धर्मनिरपेक्षता आणि गांधी-नेहरू

आंदोलन-शाश्वत विकासासाठी जानेवारी-फेब्रुवारी 2016 या प्रजासत्ताक दिन विषेशांकात प्रकाशित झालेला लेख.......

धर्मनिरपेक्षता आणि गांधी-नेहरू
धर्मनिरपेक्षता हे मूल्य राज्यशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासल्यास  त्याचा नेमका अर्थ काय, याबाबत विचारवंतात अनेक बाबीविषयी मतभेद असू शकतात मात्र भारतीय राजकारणात धर्मनिरपेक्षता हा शब्द सर्वांनी वापरून वापरून गुळगुळीत झालेला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतो आणि आपला पक्ष इतरांपेक्षा कसा जास्त धर्मनिरपेक्ष आहे, याचे दाखले दिले जातात. हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारे पक्ष, धर्मनिरपेक्षता हे पाश्चात्य मूल्य असल्याचे सांगून त्यावर टीका करतात, तर हिंदुत्व हाच कसा धर्मनिरपेक्षतेचा  आधार आहे, हे सांगण्याचेही त्यांचे कार्य चालू असते. भारतीय राजघटनेच्या प्रास्ताविकेत  धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द घटना निर्मितीच्या वेळी अंतर्भूत केले गेले नव्हते, याचा अर्थ घटनाकारांना धर्मनिरपेक्ष घटना अभिप्रेत नव्हती, असाही सूर काहींनी नुकत्याच झालेल्या घटना दिनाच्या निमित्ताने काढला होता. एकंदर धर्मनिरपेक्षता, निधर्मीवाद, सर्वधर्मसमभाव, सेक्युलर हे सर्व शब्द आताच्या समाजातील प्रभावशाली अशा प्रमुख सामाजिक राजकीय विचारधारांच्या निशाण्यावर आहेत, असे स्पष्ट चित्र दिसत आहे.
देशात नव्वदीच्या दशकात एका बाजूला उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरण होऊन जनसामान्यात अधिकाधिक बाजारू मूल्यांचा प्रभाव वाढून लोक आर्थिक आणि राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी कमालीचे 'धर्मनिरपेक्ष' झाले, मात्र समाजात धर्मनिरपेक्षता हे मूल्य स्वीकृतीचा नव्हे तर  उपहासाचा विषय बनले. नॉम चोमस्की यांनी एके ठिकाणी म्हटले होते, धर्मनिरपेक्ष राज्याने खूपच सहनशील असायला हवे! याचा अर्थ धर्मनिरपेक्षता ही केवळ सहिष्णू समाजात सुरक्षित राहू शकते! भारताच्या स्वातंत्र्यलढयात आणि त्यानंतर भारतीय  समाजाची जडणघडण गांधी-नेहरू यांच्या विचारधारेवर झालेली आहे. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना मुळातून समजून घेण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील फाळणी या घटनेचा आवर्जून अभ्यास करावा लागतो. देशाची फाळणी होऊ नये याचे सर्वतोपरी प्रयत्न अयशस्वी झाल्यावर फाळणी अपरिहार्य बनली. भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण झाली. पाकिस्तान हे मुस्लीम राष्ट्र होणार हे उघडच होते आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून भारत हे हिंदुराष्ट्र होऊ शकले असते. तसे झाले असते तर ती देशाचे अनेक तुकडे करण्यास आमंत्रण देणारी घटना ठरली असती. मात्र उर्वरित भारत हे सर्व भारतीयांचे - मग ते हिंदू असोत, मुस्लिम असोत, ख्रिस्ती असोत, शीख, बौध्द, जैन वा पारशी असोत या सर्वांचे - राष्ट्र असेल आणि हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष असेल, अशी ग्वाही देवून भारतासारख्या विविध धर्मी, बहुभाषिक देशात ती यशस्वीरीत्या अमलात आणली गेली. पाकिस्तान निर्मितीची प्रतिक्रिया म्हणून भारताची जडणघडण ठरवणे हे  राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण ठरले असते. म्हणूनच गांधी-नेहरू यांनी या देशाची निर्मिती खंबीरपणे धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर केलेली आहे.
महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू या दोन प्रमुख नेत्यांच्या विचारधारेतून धर्मनिरपेक्षता ही संकल्पना भारतीय समाज व्यवहारात रूढ झालेली आहे. तिचा अर्थ युरोपियन सेक्युलर या संकल्पनेप्रमाणे नसून, भारतीय समाज जीवनात तिचा अर्थ 'निधर्मी' असा न राहता 'सर्व धर्माबाबत समान धोरण' या आशयाने ती स्वीकारली आहे. ज्याला काहींनी 'गांधीयन सेक्युलेरीजम' असे म्हटले आहे.
महात्मा गांधी धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि आपल्या चळवळीसाठी त्यांनी धार्मिक भाषा आणि साधने वापरली. शंभर वर्षांपूर्वीच्या भारतीय समाजाचे समाजमन लक्षात घेता, त्यांची प्रतिमा एखाद्या महात्म्याची, अथवा संताची असणे आवश्यक होते. त्यामुळेच त्यांना प्रचंड मोठा जनसमूह त्यांच्या सोबत मिळवता आला. गांधीजी धार्मिक होते, त्यांचे मन धर्मश्रध्द होते मात्र ते धर्मांध नव्हते आणि कर्मकांडी देखील नव्हते. सर्व धर्मांना समान मानून सर्व धर्मांचा आदर ते करत असत, परंतु धर्माचा वापर करून राष्ट्रीयत्व धर्मापुरते सीमित करण्यास त्यांचा विरोध होता. महात्मा गांधी यांच्यासाठी धर्माचा व्यापक अर्थ 'मानवतावादी नीती-नियम' एवढाच होता आणि त्यांचा ईश्वर ते सत्य आणि अहिंसा या दोन रुपात पाहत असत. त्यांच्या विचारातील धर्मनिरपेक्षता सर्वधर्मसमभाव या स्वरूपातील आहे.
नेहरूंची विचारधारा ही आधुनिक विज्ञानावर आधारलेली चिकित्सक आणि बुध्दिवादी होती. पाश्चिमात्य उदारमतवाद आणि मानवतावाद हा नेहरूंच्या तत्वचिंतनाचा मूळ गाभा होता. मात्र नेहरूंचा मानवतावाद धर्मप्रणित मानवतावादापेक्षा निराळा होता. 'माणसाची श्रेष्ठतम अवस्था प्राचीन काळात होती. पुढे कालक्रमानुसार त्यात अध:पतन होत गेले आणि पुढेही होणार आहे. म्हणजे माणसाचा वर्तमानकाळ वाईट आणि भविष्यकाळ त्याहूनही वाईट असेल. ईश्वर भक्ती, अनुष्ठान ,जपतप या कर्मकांडाचे तंतोतंत पालन केल्यानेच या दुष्टचक्रातून मनुष्य बाहेर पडेल', असे जगातील जवळपास सर्वच धर्मांचे तत्वज्ञान सांगते. नेहरू या धार्मिक तत्वज्ञानाच्या पूर्णत: विरोधी आहेत. त्यांच्या आत्मचरित्रात 'धर्म म्हणजे काय' या प्रकरणात नेहरूंनी याबद्दल खूप सविस्तर लिहिले आहे. ''धर्माच्या नावाखाली बहुतेक वेळा, अंधश्रध्दा, कर्मठपणा, प्रतिगामित्व, कडवेपणा आणि स्वार्थरक्षण याचाच धांगडधिंगा सुरु झालेला दिसतो. तथापि मनुष्याच्या अंतरंगातील एक खोल दडलेली तहान ज्यामुळे तृप्त होईन, असे काहीतरी धर्मात आहे, हे मी ओळखून आहे. वेदनापीडित असंख्य जीवांना शांत करण्याचे काम एकेकाळी धर्माने केले आहे. संघटित धर्माचे इतिहासकालीन स्वरूप काहीही असो, वर्तमानकाळात खोबरे निघून गेलेल्या करवंटीचे स्वरूप त्यास प्राप्त झालेले दिसते. त्याचा बाह्य पापुद्रा पूर्ववत कायम असला तरी आत निराळाच मालमसाला भरलेला आढळतो आणि आतल्या गाभ्याचा काही चांगला भाग शिल्लक असलाच तर त्याच्याभोवती इतर हानिकारक द्रव्यांचा साठा जमलेला दिसतो.''
