नेतृत्व आणि भाषा - इंदिरा गांधी आणि नेहरू

नेतृत्व - इंदिरा आणि नेहरू यांचे!!!!!   

इंदिरा गांधी यांचा फ्रेंच भाषेतील मुलाखतीचा एक Video फेसबुकवर एकदा पुन्हा खूप viral झाला आहे. त्यातील त्यांचे फ्रेंच भाषेतील उच्चार पाहता , त्यांनी फ्रेंच बोलण्याचे परिश्रमपूर्वक प्रशिक्षण घेतल्याचे स्पष्ट होत होते. म्हणजे त्यांनी ही भाषा योग्यपणे पिक अप केली म्हणावे लागेल. कारण फ्रेंच भाषा निव्वळ पुस्तकी स्वरुपात शिकता येणे आणि त्यातही बोलता येणे तसे अवघडच आहे. 

फ्रेंच भाषेला एक लय आहे.व्यंजने कठोर नाहीत. शब्दातील शेवटच्या व्यंजनाचा उच्चारच होत नाही. दुस-या शब्दाची सुरूवात जर स्वराने होत असेल तर पहिल्या शब्दातील अखेरचे व्यंजन त्या स्वरात मिसळते. उच्चार एकदम Compact आणि लयबद्ध असतात. फ्रेंच शिकण्याचं बोलण्याच एक तंत्र आहे. ते चांगल्या शिक्षकाकडून शिकून घेतले तरच जमू शकते. नेमकं याच्या उलट जर्मन भाषेचे आहे. कठोर व्यंजने आणि अतिशय पसरट उच्चार! 

'कौमा ताले वू'  या उच्चाराचे फ्रेंच स्पेलिंग 'Comment alle vous? ( How are you? )असे असून  'Donna moia votre adreess, sil vous please' ( Please give me your adress) चा उच्चार 'दोन्नम्वा वोत्राद्रेस सिल वू प्ले' असा आहे. फ्रेंच लोक लंडनला  'लुंद्र' म्हणतात तर पॅरीसला फक्त 'पॅरी'! इंग्रजी भाषेतील 'बोन् व्हाएज' हा Happy Journy  म्हणून वापरला जाणारा शब्द मुळात फ्रेंच आहे! 

जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी हे दोघेही अनेक भाषेचे जाणकार होते. त्यांचे नेतृत्व एकाचवेळी भारतीय जनमानसावर आणि त्याच वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपला वेगळा प्रभाव निर्माण करणारे होते. हे नेतृत्व असे का घडले याच्या मागे एक विश्वव्यापक संवादक्षमतेच्या प्रभावी विचारांची बैठक आहे. 

ब्रिटीशांच्या सर्वच वसाहतीत स्वातंत्र्यलढा चालू होता पण नेहरू सारखा नेता इतर कोणत्याच वसाहतीत निर्माण झाला नाही! याचे कारण नेहरूंनी खूप परीश्रमपुर्वक स्वत:चे नेतृत्व उभे केले आहे. ते भारतीय पातळीवर जसे भक्कमपणे निर्माण केले तसे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरही निर्माण केले. स्वाभाविकपणे हेच, त्यांचे नेतृत्वगुण त्यांनी पिता म्हणून इंदिराजींच्या व्यक्तीमत्वात अंतर्भूत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. नैनीच्या कारागृहात नेहरू असताना इंदिरा केवळ पंधरा सोळा वर्षाच्या होत्या पण नेहरूंनी त्यांना इंग्रजी शिवाय जगातील फ्रेंच, जर्मन, इटालियन, स्पँनिश अशा प्रभावशाली भाषा शिकून घे, ते भविष्यात तुला खूप उपयुक्त ठरेल असा सल्ला दिला होता.नेहरू इंदिराजींचे केवळ पिता नव्हे तर राजकीय गुरूही होते! स्वाभाविकपणे इंदिरेने हा सल्ला ऐकून त्या दृष्टाने प्रयत्न केले. पुढे नेहरूनंतरच्या काळात त्यांच्या समोर अनेक दिग्गज कॉग्रेसी नेते असतानाही त्यांनी जनतेचे मन जिंकले आणि जागतिक नेत्या बनल्या, यात त्यांच्या संवाद कौशल्याचा खूप मोठा वाटा आहे! संवादाचे माध्यम भाषा असते आणि केवळ भाषेमुळे अनेक महान नेते मागे पडल्याचे आणि त्याच बरोबर घडल्याचेही आपण पाहतो. कारण भाषा हे नेतृत्व घडविणारं मुलभूत साधन आहे. 

