देहबोली आणि हावभावाची भाषा ....
दै.प्रजापत्रच्या 'बहुरंग' पुरवणीत ' भाषा आणि समाजजीवन' या पाक्षिक सदरात प्रकाशित झालेला लेख.
देहबोली आणि हावभावाची भाषा ...
जगभरातील मनुष्यांचीच नव्हेतर अनेक प्राणीमात्राची आद्याभाषा म्हणजे देहबोली आणि हावभावाची भाषा! आज भाषेची अनेक रूपे ,अनेक संस्करणे निर्माण झाली आहेत. भाषेची अस्मिता देखील जगभरातील प्रत्येक मानवी समूहात पाहायला मिळते ,मात्र आजही मानव एवढा प्रगत होवूनही देहबोली किंवा आपण ज्यास हावभावाची भाषा म्हणूया, याला पर्याय निर्माण झाला नाही! आणि कधीही होणार नाही.
भाषेवर समाज जीवनाचा मोठा प्रभाव असल्यामुळे ,तो हावभावाच्या भाषेवर तर जास्तच प्रमाणात दिसून येतो. भारतीय व्यक्ती स्वागत करणे, आदर व्यक्त करणे यासाठी दोन्ही हात जोडून नमस्कार करतो, युरोपियन लोक तेाच भाव हस्तांदोलनतून व्यक्त करतात तर जपानी लोक त्यासाठी कमरेतून वाकतात. या प्रकारची देहबोली किंवा हावभावाची भाषा म्हणजे मानवाने शिकलेली सर्वात पहिली भाषा !
मानवी मनाला अभिव्यक्त होण्यासाठी दरवेळी तो भाषेच्या माध्यामतून अभिव्यक्त होईल असे नव्हे ,तर मानवी शरीर सुद्धा अभिव्यक्तीचे साधन बनते आणि मानवी शरीराच्या हालचाली ,हावभाव यातून संवाद घडतो. अगदी लहान मुलाचे बोट पकडून चालणे , हे आधार हवा असल्याची अभिव्यक्ती असते. भूक लागल्यावर रडणारे आणि कोणतीही भाषा न येणारे ते बाळ रडण्याच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असते.
दूरदर्शनवर पुर्वी दर रविवारी ‘मूक बधीर’ व्यक्तींसाठी एक न्यूज बुलेटीन असायचे, त्यातील हावभाव आणि त्यासोबत दिल्या प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्या कित्येकांनी पहिल्या असतील. त्यातील विशिष्ट शब्दांना विशिष्ट अशा हावभावातून प्रकट केले जात असे. मुकबधीर व्यक्तींसाठी हावभावाची भाषाही अनिवार्य म्हणजेच ज्ञानासाठी आवश्यक असली तर दैनंदिन जीवनात आपल्यापैकी प्रत्येक सामान्य व्यक्तीही अशा प्रकारच्या हावभावाची भाषा उपयोगात आणत असतोच. हाताने खुणवून ये म्हणणे ,किंवा जाण्यास सांगणे, मान डोलावून होकार देणे किंवा नकार देणे या क्रिया तर खूप सर्वसामान्य आहेत. पण या शिवाय विविध भावनांचे प्रकटीकरण सुद्धा या माध्यमातून होते.
डोळे मोठे करणे, म्हणजे रागावणे ! यावरूनच डोळे वटारणे ही म्हण प्रचलित झाली आहे. भुवया उंचावणे, ओठांचा चंबू करणे, तोंडात बोट घालणे म्हणजे अाश्चर्यचकीत होणे किंवा जिज्ञासेने पाहणे. नाक मुरडणे म्हणजे नापसंती व्यक्त करणे, खांदे उडवणे म्हणजे आपण अनभिज्ञ असल्याचे दर्शविणे किंवा जवाबदारी झटकणे ! या प्रकारच्या अनेक म्हणी जगातील सर्वच भाषेत आढळतात,यांचा उगम या हावभावाच्या भाषेतच आहे.
प्राचीन भारतीय परंपरेत ६४ कलांचा समावेश आहे ,त्यातील ‘अक्षर मुष्टिका कथन’ ही एक कला आहे, ज्यामध्ये बोटांच्या हालचालीवरून कथा सांगण्याची कला असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. मात्र सर्वसामान्य जीवनात ही कला प्रत्येक व्यक्तीस अवगत असतेच ,कारण अशा कलेचा वापर समाजात संवाद साधण्यासाठी होत असतो.
