मोदींच्या भारतात कॉंग्रेसचे एक वर्ष.

भाजप सत्तेत येवून नरेंद्र  मोदी पंतप्रधान होवून एक वर्ष संपत आले ,उद्या २६ मे ला मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकीर्दीस एक वर्ष पूर्ण होईल. त्यांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा हा स्वतंत्र विषय म्हणून तूर्तास बाजूला ठेवला तर गेल्या एक वर्षात कॉंग्रेस ने काय केले हा महत्वाचा विषय आहे. लोकसभेच्या निवडणुकानंतर अल्पावधीत झालेल्या महाराष्ट्रासारख्या महत्वपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीत  झालेली कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाची अवस्था अतिशय केविलवाणी असली तरी दहा वर्षातील त्यांच्या कर्तृत्वास ती साजेशीच म्हणावी अशीच होती. देशात सर्वत्र कॉंग्रेस गलितगात्र झालेले चित्र स्पष्ट दिसत असताना मोदी यांच्या विजयाचा वारू थोपवता येवू शकतो असा दिलासा दिल्ली च्या विधासभेच्या निवडणुकीतील निकालाने दिला . पण दिल्लीच्या निकालाचा हा अर्थ खूप मोठा होता व आहे कि ,जनता  भाजपला आणि कॉंग्रेस ला पर्याय शोधते आहे. दिल्लीत कॉंग्रेस कडे  गमावण्यासाठी काहीच शिल्लक राहिलेले  नव्हते, परंतु दिल्लीच्या निकालातून कॉंग्रेस करिता  शिकण्यासाठी मात्र खूप काही होते ,पण कॉंग्रेस आणि कॉंग्रेस चे कार्यकर्ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत किंवा त्यांनाही मोदींचा विजय आपला पराभव असल्याची बाब त्यांना मान्य नाही. कारण कॉंग्रेस चे आमदार आणि खासदार वैचारिक दृष्ट्या कॉंग्रेसच्या विचारधारेचे किती प्रामाणिक पाईक होते, यावर संशोधन करावे लागेल . मोदीमय वातावरणात कॉंग्रेस चे अनेक कार्यकर्ते भाजपच्या आश्रयाला जावून आपापले सुभे सांभाळण्याच्या प्रयत्नात आपण पहिले आहेत . तळागाळातील कार्यकर्त्यांना डावलून मोठ्या झालेल्या फांद्यांनी नवीन पालवी फुटू दिली नाही त्यामुळे वटवृक्ष वरचेवर पोकळ होत गेला आणि मग समूळ उखडला गेला . मोजक्या मुळ्या आणि पारंब्याच्या साह्याने अस्तित्व टिकवून आज नव्या आशेने भविष्याकडे पाहताना जुन्या अनुभवातून काही शिकला आहे ,असे मात्र अजिबात दिसत नाही ,हे खेदाने म्हणावे वाटते .
गेल्या वर्षभरात कॉंग्रेस पराभवातून काही शिकली आहे ,असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. सत्तेत असतानाच  कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची जनतेशी असणारी नाळ केंव्हाच अस्तंगत झाली होती. नेत्रावाची अवस्था देखील फार काही वेगळी नव्हती . कार्यकर्त्यांना कोण सत्तेवर येतो आहे यापेक्षा आपल्याला आपले महत्व कसे टिकवून ठेवता येईल याची चिंता लागली होती. हाताच्या चिन्हावर नाहीतर कमळाच्या चिन्हावर ! असल्या बाजारबुणग्यांच्या विश्वासावर कॉंग्रेस चे युवराज राहुल गांधी पुन्हा सत्तेवर येण्याची स्वप्न पाहत होते. कॉंग्रेस चा पराभव इथेच निश्चित झाला होता.  