इंदिराजींनी पुण्यातून 3 ऑक्टोबर 1932 रोजी नेहरूंना पत्र लिहून जर्मन आणि फ्रेंच शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगीतले. कारण त्यापुर्वीच्या एका पत्रात नेहरूंनी जर्मन शिकत असल्याचा उल्लेख केला होता. 

नेहरूंनी अध्यक्षपदावरून कॉंग्रेसच्या कराची अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. त्याच अधिवेशनात त्यांनी ब्रिटीश सरकारला एक महिन्याची मुदत दिली होती आणि ती मुदत संपताच २६ जानेवारी १९३० देश स्वतंत्र झाला असे जाहीर करून पहिले राष्ट्रपती म्हणून चरखा असलेला तिरंगी ध्वज फडकवला होता. पुढील काळात नेहरूच देशाचे नेतृत्व करणार हा संदेश जवळपास या वेळेपासूनच सर्व जनतेला मिळाला होता.या नंतर नेहरूंना अटक होवून ते नैनी, बरेली, देहरादून अलीपूर आणि अल्मोरा या तुरुंगात होते. हा कालखंड जवळपास चार वर्षाचा आहे. यात त्यांनी अनेक भाषा शिकून घेतल्या आणि त्यांवर प्रभुत्व मिळवले हे विशेष!  

नेहरूंनी भारतात असताना हिंदी, इंग्रजी, संस्कृत,उर्दू,काशिरी या भाषा अवगत केल्या होत्या. मात्र केम्ब्रिज मध्ये शिकत असताना त्यांनी इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभुत्व मिळवले. शैलीदार इंग्रजी लिहीणे आणि शैलीदार इंग्रजी बोलणे, त्यांनी शिकून घेतले आणि  ते विविध भाषा त्या भाषेचा बाज ओळखून बोलत असत. त्याच काळात त्यांनी फ्रेंच भाषा शिकून घेतली,  मात्र फ्रेंच वर प्रभुत्व मिळवणे एवढी सोपी बाब नव्हे ! परंतु त्यांनंतरच्या काळात नेहरूंनी खूप कष्टाने फ्रेंच भाषा अवगत केली. सन १९३२ ते १९३५ या काळात त्यांनी फ्रेंचवर प्रभुत्व मिळवले. त्यांच्या आत्मचरीत्रात त्यांनी अनेक इंग्रजी साहित्या सोबतच फ्रेंच कविता, नाटके, कांदंबरी, कथा यांचे संदर्भ दिले आहेत. याच काळात ते जर्मन भाषा देखील शिकले.

जर्मन भाषा शिकण्यासाठी त्यांना ब्रिटीशांच्या नौकरीत असणा-या एका जर्मन अधीका-याचे सहाय्य मिळाले.हा अधिकारी नेहरूंना जर्मन भाषा शिकण्यासाठी उपयुक्त पुस्तके आणि त्याच बरोबर नियतकालीके उपलब्ध करून देत असे. परंतु या काळात नेहरूंनी सर्वात जास्त फ्रेंच साहित्याचे वाचन केले. बरेलीच्या तुरुंगात असताना इंदिरा गांधी त्यावेळी कमला नेहरू यांच्या उपचारासाठी आजी स्वरूपरानी सोबत पुण्यात होत्या.त्यावेळी त्यांनी सिंहगड येथे जावून 'तानाजी मालुसरे' यांची समाधीही पहिली असल्याचा उल्लेख पत्रात उपलब्ध आहे. 

