यशपालजी
व्यासंगी, विद्वान नेतृत्व- यशपाल सरवदे
यशपालजींची आणि माझी ओळख सर्वप्रथम मी आकाशवाणीत असतांना 1998 साली झाली. तो पर्यंत आंबेडकरांच्या विचारांवर नितांत प्रेम करणारे नेतृत्व एवढीच त्यांची माझ्या साठी ओळख होती. आकाशवाणी उस्मानाबाद साठी केल्याने देशाटन या मालिकेतील ' धाराशिव लेणी' या कार्यक्रमाच्या निर्मिती दरम्यान त्यांची नवीन ओळख मला झाली. ती ओळख एक व्यासंगी,बुद्धीवादी , साक्षेपी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ता अशी होती.
बुद्ध विचार हा माझ्या आणि त्यांच्या अभ्यासाचा विषय. त्यात त्यांचा डॉ.आंबेडकरांवरील अभ्यास आणि माझे जवाहरलाल नेहरू विषयक संशोधन यातून आमचा स्नेह वाढला. मी तेर वर पुस्तक लिहू लागलो तेव्हा आम्ही अतिशय जवळ आलो. आम्ही मिळून तेरला अनेक वेळा भेट दिली.
सन 2001 साली तीर्थ (बु) या तुळजापुर जवळील गावाच्या भैरवनाथाच्या टेकडीवर एक प्राचीन स्थापत्य सापडले होते. ते बौद्ध स्तुप असल्याचे मत मांडणारा एक लेख मी दै.संघर्ष मधे लिहीला. तो वाचून त्यांनी मला आवर्जून फोन केला आणि सत्य सांगण्याचं धाडस केलंस म्हणून माझे कौतुकही केले. त्यानंतर आमचा एकत्र संशोधन प्रवास सुरू झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध स्थळे , प्राचीन व्यापारी मार्ग यांवर संसोधनासाठी आम्ही तेर, ईर्ला, जागजी, कळंब, वडगांव, पिंपळदरी, गड, मेसाई जवळगा, खामगांव अशा अनेक गावांना भेटी दिल्या.
माझ्या तेर वरील पुस्तक निर्मिती वेळी त्यांनी अनेक ग्रंथ उपलब्ध करून दिले. त्यांनी आयोजित केलेल्या धम्मपरीषदेची स्मरणिका मला खूप उपयुक्त ठरली. उस्मानाबाद शहराचे नांव आता धाराशिव झाले असले तरीही या शहराचे मुळ नांव नागेशनगरी असल्याचे त्यांनी संशोधनातून मांडले होते. उस्मानाबाद शहराच्या दक्षिणेस असणा-या धृतराष्ट्र नागेश्वर या मंदिरावरून या नगरीचे नांव नागेशनगरी असल्याचे त्यांचे मत होते.
माझ्या आयुष्यातील दोन तीन प्रसंग यशपालजी सोबतचा माझा स्नेह सांगण्यासाठी आवर्जून आठवणीत आहेत.
आकाशवाणी उस्मानाबाद साठी डॉ. आंबेडकरांच्या ' द प्रॉब्लेम ऑफ रूपी' या ग्रंथावर आधारीत रूपकाची संहिता मला लिहायची होती. यावेळी मी, अरविंद माने , सुदेश माळाळे आणि यशपालजी यांनी एकत्रित कार्य केले. जवळपास दिड महिन्याच्या संशोधनातून आम्ही ते रूपक तयार केले आणि विशेष म्हणजे ते रूपक महाराष्ट्रातील सर्व केंद्रांनी सहक्षेपित केले!
एकदा आकाशवाणी वरून एक जातिवाचक उल्लेख करणारा कार्यक्रम प्रसारित झाला. तत्कालीन अधिका-यांना यशपालजी आवर्जून येऊन भेटले आणि आकाशवाणी अंतर्गत यांवर अनेक विविध सामाजीक कार्यकर्त्यांची एक मिटींग होऊन, सर्व जाती धर्म समावेशक विचार प्रसारीत व्हावा म्हणून ,यासाठी एक मॉनिटरींग कमिटी गठित करावी असे ठरले.विशेष म्हणजे या कमिटीच्या प्रमुखपदी माझी नियुक्ती करावी अशी भुमिका यशपालजींनी मांडली आणि त्यावर सर्वच लोक चकित झाले. विशेष म्हणजे त्यांची ही मागणी सर्वांनी मान्य केली. हा यशपालजींनी माझ्या निरपेक्षवृत्तीवर दर्शविलेला विश्वास होता, जो मी कधीही ढळू दिला नाही कारण ती माझी जवाबदारी होती.
एक व्यक्तिगत प्रसंग असा की , सन 2002 साली मी एलएलबी झालो आणि वकिली करायची की नाही ते अजून ठरवले नव्हते. पण अनेकांनी मला वकिली करण्यासाठी प्रेरणा दिली त्यात यशपालजींचा वाटा खूप मोठा आहे. कारण त्यांनी थेट डॉ.आंबेडकरांचा संदर्भ देत मला म्हटले की, वकिली आणि ईतिहास संशोधन या साठी तु आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिली सुरू करायला हवी. यशपालजी एवढेच म्हणून थांबले नाहीत तर , मला म्हणाले तुला कोट घालण्याच्या कार्यक्रमाला मी आवर्जून येतो. इंग्लिश परंपरेत वकिल झाल्यावर ज्येष्ठ वकिलाकडून नवीन वकिलास कोट घालण्याचा एक समारोह होत असे. तो समारोह माझ्या घरी
मला माझ्या आजोबाच्या ठायी असणा-या अँड.दिगंबरराव जिंतुरकर हस्ते झाला आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते अर्थातच ,यशपाल सरवदे !
