भारतरत्न राजीव गांधी आणि 'आप 'मतलबी राजकारण
भारतरत्न राजीव गांधी आणि 'आप'मतलबी राजकारण....
दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाच्या श्रीमान अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने, माजी पंतप्रधान दिवंगत श्री. राजीव गांधी यांना दिलेला भारतरत्न हा सन्मान त्यांना, त्यांनी १९८४ मधील शीख विरोधी दंगलीतील भुमिकेबद्दल दिला असल्याचा शोध लावत, राजीव गांधी यांना दिलेला भारतरत्न हा सन्मान परत घ्यावा असा ठराव मंजूर केला आहे. हा ठराव एवढा 'आप'साठी महत्वपुर्ण होता की, ठरावाच्या बाजूने मतदान करणे व न करणे, सदस्यांच्या विवेकावर न ठेवता, ठरावाच्या बाजूने मतदान न करणाऱ्या अापच्या सदस्या श्रीमती. अलका लांबा यांचा राजीनामा देखील मागितला गेला. श्री. केजरीवाल यांना सोडून जाणाऱ्या अनेक मोठ्या नेत्यांच्या यादीत आता श्रीमती अलका लांबा देखील समावेश झाला आहे!
श्री. अरविंद केजरीवाल यांची ओळख खरे तर पठडी बाहेरील राजकारणी अशी आहे. कारण दिल्लीत त्यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय सेवासुविधा, विद्युत पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, बेघरांसाठी घरे, रैन बसेरे आदी जनकल्याणकारी उपक्रम यशस्वीपणे राबवून उत्तम प्रशासनाचा एक वेगळा ठसा निर्माण केला असल्याचे बोलले जाते. मात्र या जनहितार्थ कामावर आपली प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा सुडाचे राजकारण करूनच आपल्या कर्तृत्वाची प्रभावळ तेजस्वी करू शकतो असा नवा साक्षात्कार त्यांना निर्माण झाल्याचे यातून दिसत आहे.
दंगली आणि त्यातील हिंसा ही नेहमीच माणुसकीला काळीमा फासणारी असते.दिल्लीतील १९८४ सालातील शीख विरोधी हिंसा ही अशीच माणुसकीला काळिमा फासणारी होती. त्यातील गुन्हेगारांना सजा झालीच पाहिजे आणि पीडितांना न्याय मिळायला हवा, मात्र त्यासाठी आज हयात नसलेल्या राजीव गांधींना जवाबदार धरणे आणि माजी पंतप्रधान असणा-या मृत व्यक्तीबद्दल द्वेषपूर्ण वृत्तीने त्यांचा भारतरत्न हा सन्मान काढून घ्यावी अशी मागणी करणे, याचा अर्थ सुडाचे राजकारण करणे असाच आहे. दिल्लीतील आणि पंजाबमधील लोकसभेच्या येत्या निवडणुकी दरम्यान याच सुडाच्या राजकारणाचा भावनिक वापर करत मते मिळविण्यासाठी केलेली ही केजरीवाल यांची योजना आहे ! याला निमित्त मिळाले ते नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे ! दिल्लीत सन १९८४ साली झालेल्या शीखविरोधी दंगलीतील एका खटल्यात कॉंग्रेस नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि याच दरम्यान मध्यप्रदेशात कमलनाथ यांची मुख्यमंत्री पदी नियुक्ती झाली. कमलनाथ यांच्या दिल्लीतल्या शीख विरोधी दंगलीतील हिंसेत सहभाग असल्याचा आरोप केला जावू लागला. शिरोमणी अकाली दलाचे कांही कार्यकर्ते कमलनाथ यांच्या विरोधात उपोषणाला देखील बसले होते. या वातावरणाचा राजकीय फायदा उठविण्यासाठी केजरीवाल यांनी राजीव गांधींचा भारतरत्न परत घेण्याचा ठराव मंजूर केला !