इंदिराजी त्याचकाळात पाचगणीला गेल्या तेंव्हा नेहरूंनी त्यांना एक पत्र लिहिलेले आहे.ज्यात नेहरू म्हणतात की मी सध्या लॉर्ड बायरन चे फ्रेंच भाषेतील चरित्र वाचत आहे. त्याच्या पूर्वीच्या पत्रात इंदिरा गांधी यांनी नेहरूंना फ्रेंच पुस्तकांची मागणी केली होती आणि ती कुठून मिळतील अशी विचारणा केल्यावर नेहरू लिहीतात ' फ्रेंच पुस्तके भारतात मिळणे अवघडच आहे. तरीही तू Times Book Club  शी संपर्क साध. तुझ्या फुफाकडे  (म्हणजे विजयलक्ष्मी पंडित) कांही फ्रेंच पुस्तके आहेत, ती तु तीच्याकडून घे'. त्याचवेळी ते असेही लिहीतात की, 'तुझ्यासाठी मी Mille Hemmerlin यांना लिहून तुझ्यासाठी कांही पुस्तके पाठवायला सांगतो. शिवाय तु स्वत:ही त्यांना लिही आणि पुस्तके मागवून घे ' असे म्हणून नेहरूंनी त्यांचा पत्ता त्या पत्रात दिला आहे. 

नेहरू पुढे लिहीतात "Times Book Club ची कांही फ्रेंच पुस्तके आपल्याकडे घरी आहेत, ती माझ्यासाठी आणलेली आहेत जी  तुझ्यासारख्या अगदी सुरूवात करणा-याच्या उपयोगाची नाहीत. पण तरीही, ती पाहून घे,  मी सध्या जर्मन भाषेवर खूप खडतर प्रयत्न करतोय. मला जर्मन भाषा  वाचायला व बोलायला तब्बल सहा आठवडे लागले. जर्मन शिकायला तशी खूप अवघडच आहे. पण तु फ्रेंच वर लक्ष केंद्रित करावे आणि शक्य तितक्या भाषा शिकून घे!" 
 

नेहरूंनी याच काळात फ्रेंच आणि जर्मन सोबत स्पँनिश भाषेचाही अभ्यास केला. स्पँनिश ही भाषा जर्मन आणि फ्रेंच पेक्षा इंग्रजी येणा-यासाठी अधिक सोपी भाषा आहे, असे म्हणून नेहरू एक गंमतीशीर बाब सांगतात, ती अशी की, तु मला जे पापु म्हणतेस तो शब्द स्पँनिश भाषेतील आहे. 

इंदिरेच्या शाळेतील कार्यक्रमास पालक म्हणून नेहरू तुरूंगात असल्यामुळे हजर राहू शकले नाहीत, म्हणून माफी मागतात आणि म्हणतात ' तु तुझ्या जीवनातील ध्येय ठरवत आहेस, याचा आनंद वाटतो. तुझ्या सुट्ट्या लवकरच सुरू होतील, तुला शक्य झाले तर तुझ्या म्हाता-या पापूला भेटायला नक्की ये! नवरोज सुरू होईल, माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेतच पण लक्षात ठेव, तुझा पापू कांहीही सहन करू शकतो पण तुला निराश आणि दु:खी चेह-याची पाहू शकत नाही" 

म्हणून नेहरूंनी या पत्रात, एक फ्रेंच भाषेतील Arnault या फ्रेंच कविची 1830 च्या आसपासची 'La Feuille' ही कविता इंदिरेला अभ्यासण्यासाठी पाठवली होती. त्या कवितेचे इंग्रजी भाषांतर ' The Leaf' असे असून त्या कवितेत ' पान आणि फुल' यांचे नाते विशद केले आहे! त्यात नेहरू  स्वत:ला गळलेले पान आणि इंदिरेला फांदी या अर्थाने ही कविता सांगतात. 
'Fallen off from your branch 
Little dried -up leaf' 

असे या कवितेच्या पहिल्या ओळी आहेत. 

नेहरू आणि इंदिरा यांच्या व्यक्तीमत्वात हाही एक महत्वपुर्ण गुण असा होता की ते अनेक भाषा लिहू, वाचू आणि बोलू शकत होते. देशातील इतर नेत्यांनी आणि भारता शिवाय इतर देशातील नेत्यांनी  स्वत:ला असे घडविण्याचा कितपत प्रयत्न केला हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. नेता होण्यासाठी काय काय महत्वपुर्ण असते याची प्रगल्भ अशी जाणीव नेहरूंना आणि इंदिरा यांनाही होती! म्हणूनच या दोघांचे नेतृत्व विश्वव्यापक पातळीवर समर्थपणे झळकले गेले आहे आणि सदैव झळकत राहील!

© राज कुलकर्णी.

[ हा लेख पुर्व प्रकाशित आहे]

Comments