चहा-पाणी


सध्याच्या वाटस अप , फेसबुक च्या जमान्यात विविध भावना दाखवणारी चित्रलिपी खूप फ़ेमस झाली . म्हणजे ठेंगा , स्माइल , नमस्कार या सर्व संकेतांना एक चिन्ह होते, त्याप्रमाणे "सुप्रभात" म्हणजे गुड मॉर्निंग साठी हमखास चहाचा वाफाळणारा कप ,किंवा चहाची किटली असे गुड मॉर्निंग चे शुभेच्छ्या संदेश खूप वेळा मला मिळाले .जणू काय सूर्य उगवण्या एवढेच महत्व चहाच्या कपाला देखील आहे ! . चहा आणि सकाळचा घनिष्ठ संबंध असला तरीही ,चहा सकाळीच पिला जातो असे नाही, पण सकाळी सकाळी चहा घेतल्याशिवाय बहुतेकांचा सूर्यच उगवत नाही! त्यामुळे चहा म्हणजे सकाळ अशी कालदर्शक ओळख निर्माण करण्यात चहाने मात्र बाजी मारली आहे . अर्थात हा प्रवास चहासाठी तेवढा सुखकर नव्हता. कारण एवढा नावलौकिक मिळविण्यासाठी चहाला जवळपास दोनशे वर्ष लागली . कित्येक जन चहा म्हणजे इंग्रजांनी लावलेली सवय असे चहाचे वर्णन करतात पण ती वस्तुस्थिती नह्वे ! त्यावेळी त्याला चहा असे नाव नसेल पण आयुर्वेदात वाळलेली पाने उकळून पिण्याचे अनेक काढे सांगितले आहेत. तो एक स्थानिक प्रकारचा चहाच म्हणावा लागेल . ताप ,खोकला , सर्दी आणि अंगदुखी साठी उपयुक्त असणारा " गवती चहा" आमच्या उस्मानाबाद जवळील येडशी अभयारण्यात ही आढळतो . बाराव्या शतकात भारतात आलेल्या डच प्रवाश्यांनी भारतात चहा म्हणजे पाने वाळवून ती उकळून केल्या जाणाऱ्या पेयाचा संदर्भ दिला आहे . भारतात चहा होताच, पण इंग्रजांनी म्हणजेच ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी ने व्यापारी तत्वावर चहाची लागवड करून चहाचे मळे १८२० साली पहिल्यांदा आसाम मध्ये निर्माण केले . तेव्हा पासून जी चहाने भरारी घेतली ती आजतागायत चालू आहे,इंग्रज गेले पण चहा मात्र भारतीयांच्या हृदयात घर करून बसला !
चहा एवढा लोकप्रिय असला तरी आमच्या लहान पणी घरात लहान मुलांनी चहा प्यायचा नाही ,केवळ दुध प्यायचे असा दंडक होता . चहाने माणूस काळा पडतो अशी चहा विषयक अंधश्रद्धा आम्हात पसरवली गेली होती . त्यामुळे घरात चहा पिणाऱ्या मोठ्या माणसांच्या कपाकडे अधाशी पणे पाहणे याशिवाय दुसरा पर्याय नसायचा. चहा पिणाऱ्या माणसांचे खूप अप्रूप वाटायचे आणि कधी एकदा मोठा होतो आणि मनसोक्त चहा पितो ,असे वाटायचे! सहावी सातवीला गेल्यावर मात्र सकाळचा चहा आणि चारचा चहा ,असा दोन वेळा चहा पिण्याचा योग यायचा. मी तर चारच्या चहाची चातकासारखी वाट पाहत असे .
