अस्थिर भूपृष्ठावरील नेपाळ.................


आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या आणि अनेक राजकीय भुकंपाना सामोरे जाणाऱ्या नेपाळ या देशाला नुकत्याच  झालेल्या भूकंपाने मात्र सर्व अर्थाने हादरवून सोडले आहे. नेपाळचे विशिष्ट स्थान ओळखून हिमालय - नेपाळ- भारत यांच्यावर एकत्रित संशोधन  करणाऱ्या वैज्ञानिकांचा समूह काठमांडू इथे कार्यरत आहे ,याशिवाय जगभरातील अनेक  भूगर्भ शास्त्रज्ञांचे लक्ष सतत हिमालयीन प्रदेशावर असतेच !  नेपाळला भूकंपाची पूर्वसूचना अमेरिकेतील संशोधकांनी यापूर्वीच दिली होती, अशा काही बातम्या सुद्धा वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्या आहेत.
भारतीय उपखंडाची गोंडवाना प्लेट आणि लौरेशियन ( रशियन )  प्लेट ,या दोन्हीच्या संयोग भूमीवर वसलेल्या नेपाळ हा देश ,रुस आणि चीन यांच्या दक्षिणेला महत्वपूर्ण भागोलिक स्थानावर आहे . त्यामुळे या देशाला एक विशिष्ट महत्व प्राप्त झालेले आहे . पोन्जीया  या सिद्धांताप्रमाणे जगभरातील सर्व खंड-उपखंड एकत्र होते आणि भूपृष्ठाच्या निर्मितीदरम्यान भारतीय उपखंडाची गोंडवाना प्लेट आणि  लौरेशियन ( रशियन )प्लेट यांच्यामध्ये टेथिस नावाचा समुद्र होता आणि गोंडवाना प्लेट उत्तरेकडे  कडे सरकू लागल्यामुळे टेथिस समुद्राच्या जागेवर  हिमालयाची निर्मिती झाली. ही प्लेट  दरवर्षी ४५ मिलीमीटर या मंदगतीने सरकते . या भूपृष्ठाच्या मंद हालचालीमुळे हिमालय हा घड्याच्या पर्वत निर्माण झाला आहे . नेपाळ हा याच हिमालयाच्या कुशीत वसलेला असल्यामुळे तेथील भूपृष्ठ  भूकंपप्रवण आहे.  भारतात दीड वर्षापूर्वी  केदारनाथ येथील भूस्खालानाबत सुद्धा भूगर्भ संशोधकांनी हेच कारण नमूद केले होते . अशा अस्थिर भूपृष्ठामुळे आजपर्यंतच्या  ज्ञात स्रोताप्रमाणे १९३४ पासून ,१९६०,१९८८ आणि नुकताच २५ एप्रिल २०१५ ला भूकंपाचा प्रचंड मोठा धक्का नेपाळला बसला. यात आतापर्यंत अंदाजे २५०० लोक मृत झाल्याचा अधिकृत आकडा समोर आलेला आहे ,प्रत्यक्षात तो यापेक्षाही मोठा असण्याचीच शक्यता जास्त आहे . जगभरातून आणि  युरोपिअन देशातून मदतीचा ओघ नेपाळकडे मोठ्या प्रमाणावर सुरु झाला असताना,  भारताने नेपाळला खूप मोठ्या प्रमाणावर मदत करणे गरजेचे आहे आणि या कार्यात सर्व भारतीयांनी देखील पुढकार घ्यायला हवा . सार्क देशातील एक देश आज नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असतात ' गुजराल तत्वाप्रमाणे थोरला भाऊ' या नात्याने नेपाळला भारताने  मदत करणे अंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय  राजकीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. मोदी सरकारने याबाबत त्वरित कार्यवाही करून मदतीसाठी भारतीय सैन्य , विमाने ,अन्नधान्य आणि औषधे यांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे ,तो नक्कीच कौतुकास्पद आहे. शिवाय ही मदत शेजारच्या राष्ट्राला असलीतरीही  महत्वाचे म्हणजे  पूर्वाश्रमीच्या हिंदू राष्ट्रातील भूकंपग्रस्तांना पाठवली जात असल्यामुळे त्यावर कोणी आक्षेप घ्यायचेही कारण नाही. भारताने येथील संपूर्ण  पुनर्वसनाचे कार्य हाती घेवून नेपाळी लोकांची मने जिंकण्याचे महत्वपूर्ण कार्य या मदत कार्याच्या निमित्ताने करणे आवश्यक आहे . भारताला 'Blessing in Disguise ' या इंग्रजी म्हणी प्रमाणे ही संधी निर्माण झालेली आहे, ती दवडता कामा नये !
