नवनिर्वाचित अमेरिकन राष्ट्रपती मा. डोनाल्ड ट्रंपजींची मोहीनी

नवनिर्वाचित अमेरिकन राष्ट्रपती मा. डोनाल्ड ट्रंपजींची मोहीनी .....

अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक नुकतीच पार पडली, व्यावसायिक तथा उद्योजक असणारे डोनाल्ड ट्रंप निवडून आले आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बनले! 

अमेरिकेतील सर्व माध्यमांचा अंदाज सपशेल फोल ठरवत डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांना पराभूत केले!
हतिमताईच्या सात प्रश्नात 'नेकी कर दर्यांमे डाल' म्हणून एक प्रश्न आहे. ते रोजे माशांना खाद्य देणा-या दरोडेखोराचे वाक्य असते. दरोडेखोराची माशांना खाऊ घालण्याची एकमेव कृती देवाला आवडते आणि देव त्यास जन्नत मधे जागा देतो म्हणे.अगदी तशीच अवस्था भारतात ट्रंप यांच्याबद्दल आहे. कारण ट्रंप यांनी मुस्लिमांविरोधात केलेली वक्तव्ये त्यांना कांही भारतीयांच्या ह्रदयात स्थान देऊन केली ! भारतात अनेक ठिकाणी ट्रंप निवडून यावे म्हणून होम हवन देखील केले गेले. अर्थात भारतात असे लोक खूप मोजके होते, बहुतांशी भारतीयांची इच्छा हिलरी निवडून याव्यात अशीच होती. कित्येकांना ज्या राष्ट्रपती पदावर वाशिंग्टन , जेफरसन, अब्राहम लिंकन बसले त्या पदावर ट्रंप यांना पाहणे मान्यच नव्हते. मात्र ट्रंप प्रचंड बहुमतांनी निवडून आले! 

दिव्यमराठी दैनिकाच्या १३ नोव्हेंबरच्या रसिक पुरवणीत शशिकांत सावंत यांचा 'मुर्ख म्हाता-याने डोंगर हलवला' या शिर्षकाचा ट्रंप यांच्या विजयाचे आणि माध्यमांच्या अपयशाचे यथार्थ विश्लेषण करणारा लेख नुकताच प्रकाशित झाला. तो सर्वांनी वाचवा असाच आहे.

अमेरिकी माध्यमांना ट्रंप नको होते ,म्हणून माध्यमे जनतेच्या इच्छांना, आशा आकांक्षांना बातमी मध्ये स्थान न देता  स्वतःच्या इच्छांना बातमीचे रूप देवू लागली आणि म्हणून त्यांचा अंदाज चुकला असे वर्णन सावंत यांनी त्यांच्या लेखात केले आहे.ते योग्यच आहे! याच लेखात शशीकांत सावंत यांनी डँनियल काहनमनच्या 'लॉस अव्हर्शन' सिद्धांताबद्दल जी माहिती दिली आहे, ती केवळ ट्रंप यांच्या विजयाच्या आकलनास नव्हेतर आपल्या देशात दोन वर्षापूर्वी झालेल्या सत्ता बदलाच्या  विश्लेषणास  आणि आकलनास देखील अतिशय उपयुक्त ठरते. फक्त आपल्या देशातील माध्यमे अशी तोंडघशी पडली नाहीत कारण  माध्यमें देखील 'लॉस अँव्हर्शन' च्या मानसिकेत होती आणि त्यांच्या तोंडात पुर्वीच सरकारविरोधी कार्पोरेट लॉबीने  घास भरविल्यामुळे त्याची तोंडे जड झाली होती! जी तोंडघशी पडणे शक्यच नव्हते.
 
डँनियल काहनमन हे मुळातच मानसशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि मानवी वर्तणूक आणि अर्थशास्त्र हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. 'लॉस अव्हर्शन' वर त्यांनी संशोधन केल्याबद्दल त्यांना २००२ सालातील अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक सुद्धा प्रदान करण्यात आलेले आहे.

माणूस अर्थव्यवहारात जोखीम पत्करतो. त्या जोखमीचे प्रमाण तो तोटा सहन करण्याच्या क्षमतेवर आधारित असतो. याचा अर्थ स्पष्ट आहे माणसाची वृत्ती ही जेवढा प्रमाणात फायदा आहे, तेवढ्या प्रमाणात तोटा होण्यास प्रतिबंध करणारी असते.म्हणजे रु.१०० कमाविण्यासाठी रु.१०० चे नुकसान होवू नये याचा विचार सातत्याने केला जातो. हा झाला उघड अर्थशास्त्रीय व्यवहार ,परंतु मानवी वर्तणुकीच्या अनुषंगाने रु.१०० चा तोटा आणि रु.१०० चा फायदा याचा मानसशास्त्रीय ताळेबंद मात्र पूर्णतः भिन्न आहे. कारण रु.१०० च्या तोट्यामुळे होणाऱ्या दु:खाची परिणामकारकता आणि तीव्रता ही रु.१०० च्या फायद्यामुळे झालेल्या आनंदाच्या परिणामकारकतेच्या आणि तीव्रतेच्या कित्येक पटीने जास्त असते.