भारतात चहा वेगवेगळ्या लोकप्रिय नावाने ओळखला जातो . परवा परभणीला गेल्यावर,चहा ची ऑर्डर देताना मित्र म्हणाला " दोन बॉबी घे रे" चहाला बॉबी हे नाव मी प्रथमच ऐकले . चहा हा 'केटी' ' कडक ' 'स्पेशल' 'कटिंग' 'गोल्डन' 'मारा -मारी' अशा विशेष नावांनी ओळखला जातो . सोलापुरातल्या 'बासुंदी चहा' ची किंवा इराण्याच्या हॉटेल मधील 'इराणी चहा' ची लज्जत कांही वेगळीच आहे. बासुंदी चहा म्हणजे घट्ट दुधाचा , बिनपाण्याचा चहा ! हा चहा मला खूप आवडायचा . मी घरी एखाद्या वेळी चहा केला कि सर्वजन माझे कौतुक करायचे पण आई वैतागून म्हणायची " आता ह्याने दुध संपविले असणार". पुरुषाचा स्वयंपाक घरातील प्रवेश हा चहा बनिविण्यासाठीच होतो. म्हणजे सर्वात प्रथम पुरुष काय बनवायला शिकतो तर तो चहाच ! चहा हे आदरातिथ्याचे प्रतिक असल्यामुळे बायको घरात नसेल तर घरातील पुरुष चहा करून देतो, हे चित्र आपल्याकडे सर्रास पाहायला मिळते . कारण घरी आलेल्या व्यक्तीला चहा हा दिलाच पाहिजे , असा नियमच बनला आहे . कोणाच्या घरी गेल्यावर चहा दिला नाही तर ,लोक सहज म्हणतात " साधा चहा सुद्धा विचारला नाही , माणसे स्वभावाने ठीक वाटत नाहीत " चहा हा अशा प्रकारे मानवी स्वभावाचा निदर्शक केव्हा बनला ,हे आपल्यालाही कळले नाही .
चहा ने भारतातील दैनंदिन मानवी जीवन सामाजिक ,आर्थिक , राजकीय अंगाने व्यापून टाकले आहे . समाजा मध्ये चहा हे मैत्री ,स्नेह, आपुलकी ,जिव्हाळा , प्रेम याचे प्रतिक बनले आहे. मुलीला पाहुणे पाहायला आल्यावर तिला चहा करता येतो का ,हे पाहण्यासाठी नवऱ्या मुलाच्या पाहुण्यांना तिच्या हातचा चहा दिला जातो आणि त्यावेळी तो तिनेच केला आहे ,हे दाखविण्यासाठी सर्व जन बैठकीतच थांबतात. चाह्च्या चवीवरून तिच्या पाककलेच्या नैपुण्याचा अंदाज बांधला जातो. म्हणजे चहा पसंती चे कारण घडू शकतो ! 'लग्नाची बोलणी आणि चहा ' यांचे विशिष्ट नाते आहे . सौतन चित्रपटातील " शायद मेरी शादी का खयाल ,दिलमे आया है. एसिलिये मम्मीने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है " या गाण्याने लग्नाच्या बोलणी मधील चहाचे महत्व अधोरेखित केले . समाजात ,सरकारी कामकाजात थोडेफार आगावू पैसे म्हणजे लाच देवून कामे केली जातात ,हे आपण नेहमी पाहतो .पण "चहा -पाणी" हा शब्द या पैश्यासाठी अगदी सहज वापरला जातो ." काम लवकर होईल पण ,जर चहा पाण्याच पाहून घ्या ". या शब्दात आपल्या होणाऱ्या कामाची खात्री पटते आणि काहीतरी आगावू रक्कम द्यावी लागणार याची जाणीवही होते . दिलजमाई करणे , चर्चा करणे , सुसंवाद घडवणे या कामासाठी चहा सारखे दुसरे पेय नाही . नेहमी वर्तमानपत्रात बातमी वाचायला मिळते " विरोधकांचा चहापानावर बहिष्कार " . त्यामुळे चहा प्यायला नकार देणे हे राजकारणातही विरोध दर्शविण्याचे प्रभावी साधन आहे ,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . भारतात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजप या पक्षाचे प्रमुख नेते नरेंद्र मोदी यांनी चहा पार्ट्या आयोजित करून प्रचाराचे नवीन तंत्र आखले होते . मोदी पूर्वाश्रमी चहा विकण्याचा व्यवसाय करत ,त्यावरून राजकीय टीका ,टिप्पणी ,खिल्ली याला उधान आले ,प्रसिद्धी माध्यमात चहाने धुमाकूळ घातला. विरोधकांनी