सुपारी
लहानपणी एकदा पूजेला बसल्यावर पौरोहित्य कराणा-या भटजी ने गणपतीपूजन म्हणून मला " शुद्धोदक स्नानम समर्पयामि " असे म्हणून त्याने समोरच्या चौरंगावर ठेवलेल्या सुपारीवर पाणी ओतण्यास सांगितले. मी कुतूहल म्हणून विचारल्यावर मला समजले कि ,ती सुपारी म्हणजेच गणपती ! भारतीयांच्या धार्मिक विधीमध्ये सुपारीला चक्क गणपती म्हणजे देवता मानण्याची रूढ दिसून येते. कोणत्याही पुजेची सुरुवात जेव्हा होते ,तेव्हा गणपती म्हणून सुपरिच ठेवली जाते . घरात औक्षवण केल्यावर किंवा ओवाळल्या नंतर पैसे नसतील तर सुपारी तरी ओवाळणी म्हणून टाकावी ,असा संकेत आहे . सुपारीला शुभ कारक ,मंगल दायक आणि सृजनाचे प्रतिक मानल्यामुळे लग्न किंवा कोणत्याही सण समारंभात स्त्रियांची ओटी भरताना तांदूळ ,खोबरे या बरोबर सुपारी हि असतेच !. एवढेच कशाला आहेर करताना पुरुषाला टोपी टॉवेल आणि त्याबरोबर पान सुपारी किंवा किमान सुपारी तरी दिली जाते.
पान आणि सुपारी या दोन्हीचा एकत्रित उल्लेख केला जात असला तरीही सुपारी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व केवळ टिकवून आहे, असे नह्वे तर तिची एक वैशिष्ट्य पूर्ण ओळख तिने निर्माण केली आहे . सांकृतिक- धार्मिक , सामाजिक ,राजकीय ,आर्थिक क्षेत्रापासून ते अगदी गुन्हेगारी क्षेत्रापर्यंत तिचा नावलौकिक आहे . 'सुपारी किलर' हा शब्द गुन्हेगारी क्षेत्रात खूप गाजलेला शब्द ! पैसे घेवून हत्त्या करणार्याला 'सुपारी किलर' म्हणतात. अर्थात सुपारी घेणे म्हणजे एखादे काम स्वीकारणे या मराठी भाषेतील वाक्य प्रचाराचा अर्थ गुन्हेगारी क्षेत्रात एवढा लोकप्रिय झाला कि याच्या नावाची सुपारी घेतलीय ,त्याच्या नावाची सुपारी याने दिलीय, अशी वाक्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या किंवा गुन्हेगारी कथानकाच्या चित्रपटात पाहायला मिळतात . कंपनी,वास्तव,परिंदा, दयावान या चित्रपटातील नायकच सुपारी किलर होते . पण सुपारी ची हि कुप्रसिद्धी अगदी अलीकडील काळातील आहे . वस्तुतः सुपारी धार्मिक ,सांस्कृतिक जीवनात मात्र पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतिक आहे .
