पावन पावाचा महिमा .....!!!!!
पावन पावाचा महिमा ..........
पाव हा पदार्थ आता भारतीय समाज जीवनाचा एक महत्वपूर्ण अंग बनलेला आहे. पण असे असले तरी भारतातील पावाचा इतिहास हा पोर्तुगीजांच्या आगमनानंतर सोळाव्या शतकात सुरु झालेला आहे. भारतीय लोकांच्या नाष्ट्यात आज पावाचा अंतर्भाव अपरिहार्य असला तरीही एकेकाळी पाव हा निषिद्ध समजला जात होता !
आज प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तीच्या घरात पाव रोज चवीने खाल्ला जातो मात्र एकेकाळी पाव खाल्ला म्हणून अनेकांना हिंदुधर्म सोडवा लागला होता आणि कित्येकांना पाव खाल्ल्यामुळे प्राय:श्चीत घेवून शुद्धीकरणही करावे लागले होते! पोर्तुगीजांनी भारतात ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या काळात सार्वजनिक पाणवठ्याच्या ठिकाणी पावाचे तुकडे टाकून अनेकांना ख्रिस्ती बनवले असल्याचे कांही संदर्भ वाचनात आले आहेत. परंतु आज मात्र पाव पवित्र आणि मंगल बनला असून, मध्यंतरी शिवसेना या राजकीय पक्षाने 'वडापाव' या पदार्थास शिव म्हणजेच पावन करून त्यास 'शिववडापाव' असे नामकरण करून तो पाव पावन झाल्याची पावती दिली होती !
ब्रेड म्हणजेच पाव! या पावाचा इतिहास मानवाने जेंव्हा शेतीचा वापर सुरु केला त्या काळापासूनचा आहे. मानव जेव्हा समूहाने राहू लागला, त्याचकाळात 'ब्रेड' म्हणजेच 'पाव' बनविण्याचे तंत्र विकसित झाले. इजिप्त मधील पिरँमिड मध्ये ब्रेड बनविण्याची पद्धत दर्शविणारे शिल्प कोरलेले दिसून येते. हा पुरावा इसवी सन पूर्व ३००० वर्ष एवढा जुना आहे!
'जुना करार' या यहुद्यांच्या धर्मग्रंथात आणि 'नवा करार' या ख्रिस्त्यांच्या धर्मग्रंथात ब्रेडचा उल्लेख खूप पवित्र आणि मंगल स्वरुपात केला आहे. आपल्या 'अन्न हे पूर्णब्रह्म' या श्लोकप्रमाणे अनेक वचने या दोन्ही ग्रंथात आढळून येतील.
युरोप मध्ये देखील इसवी सनपूर्व २००० वर्षापूर्वीपासून पाव निर्मितीचे संदर्भ आढळतात. आज दैनंदिन खाद्यासाठी 'ब्रेड अँड बटर' असा शब्द प्रयोग असला तरीही मुळात युरोपात 'ब्रेड अँड बियर' असा उल्लेख केला जात असे ,कारण दैनंदिन खाण्याचे हेच दोन पदार्थ प्रसिद्ध होते. कारण बीयर म्हणजे द्रवरूप ब्रेडच! याच बीयरचा फेस ब्रेड बनवताना किण्व प्रक्रियेसाठी वापरला जायचा! या ब्रेड सोबत मासांहार असायचा, तो ही अत्यंत कमी मसाल्याचा !
युरोपियन खलाशी जेंव्हा समुद्र सफरीस निघत असत तेंव्हा जहाजावरच पाव भाजायची भट्टी निर्माण केली जात असे आणि त्यासाठी खास भाजकाम करणारे खलाशीही असत. इस्तंबूल म्हणजे कॉन्सटँटिनोपलच्या १४६० साली झालेल्या पडावानंतर खुष्कीचा मार्ग बंद होवून समुद्र मार्गे भारतीय उपखंडाचा शोध घेण्यास निघालेल्या खलाश्यांनी ब्रेड ला ख-या अर्थाने जगभर पोचवला .
