रौशन दिवाळी .............
रौशन दिवाळी .............
तीन वर्षापुर्वीची दिवाळी तील घटना! सकाळची वेळ होती , अभ्यंग स्नान करूनही पहाटे लवकर उठल्यामुळे बसल्या बसल्या सोफ्यावरच पुन्हा एक डुलकी लागली होती. पोरांच्या फटाके अजून पाहिजेत या मागणीवरून सुरु झालेल्या रड्गाण्याच्या संगिताने मी झोपेतून जागा झालो. सकाळी दिलेले सर्व फटाके उडवून मुलगा ,पुन्हा फटाक्यासाठी ओरडत होता ! फटाक्याच्या दारूमुळे काळपट झालेले हात , घाण झालेले कपडे आणि फटाक्याच्या नादात सकाळपासून पोटात अन्नाचा कण देखील नव्हता ,म्हणून आईच्या हातचा मार खाण्याचा कार्यक्रम चालू होता आणि मी तेवढ्यात उठलो. एकतर झोपमोड झालेली आणि त्यात त्याने पसरलेले भोकाड ! ,एकत्रित परिणाम होवून ,माझा राग अनावर झाला
" अरे सकाळीच दिले होते ना फटाके ? आता मिळणार नाहीत " असे म्हणून मी केवळ हात उगारला ,तेवढ्यात माझ्या आजीचा " नको रे सणासुदीच मारू लेकराला " हा कंप पावणाऱ्या ध्वनिलहरी मधील टिपिकल आवाज कानावर पडला आणि मी तिथेच थांबलो. आजीने त्याला जवळ घेतले आणि " अरे पोरा फटाके फटाके काय करतोस ,त्याने काय पोट भरणार आहे का ? असे म्हणत म्हणत ,तिच्या काष्टाघोळ पातळाच्या पदराने त्याचे डोळे पुसत पुसत स्वयपाकघरात घेवून गेली.
लहानपणी माझीही फटाक्यासाठी अशीच मरमर असायची ,पण वय वाढले तसे फटाक्याचे आकर्षण संपले ,त्याचप्रमाणे फटाक्याचे आकर्षण का वाटते याच्या स्मृतीही मनातून पुसल्या गेल्या असाव्या!
दिवाळीतील पाडव्याचा दिवस ! म्हटले आता झोपमोड झालीच आहेतर ,उठून फ्रेश व्हावे . बायको स्वयंपाकघरातच होती " फराळ देते खायला , खावून घ्या, पुन्हा जेवायला उशीर होणार आहे " असा तिचा आवाज कानावर पडला. माझ्या लक्षात आले ,पाडवा म्हटले कि पुरणाचे जेवण, सवाष्ण बाईचे जेवण ,हे सर्व सोपस्कार व्हायला दुपारचे दोन तरी वाजणार ! मनात हाच करत करत ,हात पाय तोंड धुवून, टॉवेल ने पुसत पुसत ,थेट स्वयंपाकघरातील पाटावर बसलो ! शेव चिवडा ,लाडू आणि माझी आवडती खुसखुशीत अशी चकली ! चकली हातात घेतली आणि अचानक लक्षात आले ,
" जेवला की नाही ग तनिष्क ,काही खाल्ले कि नाही त्याने ?"