हि त्यांच्यावर टीका करण्यासाठी चहाचा आधार घेवून उपहासाने त्यांचे वर्णन " चहाच्या कपातील वादळ " ( storm in cup of Tea ) असे केले . पण एकंदरीत दोन्ही बाजूने चहा खूप शिजवला गेला आणि चहाच्या कपातील वादळ कपात विरून गेले नाही त्याला उधान आले . मोदी निवडून आले आणि त्यांनी सरकार ही स्थापन केले. पण राजकारणाच्या पेटलेल्या शेगडीवर चहा पहिल्यांदाच एवढा गरमा गरम झालेला पाहायला मिळाला . जागतिक राजकारणातील एका महत्वपूर्ण घटनेत चहाने स्वातंत्र्य योद्ध्यांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवली . अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यात १७७३ साली अमेरिकन स्वातंत्र्य योद्धा सम्युअल एडम्स याने इंग्रजाकडून अमेरिकन वसाहतीच्या चहाच्या आयातीवर लावण्यात आलेल्या जाचक कराच्या विरोधात आंदोलन केले आणि बोस्टन बंदरात ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी कडून आलेल्या तीन जहाजातील चहाच्या एकूण ३४२ पेट्या बोस्टन नदीत ओतून दिल्या , ही घटना अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यात " बोस्टन टी पार्टी " म्हणून ओळखली गेली . ही घटना मात्र खूप महत्वपूर्ण मानली जाते . कारण अमेरिकन स्वातंत्र्याच्या लढ्याने इथूनच वेग घेतला आणि दोन वर्षात अमेरिकेला स्वातंत्र्य ही मिळाले . भारताच्या दृष्टीने विलक्षण गोष्ट अशी कि , मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी १९३० मध्ये गांधीजी तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड आयर्विन यांना भेटायला गेल्यावर , मिठावरील कर रद्द करा हे सांगताना ,गांधीजीनी त्यांच्या शाल मध्ये बांधून आणलेले मुठभर मीठ चहाच्या बशीत ओतून समोर ठेवले आणि स्मित हास्य करून म्हणाले
" आपल्याला बोस्टन टी पार्टी चे स्मरण व्हावे म्हणून हे कर मुक्त मीठ आणले आहे " चहाने जगातील राजकीय क्षेत्रातील असे अनेक प्रसंग उठावदार केले आहेत.समजिक समतेचा लढा आणि चहा ,याबाबत एक प्रसंग आवर्जून सांगण्यासारखा आहे . . कोल्हापूरात शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे नावाच्या एका गरीब व्यक्तीला चक्क स्वत: आर्थिक मदत करून हॉटेल काढून दिले होते . दुर्दैवाने मागास व्यक्तीने चालवलेले हॉटेल निषिद्ध मानले जाऊन सुरुवातीला लोकांचा प्रतिसादच मिळेना. त्यामुळे शाहू महाराज रोज येता जाता त्या हॉटेलमध्ये जाऊन पैसे देऊन चहा पिऊ लागले. स्वत: राजा त्या हॉटेलात जातो ते पाहून जनतेच्या मनातील संकोच दूर झाला आणि हॉटेलला भरभरून प्रतिसाद सुद्धा मिळाला.
त्या चहा पिण्याच्या छोट्याशा कृतिने गंगारामला सामाजिक न्याय तर मिळालाच शिवाय लोकही जोडले गेले. चहाने केलेल्या या सामाजिक क्रांतीला इतिहासात तोड नाही ! भारतात रेल्वे मध्ये मिळणाऱ्या चहाची चव वेगळीच असते . लालू प्रसाद यादव हे रेल्वे मंत्री असताना त्यांनी ,रेल्वे मधला चहा मातीच्या कपातून म्हणजे " कुल्हड" मधून देण्यात येईल अशी घोषणा केली होती . त्यावेळेस त्यांच्या वर लालू प्रसाद यादव चहाची किटली घेवून रेल्वे स्थानकावर उभे आहेत अशी अनेक व्यंगचित्रे त्याकाळी वर्तमानपत्रात पाहायला मिळाली. भारतात चहा असा ईश्वरासारखा जळी, स्थळी ,काष्ठी पाषाणी आढळून येतो .