मनमोहन सिंह यांच्या सरकारच्या काळातील अनेक घोटाळे ,भ्रष्टाचाराची प्रकरणे, कॉंग्रेस आणि घटक पक्षातील विसंवाद, यांच्यासोबत कॅग, सिविसी, लोकपाल, थोडे अण्णा, थोड्या प्रमाणात न्यायालायचे ताशेरे, भाजपा मध्ये दररोज होणारे नव्या जुन्या नेत्यांचे प्रवेश, गान कोकीळेपासून सैन्यदलाच्या प्रमुखापर्यंत सर्वांनी आळवलेला नमोनमोचा राग , माध्यमांनी सरकारविरोधात निर्माण केलेला असंतोष  आणि विकासपुरुष म्हणून मोदींची विशाल प्रतिमा या साऱ्या पार्श्वभूमीवर  देशातील भांडवलदारांनी माध्यमांना हाताशी धरून  निर्माण केलेल्या धर्माधीष्टीत उग्रराष्ट्रवादी वातावरणात  नरेंद्र  मोदी यांनी झंझावाती प्रचार केला, सर्व  विरोधकांना धूळ चारून मोदी  बहुमताने सत्तेत आले आणि ठरल्याप्रमाणे  पंतप्रधान देखील झाले.  पण आज  केंद्रात संपूर्ण बहुमत आणि बहुतांश राज्यात सरकारे असूनही , अद्याप काश्मीर प्रश्न , ३७० कलम,समान नागरी कायदा, काळा पैसा,राम मंदिर,या बाबत  नवीन सरकारला  काहीही करता आलेले नाही. हे तेच मुद्दे आहेत मुद्द्यांचे भांडवल, भारतीय जनता  पक्षाने सतत साठ वर्ष केले आहे. पण कॉंग्रेस अजूनही अंग झटकून कामाला लागल्याची चिन्हे दिसत नाहीत . निवडणुकीनंतर काही काळ गेल्यावर राहुल गांधी अचानक पाने दोन महिन्याच्या सुट्टीवर गेले . राहुल गांधी यांना  स्वतःच्या  मनाप्रमाणे काम करण्यास अडथला होत असल्यामुळे ते नाराज असल्याचे कारण सांगितले गेले ,तर काहींच्या  मताप्रमाणे त्यांच्या या कृतीस आत्मचिंतन ,आत्मपरीक्षण असे म्हटले गेले . आत्मचिंतन करून राहुल गांधी परतल्यानंतर त्यांनी त्यांचे  सल्लागार बदलल्याचे  दिसून आले. मोदी यांनी निर्माण केलेल्या अच्छे दिनाची धूळ उतरत असताना माध्यमात आपसूक निर्माण झालेल्या पोकळीत त्यांनी चंचू प्रवेश केल्याचे काहीसे आशादायक चित्र सध्या दिसत आहे.  राहुल गांधी  कॉग्रेसला सक्षम नेतृत्व देवू शकत नसल्याचे काहींनी मत व्यक्त करून कॉंग्रेस मध्ये पर्यायी नेतृत्व निर्माण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. पर्यायी नेतृत्व निर्माण होणे अतिशय महत्वाचे आहेच  परंतु ,गांधी घराण्याशिवाय निर्माण केलेले नेतृत्व अशा नाजूक प्रसंगी पक्ष एकसंघ ठेवू शकेल काय ? याचाही विचार महत्वाचा आहे.  
कॉंग्रेस वर घरानेशीचा आरोप सातत्याने केला जातो आणि तो प्रथम दर्शनी ठळकपणे जाणवणारा आहे. नेहरू -गांधी घराण्याची घराणेशाही सत्ता नसलेल्या स्वातंत्रपूर्व काळापासून आहे. त्यासोबत हेही वास्तव आहे कि ,भारतीय उपखंडातील प्रत्येक देशातील प्रत्येक पक्षात घराणेशाही पाहायला मिळेल. कॉंग्रेस वर परिवारवादाचा आरोप करणाऱ्या भाजपमध्येही परिवारातील  भाजप नेते आणि परिवाराच्या बाहेरचे भाजप नेते असा भेद असतोच ! परंतु  सत्तेत असो वा नसो ,गांधी घराणे आणि घराण्यातील सदस्य सातत्याने भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात. कॉंग्रेस चे नेतृत्व गांधी घराण्याभोवती केंद्रित राहिले ,हि बाब वास्तव असल्याचे मान्य केले तरी, सत्तेत असताना घराण्यावर टीका समजू शकते. परंतु कॉंग्रेस सत्तेत नसली तरीही  विरोधकांची टीका गांधी घराण्यावरच असते, हे वास्तव आहे . गांधी परिवारापैकी कोणीही पदावर नसताना , अंतर्गत दुफळीने त्रस्त झालेली कॉंग्रेस ,स्वतःहून गांधी परिवाराच्या आश्रयाला गेलेली आपण पहिली आहेच.  