फँसीझम नाझीझम आणि फिल्म

फँसिझम-नाझीझम आणि फिल्म जगत .

नाझी विचारांचा प्रभाव जर्मनीत वाढू लागल्यावर पक्ष प्रचाराचे प्रमुख माध्यम म्हणून चित्रपट आणि टिव्ही शो कडे लक्ष देण्यात आले.चित्रपटांमध्ये समाजात मोठा प्रभाव टाकण्याची क्षमता व समाजातील यांची लोकप्रियता ओळखून चित्रपट कलावंताच्या प्रसिद्धीच्या जोरावर नाझी नेत्यांनी जनतेत स्वत:ची स्विकृती वाढविण्यास सुरूवात केली. सन १९२७ ते १९४५ या काळातील जर्मन सिनेमे नाझींच्या प्रचाराचे प्रमुख साधन बनले. 

हिटलर सत्तेत आल्यावर चित्रपटाचे कथानक काय असावे, कोणत्या कलाकारांना चित्रपटात रोल दिला जावा, चित्रपटातून काय संदेश द्यावा याचे निर्देश नाझी पार्टीकडून दिले जायचे. कांही सुमार दर्जाचे कलाकार हिटलरच्या जवऴ जाऊन पैसा नि प्रसिद्धी मिळवू लागले तर नाझी पक्षास समर्थन न देणा-या कलावंतांचा विविध प्रकारे छळ सुरू झाला. जोसेफ गोबेल्स त्यासाठी खास प्रचार मंत्रालयाची स्थापना केली व जर्मन संस्कृती, देशभक्ती यासाठी जर्मन सिनेमा असे धोरण जाहीर केले. या सर्व प्रयत्नाचा मुळ हेतू समाजात ज्यू वंशियाबद्दल द्वेष सतत वाढवत त्या द्वेषावर जर्मनीचा राष्ट्रवाद विकसित करणे हा त्यांचा हेतू होता. हिटलर स्वत: सिनेमाचा चाहता होता. सुरवातीच्या काळात हिटलर स्वत:ला समाजात स्विकृती मिळविण्यासाठी लोकप्रिय चित्रपट अभिनेत्यांशी भेटत असे, त्यांच्या सोबतचे छायाचित्रे, मुलाखती प्रसिद्ध करत असे. जाज्वल्य जर्मन राष्ट्रवादाच्या दांभिक प्रचारासावर आवरण म्हणून या सिनेजगताच्या झगमगटाचा वापर केला जाई. गोबोल्स स्वत: प्रत्येक फिल्म पाहून त्यात सुधारणा सांगत असे. 

अनेक ज्यू अभिनेत्यांना परागंदा व्हावे लागले, एवढेच नव्हेतर ज्या कलाकारांची आई वा वडिल यांच्यापैकी एकजण ज्यू होते  अशांना विशेष लक्ष्य करण्यात आले. सुरवातीच्या काळात ज्यू वंशियांचा द्वेष हा प्रमुख अजेंडा होता. मात्र चित्रपटात हिटलरचे विचार हे देशाला एकसंघ करण्याचे आणि बलशाली जर्मनी बनविण्याचे आहेत, असे प्रदर्शित केले जात असत. "Triumph des Willens" या चित्रपटात हिटलर समाजात सर्वांना समान अधिकाराचे आणि वर्गविहीन समाजरचनेचे समर्थन करत असल्याचे दर्शवले होते. हिटलर म्हणजे समाजात समता आणणारा नायक अशी प्रतिमा निर्माण केली जात असे. प्रत्यक्षात मात्र ज्यू द्वेष चालू असे कृतीत तर ज्यूंच्या कत्तलीही केल्या जात असत. हिटलर जेव्हा जर्मन नागरिकांना एकतेचा नि समतेचा संदेश देई, तेंव्हा तो ज्यूंच्या विरोधात सर्वांनी एक व्हावे आणि ज्यूंचा द्वेष करणा-यांनी समतेने वागावे, असा त्याचा संदेश होता. पण पुढे द्वेषाचा परीघ देशभक्ती व जर्मन राष्ट्रवाद यांच्या आवरणाखाली वाढवला जाऊन ज्यू बरोबर देशद्रोही, जर्मनीचे विरोधक, शत्रुचे हस्तक म्हणून जिप्सी, कम्यूनिस्ट, स्वाव वंशीय, समलिंगी, मानसिक रूग्ण यांचा समावेश झाला. 