नेहरूंचे धर्मविषयक चिंतन हे एवढे सुस्पष्ट आहे की, याचे अर्थ लावताना अनुयायांना स्पष्ट संदेश जातो. गांधीजींची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या सर्वधर्मसमभाव या भावनेतून आहे, मात्र नेहरूंनी स्वीकारलेली धर्मनिरपेक्षता ही सामाजिक जीवनातील निधर्मी भूमिका स्पष्ट  करणारी आहे आणि धर्म हा अधिकाधिक अध्यात्माशी आणि व्यक्तिगत पातळीवर अस्तित्वात असावा असे सांगणारी आहे. व्यक्तिगत स्तरावर नेहरूंनी ''अलौकिक शक्तीचे अस्तित्व आणि आत्मा नावाची काही गोष्ट अस्तित्वात असते यावर माझा विश्वास बसत नाही'' असे म्हटले आहे. परलोकाबद्दल आपण जेवढी कमी चिंता करू, तेवढे जास्त आपण लोकांचे कल्याण करू शकू, असे त्यांचे स्पष्ट मत होते. नेहरू विचाराने पूर्णपणे इहवादी होते, जगातील सर्वच धर्मांना मानवी मूल्यांचे आणि सामाजिक न्यायाचे आकलन नसून सर्वच धर्म संकुचित आहेत. त्यात परमतसहिष्णुता नाही. आज जगात ज्यास धर्म म्हणतात त्याची कृत्ये पाहून मानवाने भयग्रस्त व्हावे असेच चित्र आहे, असे त्यांनी त्यांच्या धर्मविषयक चिंतनपर लेखात नमूद केले आहे. नेहरू म्हणतात, ''काही हिंदू वेदकालाकडे परत फिरले पाहिजे असे म्हणतात, काही मुसलमान इस्लामिक धर्मराज्य स्थापनेचे स्वप्न पाहतात, हे सारेच स्वप्नरंजन आहे, कारण भूतकाळाकडे पुन्हा पाऊल टाकता येत नसते, तुम्हाला वाटेल आपण रेंगाळत राहावे, पण तेही शक्य नाही, कालप्रवाह एक मार्गीच असतो.'' धर्मनिरपेक्षतेला असणारा जमातवादाचा धोका स्पष्ट करून, सर्व प्रकारचा, सर्वच धर्मीयांचा जमातवाद विघातक असून त्याचे विश्लेषण करताना नेहरूंनी त्याची  'प्रामाणिक जमातवाद' आणि 'अप्रामाणिक जमातवाद' अशी विभागणी केली आहे. प्रामाणिक जमातवाद हा भीतीचे अपत्य असतो तर अप्रामाणिक जमातवाद ही राजकारणी लोकांची स्वार्थी प्रतिक्रिया असते. अल्पसंख्यांकांचा जमातवाद एका मर्यादेत प्रामाणिक असतो, सामाजिक-राजकीय जीवनातील बहुसंख्यांकांच्या प्रभुत्वामुळे आपले हक्क टिकणार नाहीत, आपल्याला न्याय मिळणार नाही, आपली सांस्कृतिक गळचेपी होईल असे वाटून जमातवाद आकार घेतो, तो प्रामाणिक म्हणता येईल. पण लोकशाही व्यवस्थेत तोही चुकीचाच आहे. मात्र बहुसंख्यांकांचा जमातवाद नेहमीच अप्रामाणिक असतो. अल्पसंख्यांकांना विश्वासात घेण्याची, त्यांच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी बहुसंख्यांकांची असते असे नेहरूंचे मत होते. नेहरू म्हणतात, धर्मनिरपेक्षतेच्या तत्वास कुठल्याही प्रकारे बाधा येणार नाही, अशा पध्दतीने लोकशाहीतील आपले स्थान वापरण्याची जबाबदारी हिंदूंची आहे.