चेहऱ्यावरील भुवया , डोळे , ओठ , नाक ,हनवटी या सर्व अवयवांची विशिष्ट हालचाल आणि यातून प्रकट होणारे विशिष्ट भाव यातून देखील संवादाची भाषा निर्माण होते. वात्सायनाने 'कामसूत्र' या ग्रंथात 'भ्रूलीला' आणि 'नेत्र पल्लवी' म्हणजेच भुवयांच्या भाषेचा आणि डोळ्यांच्या भाषेचा उल्लेख केला आहे. खरे तर प्रेम या भावनेसाठी भाषा ही कधीच अडसर नसते! परंतू ही भाषा एकमेकांशी परिचित अशा व्यक्तीमधील विशिष्ट प्रसंगी संभाषणाची भाषा असू शकते. विशेषतः हेरगिरी करणाऱ्या गुप्तहेरांच्या संवादाची भाषा याच प्रकारची असते.
जगभरातील प्राचीन संस्कृतीत बोटांच्या आणि हाताच्या विशिष्ट रचनेतून मानवी भावना प्रकट झाल्याची व ती भावना पुढे भाषेत रूपांतरीत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. प्राचीन रोम मधील 'ग्लँडिएटर' या युद्धक्रिडेवर आधारित ,याच नावाचा एक हॉलीहूड चित्रपट मध्यंतरी खूप लोकप्रिय झाला होता. या चित्रपटात पराभूत झालेल्या त्या योद्ध्यास जिवंत ठेवायचे कि मारायचे ,याचा निर्णय राेमन सम्राट जनतेचा कौल घेवून घेत असे. या चित्रपटात ‘हाताची मुठ करून अंगठा आकाशाकडे करणे’ अर्थात ‘थम्स अप’ करणे म्हणजे जीवनदान देणे आणि अंगठा जमिनीकडे अर्थात 'थम्स डाऊन' म्हणजेच मृत्युदंड असल्याचे मानले जात होते. प्राचीन रोम मध्ये 'ग्लँडीएटर' च्या झुंजी होत असतं हे खरे, परंतु खरोखरच असे 'थम्स अप' आणि 'थम्स डाऊन' च्या हावभावावरून असे मृत्यूदंडाचे वा जीवनदानाचे निर्णय घेतले जात असत किंवा नाही, याची माहीत मिळत नाही. परंतु 'थम्स अप' हे चिन्ह आजही जगभरात नवजीवन, सकारात्मकता , समर्थन ,स्वीकृती याचे प्रतिक आहे ,तर 'थम्स डाऊन' हे निषेधाचे प्रतिक आहे. आजही 'फेसबुक' किंवा 'वॉटस अँप' या संवाद माध्यमात 'आवडले' किंवा 'निषेधार्ह' या अर्थाने अशा प्रतीकांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. जपान मध्ये दोन्ही हाताचे अंगठे आकाशाकडे करणे म्हणजे आनंद व्यक्त करण्याचे प्रतिक असून भारतात 'थम्स अप' म्हणजे समर्थन असे मानले जात असले तरीही अंगठा आकाशाकडे करून डाव्या उजव्या बाजूस एकसारखा फिरवणे याचा अर्थ नकार असणे किंवा मान्य नसणे असा घेतला जातो.
'थम्स अप' प्रमाणेच तर्जनी आणि मधले बोट आकाशाकडे करून, हात उंचावून इंग्रजी ‘व्ही’ आकारचे चिन्ह निर्माण करणे , यास विजयाचे चिन्ह म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी १९४१ साली हे चिन्ह दर्शवून दोस्त राष्ट्रांच्या विजयी मोहीमेचे वर्णन केले होते. या अर्थाने 'व्ही' या हावभावाद्वारे विजयाचा आनंद प्रकट होतो. भारतातील अनेक निवडणुकां यत निवडून आलेला उमेदवार असेच ‘व्ही’ चिन्ह घेवून प्रसिद्धी मध्यमाच्या समोर जाताना आपण वारंवार अनुभवले आहे. मात्र उलट्या हाताने 'व्ही' चिन्ह दर्शविणे हे जगातील कांही देशात अपमानास्पद हावभाव म्हणून ओळखले जाते, ऑस्ट्रेलिया मध्ये या चिन्हास ‘दोन बोटांची सलामी’ या अर्थाने अपमान, नकार , निषेध किंवा धिक्कार या भावनेच्या प्रकटीकरणासाठी वापरले जाते. संपुर्ण जगभरात केवळ मधले बोट वरती करणे ,हा हावभाव तर अत्यंत असभ्य शीवीप्रमाणे समजला जातो . भारतात या प्रकारचा हावभाव अश्लील म्हणून समजला जातो आणि भारतीय दंड विधानातील तरतुदीनुसार तो गुन्हा देखील समजला जातो.