भारत आणि चीन या कापूस ,चहा , ताग ,इ . कच्चा माल देणाऱ्या दोन मोठ्या वसाहती होत्या . औद्योगिक क्रांतीमुळे कारखाने वाढले, कच्च्या मालाचे रुपांतर वेगाने पक्क्या मालात होवू लागले आणि त्यातून पैश्यासाठी , कच्च्या मालासाठी ,वसाहतीवरील वर्चस्वासाठी महायुद्धे लढली गेली . पण आश्चर्याची बाब अशी कि , जेम्स व्ह्याट या संशोधकाला चहा पिण्याची तल्लफ कदाचित झाली नसती आणि चहाच्या किटली चे झाकण उडाले नसते तर वाफेच्या इंजिनाचा शोधही लागला नसता किंवा उशिरा लागला असता . म्हणजे जागतिक औद्योगिक क्रांती चहामुळे झाली हे वाक्य सर्व अर्थाने योग्य ठरते .
चहाची ख्याती ही अशी अंतराष्ट्रीय आहे . असे म्हणतात कि इंग्रजांच्या राज्यावर सूर्य कधीच मावळत नव्हता ,पण महत्वाची बाब अशी ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीला भरपूर नफा मिळवून देवून जगावर राज्य करण्याची संधी इंग्रजांना मिळवून दिली ती चीनी आणि भारतीय चहाने! तो चहाच होता ,ज्यामुळे सूर्य मावळणार नाही ,एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर इंग्रज राज्य करू शकले. म्हणून जिथे जिथे इंग्रज गेले तिथे तिथे चहा पोचला ! जगातल्या देशांनी चहा इंग्रजाकडून स्वीकारला पण, बनवायची पद्धत मात्र स्वतंत्रपणे विकसित केली . म्हणून चहा वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो.
चीन हा देश म्हणजे चहाचे मुळ ठिकाण . चीन मध्ये चहा इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षापासून अस्तित्वात आहे. एक आख्यायिका अशी सांगितली जाते कि ,चीन मधील बुद्ध धर्माचा प्रणेता बोधिसत्व बोधीधम्म हा बुद्ध मूर्तीसमोर ध्यान करताना झोप लागल्यामुळे अपघाताने ९ वर्ष झोपला आणि जाग आल्यावर त्याला या कृतीचा खुप पश्चाताप झाला आणि रागाने त्याने स्वतःच्या पापण्या कापून टाकल्या. या पापण्यापासून जी वनस्पती उगवली ती म्हणजे चहा ! . म्हणून चहा पिला कि झोप येत नाही, असा समाज रूढ झाला . पुढे सर्वजण झोप न येण्यासाठी या वनस्पतीची पाने चघळू लागले आणि त्यातून पुढे या वनस्पतीच्या पानाचा काढा म्हणजेच चहा सुरु झाला .चहा मध्ये प्रथिने ,संप्रेरके यांच्या बरोबर काफाइन नावाचे उत्तेजक द्रव्य असते ,ज्यामुळे तरतरी येते . चीन प्रमाणे ,जपान ,कोरिया , वियतनाम , या देशात बुद्ध धर्माच्या प्रसारासोबत चहा देखील पसरला आणि बुद्ध धर्मातील विविध पूजा ,विधी , सण, समारंभाचा भाग बनला . या सर्व पौव्रात्य देशात हिरवा चहा म्हणजे चहाची हिरवी पाने उकळून केलेला चहा पिला जातो आणि सर्व बुद्ध धर्मीय देशात "टी सेरिमनी" हा धर्मिक विधी केला जातो.