फ्रिट्झ नावाच्या सिनेनिर्मात्याकडून गोबेल्स ने 'Der Ewig Jude' हा चित्रपट खास तयार करून घेतला, त्याचे इंग्लिश रूपांतर ' Eternal Jews' असे करून घेतले. यात ज्यूंची तुलना वेगाने लोकसंख्या वाढविणा-या उंदरांशी केली होती. जसा उंदीर हा घाणेरडा नि उपद्रवी तसेच ज्यू आहेत. हे जर्मन लोकांवर बिंबवण्यात आले. कॉकेशियन वंशाच्या जर्मन स्त्रीवर एक ज्यू पुरूष बलात्कार करतो, असे कथानक असणा-या ' Jude sus' या जर्मन नाटकास गोबेल्सने आवर्जून प्रसिद्धी दिली. यातून गोबेल्सने जनमानसांत ज्यू-ख्रिस्ती असा आंतरधर्मिय विवाह करणा-या अनेक फिल्म अभिनेत्यांना आणि चित्रपट रसिकांनाही  लक्ष्य केले आणि यातून जो संदेश द्यायचा तो दिला गेला!  

चित्रपटातून या सर्वांबद्दल तिरस्कार वाढविण्यास सुरूवात झाली. शुद्ध कॉकेशियन नॉर्डिक वंशाचा आग्रह धरताना यांच्याशिवाय कोणीही जर्मन देशभक्त नाही, असा प्रचार केला गेला. वायमार रिपब्लिक काळातील जर्मन सिनेमे हे जर्मन राष्ट्रवादाच्या विरोधी आहेत पुर्वीच्या सर्व चित्रपटांवर टिका सुरू केली गेली. त्याचा मुख्य हेतू हा की, अधिकाधिक प्रेक्षक नाझी पक्षात समाविष्ट होण्यास उद्युक्त होतील. महत्वाचे म्हणजे या सर्व प्रकारास फिल्म निर्मितीस जर्मन राष्ट्रवादी बनविण्याचे प्रयत्न म्हणून गौरविले गेले. 

ज्यू विरोधात फिल्म बनविणा-या निर्मात्यांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देणे आणि करातूनही सवलती देण्याचे धोरण ठरवले गेले. अनेक फिल्म कंपन्या नाझी पक्षाने स्वत: स्थापन केल्या आणि त्यांचे एकत्रिकरण करून इतर देशातील गुंतवणुकदारांनाही आमंत्रित करण्यात आले. याचा अनेक नफेखोर फिल्म निर्मात्यांनी लाभ घेतला. अनेक कलावंतावर पाळत ठेवली गेली, छळ सुरू झाला. त्यातून अनेकांनी जर्मनी सोडली तर अनेक फिल्मसवर आणि फिल्म निर्मात्यांवर, दिग्दर्शकांवर, अभिनेत्यांवर बंदी आणून त्यांना देश सोडण्यास भाग पाडण्यात आले. 

नाझी पक्षाच्या ध्येयधोरणांचा प्रचार करणा-या फिल्म्सना, दिग्दर्शकांना, कलाकारांना 'अवार्ड' दिले जाऊ लागले. ही आवार्ड्स मिळविण्यासाठी अनेकांनी नाझी पक्षाच्या बरहुकूम काम करण्यास सुरूवात केली. कांहीजण भुमिकाच घेत नसत, त्यांचे कांही काळ चालले पण नाझी पक्षाचा प्रभाव वाढला तसे या तटस्थ लोकांचाही छळ सुरू झाला. 