स्वातंत्र्य चळवळ आणि तत्कालीन समाज आणि त्या समाजाच्या नेतृत्वाच्या कल्पना, या बाबतची व्यावहारिक गरज म्हणून एका ठराविक मर्यादेत गांधीजींची धर्माबाबतची भूमिका जवाहरलाल नेहरूंना मान्य होती, मात्र सत्याची गूढवादी संकल्पना, अहिंसा, व्रतस्थ जीवनाचा आग्रह, या गोष्टींना नेहरूंचा विरोध होता आणि तो त्यांनी अनेकवेळा स्पष्टपणे मांडला. जीवन शुष्क करणारे तत्वज्ञान प्रगतीला मारक आहे, असे ते म्हणत. पाश्चात्य उदारमतवादी विचारांचा उदय हा मुळातच मानवाची प्रतिष्ठा आणि समानता या हक्कांसाठी धर्म, सरंजामशाही यांच्या विरोधातील लढयातून झालेला होता, त्यामुळे पारलौकिक जीवन हे धर्माचे कार्यक्षेत्र आणि ऐहिक जीवन राज्याचे कार्यक्षेत्र, हा धर्मनिरपेक्षतेचा नेहरूवादी अर्थ अशा प्रकारे पाश्चात्य विचारधारेशी मिळता जुळता दिसून येतो. शासनाचा प्रमुख म्हणून नेहरूंनी भारतीय राज्य घटनेतील धर्मनिरपेक्षतेची संकल्पना अंगिकारली. मात्र  व्यक्तिगत जीवनात ते  निधर्मी, इहवादी राहिले.
धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना पाश्चात्य विचार प्रवाहातून उगम पावली असली तरी पाश्चात्य राज्यव्यवस्थेप्रमाणे तिचा अर्थ भारतीय घटनेत नाही. भारतीय राज्यघटनेत हीच धर्मनिरपेक्षता अनुछेद 25 मध्ये मांडण्यात आलेली आहे. यामध्ये धर्म, व्यक्ती आणि शासन या तीनही बाबींचा विचार करताना दोघांमधील संबंधात तिसऱ्या बाबीस वगळले आहे. म्हणजे धर्म आणि व्यक्ती मध्ये शासन असणार नाही, शासन आणि धर्म यामध्ये व्यक्ती असणार नाही आणि शासन आणि व्यक्ती यात धर्म असणार नाही! धर्म आणि व्यक्तीत राज्याचा हस्तक्षेप नसणे म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य तर राज्य आणि व्यक्ती यांच्यातील संबंध म्हणजे नागरिकत्व धर्मावर आधारित नसेल. राज्य आणि धर्म यांच्यातील संबंधातून व्यक्तीस वेगळे ठेवणे म्हणजे समाजातील सुधारणा विषयक कायदे, धर्माच्या अनुयायांना डावलून करणे शक्य व्हावे! जवाहरलाल नेहरू 31 डिसेंबर 1952 रोजी 'मन:प्रवृतीची सहिष्णुता' या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात म्हणतात, ''भारताची पहिली निकड जर कोणती असेल तर देशाची एकी टिकवणे! ही एकी केवळ राजकीय स्वरुपाची नव्हे तर मनाची, हृदयाची असायला हवी ज्यामध्ये फुटीरतेकडे झुकणाऱ्या धर्म, वंश,भाषा वा प्रदेश अशा संकुचित प्रेरणांना स्थान राहणार नाही.''