युरोपियन देशांपैकी जवळपास सर्व देशात चहा लोकप्रिय आहे . इंग्लंड , जर्मनी ,इटली ,फ्रांस ,पोर्तुगाल या देशात चहा इंग्रजांनी लोकप्रिय केला आहे . इराण मध्ये मात्र चहा १७ व्या शतकातच पोचला होता . इंग्लंड मध्ये काय आणि भारतात काय चहा वर गाणी, नाटके , कथा , कादंबरी तील प्रसंग चहामय झाल्याचे दिसून येते. " अ कप ऑफ टी" या नाटकाने युरोपियन रंगभूमी गाजवली होती . इंग्लंड म्हणजे क्रिकेट या भारतीयांच्या आवडत्या खेळाची जन्भूमी ! कसोटी क्रिकेट मध्ये ,४ वाजता "टी टाइम" ची पद्धत आजही कोणत्याही देशात सामना असला तरीही पाळली जाते .क्रिकेट ,इंग्रजी भाषा आणि चहा या मुळे इंग्रज दीडशे वर्ष देशावर राज्य करून निघून गेले तरीही इंग्लंड आणि भारत या दोन देशातील स्नेहबंध मात्र कायम राहिले .
चहा हा देश विदेश गरीब श्रीमंताचा सर्वांचा आवडता आहे. मी सहावी सातवीला असताना चहाची १० पैसे ,२५ पैसे एवढ्या किमतीची पुडी मिळायची ,आणि गरीब लोक तेवढीच घेवून जावून चहा ची तल्लफ भागवायचे , माझ्या शेतातील सालकरी गड्याच्या घरी मी एकदा गूळ घालून केलेला चुलीवरचा चहा मी एकदा घेतला होता ,आजही गावी गेलो कि शेतात अशा चुलीवरच्या चहाची मज्जा आम्ही लुटतो . चहा हा तसा स्वस्त असल्यामुळे ,बाहेर हि अनेक ठिकाणी सहजगत्या उपलब्ध होतो . कितीही खेडेगाव असले तरी चहाचे हॉटेल असणारच असणार . पूर्वी बाहेर खाणे ,बाहेर जेवणे ,ह्या सवयींना चुकीचे समजले जाई, तेंव्हा हॉटेल म्हणजे फक्त चहाचे अशीच संकल्पना रूढ होती . शाळा कॉलेज मध्ये शर्यत , खेळाचे सामने , वाढदिवसाच्या पार्ट्या म्हणजे फक्त चहा पार्ट्याच असायच्या . कॅन्टीन मध्ये मित्र मैत्रीण बोलावणे , गप्पा मारणे या गोष्टी चहाच्या साक्षीने व्हायच्या . कित्येकांचे प्रेम प्रसंग चहाच्या संगतीत गोड झालेले आहेत आणि कॅन्टीन मधल्या कटिंग ने कित्येकांच्या प्रेम विवाहाच्या बैठकी पार पडल्या आहेत.
भारतात आसाम चहा आणि दार्जीलिंग चा चहा असे प्रमुख प्रकार आहेत. दार्जीलिंग चहा हा चीनी चहा म्हणूनही ओळखला जातो . चहाचे पांढरा ,पिवळा ,हिरवा , उलुंग , लालसर काळा आणि मुरवलेला काळा असे प्रकार आहेत . चहा ची हिरवी आणि विशेतः कोवळी पाने तोडून वाळवून घेतली जातात ,त्यामुळे ती पाने आपोआप दुमडून त्याची गुंडाळी होते , पानात असणारे क्लोरोफिल नष्ट होते व टानीन नावाचा पदार्थ तयार होतो ,ज्यामुळे चहाला काळा-,लाल असा रंग येतो. त्यानंतर चहावर वाफ देणे , गरम करणे ,मुरवणे अशा प्रक्रिया केल्या जातात . त्याची प्रतवारी ,वर्गवारी करून स्वतंत्र पाने त्याची भुकटी बनविण्यात येते . कोवळी पाने , किती वाजता खुडण्यात आली , त्या झाडाची उंची ,तिथले भौगोलिक ,नैसर्गिक वातावरण यावर चहाचा स्वाद ठरतो . पानाची भुकटी, शिरांची भुकटी , देठांची भुकटी यामुळे चहाची प्रतवारी ठरते . बाजारात सी टी सी डस्ट आणि सी टी सी लिव्हज अशा दोन प्रमुख पद्धतीचा चहा मिळतो . सी टी सी म्हणजे कर्लिंग ,ट्विस्टिंग आणि क्रशिंग . प्रत्येक कंपनी च्या चहाची लज्जत वेगळी असते कारण चहा मुरवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते . भारत जगातील प्रमुख चहा उत्पादक देशांपैकी आहे ,मात्र भारतात चहाचा खप जास्त असल्यामुळे निर्यातीमध्ये मात्र भारत श्रीलंकेच्याही मागे आहे . पण भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनात चहाचा सिंहाचा वाटा आहे .