मोदींच्या विजयाची मंगोलियन वर्षपूर्ती
चीन चा दौरा आटोपून मोदी नुकतेच मंगोलिया या चीन -रशिया -जपान या तिन्ही महाशाक्तींच्या कवेत वसलेल्या मंगोलिया या देशाच्या दौर्यावर जावून आले. पूर्वी भारतीय पंतप्रधानांचे परदेश दौरे आणि त्याची उपलब्धी यावर वर्तमानपत्रातून स्तंभलेखन होत असे आणि लोकसभेत निवेदन वगैरे चालायचे ,पण हल्ली फेसबुक ,ट्विटर मुले आपली लोकशाही कधी नव्हे एवढी सजग झाली आहे ! घरात स्नान संध्या आणि पूजाअर्चा करत अमेरिका, चीन ,ऑस्ट्रेलिया ,मंगोलिया असा विश्वसंचार चालू असतो . कारण हा दौरा केवळ भारतीय पंतप्रधानांचा नसून तो भाजपचे नेते नरेंद्र मोदी असल्यामुळे त्यास कधी नव्हे एवढे महत्व प्राप्त झालेले असते ,जणू काही पंतप्रधानांनी परदेश दौरा करण्याची प्रथा गेल्या वर्षभरापासून सुरु झालेली आहे .
चीन चा दौरा आटोपल्यानंतर मोदी पूर्वनियोजित मंगोलिया दौरा पार पडला .भारत आणि मंगोलिया यांच्यातील संबंध दृढ करणे,व्यापारी ,सांस्कृतिक करार करणे,या दृष्टीने या दौर्याचे महत्व होते, कारण मंगोलिया भारताचा सातत्याने सहकारी देश राहिला आहे. मंगोलिया आणि भारत यांचे संबंध २५०० वर्ष जुने आहेत . स्वतंत्र भारतात १९५७ साली भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती राधा कृष्णन यांनी मंगोलियाचा दौरा केला होता. त्यापूर्वीच १९५६ साली व्ही . के . कृष्णन मेनन यांनी संयुक्त राष्ट्राच्या १० व्या आमसभेत मंगोलियाला सदस्यत्व मिळावे म्हणून मागणी केली ,पुढे नेहरूंच्याच प्रयत्नाने १५ व्या आमसभेत मंगोलियाला सदस्यत्व मिळाले. मंगोलीयाने भारताच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सभासदत्वाला पाठींबा दर्शविलेला आहे . महत्वपूर्ण बाब अशी कि १९७२ च्या युद्धात मंगोलिया ने भारताला पाठींबा देवून बांगला देशाला मान्यता दिली होती.
मंगोलियन भाषा भारत शिकवली जावी आणि भारतीय आयुर्वेदाचा मंगोलियातील शैक्षणिक क्षेत्रात अंतर्भाव असावा यासाठी, १९७३ साली परस्पर सहकार्याचे अनेक करार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले होते . १९७८ पासून मंगोलियन भाषा भारतीयांना शिकविण्यासाठी शिक्षक पुरविण्याचे मान्य करून दिल्लीच्या जवाहरलाल विद्यापीठात तसा अभ्यासक्रम सुरु केला . त्यानंतर १९८७ मध्ये तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मंगोलियन भाषा संस्कृती बाबत अभ्यास केंद्र आणि स्वतंत्र अध्यासन स्थापण्यात आले . मंगोलियात १९८९ हे वर्ष जवाहरलाल नेहरू यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले आणि त्यावर्षी नेहरू यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे टिकेट प्रसिद्ध करण्यात आले होते . पुढे नरसिंहराव पंतप्रधान असताना १९९३ साली गौतम बुद्ध यांचे काही अवशेष मंगोलिया ला पाठवण्यात आले ,त्याच वर्षी २२ फेब्रुवारी १९९३ रोजी दिल्लीत ' मंगोलिया संस्कृतीचे दिवस " या नावाचा सांस्कृतिक उत्सव आयोजित केला गेला होता. मंगोलियन संस्कृती कला याबाबतच्या ९५ देखाव्याचे भव्य प्रदर्शन देखील आयोजित केले गेले होते. हेच प्रदर्शन पुढे कलकत्ता आणि इंफाळ येथेही आयोजित केले गेले. भारताने मंगोलिया आणि भारतीय उपखंडाच्या आणि अतिपूर्वेकडील देशातील संबंध वृद्धिगंत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांना मंगोलियन विद्यापिठाची डि. लीट. ही पदवी सन्मान पूर्वक देण्यात आणि त्याच वर्षी बुद्धगया येथे मंगोलियन मोनास्ट्री निर्माण करण्याचे कार्य हाती घेण्यात आले. मनमोहन सिंह याच्या कालखंडात २००६ साली भारत आणि मंगोलिया मध्ये करार झाले ,त्याच वर्षी मनमोहन सिंह याची मंगोलिया यात्रा ठरली होती परंतु ती रद्द झाली ,त्यानंतर २००९ मध्ये मंगोलियन राष्ट्राध्यक्षाचा भारत दौरा होवून सहकार्य आणि आर्थिक मदतीचे करार झाले.