एकजुटीचा आणि एक राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार ही गांधी आणि नेहरू यांच्या जीवनाची प्रमुख उद्दिष्टे होती आणि या एक राष्ट्रीयत्वात सर्वधर्म समभाव म्हणजेच एका अर्थाने धर्मनिरपेक्षता तत्वाला त्यांनी मुख्य स्थान दिले होते. द्विराष्ट्रवाद या विषयावरील  वरील चर्चेत भाग घेताना नेहरू प्रांजळपणे म्हणाले होते,   ''धर्माधिष्ठित राज्य आणि द्विराष्ट्रवाद या तत्वाचा तर्कशुध्दपणे अंगीकार करावयाचा झाल्यास भारतामध्ये दोनच का अनेक राष्ट्रे निर्माण होवू शकतील, कारण शीख, जैन, ख्रिस्ती देखील या देशाचे नागरिक आहेत.''
धर्मनिरपेक्षता हे बहुधर्मीय, बहुवंशी, बहुभाषिक समाजात समता प्रस्थापित करणारे लोकशाही व्यवस्थेतील एक मूल्य आहे. या मूल्यावर मार्गक्रमण केल्याशिवाय आपले राष्ट्र एकसंघ होणार नाही. राष्ट्रीय एकात्मतेशिवाय देश प्रगतीशील होणार नाही आणि पर्यायाने भारतीय जनतेतील तळागाळातील लोकांचे कल्याण होणार नाही अशी स्पष्ट मांडणी जवाहरलाल नेहरू यांची होती. धर्माधिष्ठित राज्याची कल्पना मध्ययुगीन अज्ञान-अंध:काराचे द्योतक असून आधुनिक भारताला त्या दिशेने नेण्यात काही हशील नाही. विविध धर्म असलेल्या भारतातील असंख्य प्रश्नांची सोडवणूक धर्मनिरपेक्षतेतच होऊ शकते. गांधीजींची देखील अशीच धारणा होती.
युरोपियन इतिहासकार डोनाल्ड युजीन स्मिथ 1963 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'India as a Secular State'  या ग्रंथात म्हणतात, ''गांधीजींच्या विचारांचा उगम धार्मिकतेतून  झाला होता. त्यांची अशी खात्री होती की सर्वच धर्म खरे आहेत, म्हणून त्यांना धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना व्यवहार्य वाटली. नेहरूंच्या विचारांचा उगम व्यवहार्य राजकीय विचारातून झाला होता, सारेच धर्म बहुतांशी खोटे आहेत, अशीच त्यांची धारणा होती. म्हणून लोकशाही पध्दतीला बाधा न आणता या सर्व धर्मांना शांततेने आपले व्यवहार करावयाला स्वातंत्र्य देण्यात यावे असे मानून त्यांनी धर्मनिरपेक्ष राज्य पध्दतीचा आग्रहाने अंगीकार केला. भारतातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हे एकमेकांवर एवढे आधारलेले आहेत, त्यातील कोणत्याही एकाचा अंत दुसऱ्याचा अंत असेल.''
भारतासारख्या बहुधार्मिक आणि बहुभाषिक देशातील लोकशाही संरक्षित करायची असेल तर देशातील धर्मनिरपेक्षता अधिक संवर्धित व्हायला हवी, हा विचार भारताला गांधी आणि नेहरू यांनी दिलेला आहे. संपूर्ण जग म्हणूनच भारताला गांधी-नेहरूंचा देश म्हणून ओळखते. जेव्हा केव्हा भारताला लोकशाहीचा आणि धर्मनिरपेक्ष विचारांचा त्याग करावयाचा असेल तर त्याची सुरुवात गांधी आणि नेहरू दोघांचा धिक्कार करूनच करावी लागेल!
© राज कुलकर्णी.

Comments