मृत्यूचा गौरव सोहळा ....
मृत्यूचा गौरव सोहळा ...........
जगातील सर्वच धर्म संस्थांमधे जन्म आणि मृत्यू या मानवी जीवनाच्या दोन टोकांभोवती संस्कारांची लटकी पुष्पराशी उभी करण्यात आली आहेत. जन्म किंवा निर्मितीच्या क्षणाबाबत हे तर्कसंगत असले तरी मृत्यूबाबत मात्र भूगोल, संस्कृती, धर्म यांच्या सीमा ओलांडून मृत्युसंस्कारांनी बसवलेले बस्तान मात्र चकित करणारे आहे! धर्मसंस्थांनी 'धर्मासाठी मरण' किंवा बलिदान ही संकल्पना उचलून धरलेली दिसते. यातून मध्यपूर्वेत झालेल्या 'क्रूसेड्स'सारख्या धर्मयुद्धांसाठी निष्ठावंतांची फौज उभी करणे शक्य झाले. यासाठीच कदाचित अब्राहमने आपल्या मुलाचाच बळी देण्याची दाखवलेली तयारी असेल , आपल्या परंपरेतील विविध ग्रंथांतून आलेली राजासाठी, धर्मासाठी बलिदानाची उदाहरणे निर्माण केली असतील आणि घडल्या घटनांना सोयीचा नि आकर्षक असा मुलामा देऊन त्यांना सर्वसामान्यांसमोर सादर करण्यात आले.
धर्मसंस्थांचा कित्ता गिरवत राष्ट्रभक्तीसारख्या संकल्पना मांडणार्यांनीही देशासाठी बलिदानाची संकल्पना मांडली. अर्थात हे एका विशिष्ट नैतिक अथवा व्यवस्थास्वरूप साध्यासाठी त्या त्या व्यक्तीने केलेल्या स्वयंस्फूर्तीने केलेल्या वैयक्तिक त्यागाबाबत असते तर त्याबाबत आक्षेप घेण्याची काही कारणही नाही. परंतु दुर्दैवाने एकदा एखादी कृती उदात्त ठरली की त्याबाबत कोणताही पर्यायी विचार त्याज्यच नव्हे तर निषेधार्ह ठरू लागतो. दुसर्या बाजूने ही कृती स्वयंस्फूर्तीपुरती मर्यादित न राहता तिची सक्ती होऊ लागते आणि ही सक्ती अर्थातच स्वतः सोडून अन्य व्यक्तींवर लादून त्याचा फायदा मात्र आपल्या अथवा आपल्या गटाच्या पदरी पाडून घेण्याचे प्रयत्न सुरू होतात.
मृत्यूच्या गौरवाचे भांडवल करून धर्ममार्तंडांकडून सामाजिक, राजकीय उद्दिष्ट्ये ठरवली जाऊ लागतात. भारतात बव्हंशी नाईलाजाने, किंवा मालमत्तेतला वाटेकरी हटवण्याच्या उद्देशाने आणलेल्या दबावातून निर्माण झालेल्या भारतीय धर्मांमधील सती प्रथेचे आणि संथारा सारख्या व्रताचे केले गेलेले उदात्तीकरण हे साधारणपणे याच स्वरूपाचे दिसून येते. विशेष म्हणजे या प्राचीन अथवा मध्ययुगीन संकल्पनांचा सांधा वर्तमानाशीही अगदी घट्ट जुळतो आहे.
उत्तरप्रदेशातील दादरी येथील एका घटनेत गोमांस भक्ष्य केल्याच्या संशयावरून महंमद अखलाख या व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आली. या घटनेला वर्ष उलटून गेलं असून हत्त्येबाबत न्यायालयात खटला प्रलंबितआहे. यातील रवि सिसोदिया या प्रमुख आरोपीचे नुकतेच किडनीच्या आजाराने निधन झाले. गोमांस भक्षण केल्याचा संशय असणार्या महंमद अखलाखला मारण्याचा आरोप असणार्या रवि सिसोदिया या व्यक्तीचा मृत्यू आणि त्याची अंत्ययात्रा मात्र त्या भागातील समस्त प्रखर राष्ट्रवादी हिंदूधर्मीयांसाठी गौरवाचा विषय ठरली. अंत्यदर्शनासाठी ठेवलेले त्याचे प्रेत हे एखाद्या सीमेवर युद्धात देशासाठी धारातीर्थी पडलेल्या सैनिकाच्या प्रेताप्रमाणे तिरंगी ध्वजात लपेटून ठेवलेले होते. ज्यांनी त्याचे प्रेत तिरंगी ध्वजात लपेटले त्यांनी खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच अखलाखच्या हत्त्येस तोच जबाबदार असल्याचे व त्यानेच अखलाखची हत्त्या केल्याचे मान्य केले, असाच त्याचा अर्थ निघतो. कदाचित या खटल्याचा निकाल लागून त्याची निर्दोष मुक्तता झाली असती तर त्याचेही भांडवल अखलाखच्या समाजाच्या विरोधात केले गेले असते आणि समजा त्यास त्यात सजा होवून फाशी दिली असती तरीही तो शहीद म्हणून गौरवला गेला असताच !