भारतीय उपखंडातून मसाल्याचे पदार्थ युरोपात जाईपर्यंत सर्वसामान्य लोकांचे नव्हेतर अगदी राजघराण्याचे अन्न सुद्धा 'ब्रेड आणि बियर' असेच होते. युरोपियन लोक सामान्यपणे धान्य घरी आणून त्यापासून ब्रेड बनविण्यापेक्षा प्रत्येकजन भाजलेला ब्रेडच विकत आणत असत. अशा त-हेने प्राचीन काळापासून ते आजपर्यंत ब्रेड हेच युरोपातील प्रमुख दैनंदिन अन्न आहे आणि त्यामुळेच युरोपियन लोकांच्या वसाहतीच्या माध्यमातून हे अन्न जगभर पोचले !
ब्रेड म्हणजेच भाजलेले अन्न या स्वरूपात लोक विकत आणत असल्यामुळे ब्रेड बनविणारे खास लोक असत, त्यामुळे साहजिकच त्यांची मक्तेदारी एकेकाळी तयार झाली आणि ब्रेड मध्ये भेसळही होवू लागली. खडू , लाकडी भुसा, कांही वेळी अगदी माती सुद्धा मिसळली जायची. म्हणून ब्रिटनने १८६० साली ब्रेड मधील भेसळ रोखण्यासाठी कायदे करून शिक्षेची तरतूद केली होती.
भारतीय समाजव्यवस्थेतील चातुर्वण्याच्या चौकटीमुळे इतरांनी शिजवलेले वा भाजलेले अन्न न खाने हा शिरस्ता होता! म्हणून की काय इतरांनी भाजलेले अन्न म्हणून पाव अथवा ब्रेड निषिद्ध मानला गेला. मुळात बाहेरचे खाणे हा प्रकारच आपल्याकडे नव्हता. कोणी गावाला निघालेतर दशम्या सोबत देण्याचा आपला रिवाज! माझ्या पणजीला ब्रेड खाणे आजीबात मान्य नव्हते. पण तीचा बिस्कीटांना आक्षेप नसायचा याचं गणित मात्र कधी समजलं नाही!
आम्ही लहान असताना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी आम्हाला न चुकता ब्रेड खायला मिळत असे ,कारण त्या अगोदरच्या दिवशी ब्रेड विकणारे, पाववाले हमखास पाव विक्रीसाठी गल्लोगल्ली फेरी मारायचे. दुस-या दिवशी पहाटे उठून लवकर शाळेत पोचण्यासाठी आम्ही ब्रेड खावून जात असू!
आता काय नि लहानपणी काय ब्रेड आणि पाव आम्हा सर्वांचा जीव कि प्राण होता आणि आहे! त्यासोबत कधी खारी आणि छोटे केक खायला मिळत असत, त्याची लज्जत कांही औरच होती. केक म्हणजे गोड पाव , जो खूप आवडायचा! कारण पाव हा चवीला कांहीसा तुरट असतो. त्यात साखरेसोबत विविध फळांचे स्वाद घालून केक बनवला जातो. अशा केकच्या बुडाशी कागदी वेष्टन असायचे! त्या वेष्टनाला लागलेले केकचे अंश सुद्धा आम्ही चाटून पुसून खायचो कारण एवढी आवड त्या केकची असायची!
इतिहासाच्या पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांती वाचताना ती फ्रेंच राणी ,लुईची पत्नी म्हणाली होती म्हणे, ‘ब्रेड मिळत नाही तर केक खा’! त्या राणीचे हे वाक्य गरिबीची थट्टा उडविणारे होते ,एवढे आम्हाला त्यावेळी समजले आणि केक हे राजेरजवाड्यांचे आणि ब्रेड हे सर्वसामान्यांचे अन्न एवढी माहिती यातून नक्कीच झाली!