गांधी घराण्याचा वारसा हा टीकेचं साधन असले तरी त्याचा फायदादेखील प्रचंड आहे. इंदिरा गांधी यांच्यासोबत वैयक्तिक आणि कौटुंबिक वाद झाल्यावर गांधी घराण्यापासून अलिप्त राहणाऱ्या मनेका गांधींना सुद्धा कॉंग्रेसेतर सरकारकडून मानाची पदे दिली जायची आणि आजही आपण तेच पाहतो आहे . वरूण गांधीचे तरी असे काय कर्तृत्व की, लगेच त्यांना  लोकसभेची उमेदवारी ,पक्षात मानाचे पद आणि प्रत्यक्ष नागपुरात संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक यांच्याबरोबर एका व्यासपीठावर बसण्याचा सन्मान त्यांना दिला गेला ! राहुल गांधी यांच्यात ती क्षमता आहे ,हे त्यांना सिद्ध करावे लागेल. भारतीय राजकारणात सुरवातीची पाच सहा वर्ष गुंगी गुडिया म्हणून हिणवल्या गेलेल्या इंदिराजींना पुन्हा दुर्गेची उपमा देण्याची वेळ येण्याची घटना आपल्या देशातच घडल्याचे सर्वांनी पहिले आहे .
लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आज विरोधी पक्ष अस्तित्वात नाही ,पण सत्ताधारी पक्ष वगळता अवघे ४४ जागा घेवून तो सर्वात मोठा बिगर सत्ताधारी पक्ष म्हणावा लागेल . सत्ताधारी पक्षांपैकी एकट्या भाजपची सदस्य संख्या ३०० च्या पुढे आहे ,परंतु एवढ्या प्रचंड बहुमताने सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना ,समर्थकांना राहुल गांधींची हेरगिरी करावी वाटते ,त्यांनी मंदिरात गेले म्हणून भूकंप झाला असा आरोप करून टीका करण्याची संधी सोडू वाटत नाही ,किंवा त्यांच्या सरकारवरील टीकेची दखल घ्यावीशी वाटते ,एवढेच नव्हेतर उत्तर देणे  भाग पडते ,हे देखील  तेवढेच खरे आहे .
राहुल गांधी यांचे वय आज ४४ असून ते  नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान आहेत. देशात वाढत जाणारा युवावर्ग आणि भविष्यातील भारतीय नेतृत्वाचा विचार करता त्यांच्या वयाचा कोणत्याच पक्षात एकही नेता नाही . राहुल गांधी यांच्याकडे अवधी आहे. पण त्यासाठी  पक्षात अमुलाग्र फेरबदल करावे लागतील. नवीन नेतृत्व निर्माण करून, पक्षांतर्गत सत्तेचे विकेंद्रीकरण करावे  लागेल.शरीराने कॉंग्रेस मध्ये आणि मनाने सोयीस्कर राजकारण करून सत्तेसाठीच कॉंग्रेस सोबत राहणाऱ्या लोकांना अर्धचंद्र द्यायला हवा. तळागाळातून काम करायला हवे. देशातील शेतकरी ,शेतमजूर ,कामगार ,कष्टकरी , आदिवासी यांच्या सोबत देशातील मध्यम वर्गाचा विश्वास पुन्हा संपादन करून त्यांना कॉंग्रेसच्या विचारधारेकडे आकर्षित करावे लागेल.  हे काम खूप अवघड आहे ,परंतु अशक्य नाही. कोणताही वारसा नसताना सर्वसामान्य वर्गातून आलेले  नरेंद्र मोदी हे करू शकतात तर राहुल गांधी यांना हे निश्चित करता येवू शकेल. अन्यथा सध्याची पाच वर्ष  आणि कदाचित त्या पुढची देखील, मोदींचा पाडाव केवळ सक्षम पर्याय नसल्यामुळे करणे शक्य होणार नाही. मोदींच्या सत्तारोहानाच्या प्रत्येक वर्षपुर्तीस कॉंग्रेसचे वार्षिक घालण्याची दुदैवी वेळ येवू शकते .
राज कुलकर्णी .

Comments

  1. वरील परिच्छेदामध्ये वरून गांधी यांचा उल्लेख आला आहेच म्हणून मत मांडावेसे वाटते.. वरुण गांधी यांच्या कर्तृत्वाबद्दल मला फार लिहायचं नाही पण ते राहुल गांधींपेक्षा नक्कीच सरस आहेत. राहिला प्रश्न त्यांच्या खासदार म्हणून असलेल्या कामगिरीचा ता २००९-२०१४ या कार्यकाळात १००% निधी खर्च करणाऱ्या मोजक्यांपैकी ते एक होत.

    ReplyDelete

Post a Comment