नेपाल हिमालयाच्या प्रदेशातील भारतीय उपखंडातील अतिशय महत्वपूर्ण देश आहे . आज नेपाळ त्याच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे  जगभरातील प्रमुख राष्ट्रांच्या नजरा स्वतःकडे  वळविण्यात यशस्वी झालेला आहे . गेल्या अनेक वर्षापासून जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला गेलेला नेपाळ २८ मे २००८ पासून 'फेडरल डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ नेपाल' म्हणून आज ओळखला जातो आहे. भारतातील अनेकांना जगभरातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून नेपाळ विषयी जिव्हाळा असला तरी नेपाळ मधील सामाजिक आणि राजकीय क्रांतिप्रवण मन भगव्या रंगापेक्षा लाल रंगाने भारावलेले आहे. भारत आणि नेपाल यांच्यात पंडित नेहरू यांच्या पुढाकाराने  झालेल्या  १९५० साली झालेल्या मैत्री कराराच्या अनुषंगाने वाटचाल करणाऱ्या नेपाळच्या भारताकडे पाहण्याच्या दृष्टीत  २००८ साली झालेल्या सत्ताबदलामुळे 'प्रचंड'  फरक पडला.  याचाच परिणाम म्हणून २०१० मध्ये प्रणव मुखर्जी  आणि नेपाळी पंतप्रधान  प्रचंड कुमार यांच्यात करार होवून ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर चे कर्ज आणि ८०,००० टन अन्नधान्य नेपाळला देण्यात आले होते, अगदी गेल्यावर्षी सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सुद्धा १०,००० कोटी रुपयांचे कर्ज नेपाळला देवू केले आहे. प्रत्येकवेळी आर्थिक मदत  ही  फक्त मदत नसते तर ती मोठी राजकीय गुंतवणूक असते . परंतु नेपाळमधील अंतर्गत राजकारणातील माओवाद्यांचा प्रभाव आणि चीन बरोबर वृद्धिंगत होत असलेल्या नवीन आर्थिक आणि राजकीय समीकरणामुळे नेपाळ हळू हळू राजकीय आणि वैचारिकदृष्ट्या सुद्धा  उत्तरेकडे सरकत असल्याची जाणीव सातत्याने होत आहे . नेपाळ छोटा देश असला तरी तो चीन बरोबर स्वतंत्रपणे संबंध प्रस्थापित करून आहे , १९६० साली नेपाळ आणि चीन यांनी सीमारेषा आखणीचे करार केले आणि १९६१ ला ल्हासा ते काठमांडू या रस्त्याच्या बांधणीचा करार केला. हिंदू राष्ट्र म्हणून कांही भारतीयांना जवळचा वाटणारा नेपाळने ,अतिशय व्यावहारिकपणे १९६२च्या भारत -चीन युद्धादरम्यान तटस्थ भूमिका स्वीकारली होती. नेपाल पारतंत्र्यात कधीच नव्हता ,पण ब्रिटीशांच्या भारत आणि चीन या दोन प्रमुख वसाहतीच्या मधोमध असणाऱ्या नेपाळला जाण्यापूर्वी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी आखलेल्या सीमारेषा स्वीकाराव्या लागल्या . पारतंत्र्यात न राहता देखील ब्रिटीशांच्या धोरणाचा परिणाम नेपाळला अनुभवावा लागला . म्हणूनच  मॅकमोहन सीमारेषा चीन प्रमाणे नेपाळला देखील मान्य नाही,ही बाब  आपण विशेषकरून समजून घ्यायला हवी .