चहाच्या वेगवेगळ्या जाती मुळे जशी त्याची चव ठरते तशीच बनविण्याच्या पद्धतीमुळे देखील ठरते. घरात चहा मध्ये अद्रक ,विलायची ,सुंठ ,टाकून चहाला अधिक बहारदार बनवता येते. विशेष म्हणजे काही व्याधीसाठी काही विशिष्ट औषधे , मुळ्या, औषधी वनस्पती चहा बरोबर उकळून दिल्या जातात . माझ्या लहानपणी खोकला, सर्दी साठी " झिंदा तीलीस्मात " नावाचे एक झणझणीत युनानी औषध चहा मध्ये मिसळून प्यायला दिले जायचे . चहा मध्ये मुळातच काही औषधी गुण असल्याचे अनेक संशोधकांनी मान्य केले आहे आणि इंग्रजांनी देखील देशात चहा विक्रीस काढला तेव्हा ताप ,थंडी -ताप ,पोटाचे विकार ,सर्दी या व्याधीवरचे औषध म्हणूनच जाहिरात केली गेली होती . पोटातील विकारासाठी काहीजण बिन दुधाचा काळा चहा लिंबू पिळून पितात. पण महारष्ट्रात गडचिरोली ,चन्द्रपूर या आदिवासी भागात बिनदुधाचा चहा केवळ औषध म्हणून नव्हे तर दररोज आवडीने पिला जातो. दुध किती जास्त घातले यावर चहाचा चवदार पण ठरत नाही ,तर अगदी कमी दुधात देखील झक्कास चहा करता येतो . भारतीयांच्या घराघरात इंग्रजां मुळे पोचलेला चहा विशेष म्हणजे भारतीयांच्या सर्व पुरातन वृत्त वैकल्ये उपास तापास यांना चालतो. शेकडो वर्षापासून चालत आलेल्या उपवासाला १९ व्या शतकात इंग्रजांनी आणलेला चहा कसा काय चालतो ? हा एक मोठा प्रश्न मला नेहमी पडतो .
चहा बनविण्याचे आणि पिण्याचे हि अनेक प्रकार आहेत . युरोपियन लोक चहा उकळून गरम पाणी ,गरम दुध आणि साखर स्वतंत्र ठेवतात . असा चहा तिथेच बनवला जातो त्यामुळे बराचसा थंड असतो ,म्हणून चहा कपाने पिला जातो . बशी फक्त नावाला कपाखाली धरतात . खेडे गावातला माणूस मात्र अगदी उकळलेला चहा कपात आणि पुन्हा बशीत ओतून फुरक्या मारीत पितो . काही मध्यम वर्गीय उगाच युरोपियन लोकांची भ्रष्ट नक्कल करण्याच्या नादात अगदी गरम चहा कपाने पितात ,कपा खाली बशी फक्त नावाला धरतात आणि तोंड भाजून घेतात. पण काहीही झाले तरी भारतीयांना चहा गरम लागतो आणि तेवढाच कडक हि लागतो . रोज लागतो आणि सतत लागतो ! अगदी दिवसाला ४० -४० कप चहा पिणारे सुद्धा काही शौकीन आहेत. भारतात चहाला कॉफी तर युरोपात चहाला कॉफी आणि बियर असे दोन स्पर्धक आहेत पण चहाचा क्रमांक सर्वात वरचा आहे . पाणी म्हणजे जीवन ,पाण्यानंतर माणूस, निदान भारतीय माणूस तरी सर्वात जास्त काय पीत असेल तर तो चहाच आहे ! म्हणून चहा एवढे लोकप्रिय आणि प्रतिष्ठीत पेय या विश्वात दुसरे कोणतेही नाही.
@ राज कुलकर्णी , उस्मानाबाद .

Comments