यांचा अशा रीतीने प्रचारासाठी उपयोग केला गेल्याचे मला माहित होते. त्यांच्या इच्छेविरुद्ध नव्हेतर त्यांना न कळवता फासिस्त प्रचारार्थ त्यांचा उपयोग केला गेला होता आणि १९३१ मध्ये इटालियन जर्नल मध्ये गांधीजींची खोटी मुलाखत प्रसिद्ध झालेली घटना माझ्यासमोर होती. मी मित्राला कळवले ,वाईट वाटते पण मी येवू शकत नाही . मी पुन्हा पुन्हा नकार पाठवत होतो ,कारण माझा विमान मार्ग रोम मार्गेच होता. रोम मध्ये पोचतात एक बडा अधिकारी एक मोठा लिफाफा घेवून आला ,त्यात मुसोलिनीच्या मंत्रिमंडळाच्या प्रमुखाचे पत्र होते ,तुम्हाला भेटायला मुसोलिनीला आवडेल ,संध्यकाळी सहाची वेळ ठरवली आहे आणि ही भेट फक्त वैयक्तिक स्वरुपाची असेल असेही सांगितले . मी पूर्वी दिलेल्या नकाराची आठवण करून दिली, मात्र त्याने खूप आग्रह धरला , वर्तमानपत्रात कांही येणार नाही खात्री बाळगा असा आग्रह तो धरू लागला . त्या अधिकाऱ्याचा आणि माझा अगदी सर्व शिष्टाचार सांभाळीत एक तासभर वाद चालू होता. बोलता बोलता भेटीची वेळ येवून ठेपली आणि अखेर माझ्या मनासारखे घडले. मुसोलीनिकडे टेलिफोन वरून संदेश धाडण्यात आला कि मी येवू शकत नाही "
सायंकाळी नेहरूंनी मुसोलिनीला पत्र लिहून ,आपण अगत्याने निरोप पाठवला त्याबद्दल आभार परंतु आपल्या भेटीचा योग नव्हता याबद्दल खेद वाटतो असे कळवले आणि नेहरू भारतात परतले.
पुढे १९३८ साली, युरोपात असताना ,नाझी सरकारने जर्मनीला भेट देण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांचा पाहून म्हणून किंवा खाजगी रित्या ,नाव बदलून गुप्तपणे किंवा जाहीर पाने जेथे इच्छा असेल तेथे जायला मुभा आहे , असे त्या आमंत्रणात नमूद केले होते. पण हे आमंत्रण त्यांनी साभार नाकारले आणि नेहरू जर्मनीत जाण्याच्या ऐवजी झेकोस्लोव्हाकीया या अति दूरच्या देशात गेले,ज्या देशातील जनतेवर मुनिच कराराच्या माध्यमातून हिटलर ने प्रचंड अन्याय करून दडपशाही धोरण अवलंबविले होते . नेहरूंनी प्राग मध्ये या कराराचा निषेध करून ,या छोट्या देशातील जनतेसोबत भारतातील राष्ट्रीय चळवळ ,भारतीय कॉंग्रेस असल्याची ग्वाही त्यांना दिली.
मुसोलिनीची आणि जर्मन सरकार अर्थात हिटलरची भेट नाकारल्याच्या बातम्या जेंव्हा युरोपातील आणि अमेरिकेतील वर्तमानपत्रात झळकल्या तेव्हा, त्याची दखल जगातील सर्वच महासत्तांनी घेतली. त्यावर वर्तमानपत्रातून चर्चा ,लेख ,स्तंभ आणि अग्रलेख देखील लिहिले गेले आणि जग भारताच्या स्वातंत्र्य लढ्याकडे आश्वासक नजेरेने पाहू लागले. स्वातंत्र्य हे उद्दिष्ट असून देखील नेहरूंच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस ने नाझीझम आणि फासीझम यांचा कडाडून विरोध केला. पुढच्या काही वर्षात हिटलर आणि मुसोलीनीचे मानवी संहाराचे रौद्र रूप पाहून त्याविषयी सुप्त आकर्षण असणारया इंग्रज आणि फ्रेंच मुत्सुद्यांनी, विचारवंतांनी , वृत्तपत्रांनी नेहरूंनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. मात्र त्यावेळी जवाहरलाल नेहरू अहमदनगर च्या कारागृहात होते, ते खेदाने म्हणतात " आता नशिबाचा असा काही विलक्षण फेरा आला की, नाझी आणि फासिस्ट वादाच्या विरुद्ध जगात युद्ध चालू असता मी आणि माझ्यासारखे तुरुंगात खितपत पडलेलो आहोत आणि हिटलर मुसोलिनीला जे अदबीने कुर्निसात करीत ,चीनवरील आक्रमणाची जे तारीफ करीत ,ते आज स्वातंत्र्याचा,लोकशाहीचा ,फासिस्ट विरोधाचा झेंडा उंच चढवत आहेत"........................................................................ देशाला पुढे स्वातंत्र्य मिळण्यास ९ वर्ष लागली मात्र भारताचे भविष्य घडविणारा नेता जवाहरलाल नेहरू आहे ,हे जगाने १९३८ सालीच मान्य केले होते !!!!!
राज कुलकर्णी ……।
( संदर्भ - डिस्कवरी ऑफ इंडिया- पान क्र. ५)
Comments
Post a Comment