पाव आणि ब्रेड पुर्वी एकाच अर्थाचे शब्द असले तरीही त्याच्या स्वरूपावरून त्याचे अर्थ विभिन्न आहेत. ब्रेड म्हणजेच पावच , पण हाच पाव,व त्याचे काप करून म्हणजेच 'स्लाईस' केल्यावर ब्रेड बनला! लोकप्रिय झाला! आज या ब्रेडचे विविध पदार्थ बनवले जातात. ब्रेड स्लाईस केल्यामुळे पाव आणखी टिकवू बनला. या स्लाईस्ड ब्रेडचा शोध १९१२ साली सर्वप्रथम लागला आणि ब्रेड स्लाईस चे प्रायोगिक तत्वावर उत्पन्न सुरु झाले . साधारणपणे १९२८ पासून 'ब्रेड स्लाईस' ला जगात अमाप लोकप्रियता मिळाली. हेच ब्रेड स्लाईस जास्त खरपूस भाजून अनेक दिवस टिकू शकतील असे टोस्ट बनवले जावू लागले आणि खूप दिवस टिकणारे अन्न म्हणून याचा वापर होऊ लागला! जो प्रामुख्याने दुस-या महायुद्धातील सैनिकांचे अन्न होता.
पाव हा खरोखरच पुर्ण अन्न आहे कारण अतिशय स्वस्त असणा-या आणि बराच काळ टिकणा-या या पावात कर्बोदके ,प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ यांचे समतोल मिश्रण आहे! विशेष म्हणजे ते गरिबांचे अन्न म्हणून प्रसिध्द आहे! याच कारणामुळे पाव गरीब अशा हमालात, कामगारांत, कष्टक-यात प्रचंड लोकप्रिय झाला. मुंबईत गोदी कामगारांना खाण्यासाठी ब्रिटीशांच्या काळात पगाराबरोबर अन्नही मिळत असे, ते प्रामुख्याने पाव हेच असायचे. देशविदेशातील जहाजे रात्री अपरात्री बंदरात येत असल्यामुळे , रात्रपाळी करणाऱ्या गोदी कामगारांना आजूबाजूच्या हॉटेल मधील , हॉटेल बंद होताना उरलेल्या सर्व भाज्यांचे मिश्रण गरम करून पावासोबत भाजी म्हणून विकले जायचे. या भाज्या उरलेल्या असायच्या आणि अशा सर्व भाज्यांचे हे मिश्रण असल्यामुळे ते अतिशय स्वस्त दरात मिळत असे ! अशा या भाजी आणि पाव मधूनच आजच्या सर्वाधिक लोकप्रिय अशा पावभाजीचा उदय झाला असावा ! पुढे त्यात विविध प्रकार आणि पदार्थ वाढून मग मिसळ पाव , मिसळ पाव सँपल, पाव मिसळ अशा अनेक खाद्य पदार्थांची निर्मिती झाली !
वडापाव हा पदार्थ तर मुंबईच्या वेगवान अशा धक्काधक्कीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. बटाटेवडा आणि त्याबरोबर पाव , हे मुंबईतील सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन खाद्य आहे आणि तेच अन्न श्रीमंताचीही चैन बनले आहे. सर्वसामान्यांची गरज ही श्रीमंताची चैन होण्याची किमया केवळ जीभेचे चोचले पुरवण्यातूनच घडते! आणि हे विषेश नसून सहज स्वाभाविक आहे. कारण मानवी मनात न मिळणा-या बाबींचे अप्रुप असते, वडापाव हे त्याचेच द्योतक आहे. म्हणूनच बटाटेवडा हा भाजी म्हणून आणि पाव हा भाकरी अथवा चपातीला पर्याय या स्वरुपात वडापाव आवडीने महाराष्ट्रभर खाल्ला जातो.