जगभरातील विविध देशांच्या सैन्य दलात , अशा हवभावाच्या भाषेला म्हणजेच देहबोलीच्या प्रतीकांना खूप महत्व आहे. मान ताठ ठेवून हाताचा तळवा समोर असताना हात मस्तका जवळ ठेवणे ,यास सल्युट म्हणतात. हा हावभाव आदर, सन्मान, अभिमान, वंदन यांचे प्रतिक आहे. राष्ट्रगीताच्या वेळेस ध्वजाला वंदन करण्यासाठी एक हात सलामीच्या स्वरुपात मस्तकाजवळ ठेवावा लागतो. दोन्ही हात सरळ शरीराशी समांतर ठेवून सावधान अवस्थेत उभे राहणे , हे विनम्रतेचे प्रतिक मानले जाते. शपथ घेताना तळवा जमिनीकडे ठेऊन छातीजवळ अडवा हात धरणे आणि सावधान अवस्थेत उभे राहणे किंवा छातीवर हात ठेवणे किंवा मानेच्या काटकोनात उजवा हात पालथा परंतू पुर्णपणे सरळ ठेवणे ,या सर्व कृती निष्ठेच्या, प्रामाणिकतेच्या प्रतीकाच्या स्वरुपात पहिल्या जातात. जगभरातील सैन्यातील या प्रकारच्या भाषेत किंवा त्यांच्या भावनेच्या प्रतीकांमध्ये एकप्रकारची सुसूत्रता आढळून येते.
हावभावाची भाषा ही प्रत्येक वेळी संवाद विरहीत नसते ,उलट हावभाव आणि संवाद एकत्रीतरीत्या अधिक परिणामकारकता साधतात. मुठ आवळून केलेला संवाद हा आत्मविश्वासाचे प्रतिक मानला जातो. भाषण करताना वक्त्याने मुठ आवळून एखादे वाक्य उच्चारणे, हे अधिक परिणामकारक असते. त्याच बरोबर ‘जय' ही घोषणा निव्वळ शब्दांतून व्यक्त होत नाही तर ती मुठ आवळून हात वरती करून म्हणावी लागते तरच त्यातून अधिक स्पष्टपणे भावना पोचल्या जातात.
आज आधुनिक कालखंडात संवादाची साधने विपुल प्रमाणात निर्माण झाली आहेत. हा संवाद केवळ बोलण्यातून ,वाचण्यातून किंवा लेखनातून होतो असं नव्हे तर, तो मानवाच्या खूप काळापासून सोबत असलेल्या हावभावाच्या भाषेच्या माध्यमातूनच होतो आहे. ज्यामुळे संवादाची परिणामकारकता वाढते आणि भावना खूप स्पष्टपणे पोचतात. आज वॉटस अँप , फेसबुक, ट्विटरवर आढळणारे विविध प्रकारचे संवादचिन्ह किंवा इमोजी आणि त्यांचे वाढते महत्व ,हे या हावभावाच्या भाषेचे आधुनिक संवाद माध्यमातील महत्व स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. कित्येक जण तर वॉट्स अँप वर चांगले एमोजी नाहीत म्हणून हँग आऊट किंवा टेलिग्राम या पर्यायाकडे वळले असल्यची चर्चा एका 'वॉट्स अँप' ग्रुपवर चालू होती. या प्रकारच्या संवाद माध्यमात भुवया उंचावणे, ओठाचा चंबू करणे, तोंडात बोट घालणे, नाक मुरडणे, डोळे लाल करणे म्हणजे रागावणे अशा भावना प्रकट करणारे सर्व प्रकारचे 'इमोजी' आढळतात आणि ते संवादाला अधिक प्रखर आणि अधिक सहज करतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी ज्याप्रमाणे ‘किस ऑफ लव्ह’ चे संवादचिन्ह असते , तसेच नाराज असल्यावर नाक मुरडणारे देखील संवादचिन्ह असते. भावना आणि विचार अधिक परिणामकारक स्वरुपात प्रकट करण्यासाठी हावभावाच्या भाषेचे महत्व आधुनिक युगात ,आधुनिक संवाद माध्यमात अधिक वाढले असल्याची ही एक प्रकारची पावतीच म्हणावी लागेल.
© राज कुलकर्णी.
Great
ReplyDelete