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर फिल्म जगतातील अनेक दिग्दर्शक, कलावंत, फिल्म निर्माते यांना सैन्यात भरती करण्याची धमकी देत नाझी पक्षाने आपला हेतु साध्य केला. टिव्ही, रेडीओ यापेक्षाही सिनेमा प्रभावी असल्यामुळे दुस-या महायुद्धात बर्लिन मधे सिनेमागृहावर बॉम्बवर्षाव होऊ नये म्हणून, त्यांना वाचविण्यासाठी खास यंत्रणा उभी केली गेली होती. म्हणजे नागरिकांच्या संरक्षणापेक्षाही नाझींसाठी सिनेमागृहे महत्वाची होती. 

जर्मनी मधे पुर्वी लोकप्रिय कलाकारांची अशी एक विशिष्ट ' स्टार सिस्टम' होती, त्यांचा एक 'स्टारडम' होता. या 'स्टार सिस्टम' आणि 'स्टारडम'ला ही ज्यूंनी विकसित केलेली पद्धती आहे, असा प्रचार करून तिला बदनाम केले गेले. अनेक उपेक्षित स्टार्संना ही कृती खूप आवडली, त्यांनी नाझींना स्वस्वार्थासाठी पाठीबा देण्यास सुरूवात केली. हेच जर्मनीतील खरे फिल्म स्टार्स आहेत,असा प्रचारही लगेच सुरू झाला. याचा परीणाम म्हणून Marlene Dietrich आणि Greta Garbo यांनी हॉलीवुडचा रस्ता धरला. 

झारा लिएँडर नावाची एक अभिनेत्री १९३७ मधे  जर्मनीत खास स्विडनहून आमंत्रित करण्यात आली होती. तीचा आवर्जून अभिनेत्री नि गायिका असा प्रचार नाझी पक्षाकडून केला गेला. ती पुर्णत: नाझी पक्षाने दिलेल्या हुकूमानुसार कृती करत असे. नाझी नेते हिटलर, गोबेल्स, गोरिंग हे जनतेमधे वावरत असताना या अभिनेत्रीस सोबत ठेवत. हिटलर स्वत: त्याची डिनर पार्टी अथवा एखादा पब्लिक इव्हेंट Olga Tschechowa आणि Lil Dagover यांच्यासोबत साजरा करत असे. त्यांनाही ते हवेच होते!

सिनेजगताशी सख्य हे नाझी नेत्यांना लोकप्रिय होण्यासाठी आवश्यक होते. नाझी पक्षाशी सख्य या कलाकारांना प्रसिद्धी नि पैसा मिळविण्यासाठी उपयुक्त होते. म्हणून देशोदेशीच्या फिल्म कलाकरांनी यात पैसा नि प्रसिद्धी मिळवळी. यात कांही रशियन, पोलिश, हंगेरियन फिल्म कलाकारही होते. 

गोबेल्स ने १९४४ साली, कलावंतांची एक 'Gottbegnadeten List' तयार केली. ही लिस्ट म्हणजे या कलावंतांना चित्रपटात घ्यायलाच हवे,असे सांगणारी होती. कारण ते या लिस्ट नुसार 'irreplaceable artist' बनले होते. जणू त्यांना वगळणे म्हणजे देशद्रोहच! या लिस्ट मधे आपले नांव असावे म्हणून अनेकांनी धडपड केली. दुस-या महायुद्धात देशभक्तीच्या नांवाखाली अशा अनेक कलाकारांनी हिटलरच्या युद्धास स्वाभाविकपणे समर्थन दिले. 

नाझींच्या अस्तानंतर या सर्व कलाकरांची जनतेने काय अवस्था केली, हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. पण एखाद्या देशात फँसिस्ट नि नाझी विचार प्रभावी होत असताना स्वत:ला निव्वळ तत्कालिन फायद्यानुसार अनुरूप बनवणे सिने कलाकार, लेखक, नाट्यकर्मी यांचा भविष्यकाळ कसा होऊ शकतो, याचे उदाहरण म्हणून याकडे पाहणे गरजेचे आहे. 

जगात जिथे कुढे फिल्म इंडस्ट्री आहे, तिथे अजून तरी हा असा प्रयोग पुरता यशस्वी झालेला नाही, पण भविष्याच्या उदरात नेमका कसला गर्भ पोसला जातो आहे, याची कल्पना आजीबातही करता येत नाही. 

© राज कुलकर्णी

Comments