पाव हा भारतातील विविध प्रांतात असा लोकप्रिय होत गेला आणि पुढे विविध प्रकारचे ब्रेडचे पदार्थ बनवण्याचा म्हणजेच बेकरी हा टिकणाऱ्या खाद्यपदार्थाचा व्यवसाय भारतातील प्रथम क्रमांकाचा व्यवसाय बनला! पूर्वी खेडेगावात शहरातून पाव विक्री करण्यासाठी फेरीवाला येत असे आज ,प्रत्येक गावागावात बेकरी निर्माण झाली असल्याचे दिसून येईल.
पाव हा मराठीतील शब्द पाव या पदार्थास मिळाल्याची हकीकत मोठी रंजक आहे. गोवा आणि मुंबई या प्रांतात ,जेंव्हा पोर्तुगीज आणि ब्रिटीश यांच्या वसाहती वाढू लागल्या ,तेंव्हा साहजिकच ख्रिस्ती लोकांचे अन्न म्हणून पाव लोकप्रिय झाला. त्यावेळी पावाची म्हणजेच ब्रेडची एक लादी मिळत असे, त्याचा एक चतुर्थांश भाग म्हणजे आज मिळतो तो पाव, अर्थात पाव भाग! म्हणून लोक त्यास पाव म्हणू लागले. ते पाव हे त्याचे नामकरण आजतागायत चालू आहे आणि तेच पुन्हा भारतभर पसरले असावे!
हिंदी भाषेत मुळात कांही ठिकाणी पावाला अथवा ब्रेडला डबल रोटी असा शब्द प्रचलित आहे. परंतु डबल रोटी हा शब्द मुळात पावासाठी नसून तो सँडविचसाठी आहे. कारण सँडविच हे दोन ब्रेड स्लाईसचे बनते. भारतीय लोक ज्या प्रमाणे एकाच रोटीचे किंवा चपातीचे रोल करू शकतात तसे एका ब्रेड स्लाईसचे रोल होऊ शकत नाहीत, त्यासाठी दोन ब्रेड स्लाईस लागतात, त्यावरून सँडविच म्हणजे डबलरोटी! पण हाच शब्द हिंदीत ब्रेड वा पावासाठी प्रसिद्ध झाला!
ब्रेड या इंग्लिश शब्दाचे भाषांतर पाव असे केले गेले असले तरी ब्रेड या शब्दाचा भारतीय भाषेतील मुळ अर्थ रोटी , चपाती अथवा भाकरी असाच आहे. एकदा मला माझ्या मित्राने 'मढ्याच्या टाळुवरील लोणी खाणे' या म्हणीच्या समानर्थी इंग्रजी भाषेतील म्हण आहे का, असे विचारले. खूप शोधल्यावर ' स्नँचींग ब्रेड इव्हन फ्रॉम डेड पर्सन' अशी म्हण मला आढळली! ती कितपत योग्य मला माहीत नाही, पण मी तीच त्याला सांगीतली!
पाव म्हणजे किण्व प्रक्रिया करून भाजलेले अन्न ! चपाती, रोटी किंवा भाकरी म्हणजे 'फ्लँट ब्रेड' (Flat Bread) म्हणून त्यांचे वर्णन करता येईल. पाव म्हणजे गव्हाचे पीठ पाण्यात यीस्ट मिसऴून त्याची कणिक तिंबून, म्हणजेच आंबवलेल्या कणकीस ठराविक तापमानापर्यंत भाजून तयार केलेली एक प्रकारची भाकरीच आहे! या यीस्ट च्या ऐवजी पुर्वीही बियरच्या फेसाचा पर्याय होता, आजकाल बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, ताक किंवा इतर आम्लयुक्त पदार्थांचा वापर केला जातो.