मंगोलीयाचे भौगोलिक स्थान जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे , जपान ,रुस आणि चीन या तीन प्रमुख राष्ट्रांच्या सानिध्यात असल्यामुळे , तिघांचीही विशेष मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न मंगोलिया करत आला आहे. प्रत्येक देश स्वार्थी असतो आणि स्वदेशहित पाहूनच करार केले जात असतात , मंगोलियाला सर्वांनीच मदत करावी असे वाटते आणि महणून तो सर्वानांच जवळ करण्याचा प्रयत्न करतो आहे . परंतु या तीन राष्ट्राखेरीज मंगोलिया भारताला एक समविचारी देश म्हणून पाहत आला आहे.,भारताप्रमाणेच मंगोलिया तिसऱ्या जगातील देश असून भारताचे त्या देशाशी संबंध दृढ असणे स्वाभाविकही आहे. चीन आणि रुस यांच्या मधोमध असणारा देश चीन आणि रुस साठी देखील महत्व पूर्ण आहे. मंगोलियाला केलेल्या मदतीचा डांगोरा पिटला जात असताना ,ही बाब समजायला हवी की, सध्या चीन आणि मंगोलियातील व्यापार ३०० मिलियन अमेरिकन डॉलर असून, भारताचा व्यापार केवळ २५ मिलियन अमेरिकन डॉलर एवढा आहे. या तफावतीवरून सत्य काय आहे हे स्पष्ट दिसून येईल. मंगोलियातील जनतेस त्यांच्या देशातील चीनचा अति हस्तक्षेप नकोस वाटू लागला असल्याची भावना भारतीय उपखंडात पसरवली गेली आहे. तसी ती चीन मध्ये ,जपान मध्ये आणि रशिया मध्येही पसरवली गेली आहे . मात्र ती खरी नव्हे कारण मंगोलियाला चीन आणि रशिया दोघांकडूनही मदत हवी आहे . गेल्या वर्षीच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी मंगोलिया मध्ये ११ बिलियन रुबल्स( ५४० मिलियन अमेरिकन डॉलर) एवढी प्रचंड गुंतवणूक केली आहे. यावरून सुज्ञांनी समजून घ्यावे एवढेच म्हणता येईल.
भारताने अमेरिकेबरोबर केलेल्या नागरी अणुसहकार्य करारानंतर अणुभट्टी निर्मिती बरोबर अणुभट्टीस लागणारे इंधन म्हणून युरेनियमचा पुरवठादार देश शोधणे महत्वाचे ठरले. अमेरिका ,कॅनडा ,ऑस्ट्रेलिया, ब्राझील इत्यादी देशासोबत मनमोहन सिंह यांच्या सरकारने २०१३ पूर्वीच करार केलेले आहेत.मोदी कितीही नावे ठेवत असतील, तरी आज त्यांचे सर्व परदेश दौरे मनमोहन सिह सरकारच्या पूर्वनिश्चित केलेल्या व्युह्तंत्राचा भाग म्हणावे लागतील. सप्टेंबर २००९ मध्ये भारतातर्फे मंगोलियाला २५ मिलियन अमेरिकन डॉलर कर्ज देण्यात आले आणि युरेनियम पुरवठा करार केला गेला. पुढे जानेवारी २०१० मध्ये भारत आणि मंगोलिया यांच्यात,भारताने मंगोलियात युरेनियमच्या खाणीचे खोदकाम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने जे करार करण्यात आले ,त्याचाच पुढील भाग म्हणजे भारतीय पंतप्रधानांचा सध्याचा मंगोलिया दौरा आहे.
