नियतीशी संकेत भेट- Tryst with destiny

नियतीची संकेत भेट ....Tryst with destiny .....

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत या देशाची जगाला नव्याने ओळख व्हावी. मध्यरात्रीच्या सत्तांतर सोहळ्या निमित्त  काही विशेष संदेश जगात पोहचला पाहिजे म्हणून  लेखन करावे वा टिपण तरी काढावे असे नेहरूंनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी ठरवले होते .परन्तु त्यांचा दिवस अतिशय व्यस्त होता, रात्री घरी यायला दहा वाजले आणि नेहरू लिहायला बसणार एवढ्यात घरातील लोकांनी आग्रह करून जेवायला बसवले. नेहरू जेवायला बसले ,तेवढ्यात लाहोर येथून एक फोन आला. लाहोर मधल्या दंगली ,रक्तपात, जाळपोळ या बद्दलचा तो फोन होता . हा फोन जवळपास अर्धा ते पाऊन तास चालू होता.फोन खाली ठेवला तेव्हा ते एकदम सुन्न झाले होते. एखाद्या खोल दरी मध्ये कोसळल्यासारखी त्यांची स्थिती होती. दिवसभर दगदग झाल्यामुळे  भाषण लिहिण्यासाठी त्यांच्या कडे वेळही नव्हता आणि शक्तीही उरली नव्हती. परंतु त्यांनी स्वतःला सावरले आणि अवघ्या ३० ते ४० मिनिटांच्या कालावधीत , मध्यरात्रीच्या पूर्वी त्यांनी रात्री १०.३० ते ११ दरम्यान अतिशय प्रभावी आणि  उत्तम असे भाषण लिहिले . त्यातील  उस्फुर्त शब्दांच्या आणि   हृदयस्पर्शी वाक्यांच्या , आश्वासक धीरगंभीर स्वरात त्यांनी केलेल्या प्रभावी मांडणी मुळे संपूर्ण सभाग्रह स्तंभित झाले. 

विशेष म्हणजे त्यांनी  लिहित असताना 'Long years ago,we made a date with destiny' 
असे लिहिले होते परंतु उस्फुर्तपणे भाषण करताना त्यांनी 'we made a tryst  with destiny' असा शब्द वापरला आणि भाषण केवळ भाषण न राहता एखाद्या काव्य प्रमाणे भावनेचा उत्कट आणि उस्फुर्त  अविष्कार रुपात प्रकट झाले ! 

नेहरूंच्या हस्क्षारातील हा ड्राफ्ट पाहताना याची आपल्याला कल्पना येते .समस्त भारतीयांसाठी हि अभिमानाची बाब आहे कि ,आपले पहिल्या पंतप्रधानांनी केलेल्या या उस्फुर्त भाषणाने संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहू लागले!
या भाषणास विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट भाषाणा पैकी (११ वे )भाषण म्हणून सन्मान मिळाला. आवर्जून सांगायची बाब अशी कि , ते जगातील सर्वोत्तम' impromptu speach' म्हणजे 'ऐनवेळी केलेले भाषण' आहे.

लंडन येथील जगातील सर्वोत्कृष्ठ भाषणांच्या संग्रहात स्थान मिळालेले हे एकमेव भारतीय नेत्याचे भाषण आहे. या भाषणात नेहरूंनी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सुपुत्रांचे स्मरण, सद्यस्थिती, जवाबदारी, आव्हाने आणि ध्येय यांबद्दल अतिशय आश्वासक पद्धतीने मांडणी या भाषणात  केली आहे. म्यानमार मधील लोकशाहीवादी नेत्या ऑन्ग सांग सु की यांनी या  भाषणास 'प्रेरणेचा सातत्यपूर्ण स्रोत' असे म्हटले आहे. जगातील अनेक नेत्यांनी या भाषणापासून प्रेरणा घेतली आहे. स्वातंत्र्य दिवशीच जगाचे लक्ष वेधून घेण्याची किमया केवळ ,आपल्या देशाने साधली. म्हणूनच  जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताचे निर्माते आहेत.

© राज  कुलकर्णी .

Comments