पोर्तुगीजांच्या काळात ख्रिस्ती मिशनरी लोकांनी पाव खायला दिल्यामुळे धर्म बहिष्कृत होवून अनेकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला हे तर पुर्वीच सांगीतले, पण आज पाव सर्वच जन आवडीने खात असले तरीही हिंदुच्या मनातील पाव आणि पावाची भट्टी याबद्दलचा आकस कांही कमी झालेला दिसून येत नाही ,कारण शहरात १९७०-८० पर्यंत पाव निर्मितीच्या क्षेत्रात हिंदूंची संख्या तशी नगण्यच होती. कांही अपवाद असतीलही! पण हा व्यवसाय प्रामुख्याने ख्रिस्ती आणि मुस्लीम समाजच करताना आढळून आल्याचा माझा अनुभव आहे. मी माझ्या लहानपणी सर्रास अजमेरी बेकरी , अंजुमन बेकरी अशीच नावे पहिली आहेत! आता त्यात बराचसा फरक पडला आहे, हेही खरे आहे. आज माझ्या गावातच नव्हेतर इतरत्रही ठिकठिकाणी बेंगळूर अय्यंगार बेकरीचे दुकाने प्रसिध्द झालेली आहेत. जी बदलत्या काळाची आणि पावाच्या वाढलेल्या लोकप्रियतेची निदर्शक आहेत.
ख्रिस्ती आणि मुस्लीम यांच्याबरोबरच बेकरीच्या व्यवसायात मुंबई मधील यहुदी समाज देखील मोठ्या प्रमाणावर आहे. यहुदी धर्मात ब्रेड म्हणजेच पावाला खूप धार्मिक महत्व आहे. 'शब्बाथ' या सणाच्या वेळी तीळ टाकून भाजलेला एक विशिष्ट प्रकारचा पाव खूप पवित्र भावनेने खाल्ला जातो! यहुद्यांच्या प्रत्येक सणासाठी पावाची एखादी रेसीपी असल्याचे आढळून येते.
यहुद्यांच्या 'पासओवर' या सणाच्या वेळी 'मात्झो' नावाचा एक विशिष्ट प्रकारचा 'चपटा पाव' म्हणजे जणू एखाद्या गव्हाच्या पोळी सारखा, वस्तुत: सांगायचे तर 'चपाती' सारखा ब्रेड अतिशय पवित्र समजला जातो. विशेष म्हणजे हा ब्रेड आंबवून केलेला नसतो!
यहुद्यांच्या 'तोराह' या ग्रंथात, मोझेस ने जेंव्हा समुद्र बाजूला सारून सर्व यहुद्यांची फारोह राजांच्या सैन्यापासून सुटका केली , त्या Exodus च्या वेळी घाईगडबडीत पाव बनवताना बेकिंग करण्यास पुरेसा वेळच नव्हता. म्हणून मोझेस बरोबर या चपातीसारखा बेकिंग न झालेला ब्रेड त्याने सोबत घेतला. म्हणूनच हा ब्रेड पवित्र मानून यहुदी लोकांकडून आवर्जून खाल्ला जातो. शिवाय या ब्रेड मध्ये पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे शिदोरी स्वरूपात अनेक दिवस अन्न म्हणून बाळगताही येतो. हा ब्रेड आपल्या धपाटे दश्म्यासारखा अनेक दिवस टिकणारा आहे. या विशिष्ट 'चपट्या ब्रेडला' गरिबाचे अन्न म्हणून मानले जाते आणि हा ब्रेड खाणे म्हणजेच ज्यू असल्याची सच्ची निशाणी समजली जाते. आपल्याकडे जसे पुरणपोळीस सर्वात पवित्र आणि पूर्ण अन्न समजले जाते , तसेच महत्व या ब्रेडला यहुदी धर्मियांत आहे !
महाविद्यालयीन काळात मी ,दिलीप कुमार आणि मीना कुमारी यांचा 'यहुदी' नावाचा एक सिनेमा पहिला होता. या सिनेमात दिलीप कुमारने 'मार्कस' नावाच्या रोमन सरदाराची भूमिका केली होती. त्याचे 'हन्ना' या ज्यू मुलीवर म्हणजेच मिनाकुमारीवर प्रेम बसते. प्रेमाखातर तो स्वतः ज्यू असल्याचे सांगून 'मनशा' असे नाव धारण करतो. परंतु पासओव्हरच्या सणाच्या वेळी , सर्वांबरोबर पंगतीत असताना तो, ही पवित्र पोळी म्हणजेच ब्रेड न खाता खाली टाकून देतो ,कारण ती भाकरी खाणे म्हणजे यहुदी असल्याचे प्रमुख लक्षण असते! त्याच वेळी मीनाकुमारीला समजते की हा 'यहुदी' नसून 'रोमन' आहे! 'यहुदी' सिनेमातील ती 'मुक्कद्दस रोटी' म्हणजे मुळात हा 'चपटा ब्रेड' च असतो !