एक महत्वाचा प्रसंग असा की, आण्णा हजारे यांच्या 2011 सालच्या आंदोलनाचा मी प्रखर विरोधक होतो. मी या आंदोलनाच्या विरोधात हे आण्णा आंदोलन घटनाद्रोही आहे, यामुळे देशातील फँसिस्ट शक्ती प्रबळ होतील म्हणून एकट्याने निवेदन दिले म्हणून एका वर्तमानपत्रात माझ्या विरोधात माझ्यावर अवमानकारक टिका करणारी बातमी छापली गेली. अनेक लोकांनी माझी यावरून निंदानालस्ती सुरू केली अगदी कांही विचारी लोकांनी माझी जात काढून माझ्यावर आरोप केले. पण यशपालजींनी मला समर्थन दिले आणि म्हणाले , 'मी तीथे असतो तर मी ही निवेदनावर सही करून तुझ्या सोबत असतो'. यशपालजींनी मला त्यावेळी मी तुझ्या सोबत आहे काळजी नको करू , अशी ग्वाही दिली. पशुवैद्यकिय दवाखान्यासमोरील एका कार्यक्रमात त्यांनी संविधान बचाव समितीची स्थापना करून मला सचिव पद दिले आणि उपस्थितांना माझी भुमिका स्वत: सांगून मी सत्य मांडण्याचे धाडस केले म्हणून माझा सत्कार स्वहस्ते केला. असा खंबीर साथ देणारा माझा नेता , आज माझ्या सोबत नाही , ही बाब खूप दुःखदायक आहे.
नाग लोक आणि बौद्ध धर्म यांवर यशपालजींचे विपुल संशोधन होते. अनेक वेळा आमची यांवर चर्चा होत असे. त्यातून बौद्ध धर्म आणि नाग लोक यांच्या सहचर्यांवर संशोधन करणारी एखादी संस्था स्थापन करावी ,असा विचार त्यांनी मांडला. या संस्थेचे नांव काय असावे यांवर आमच्या अनेक मिटींग्ज झाल्या. मी या संस्थेसाठी सुचवलेले नांव होते 'श्रावस्ती'! हे नांव त्यांना खूप आवडले पण त्यात नाग हे नांव कुठेच नव्हते. मग मी, सुदेश आणि दिपक डावरे यांनी नागबोधी हे नांव शोधले आणि तेच पुढे स्विकारले गेले. पिंपळदरी इथं यासाठी जमीन खरेदी करून एका वैशाख पौर्णिमेला बुद्धजयंती निमित्त शुभारंभ झाला. मी बौद्धधर्म अनुयायी नसलो तरी विचाराने तु बौद्धच आहेस म्हणून तुही यात महत्वाचे कार्य करायचे आहे ,असे त्यांनी मला सांगीतले. हे त्यांचा माझ्या विचारांवरील विश्वासाचे प्रतिक होते. आम्ही कित्येकवेळा पिंपळदरीत जाऊन वृक्षारोपनही केले.
यशपालजी म्हणजे दलित पँथर चळवळीतील महाराष्ट्रातील महत्वाचे नांव ! महाकवी नामदेव ढसाळांच्या अनेक कवितांबरोबरच अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. त्यातील एक कविता खूप महत्वाची , जी यशपालजींच्या सर्वसमावेशक अशा सामाजीक , धार्मिक नि राजकीय जीवन प्रवासाचे सार म्हणावी लागेल …
आभाळाला बाप आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने रहावे
चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे एक तीळ सर्वांनी करंडून खावा
माणसावरच सूक्त रचावे माणसाचेच गाणे गावे माणसाने...
आजवर रचलेली सुक्ते ही देवांदिकांवर होती, पण माणसांवर सुक्त रचावे आणि माणसाचेच गाणे गावे माणसाने, हा मानवकेंद्री ईहवादी बुद्धविचारांचे सार आपल्या जीवनात सर्वंकष अंगिकारणारा मी पाहीलेला, मी अनुभवलेला विद्वान म्हणून यशपालजी सर्वांच्या स्मरणात सदैव सचेतन राहतील याची खात्री आहे.
यशपालजी पाच सहा महिन्यापुर्वी कोर्टात अँड. खंडेराव चौरे आणि पांडुरंग शेरखाने यांना भेटायला आले होते. तीच माझी नि त्यांची शेवटची भेट. त्यावेळी ही ते म्हणाले , 'राज नागबोधीचं काम आपल्याला मिळून पुन्हा चालू कराचंय '
यशपालजी आज आपल्यात नाहीत, ते बुद्धवासी झाले आहेत. पण नागबोधी रिसर्च सेंटरचं काम पुढे नेणे आणि हे सेंटर कार्यान्वित करणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल!
© राज कुलकर्णी
Comments
Post a Comment