" खेळण्या शिवाय काही सुचत नाही आणि फक्त एक कप दुध पिवून,गेलंय कार्ट" मी काहीच न बोलता खायला सुरुवात केली.बाहेर मोठ मोठ्या आवाजात वाजणाऱ्या फटाक्यांचा आवाज कानावर पडत होता ,आणि माझ्या दातात खुशखुशीत असणाऱ्या चकलीने देखील खुट्ट असा आवाज केला. शेव, चिवड्याचा फन्ना उडवून अर्धाच बेसन लाडू खावून अर्धा तसाच डीश मध्ये ठेवला आणि पाणी पीत पीत दरवाज्यात आलो. त्याचवेळी फाटक्या कपड्यातील काळपट परंतु सावळ्या रंगाचा साधारण पणे ६ ते ७ वर्षाचा एक मुलगा आणि ८ ते ९ वर्षाची त्याची बहिण , एक प्लास्टिक ची पिशवी आणि जर्मन धातूचे टोपले घेवून दारात आशेने उभे होते . ऐन दिवाळीत विविध पदार्थांची रेलचेल असणाऱ्या अनेक घरात भिक मागून सुद्धा ते टोपले अर्धेही भरले नव्हते, अनवाणी पाय , फाटके कपडे ,तुटलेल्या बटणाचा शर्ट, भुरकटलेले केस , मातीमुळे घाण झालेले गुढघे , किलकिल्या डोळ्यातून माझ्याकडे आशेने पाहत होते. पोटातील भूक त्यांच्या चेहऱ्यावर वर स्पष्ट दिसत होती. त्या डोळ्यात पाहताना काळीज चर्र होत होत आणि मी त्या पोराला न्याहाळत होतो आणि अचानक
" शिळी भाकरी, तुकडा ,भाजी काय तरी वाढा ,सायब"
त्या चिमुरडीच्या या वाक्याने मी भानावर आलो .पाण्याच्या तांब्या माझ्या हातात तसाच होता . मी त्यातला शेवटचा घोट संपविला आणि बायकोला हाक मारली
" स्वाती ,अग ही दोन लहान पोर आलीत ,त्यांना काही तरी वाढ आणि फक्त भाकरी नको देवू काही तरी दिवाळीच्या फराळाचं दे "
सहज मनात विचार आला ,या गरीब पोरांच्या आयुष्यात दिवाळी ती कुठली असणार, साडे तीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या बली प्रतिपदेच्या दिवशी ,ही दोन चिमुरडी शिळ्या भाकरीच्या आशेने आकाशदिवा चमचमणाऱ्या आणि दिव्यांची आरास केलेल्या प्रत्येक दारात भिक मागत हिंडत होती. बायको फराळाचे पदार्थ घेवून येईपर्यंत , मी त्याला नाव विचारले...
" माझे नाव रौशन आहे" .
आणि तुझे ,मी चिमुरडीला विचारले...........
" मुमताज " !!!
म्हणून तिने उत्तर दिले . कुठे राहता म्हटल्या वर , मारुती मंदिरा समोरील मंत्र्याच्या शेतात त्यांनी पाल ठोकली असल्याचे समजले. एक झोपडी आणि तिच्या समोर घिसाडी काम करणार कुटुंब मी दोन दिवसापूर्वीच पहिले होते, बहुदा ही त्यांचीच मुले असावीत. तेवढ्यात बायको ,शिळ्या दोन चपात्या ,भाजी भात या बरोबरच दोन तीन रव्याचे ,बुंदीचे लाडू, शेव चिवडा देखील घेवून आली . मी दरवाज्यातून बाजूला सरकलो आणि ती त्या चिमुरडीच्या प्लास्टिक च्या पिशवीत ,ते वाढू लागली. वाढून झाल्यावर ती मुले त्यांची ती पिशवी सावरत सावरत , बायकोला काहीतरी सांगत होती. मी तोपर्यंत हातात पेपर घ्यावा म्हणून मागे वळलो ,तेवढ्यात बायकोने हाक मारली.