वास्तविक राजीव गांधींना भारतरत्न दिला गेला तेंव्हा दिल्ली विधानसभा अस्तित्वात नव्हती आणि हा सन्मान भरत सरकारतर्फे दिला जात असल्यामुळे दिल्ली विधानसभेचा ठराव भारत सरकारवर बंधनकारक नाही. केजरीवाल यांची इच्छा खरोखरच पिडीत शिखांना न्याय मिळवून देण्याची असेल तर या ठरवाने शिखांना कांहीही मिळणार नाही. म्हणजे भारतरत्न परत घेण्याचा ठराव म्हणजे केजरीवालांचाही निव्वळ 'चुनावी जुमला' असल्याचेच म्हणावे लागेल !
कमलनाथ यांच्या विरोधात कोणताही खटला प्रलंबित नाही. परंतु खटला प्रलंबित नसला तरी नैतिक पातळीवर कमलनाथ यांची त्या हिंसेत कांही भुमिका होती काय?, या प्रश्नाचे उत्तर शोधताना; दंगलीनंतर गेल्या ३४ वर्षात कमलनाथ यांनी शीख धर्मियांच्या विरोधात सतत भाषणे देवून आपली राजकीय प्रतिमा शीखधर्माचे कर्दनकाळ अशी अजिबात निर्माण केलेली नाही किंवा तशी झालेली देखील नाही, हे विशेष महत्वाचे आहे. सन १९८४ पूर्वी देखील त्यांनी कट्टर धर्मांधतेचा पुरस्कार करत, शीख धर्मीयांविरोधात भाषणे केल्याचा कोणताही संदर्भ नाही. अगदी कॉंग्रेस पक्षाची ओळख देखील ठरविक धर्मिकत्वाचा पुरस्कार करत कट्टर शीखविरोधी राजकीय विचार मांडणारा पक्ष अशी १९८४ पूर्वीही नव्हती आणि त्यानंतरही तशी कधीच झालेली नाही ! शिवाय या पक्षाचे कोणतेही नेतृत्व 'विशिष्टधर्महृदयसम्राट'अथवा सर्व शिख धर्मियांच्या देशभक्तीवर शंका घेणारे 'शीखविरोधी' असे नव्हते आणि आजही नाही !
राजीव गांधी यांना दिलेला भारतरत्न हा सन्मान त्यांच्या मृत्यूपश्चात श्री.नरसिंहराव सरकारच्या काळात मा. राष्ट्रपती श्री. आर व्यंकटरमण यांच्यी राजीव गांधींचे बलिदान आणि त्यांनी त्यांच्या काळात केलेल्या विज्ञान तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स,दूरसंचार, संगणक,या क्षेत्रातील कार्यबद्दल देण्यात आला आणि तो श्रीमती सोनिया गांधींनी स्विकारला. या सन्मानाचा आणि शीख दंगलीचा तसा अर्थाअर्थी कांहीही संबंध नाही.
राजीव गांधी यांना कोणताही अनुभव नसताना आई इंदिरा गांधी यांच्या हत्त्येच्या अपघाताने त्यांना पंतप्रधानपद स्वीकारावे लागले. इंदिराजींची हत्त्या ३१ ऑक्टोंबर १९८४ ला झाली आणि त्याच्या दुस-या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरला दिल्लीत शीखविरोधी हिंसा सुरु झाली त्यावेळी राजीव गांधींनी अजून प्रत्यक्ष कार्यभारही हाती घेतला नव्हता. पुढची दोन दिवस इंदिराजींचा अंत्यविधी आणि रक्षाविसर्जन यात ते व्यस्त होते. दरम्यान २ नोव्हेंबर रोजी सैन्य दलास पाचारण करण्यात आले आणि त्याच दिवशी हिंसा पूर्णपणे थांबविली गेली. पुन्हा त्यानंतर कोणतीही हिंसा घडली नाही. परंतु त्याच दिवशी म्हणजे २ नोव्हेंबर १९८४ रोजी, राजीव गांधींनी दूरदर्शन आणि आकाशवाणी वरून भारतीय जनतेस आवाहन केले की, “हिंसेचा आणि द्वेषाचा आधारवर कांही लोक इंदिराजींच्या स्मृतीस लांच्छन लावत आहेत. हे थांबायला हवे. अशी हिंसा केवळ विध्वंसक शक्तींना साह्यकारी ठरते. धार्मिक वेडेपणा आपल्या भारत देशाला संपुर्णर्पणे नष्ट करेल, आणि भारताचा पंतप्रधान म्हणून मी असे कदापिही होवू देणार नाही”
राजीव गांधींचे हे वक्तव्य दंगली चालू असतानाचे त्या थांबविण्यासाठीच असून त्यात हिंसेस चिथावणी अजिबातच नाही. तरीही राजीव गांधी यांच्यावर असा आरोप केला जातो की त्यांनी , ‘मोठा वृक्ष पडल्यावर जमीन हादरते’ असे वक्तव्य करून हिंसक जमावास चिथावणी दिली. अर्थातच हा आरोप धादांत चुकीचा आहे आणि राजीव गांधींचे ते वाक्य विरोधकांकडून संदर्भाशिवाय अर्धवट स्वरूपात मुद्दाम पसरवले जाते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, राजीव गांधीचे ते बहुचर्चित वक्तव्य केंव्हा आणि कुठे केले गेले आहे ?
