संगीत मैफिली आणि मी


शास्त्रीय संगीतातले मला काही कळत नाही ,नव्हेतर काही मित्रांनी केवळ मला शास्त्रीय संगीत समजत नाही या एकाच निकषावर मला बादशाही बहाल करून माझे नाव औरंगजेब असे ठेवले आहे. या नावामुळे माझा संबंध थेट मुघल घराण्याशी जोडला गेला असल्यामुळे किराणा ,आग्रा या घराण्याची मला माहिती असण्याचे काहीच कारण नाही. औरंगजेबाची राजधानी आग्रा होती हे मी वाचले असल्यामुळे बहुदा हा त्यांनी सबंध जोडला असावा, असा मी मनात विचार केला. हिरो हिरॉईनवर चित्रीत झालेली सिनेमा मधील गाणी म्हणजेच संगीत असा काहीसा माझ्या औकादीनुसार मी काढलेला निष्कर्ष !
संगीत ही चौसष्ठ कलांपैकी एक कला आहे , प्रत्येक कला मानवी जीवनाला समृद्ध बनवते ,मन आनंदी होते. एवढा अनुभव तर होता , पण तो आनंद मला अध्ययनातून, वाचनातून , कवितेतून ही मिळायचा ! कधी जून्या मंदिरांना भेटी देऊन, गडकिल्यांची सफर करूनही आनंद मिळायचा.
वक्तृत्व या कले बद्दलही जिव्हाळा होता. श्रवण करणे ही देखील कला आहे. ही श्रवणाची कला मात्र आकाशवाणी या श्राव्य माध्यमाशी लहानपणापासून असणाऱ्या आवडी मुळे आपसूकच जोडली गेली होती . त्यातूनच मी आकाशवाणीत प्रासंगिक निवेदक म्हणून काही काळ काम केले. त्यादरम्यान भीमपलासी , बिहाग , दरबारी ,देस , मालकंस , मारवा या नावांचा परिचय झाला . सुगम संगीत आणि अगम्य संगीत ,अशी संगीताची मी सोपी वर्गवारी केली होती .
शास्त्रीय संगीताचे जाणकार असणे ,हे समाजात अतिशय प्रतिष्ठीत पणाचे लक्षण असल्याचा अनुभव मला वारंवार आला होता . तुमचे वाचन किती ,लेखन किती आहे , चांगले कवी असा किंवा लेखक असा , चित्रकार असा किंवा शिल्पकार , तुम्हाला संगीत काळात नसेल तर , तुमचा काही उपयोग नाही . समाजात प्रतिष्ठीत व्हायला कोणाला आवडत नाही ! म्हणून मी ही प्रतिष्ठीत होण्याचा मार्ग संगीत मैफिलीतून जातो ,हे मर्म ओळखले आणि त्याच मोजक्या शिदोरीवर, मी हि प्रतिष्ठीत असल्याचे इतरांना दर्शविण्यासाठी काही संगीत मैफिलीना हजेरी लावण्याचे धाडस करण्याचा प्रयत्न केला.
