पूजनीय गोवंशाचे लैंगिक शोषण ……………

पुण्यात एका एनजीओ तर्फे आयोजित एका शिबिरात सार्वजन चहा पीत असताना , अचानक दुध खराब झाल्याचे समजले म्हणून ,त्यांनी  लोकांसाठी बिनदुधाचा चहा ठेवला होता . आपल्याकडे बिनदुधाचा चहा क्वचित पिला जातो ,उलटपक्षी  भरपूर दुध घालून केलेला चहा म्हणजे फक्कड चहा समजला जातो . पण त्या शिबिरास आलेले  चंद्रपूर  जिल्ह्यातील काही सहकारी मात्र खूप कौतुकाने हा चहा पीत होते . सहज बोलत विषय निघाल्यावर त्यांनी सांगितले कि,   जंगलातील आदिवासी समाजाचे लोक आवर्जून असा चहा पितात . मी म्हटले त्यांच्याकडे दुध नसते काय ? ते म्हणाले , ते असे मानतात कि गाईचे दुध हे तिच्या वासरासाठी आहे ,आपल्यासाठी नव्हे ,मग आपण का प्यायचे ? हा प्रश्न मला खरेच निर्रुत्तर करणारा होता . प्रत्येक सस्तन  प्राण्याचे दुध हे त्याच्या संतती असणार हे सांगण्यास कोण्या वेद शास्त्राची काय गरज ?
गाय ही आमची माता आहे आणि तिच्यात ३३ कोटी देव निवास करतात आणि म्हणून ती वंद्य ,प्रिय आणि पूजनीय आहे आणि तसी ती वंद्य आणि पूजनीय असण्यास कोणाचा काही आक्षेप असायचे काही कारणही नाही. परंतु वंदन आणि पूजन करून गाईच्या भावनेशी मात्र सर्रास खेळले जाते ,ही बाब मला  धार काढण्याच्या पद्धती पाहून वारंवार जाणवली ! धार काढण्यापूर्वी खरे गाईच्या वात्सल्य भावनेशी खेळले जाते असेच म्हणावे लागेल . तिचे वासरू पिण्यासाठी सोडायचे ,दोन ते चार मिनिट त्याने पिले कि गाय वात्सल्य भावनेतून पान्हा सोडते . लगेच त्या वासराला खेचत लांब घेवून जायचे आणि सड धुवून धार काढायची . गाईने स्रावलेला पान्हा हा तिच्या वासारासाठीच असतो . शिवाय तिला याची जाणीव होवू नये म्हणून तिच्या समोर पीठ ,कळना किंवा तत्सम  पशुखाद्य असणारे टोपले ठेवले जाते. पूजनीय आणि वंद्य असणाऱ्या गाईच्या वात्सल्य भावनेची ही क्रूर चेष्टा सतत होत आली आहे ऽअनि एवढे करूनही ती अजून वंद्य मानली जाते ! एकदा तर लहानपणी एका नातेवाईकाच्या वास्तुशांतीच्या सोहळ्यास गेलो होतो . पूजेसाठी गोमुत्र हवे म्हणून  ,ते आणण्याचे काम आम्हा मुलांना सांगितले . आमि बाटली घेवून शेतात गेलो आणि गाड्याला घरी पूजेसाठी  गोमुत्र  हवं असल्याचे सांगितले आणि आम्ही एका आंब्याच्या झाडाखाली थांबलो . तो गडी ती बाटली घेवून गेला आणि जवळपास १५ ते २० मिनिटे त्याने त्या गाईचे  जननेन्द्रिय  हलवून मिळालेले  गोमुत्र आम्हास आणून दिले.  तेंव्हा ७/८ वर्षाचा असल्यामुळे गड्याच्या त्या कृतीबद्दल कांही गैर वाटले नाही . पण पूजनीय आणि वंद्य गाईच्या लैंगिक भावनाशी केलेला हा छळ म्हणावा लागेल. आणि हा छळ केवळ पूजनीय  गाईच्या वाट्याला येतो !
आता नवीन कायदेशीर तरतुदीमुळे , गाई बरोबर गोवंश म्हणजेच बैल देखील आपसूकच पूजनीय आणि वंद्य बनला आहे . परंतु बैल शेतीच्या कामासाठी  वापरण्यापूर्वी बैलाच्या कान्या तोडणे नावाचा एका प्रकार ग्रामीण भागात सर्रास चालतो आणि तो बैलांसाठी खूप वेदनादायक असतो.  आता त्यासाठी विविध उपकरणे आणि इंजेक्शन उपलब्ध असतील परंतु बैलांच्या लैंगिक  भावनांचे वेदनादायक दमन हे  कोणत्या पुजनियतेमध्ये अन्युसुत होते ,हे मला  आजपर्यंत समजू शकले नाही. नवीन कायद्यानुसार गाय ही माता म्हणून  आणि बैल हा गोवंश म्हणून त्याचे संरक्षण करण्याच्या पवित्र आणि मंगलमय कार्यात, त्यांचा असा लैंगिक छळ करू नये म्हणून काही तरतुदी या कायद्यात आवर्जून कराव्या लागतील ! अन्यथा या गोमाता पित्यांचे पूजन आणि वंदन निव्वळ दांभिक पणाचे ठरेल .
राज कुलकर्णी .

Comments