इंदिराजीच्या हत्त्येनंतर १८ दिवसांनी म्हणजे १९ नोव्हेंबर १९८४ या, इंदिराजींच्या मृत्त्योत्तर पहिल्या जन्मदिनी आयोजित एका कार्यक्रमात राजीव म्हणाले “ Some riots took place in the country fallowing the murder of Indiraji. We know the people were angry and for a few days it seems India has been shaken. But, when a mighty tree falls , it is only natural that the earth around it shakes. But from the way you put a stop to it , from the way the India has been brought back to the path of unity with your help ,and is able to stand united again , the world can see that India has became a genuine democracy”
राजीव गांधी यांचे हे वक्तव्य दंगली पूर्णपणे शांत झाल्यानंतरचे असून त्यातही त्यांनी, दंगलीत हिंसा झाल्याचे मान्य करून ज्या प्रकारे जनतेने पुन्हा एकतेचा संदेश देत, शांतता व एकी निर्माण केल्यानेच भारतीय लोकशाहीचे चांगले चित्र जगासमोर असेल, असेही म्हटले आहे.
गांधी घराण्यावर शिख दंगलीस जवाबदार असल्याचा विरोधकांकडून सातत्याने आरोप केला जातो. मात्र राजीव गांधी वा त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य दंगलखोरांना प्रोत्साहन देत होता असा आरोप अगदी शीख समाजाकडून देखील केला गेला नाही. दंगल काळात परिस्थिती हाताळण्यास अयशस्वी ठरल्याचा, राजधर्म न पाळल्याचा आरोप करायचा म्हटला तर तसा आरोप अनेकांवर केला जावू शकतो! परंतु इतरांनी चुक केली म्हणून त्यातून सुटका होवू शकत नाही, असे नैतिकतेचा आधार घेऊन कोणी म्हटले तर आज हयात नसणाऱ्या, कालवश झालेल्या राजीव गांधींना शिक्षा तरी कोणत्या नैतिकतेत बसते?
कॉंग्रेस पक्षातर्फे या दंगलीतील हिंसेबाबत अनेकवेळा माफी मागितली आणि शिख धर्मीयांची मने सौहार्द आणि स्नेहाच्या आधारवर पुन्हा कॉग्रेसने जिंकली हे वास्तव आहे!
गांधी घराण्यावरील हिंसेस प्रोत्साहन दिल्याचे आरोप तर चुकीचेच आहेत कारण कोणत्याही कॉग्रेस अध्यक्षाने कोणत्याच धर्माच्या विरोधात हिंसक वक्तव्ये कधीही केलेली नाहीत. मात्र कॉंग्रेस पक्षाचे एक वैशिष्ट्य असे की, दंगलीत हिंसा केल्याचा आरोप सिद्ध होवून शिक्षा झालेल्या दंगलखोर-गुन्हेगाराच्या विरोधात खटला न्यायायासमोर असताना आरोपीच्या बाजूने साक्ष देणारा आणि न्यायालयाकडून ज्याची साक्ष नाकारून, दंगलखोर गुन्हेगारास शिक्षा ठोठावली गेली ,असा एकाही कॉग्रेस कार्यकर्ता वा नेता कधीही सन १९८४ पासून आजतागायत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्याचे दिसून येत नाही ! प्रत्येकाने आपला सदसदविवेक जागृत ठेवून या महत्वपुर्ण घटनेवर जरूर चिंतन करावे!
© राज कुलकर्णी.
Comments
Post a Comment