धार्मिक असहिष्णुतेच्या वातावरणात कोणत्याही घटनेचे अर्थ हे धार्मिक विद्वेष वाढविण्यासाठीच काढले जातात. अशा वातावरणात मानवी जीवनाचे मूल्य नष्ट होवून जीवन संपवणाऱ्या मृत्यूचा गौरव सोहळा साजरा केला जातो. असा सोहळा करणा-यांसाठी न अखलाखच्या जीवाची किंमत असते ना त्याला मारणाऱ्या रवीच्या जीवाची किंमत असते !
अखलाखची हत्त्या झाल्यावर संघाच्या 'पांचजन्य' या नियतकालिकात गोमांस भक्षण करणार्या व्यक्तीस ठार मारण्याचा अधिकार स्मृतिसंमत असल्याची मांडणी करणारा लेख लिहिण्यात आला होता. ते निव्वळ रवि सिसोदियाच्या कृतीचे समर्थन नव्हते तर, अखलाखला धर्मशास्त्रातील नियमाप्रमाणे दिलेल्या शिक्षेचे समर्थन देखील होते. यातूनच अखलाखच्या हत्त्येच्या आरोपींना अध्यात्मिक आणि मानसिक बळ देण्याचे कार्य कट्टर जातीय संगठनांनी केले. ज्याची परिणिती होवून अखलाखच्या मारेकर्याची अंत्ययात्रा ‘तिरंगी ध्वजाच्या’ साक्षीने आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणेत राष्ट्रभक्त जमावाच्या साक्षीनं पार पडली.
महात्मा गांधींच्या हत्त्येच्या खटल्यातील गुन्हेगार नथुराम गोडसेआणि नारायण आपटे यांची प्रेते फाशीच्या अंमलबजावणीनंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली असती तर त्यांचे प्रेत भगव्या ध्वजात लपेटून 'हिंदू राष्ट्र की जय' या उद्घोषातच निघाली असती. समजा आज नथुरामची अंत्ययात्रा निघाली असती तर याकूब मेमनच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटीनं अधिक लोक त्यात हजर राहीले असते.मात्र आज नथूरामची अंत्ययात्रा भगव्या ध्वजाच्या ऐवजी तिरंगी ध्वजातच आणि 'हिंदू राष्ट्र की जय' ऐवजी 'भारत माता की जय', या उद्घोषातच निघाली असती!
हिंदू राष्ट्रवाद्यांच्या मृत्यूच्या गौरव सोहळ्यातील भगव्या ध्वजापासून तिरंगा ध्वजा पर्यंतच्या प्रवासास बदललेल्या वातावरणात नवीनच अर्थ प्राप्त झाल्याचं हे लक्षण म्हणावं लागेल. धर्मयोद्ध्याने धर्मकर्तव्य बजावत असताना प्राण घेतले काय किंवा स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले काय ,दोन्ही बाबी गौरवास्पद आहेत. मात्र असे धर्मकार्य पार पडत असताना मृत्यू पावलेल्या धर्म योद्ध्याच्या प्रेतावर धर्माच्या ध्वजाच्या ऐवजी एखाद्या राष्ट्राचा ध्वज असणे, ही बाब त्या राष्ट्राची वाटचाल धर्माधिष्टीत राष्ट्राकडे होत असल्याचे चिन्ह म्हणावी लागेल!