"हा मुलगा काय म्हणतोय ऎका ना"
मी कुतूहलाने त्या मुलाकडे आलो आणि विचारले
" काय रे ,काय झाले, अजून काय हवंय रे "
अत्यंत विनवणीच्या स्वरात ,तो रौशन मला म्हणाला
" सायब ,हे लाडू ,शेव ,चिवडा तुमालाच राहूद्या , मला फटाकड्या द्या हो , लई उडवू वाटत्यात !! लई मज्जा येतीय बगा फटाकड्या उडविताना " त्याची बहिण मुमताज म्हणाली
" काल आमाला वाढला हुता, लोकानी चिवडा लाडू "
मला दोन मिनिट त्यांच्या या वाक्यावर काय उत्तर द्यावे ते समजलेच नाही . मी बायकोकडे पहिले, बायकोलाही त्या चिमुरड्यांचे खूप कौतुक वाटले. मी त्याला म्हटले
" हे चिवडा ,लाडू राहूदे ,थांब मी आलोच"
मी लगबगीने घरात गेले ,माळ्यावरील फटाक्याचा बॉक्स खाली घेतला . दोन फटाकड्याच्या माळा, तेरखेडी तोट्यांची एक छोटी पिशवी , दोन फुलबाज्याचे बॉक्स, आणि इतर काही नळे ,टिकल्या इ. त्याला आणून दिले . त्या फटाकड्याच्या साहित्याकडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद मला पाहायला मिळाला होता ,तो शब्दात सांगणे कठीण आहे! ती मुले क्षणार्धात पोट भरून तृप्त झाली असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. भाकरी ,भाजी ,लाडू ,चिवडा यातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा फटाक्यांचा आनंद मोठा होता. हा आनंद त्यांनी त्यांच्या झोपडीसमोर फटाके उडवून साजरा करायचा होता ,म्हणून ती लगबगीने घराच्या दिशेने निघाली . रौशन आणि मुमताज, माझ्या कडे आणि माझ्या बायकोकडे , सतत वळून पाहत पाहत , अत्यंत आनंदाने ,अक्षरशः उड्या मारत ,माझ्या घराच्या दारापासून घाई घाईने दूर जावू लागले. त्यांचे मागे वळून पाहणे चालूच होते . आम्ही दोघे त्या दोघांकडे ,ती मुले दिसेनासी होईपर्यंत पाहत दरवाज्यातच उभे होते . ते मुले दिसेनासी झाली तरीही त्यांचे प्रफुल्लीत चेहरे ,आमच्या डोळ्यासमोर तरळत होते.
तेवढ्या वेळात, माझा मुलगा तनिष्क पुन्हा, फटाक्याच्या दारूने काळपट झालेले हात ,आणि विझलेली उदबत्ती घेवून आला होता ! चप्पल सोडत होता, मी बायकोकडे पहिले . यावेळी तो रडत नव्हता,गाणे गुणगुणत होता . बऱ्याच वेळेपासून गायब असून देखील बायको त्याला अजिबात रागावली नाही ! मला याचे एकदम आश्चर्य वाटले . मनात विचार आला , खरेच मानवी मनात भावनांचे विविध तरंग आहेत, त्या भावनांना सुखावणारी प्रत्येक गोष्ट मानवाला जगायला शिकवते . मानव केवळ अन्न पाण्यावर जगू शकेल असे नह्वे, तर आनंद ,हर्ष, क्रोध इ भाव भावनांच्या प्रकटीकरणातूनच त्याच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. रोशन च्या चेहऱ्यावरील भाव मला याच शाश्वत सत्याचे दर्शन घडविणारे होते. अज्ञानरुपी अंधकारापासून ज्ञानरुपी प्रकाशाकडे , अशाश्वतापासून असत्यापासून, शाश्वत सत्याकडे , मृत्यू पासून अमृताकडे घेवून जाणाऱ्या दिवाळीचा सण त्या दिवशी खऱ्या अर्थाने रौशन झाल्याचा माझ्या मनातील आनंद, अध्यात्मिक अनुभूती देणारा होता आणि तोच आनंद त्या चिमुरड्या रौशन च्या आनंदाशी तदात्म पावणारा होता. बायकोने मुलाला आपुलकीने जवळ घेतले आणि म्हणाली.....
" पिल्ल्या फटाके देवू का उडवायला "
मी तिच्याकडे कौतुकाने पहिले , अवघ्या एक तासात तिला काहीतरी उमगले होते , हे नक्की !
" दे पण, आधी मला जेवायला वाढ खूप भूक लागलीय आणि दुध भाकरीचा काला करून दे ! आलो मी हात पाय धुवून "
असे म्हणून माझा मुलगादेखील त्या रौशन आणि मुमताज प्रमाणेच उड्या मारत ,बाथरूम कडे पळाला ! आम्ही दोघे तो तो उड्या मारत जाताना त्याच्या पाठमोऱ्या अंगाकडे बघत होते . एकदम भानावर आलो ,ते त्याच्या ' आई ,टॉवेल दे ग ' या हाकेनेच ! मी बायकोकडे पहिले ,ती कांहीच बोलली नाही आणि ती सुद्धा आनंदात लगबगीने घरात निघून गेली !!!!
लेखन :-राज कुलकर्णी .

Comments
Post a Comment