एका संध्याकाळी मैफिल असल्याचे समजताच , आता मी प्रतिष्ठीत होणार या भावनेने आनंदून गेलो , कामामुळे उशीर झाला म्हणून , कोट कार्यलयात ठेवला आणि पांढरा शर्ट, पांढरी विजार घालून लगबगीने सभाग्रहात पोचलो. मैफल अजून सुरु नव्हती म्हणून मी आलेल्या लोकांना भेटावे, बोलावे असा विचार करून मैफिलीच्या सभाग्रहात वावरत होतो. अनेक लोक मला पाहून विस्मय कारक नजरेने माझ्याकडे पाहत होते . काही लोक कॉंग्रेस कार्यालयात राणे यांच्याकडे पाहावे तसे , माझ्याकडे पाहत होते . काहींनी तर माझ्या उपस्थिती बद्दल विक्रम वेताळ मधील वेताळ जसा विकट हास्य करायचा तसे हास्य केले . मी इकडे तिकडे पाहत होतो. आपले अज्ञान जास्त उघडे पडू नये म्हणून , माझ्या श्रवण रसिकतेच्या क्षमतेचा व्यक्ती माझ्या शेजारी असावा म्हणून माझी धडपड . एरवी बर्मुडा टी शर्ट घालणारे शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला शाल पांघरून आले होते . मी मात्र माझ्या नेहमीच्या फ़ोर्मल ड्रेस मध्ये होतो. पण मी जणू काही कपडे न घालताच मैफिलीला आल्यासारखे हे रसिक लोक माझ्याकडे पाहत होते. मी मात्र त्यांनी अंगावर ओढलेली 'प्रतिष्ठीततेची शाल' कौतुकाने पाहत होतो. एकेक जन आसनस्थ होऊ लागले आणि शेवटी मी माझी त्या मैफिलीतील लायकी पाहून चपलांच्या ढिगाऱ्या जवळ बसलो . दुसरी बाब अशीही होती कि, चपलाशेजारी बसल्यामुळे आपल्याला लवकर सटकता येईल. कांही तरी कानांवर पडावे आणि प्रतिष्ठीतपणाचा कानमंत्र कानी पडावा खूप वेळ आतूर होऊन ऐकत होतो, पण तो गायक गाणे काही सुरु करेना, दहा मिनीटे केवळ तंबोऱ्या चा आवाज आणि तबलजी जवळपास वीस पंचवीस मिनिटे बोटांच्या ऐवजी हातोड्यानेच तबला वाजवत होते.
" काही प्रोब्लेम झाला आहे का?" असे मी शेजारी विचारले असता, ते रसिक सदग्रहस्थ मक्ख चेहऱ्याने माझ्याकडे पाहू लागले . मी एकदम शांत बसलो .हाताची घडी तोंडावर बोट !
जवळपास वीस पंचेवीस मिनिटा नंतर गायकाने तोंड उघडले ,बहुदा हीच मैफिली ची सुरुवात असावी असे मला वाटले, मी ऐकू लागलो. लोक लवकरच डोलूही लागले , थोड्यावेळाने माझ्या शेजारी बसलेले सद्ग्रहस्थ सतत "वाह वाह्ह्ह" म्हणू लागले . त्यांच्याकडे लोक कौतुकाने पाहू लागले. आपलेही कौतुक व्हावे , आपल्यालाही प्रतिष्ठा मिळावी या शुद्ध हेतूने मी देखील अधून मधून "वाह वाह" म्हणू लागलो . केंव्हा केंव्हा लोकांच्या वाह म्हणण्याची आणि माझी वेळ जुळेना. एकदातर चुकून माझ्या तोंडून "वाह" असा शब्द गेला ! मी एकदम घाबरलो आणि गप्प झालो , पण काय आश्चर्य , मी वाह म्हटल्याचे ऐकून ,आणखी ४/५ जन वाह म्हणाले ! मला एकदमच प्रतिष्ठीत झाल्याची जाणीव झाली आणि खूप सुखावलो . पण पुढे हा , प्रतिष्ठीत पणा खूप कंटाळवाणा वाटू लागला. साधरणतः तीसचाळीस मिनिटे झाल्यावर गायक गाणे म्हणयचे थांबले आणि मी माझ्या चपलेकडे पहिले ,ती मला खुणवत होतीच. तेवढ्यात दुसरे गाणे सुरु होण्याची शक्यता मला दिसत होती . उत्सुकतेपोटी माझ्या समोर बसलेल्या रसिक व्यक्तीला विचारले " आता हे दुसरे गाणे संपायला अंदाजे किती वेळ लागेल " ते रसिक एकदम उग्ररसयुक्त चेहऱ्याने माझ्या कडे पाहू लागले. रागाचे आणि शास्त्रीय संगीताचे नाते नव्या पद्धतीने मला समजले. मी त्या रसिकाचा तो उग्ररसयुक्त चेहरा पाहून, माझ्या चपले जवळ सरकलो आणि माझी पत ओळखून मी मैफिलीतून काढता पाय घेतला .
© राज कुलकर्णी .

Comments