रवि सिसोदिया याच्या अंत्ययात्रेतील गौरव सोहळ्यावरून भारतीय इतिहासाला कलाटणी देणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व भारतात घडलेल्या इलमुद्दीनच्या खटल्याची आठवण येते. लाहोरमध्ये साधारणपणे १९२६ च्या दरम्यान एका उर्दू दैनिकात सीतेबद्दल आक्षेपार्ह मजकूर असणारे लेखन प्रकाशित झाल्यानंतर, कृष्णप्रसाद प्रताप यांनी 'चंपूपती' या टोपन नावाने प्रेषित महंमदाबद्दल त्याच पद्धतीचा आक्षेपार्ह मजकूर असणारे एक पुस्तक लिहिले,जे लाहोरमधील राजपाल या प्रकाशकाने प्रकाशित केले. इलमुद्दीन हा लाहोरला राहणारा अवघ्या १९-२० वर्षाचा सुतारकाम करणारा मुलगा. घरासमोरील मशीदीत या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी जी गर्दी जमली होती, त्यातील मुल्ला मौलवींची भाषणे घोषणा सतत ऐकून इलमुद्दीनने राजपालला ठार मारण्याचे ठरविले. त्याने ६ सप्टेंबर १९२९ रोजी राजपालच्या दुकानात जावून राजपालची हत्त्या केली. या हत्त्येच्या आरोपावरून त्यास अटक होवून न्यायालयाकडून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावेळी इल्मुद्दीनच्या समर्थनार्थ वर्तमानपत्रात अनेक मुस्लीम विचारवंतांचे लेख असेच या पद्धतीने छापले गेले की,प्रेषितांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीस ठार मारण्याचा अधिकार प्रत्येक मुसलमान व्यक्तीस आहे! नव्हेतर अशा व्यक्तीस ठार मारणे हे त्याचे आद्य कर्तव्यच आहे!
इलमुद्दीनच्या वकिलाने देखील इलमुद्दीनच्या कृतीचे समर्थन करताना प्रेषित महंमदांची बदनामी केलेल्या व्यक्तीला ठार मारण्याचा अधिकार इलमुद्दीनला असल्याचा बचाव केला गेला. मात्र हा बचाव अमान्य करून त्याची मृत्यूदंडाची शिक्षा कायम झाली. लाहोर हायकोर्टात हे प्रकरण सुनावणीसाठी असताना इलमुद्दीनचे वकिलपत्र बॅ. महंमद अली जिना यांनी घेतले. मात्र ते इलमुद्दीनला वाचवू शकले नाहीत. या खटल्यात इलमुद्दीनला फाशी देण्यात आली आणि त्याचे प्रेत मिनावली जेलच्या समोर गाढण्यात आले. परंतु मुस्लिम जमातवादी नेत्यांनी त्याचे प्रेत पुन्हा मिळवले व त्याचा प्रचार असा करण्यात आला, दफन झाल्यानंतर पंधरा दिवसांनी कबरीबाहेर काढलेले ते प्रेत आहे त्या अवस्थेत होते व ते अजिबात कुजलेले नव्हते, असा प्रचार करण्यात आला.लाहोरमध्ये इलमुद्दीनची मोठी प्रेतयात्रा निघाली. ज्यामध्ये हजारो लोक जमा झाले. त्याचेही प्रेत हिरव्या ध्वजात लपेटलेले होते. ही अंत्ययात्रा वजीरखान मशिदीसमोर थांबविण्यात आली आणि मियानी साहब, बवहलपूर रोड लाहोरच्या दफनभूमित त्याचे प्रेत दफन करण्यात आले. आज या ठिकाणी एक मशिद बांधलेली दिसून येते. जीला 'गाजी इलमुद्दीन शहिद मशीद' असे म्हटले जाते!
इलमुद्दीनने राजपालची हत्त्या स्वतःहून केलेली नव्हती. तर त्याला तशी हत्त्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले होते आणि तसे करणे म्हणजे प्रेषितांवरील स्वतःची निष्ठा व्यक्त करणे असल्याचे मानण्यात आल्यामुळे तो राजपाल याला ठार मारायला तयार झाला. हत्त्येनंतर खटल्यादरम्यान फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर इलमुद्दीन पूर्णपणे कोलमडला होता. पण त्याच्या कृतीमुळे तयार झालेले वातावरण तत्कालीन राज्यकर्त्यांना पोषक होते. त्यांनी इलमुद्दीनला शहिद घोषित केले. फाशीच्यावेळी त्यांनी केलेली प्रार्थना, त्याचं आत्मत्यागाचे आवाहन या सर्व गोष्टी इलमुद्दीनचा गौरव वाढावा म्हणून मुद्दामहून पसरविण्यात आल्या . पंधरा दिवसानंतर कबरीबाहेर काढलेले इलमुद्दीनचे प्रेत अजिबात कुजलेले नव्हते, ही अफवा मुद्दामहून इलमुद्दीनच्या पाठिशी ईश्वरी शक्ती कार्यरत होती व त्याने राजपालला ठार मारावे किंवा मारले म्हणून प्रत्यक्ष ईश्वर त्याच्याबरोबर होता, हे दर्शविण्यासाठी रचलेल्या होत्या. या खटल्याच्या निमित्ताने महंमदअली जिना सर्वप्रथम कट्टरपंथी लोकांच्या सानिध्यात आले आणि या खटल्यामुळेच जिनांच्या मनावर पाकिस्तान रचनेचा विचार खोलवर रूजला गेला, असे मत जिनांचे चरित्रकार व 'जिना अ मॅन ऑफ डिस्टनी' या पुस्तकाचे लेखक अलेक पद्मसी यांनी नमूद केले आहे.