भारत अण्वस्त्रांच्या निर्मितीमुळे गेली ३४ वर्ष अणुउर्जा प्रकल्पांच्या निर्मितीच्या जागतिक व्यापारापासून अस्पृश्य राहिला होता. त्यामुळे देशात साधन संपत्ती मुबलक असूनही ,उर्जेच्या तुटवड्यामुळे देशाचा विकास वेगाने होवू शकला नाही. उर्जेची ही भूक केवळ केवळ अणुउर्जा भागवू शकते याची जाणीव पूर्वीच्या आणि सध्याच्या सरकारला आहे. याच कारणास्तव भारत सरकारने २००८ पासून विविध देशासोबत अणुसहकार्य व अणुभट्टी इंधन पुरवठ्याचे करार केले आहेत. भारतातील एकूण उर्जेची मागणी लक्षात घेता २०२० सालापर्यंत १४६०० MW एवढ्या उर्जेच्या निर्मिती केंद्राच्या उभारणीचे ध्येय २०१० साली ठरविण्यात आले होते. याच अनुषंगाने देशातील एकूण ऊर्जानिर्मितीच्या २५% उर्जेचा स्रोत अणुउर्जा असावा असे लक्ष २०५० सालापर्यंत ठरविण्यात आले आहे. त्या दृष्टीने केलेला यशस्वी प्रयत्न म्हणून भारतासाठी पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा निश्चितच महत्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलिया दौर्यात रविवारी मंगोलियन लोकप्रतिनिधी गृहासमोर भाषण देवून ,सभागृहास संबोधित केले ,विशेष त्या दिवशी रविवार म्हणजे सुट्टी असतानाही भारतीय पंतप्रधानांचे विचार ऐकण्यासाठी खास एकदिवशीय अधिवेशन आयोजित करण्यात आले,ही भारतीयासाठी अत्यंत सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. परंतु यशस्वी दौरा करून परतणाऱ्या मोदींनी अपरिपक्वतेचे दर्शन घडवत या सन्मानास गालबोट लावलेच. मंगोलियाच्या लोकप्रतिनिधी गृहासमोर दिलेल्या भाषणात भारताच्या पंतप्रधानांनी तुमच्या राष्ट्रीय चिन्हात कमळ आहे आणि माझ्या पक्षाच्या चिन्हही कमळ असल्याने दोन देशात घट्ट मैत्री होत असल्याचे सांगितले. आपण एका महान देशाचे प्रतिनिधित्व करीत आहोत याचा मोदींना विसर पडल्याचे हे लक्षण म्हणावे लागेल. वास्तविक कमळ या फुलाची माहिती सांगायची होती तर आमचे राष्ट्रीय फुल कमळ आहे आणि आपले राष्ट्राचे चिन्ह कमळ आहे किंवा आमची हिंदू देवता श्री.विष्णूच्या हातात देखील कमळ असते, श्री. लक्ष्मी ही देवता कमळावर विराजमान असते ,असे म्हटले असते तर अधिक चांगले झाले असते. पण मोदींना देवी देवतापेक्षाही राजकारण जास्त स्मरणात राहते, ही अत्यंत चिंता वाटणारी बाब आहे.
त्यानंतर तर नरेंद्र मोदींनी कहरच केला , भारतीयांना गेली ६५ वर्षे आपण भारतीय असल्याची लाज वाटत होती आणि गेल्या वर्षी आपण सत्तेत आल्यापासून भारतीयांना सन्मान मिळत असल्याचे संकुचित वृत्तीचे वक्तव्य त्यांनी केले. मोदीअद्याप ही निवडणूक प्रचार अभियानातून मानसिकदृष्ट्या बाहेर न आल्याचे हे लक्षण म्हणावे लागेल. देशातील 125 करोड जनतेचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधानपदावर आरूढ होऊन एक वर्ष झाले तरी त्यांना कमळ दिसले की निवडणूक चिन्ह आठवते पण राष्ट्रीय फुल आठवत नाही ! आपल्या देशात असताना एकवेळ समजूही शकते पण परदेशात असतानाही पक्ष चिन्ह आठवणे खूप दुर्दैवी आहे. .
भारतातर्फे आयटी केंद्र उभारणीची कोनशीला बसवून मोदी दक्षिण कोरिया च्या दौर्यावर रवाना झाले आहेत . मंगोलिया दौरा भारतासाठी किती उपयुक्त ठरेल हे येणारा काळ ठरवेल, पण मंगोलियाच्या भूमीचे हे भाग्यच म्हणावे लागेल कि, भारतातील भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींच्या विजयाची वर्षपूर्ती त्यांच्या भूमीवर साजरी झाली
मोदींचा परकीय भुमीवरील पक्षाभिनीवेष औचित्यभंगाचा प्रकार असून अतिशय उद्विग्न करणारा आहे. मोदी यांचे परदेश दौरे आणि जागतिक विमानवाऱ्या देशहितासाठीच आहेत हे मान्य, परंतु मोदींचे प्रचार अभियानाचे विमान आता वर्षानंतर तरी जमिनीवर यावे अशी अशा व्यक्त करतो.
राज कुलकर्णी .
Comments
Post a Comment