मानवी जीवनात तोटा, नुकसान, वंचितपणाची भावना, उपेक्षितापणा यांचे परिणाम हे अधिक तीव्र असतात आणि यातूनच प्रत्येक व्यक्ती स्वतःला वंचित , उपेक्षित, पिडीत, नुकसान भोगणारा समजत असतो. लहानपणी आमच्या घरी माझ्या आईच्या अनेक मैत्रिणी रोज संध्याकाळी गप्पा मारायला यायच्या. प्रत्येक जन त्यांच्या होणा-या  त्रासाबद्दल आईजवळ सांगून मन हलके करायच्या. कोणाला सासू त्रास देत असायची, कोणाला दीर, कोणाला जावू ,तर कोणी भावजयीचा त्रास सांगायचे. अगदी वडिलांकडे येणारे त्यांचे मित्र देखील भावाचे गाऱ्हाणे सांगत असत ! मला प्रश्न पडायचा, केवळ अन्याय होणारे किंवा ज्यांच्या वर अन्याय होतो ,असेच लोक आपल्या घरी का बरे येत असावे ? मी सासूला त्रास देतेय  किंवा मी सुनेला छळतेय म्हणणारी सासू कधीच कशी आपल्या घरी हे सांगायला येत नाही ! या लहानपणी पडलेल्या भाबड्या प्रश्नाचे उत्तर मानवी वर्तणुकीत आपल्याला सापडते. माणसाला लाभापेक्षा झालेल्या तोट्याचे दु:ख अधिक असते.

भारतात झालेल्या सत्ता बदलाचे व सत्ताबदल झाल्यावर  कोणत्याही स्थितीत सरकारच्या प्रचंड समर्थनाचे इंगित आणि त्याचे  आकलन या ‘लॉस अव्हर्शन’ च्या सिद्धांतानुसार नक्कीच करता येते. भारतात मनमोहन सिंग यांचं सरकार पायउतार होणं यासाठी अनेक कारणे सांगीतली जातात, त्यापैकी ‘लॉस अव्हर्शन’ सिद्धांतात  विश्लेषण केलेली मानवी वर्तणूक हे एक प्रमुख कारण आहे. नव्हेतर वाढलेल्या भक्तांच्या संख्येची कारण मीमांसा सुद्धा याच आधारावर करता येते. तत्कालीन विरोधी पक्षाने  देशातील मागील 60 वर्षाच्या काळातील भारतातील उपलब्धी पेक्षा 60 वर्षातील कमतरतेवर जास्त भर दिला. विरोधी पक्ष या नात्याने राजकारणात तसे करणे स्वाभाविक देखील होते. साठ  वर्षात देशाने मिळवलेल्या  यशाबद्दल जनता विसरली ! कारण त्यात त्यांचा फायदा झाला होता खरा,मात्र वाढलेल्या पूर्वीच्या सरकारच्या धोरणांमुळे उंचावलेल्या राहणीमानातून ज्या नवीन आशा, आकांक्षा निर्माण झाल्या होत्या आणि त्या नव्या आशा आकांक्षा पुर्ण न होऊ शकल्यामुळे मनात वाटणाऱ्या तोट्याची  वा कमतरतेची तीव्रता आणि परिणामकारकता अधिक होती.