सिक्कीम आणि नेपाळ यांच्यामधील सीमारेषेचा वाद याच कारणामुळे  ब्रिटीश काळापासून अस्तित्वात  होता ,त्यामुळे चीन ने २००३ साली सिक्कीम वरील भारताचे आधिपत्य मान्य करून २००५ मध्ये चीन- भारत- भूतान यांच्यातील नथुला खिंडीचा मार्ग व्यापारासाठी मोकळा करेपर्यंत, नेपाळ ने देखील सिक्कीमच्या भारतामधील विलीनीकरणाला मान्यता दिली नव्हती. अर्थात देश छोटा असो व मोठा ,प्रत्येक देश स्वतःचे  हित  पाहत असतो. नेपाळमधील माओवादी साम्यवादी पक्षाला चीनमधील साम्यवादी पक्षाचे मार्गदर्शन मिळते ,हे सांगण्याची देखील गरज नाही, परंतु आपल्या देशातील कांही समस्यांच्या उगमाची तार ही नेपाळच्या अंतर्गत राजकारणातील कांही घटकांशी जोडली गेली आहे, हे वास्तव  आपल्या देशातील सुज्ञांनी समजून घेणे गरजेचे आहे . नेपाळच्या सीमेवरील खासा या शहरापासून  तिबेटची राजधानी ल्हासा पर्यंत ७७० किमी चा रेल्वेमार्ग बांधण्याची महत्वकांक्षी योजना चीनने नेमकी  २००८ साली हाती  घेतली आहे आणि ती जवळपास पूर्णत्वाकडे पोचली आहे . या रेल्वे मार्गामुळे नेपाळ आणि चीन यांच्यातील व्यापार ,दळणवळण, धरणांचे बांधकाम ,इतर सोयीसुविधा त्याचबरोबर  सैन्य सहकार्य याबाबी सुद्धा आपसूकच सुरु होतील ,त्याला कोणीही रोखू शकणार नाही. भूपृष्ठाप्रमाणे नेपाळ देखील उत्तरेकडे सरकत असल्याचे हे द्योतक आहे .
 नेपाळचे  अस्थिर भूपृष्ठ नैसर्गिक रचनेमुळे हळू हळू उत्तरेकडे सरकत आहे आणि सरकत राहणार हे वास्तव आहे .त्यामुळे अधून मधून असे नैसर्गिक भूकंप देखील अनुभवायला मिळतील. नेपाळच्या  भूपृष्ठाचे हे सरकणे नैसर्गिक आहे ,परंतु नेपाळ सारखा जगात अत्यंत महत्वपूर्ण भौगोलिक स्थान असणाऱ्या ,संस्कृती-राहणीमान-जीवनशैली सुद्धा जवळपास एकसमान असणाऱ्या, आपल्या शेजारील देशातील राजकारणाचे भूपृष्ठ मात्र उत्तरेकडे सरकू नये याची मात्र काळजी घेणे आपल्या हातात आहे . सोशल मेडिया वर  " चीन ला जमले ते मोदींना जमले नाही " असे म्हणून काहींनी मोदी सरकारवर टीका देखील केली, पण त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे . नेपाळमधील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी वीसहजार संघस्वयंसेवक गेल्या असल्याच्या बतावण्या सोशल मेडीयावर करणाऱ्या नमोभक्तांचा   एका बाजूला समाचार घेत असताना, दुसऱ्या बाजूला व्यापक देशहित लक्षात घेवून पंतप्रधान नरेंद्र  मोदी नेपाळ सोबतही 'मन कि बात' यशस्वीरित्या करतील अशी अशा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो !
जपान मध्ये वारंवार भूकंप होतात ,म्हणून भूकंपापूर्वी कांही सेकंद धोक्याची सूचना देणारी  घंटा वाजते आणि लोक अलर्ट होतात, भूकंपात उध्वस्त झालेल्या नेपाळमधील मातीच्या ढिगाऱ्यातील ही  घंटा भूकंपात कोसळल्यानंतरही कोणालातरी, कोणतीतरी सूचना नक्की देत असेल असे वाटते  !!!!!!!!!
लेखक :- राज कुलकर्णी .

Comments