दादरी हत्त्याकांडातील आरोपी रवि सिसोदिया हा न्यायालयाकडून फाशीच्या अंमलबजावणीने मृत्यू पावलेला नाही. मात्र त्यावरील आरोप आणि त्याच्या अंत्यविधी दरम्यान झालेल्या घटना या इलमुद्दीनच्या अंत्यविधीशी व कृतीशी तुलना करण्यास प्रेरीत करतात. इलमुद्दीन यांस प्रेषितांची बदनामी करणार्या व्यक्तीला ठार मारण्याचा अधिकार असल्याचे मत त्याच्या धर्मातील अधिकारी समुहाने व्यक्त केले होते तर रवि सिसोदियाने गोमांस भक्षण करणार्या व्यक्तीस ठार मारण्याचा अधिकार त्यास प्राप्त झाल्याच्या भावनेतून अखलाखची हत्त्या केली होती, असे मत त्याच्या धर्मातील अधिकारी व्यक्तींचे होते. इलमुद्दीनच्या कृतीचे समर्थन ज्याप्रमाणे मुस्लिम धर्ममार्तंडांनी वृत्तपत्रातून व भाषणातून केले, त्याच पध्दतीचे समर्थन रवि सिसोदिया याच्याबाबत पांचजन्यसारख्या नियतकालिकातून केले गेले. दोघांच्याही अंत्ययात्रांना धर्माच्या गौरवसोहळ्याचे प्रतीक समजून दोघांनाही शहिद उपमा दिली गेली. या दोन अंत्ययात्रेच्या गौरव सोहळ्याची तुलना करीत असताना अंत्ययात्रेचे राजकारण व धर्मकारण किती भयानक असते याचा प्रत्यय अनेक प्रसंगातून येतो. काश्मीरमधील दहशतवादी तरूण बु-हाण वाणी ठार झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला 'शहिद' म्हटलं होतं तर हैद्राबादमधील ६८ दिवस उपवास करून मृत्यूमुखी पडलेल्या तेरा वर्षाच्या एका मुलीच्या आईवडिलांनी स्वत:च्याच मुलीच्या प्रेताची शोभायात्रा काढली! मृत्यू पाठीमागची कृती आणि मृत्यूचा गौरवसोहळा आणि त्या गौरव सोहळ्याचे समर्थन या कृती इलमुद्दीन, रवि सिसोदिया, बु-हाण वाणी वा अनुराधा यांच्या मृत्यूच्या गौरव सोहळ्यात एक प्रकारचे साधर्म्य आहे!
गाईड चित्रपटात राजूचा स्वामी झाल्यावर त्या भूमिकेतून येणारी अपरिहार्य जबाबदारी म्हणून त्याला पावसासाठी उपोषण करावे लागते कारण समाजाने आपल्या विपदेच्या निवारणाचे जोखड त्याच्या खांद्यावर दिलेले असते. राजू हा रवीसारखा, इलमुद्दिनसारखा गुन्हेगार नव्हता, तरीही सामाजिक हिताचे जोखड त्याच्या मृत्यूला वाहावे लागले. 'पुजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा' म्हणताना त्या पानांना, फुलांना स्वतंत्र अस्तित्व नाकारले जात असते. या जगात तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व नसते. जन्मतःच खांद्यावर दिलेले कुटुंब, जात, धर्म, राष्ट्र, भाषा, संस्कार, परंपरा यांच्या स्वरूपात सिंदबादचा म्हातारा तुमच्या खांद्यावर बसलेला असतो. तुम्ही गुन्हेगार असा किंवा राजू गाईड सारखा आपद्धर्म म्हणून स्वामी झालेला साधा माणूस, हा म्हातारा त्याची किंमत तुमच्या मृत्यूनेही वसूल करण्यास मागेपुढे पाहात नसतो.
© राज कुलकर्णी.
Comments
Post a Comment