माणूस सातत्यानं स्वत:स उपेक्षित, वंचित वा पिडित समजत, स्वप्रतिष्ठेची त्याची वर्तणूक या उपेक्षितपणाच्या न्यूनगंडातून आलेली आक्रमकता असते. प्रत्येक समुह असा विचार करतो , तसा प्रत्येक व्यक्ती सुद्धा असाच विचार करतो !  तो जे मिळालं आहे, त्याकडे दुर्लक्ष करून ते विसरूनही जातो, मात्र जे प्राप्त झालं नाही, त्याबद्ल मात्र अति  उद्वेगाने बोलतो. याला मानसशास्त्रीय भाषेत   'नॉनसँटिशफँक्शन अव्हर्शन' म्हणता येईल! आपण पाहतो लग्न होऊन तीस चाळीस वर्ष झालेली जोडपी जेंव्हा भांडतात, तेंव्हा 'मला तुमच्यापेक्षा खूप चांगली स्थळं आली होती, पण मी तुझ्यासोबत लग्न करून चुक झाली म्हणतात' भारतीय परंपरेत चुक सुधारण्याची सोय तेवढी प्रचलित नाही, पण या वाक्यातून आढळणारा भाव तोच आहे, जे मिळाले त्याच्या आनंदाच्या परीणामापेक्षा जे मिळाले नाही त्याचा परिणाम तीव्रआणि त्याबद्दल तीव्र आकर्षण आढळून योते ! जीवनात  व्यक्ती याच पद्धतीने गेलेल्या संधीचं ' लॉस्ट ऑपॉरच्युनिटी अव्हर्शन' असा विचार करत असतो !  

मानसिकदृष्ट्या असा विचार प्रत्येक बाबतीत चालू असतो, मग याच मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून जीवनातील सर्व घटनांचे, भावनेचे आकलन साध्य होते. नेहरूंऐवजी पटेल पंतप्रधान झाले असते तर देशाचं भलं झालं असतं असाही विचार का जन्म घेतो?  किंवा गांधी ऐवजी सावरकरांच्या विचारावर देशानं मार्गक्रमण करायला हवं होतं, अशा विचारांची बीजे या मानसिक प्रक्रियेतून उगवलेली आढळून येतात.

जनसामान्यांच्या मनात अशा विचार प्रक्रीयांनी थैमान घातलेलं असताना त्यातून निर्माण होणारी  अगतिकता एवढी असते की   असे मानवी मन कोण्याही उथळ, थोतांड, भंपक व्यक्तीलाही आपल्या इच्छांच्या पुर्तीसाठी येणारा मसिहा समजू लागते !

अमेरिकेत तेच झाले! दुसऱ्या महायुद्धापासून प्रचंड सुखासमाधानात जगणाऱ्या अमेरिकन नागरिकांना झालेल्या लाभाचा विसर पडला मात्र गेल्या कांही वर्षात मध्यमवर्गीयांना झालेला तुलनेने कमी त्रास आणि अमेरिकेबाहेरील लोकामुळे निर्माण झालेली कांही  बेरोजगारी जास्त परिणामकारक वाटली आणि याच्या परिणातून त्यांनी ट्रंप यांना निवडून दिले !

माणूस स्वतःला सातत्याने उपेक्षित , वंचित ,पिडीत अर्थशास्त्रीय भाषेत  तोटा झालेला समजतो आणि झालेले फायदे सतत विसरत असतो.या आभासी उपेक्षितपणात , वंचिततेच्या भावनेत तो सातत्याने कोणाची तरी वाट पाहत असतो. पन्नासच्या दशकात  सँम्यूयल बेकेटचे  'वेटींग फॉर गोदो'  या मुळ फ्रेंच नाटकाचे इंग्रजी रूपांतर रंगभुमीवर आले होते. त्यात कधीच न येणा-या ‘गोदो’ नावाच्या कोण्या व्यक्तीची वाट पाहणारे दोघे मित्र आहेत. त्यांना हा 'गोदो' भेटतच नाही! कारण गोदो असा कोणी अस्तित्वातच नसतो ! पण मतदानावर आधारीत लोकशाहीत मात्र अशा मिळालेल्या लाभाच्या आनंदाच्या परीणामापेक्षा स्वतःच्या इच्छांच्या अपूर्णतेच्या दु:खाचे ओझे वाहणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना कोण्या उमेदवारात 'गोदो' दिसतो तर भारतीय मानसिकतेत कोणाला विष्णुचा कलीयुगातील अवतारी पुरूष दिसतो.

‘लॉस अव्हर्शन’ सिद्धांतात विश्लेषण केलेलल्या याच मानवी वर्तणुकीतून  कोणी एखादा सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या जिन्न च्या शोधात कोण्या बाटलीचे बुच काढतो आणि अलादिनच्या परोपकारी जिन्न ऐवजी, नेमका हातिमताईच्या चित्रपटातील 'इन्सानी कुर्बानी' मागणारा विनाशकारी जिन्न बाहेर पडतो. त्याला सतिश शहा आणि जितेंद्र पुन्हा बाटलीत बंद करतात. तो परोपकारी 'जितेंद्र'ही  वेगळा आणि तो 'शहा'ही वेगळा!  आणि आता बाटलीही  नाही पण मतपेटीत असे जीन्न पुन्हा बंद करण्याची सोय याच लोकशाहीत आहे.
© राज कुलकर्णी.

Comments