ख्रिस्ती धर्मात तर ब्रेडला खूप महत्व आहे! दोन चार वर्षपूर्वी आलेल्या 'दा विन्ची कोड' या चित्रपटात येशूच्या ‘अखेरच्या पंगतीचे’ चित्रण करणारे 'लास्ट सपर' हे चित्र आहे. त्या चित्रात येशू 'ब्रेड' आणि 'द्राक्षरस'म्हणजेच वाईनचे जेवण करतो आहे . जे त्याचे शेवटचे जेवण आहे! त्यावेळी येशू स्वतःच सांगतो कि, माझे स्मरण म्हणून तुम्ही हा ब्रेड आणि वाईनचे सेवन करा ,कारण ब्रेड हे माझ्या शरीराचे आणि वाईन ही माझ्या रक्ताचे प्रतिक आहे! म्हणून येशू हा ब्रेड रुपात अस्तित्वात असल्याची ख्रिस्ती धर्मियांची मान्यता आहे!
ब्रेड बनविणारे ,बेकरीवले आणि ब्रेड-पाव विकणारे यांच्यात मुस्लिमांची संख्या मोठी असली तरी इस्लाम मध्ये ब्रेड 'हराम' आहे की 'हलाल' याबद्दल अनेक वाद प्रवाद आहेत. ब्रेड इस्लाम मध्ये 'हलाल' म्हणजेच 'खाण्यास योग्य' आहे कारण ब्रेड बनवताना त्यात अल्कोहोल तयार होत असले तरीही ते उष्णतेने बाष्प होऊन निघून जाते असे मानणारे अनेक जन आहेत. मात्र कांहीजण ब्रेड मध्ये कांही प्रमाणात तरी अल्कोहोल असतेच म्हणून ब्रेड खाणे योग्य नाही असेही मानतात. त्यास हराम म्हणतात! याच कारणास्तव कडक आणि एकदम सुक्का स्वरूपातील पाव म्हणजेच 'टोस्ट' खाणारे अनेक मुस्लीम आहेत ! त्यामुळे इस्लाम मध्ये किण्व प्रक्रियेविना तयार केल्या ब्रेडला म्हणजेच रोटला अर्थात मोठी जाड रोटी अथवा भाकरीला महत्व आहे. जो मुळात एक फ्लँट ब्रेडचाच एका प्रकार आहे. हा रोट मुस्लिमांमध्ये खूप लोकप्रिय असून 'हातिमताई' , 'थीफ ऑफ बगदाद' ,' अलिबाबा' ' अजूबा' या चित्रपटात भाकरी म्हणून दाखवलेला आहे, तो हा रोटच आहे. हाच रोट गुळात कुस्करून त्यापासून तयार होणारा मलिदा कांही पीरांना, दर्ग्यांना नैवेद्य म्हणून खैरात रूपात वाटला जातो.
गंगा जमनी तहजीबचं प्रतिक म्हणून सांगण्यासाठी खूप कांही आहे, पण गंगा, जमना, होल्गा, युफ्राटीस, नाईल, टायबर या आणि जगातील अनेक नद्यांसोबतच आब-ए-जमजम आणि यरूशलेमसह सर्वच तिर्थस्थळी असणा-या पाण्याचा संगम ज्याच्यात सामावलेला आहे, तो पदार्थ फक्त पाव हाच आहे! तो ख-या अर्थाने विश्वव्यापक पुर्णब्रह्म आहे!
© राज कुलकर्णी.
Comments
Post a Comment