सुपारी हि लक्ष्मी म्हणजेच संपत्ती ,पैसा याचे द्योतक आहे . सुपारीला 'अडकी'असे हि म्हणतात आणि म्हणूनच सुपारी कातरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजाराला 'अडकित्ता' असे नाव आहे . त्याच बरोबर आपलीअर्थिक स्थिती हलाकीची आहे ,हे सांगण्यासाठी काही जण " माझ्याकडे पैसा ,अडका काही नाही " असे म्हणतात . बहुतेक या ठिकाणी 'अडका' हा शब्द पैसे निदर्शक म्हणून वापरला गेला असावा . धार्मिक कार्यात सुपारी हि पत्नी ची प्रतिक म्हणून मानली जाते. अर्थात सुपारीला पत्नी मानणे म्हणजे स्त्रियांना वस्तू मानण्यासारखे आहे , पण प्राचीन हिंदू धर्मातील पुरुषवर्चस्ववादी विचारांचे हे प्रकटीकरण आहे ,हे खेदाने म्हणावे वाटते . विधवांना कोणत्याही पूजा विधी करता येत नाहीत , पण पत्नी मयत झालेल्या विधुर व्यक्तीला मात्र कमरेला सुपारी बांधून सर्व विधी करता येवू शकतात. सुपारी चे पावित्र्य नारळ या फळाएवढेच असल्यामुळे किवा तशी संकल्पना रूढ असल्यामुळे ती फोडणे म्हणजे शुभ कार्याची सुरुवात झाली असे मानली जाते . लग्नाच्या बोलणीत ,बैठकी मध्ये वधु आणि वर या दोन्ही पक्षातील आहेर -उपचार ,देणे -घेणे ,सोने -नाणे या बाबतचा तो विशिष्ट वाद सन्मानाने (?) आणि सामोपचाराने मिटला कि, कोणीतरी मध्यस्त म्हणतो " फोडा आता सुपारी आणि काढा बर तारीख " सुपारी फुटली म्हणजे लग्न ठरले! आणि आता केवळ लग्नाची तारीख काढणे एवढेच काम राहिले . एकदा सुपारी फुटली कि काही नव्याने मागणी करायची नसते ,असा देखील एक संकेत आहे.
मध्यंतरी एक वाघ्या मुरली गीत ऐकले होते " खंडेरायाच्या लग्नाला ,बानू नवरी नटली , काल बाई सुपारी फुटली " सुपारी म्हणजे लक्ष्मी, संपती, पैसा याचे प्रतिक असल्यामुळे ती आपसूकच लग्नाला बाजाराचे स्वरूप प्राप्त करून देते .पण समाजमान्यता असल्यामुळे सुपारीशिवाय एकही विधी किंवा पूजा होत नाही ,हेही तेवढेच महत्वाचे ! सुपारी हे संपन्नतेचे निदर्शक म्हणून ,नवरदेवाच्या हातात हळकुंडा सोबत सुपारी देखील बांधतात. भारतीयांच्या आणि विशेष करून महाराष्ट्रीय पूजा ,विधी , सण समारंभात महत्वाचे स्थान निर्माण करून बसलेली सुपारी हजारो वर्षापासून सर्वाना भुरळ घालते आहे .
सुपारी आपल्याकडे पांढरी सुपारी आणि लाल सुपारी . लाल सुपारीत पुन्हा खाण्याची मोठी लाल सुपारी आणि पूजेत उपयोगाला पडणारी लाल लहान सुपारी ,जी खायला खूप तुरट आणि कडवट लागते . त्यानंतर चपटी चिकणी सुपारी म्हणून एक सुपारी असते , विशिष्ट पद्धतीने शिजवून खाण्यालायक केलेली असते . या सुपारीच्या छोट्या छोट्या तुकड्यांना विविध फ्लेवर वापरून ,गुलाब सुपारी ,इलायची सुपारी इ . अशा अनेक सुपाऱ्या बाजारात उपलब्ध आहेत . सुपारीला इंग्रजी मध्ये अरेका नट म्हणून ओळखतात. पण पान आणि सुपारीचे एवढे घनिष्ट नाते आहे कि , पानाला बेट्ल लीह्व्स म्हटल्यामुळे सुपारीला बेट्ल नट या नावाने ओळखतात. असे असले तरीही पाना शिवाय सुपारीची स्वतंत्र ओळख गेल्या हजारो वर्षापासून आहे . भारतात कर्नाटकातील शिमोगा जिह्ल्यात सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते .दक्षिण पूर्व आशियातून सुपारी हे फळ हजरो वर्षापूर्वी भारतात दाखल झाल्याच्या नोंदी आहेत . गुप्त कालखंडात ( इ .स .४०० ते इ .स. ६००) सुपारी खाण्याची सवय प्रचंड वाढली असल्याचे म्हटले आहे.आर्यपूर्व हरप्पा आणि मोहिन्जोदारो या संस्कृत देखील सुपारीचे अस्तिव असल्याचे उत्खननात आढळून आले आहे . वेदात आणि प्रामुख्याने आयुर्वेदात औषधी म्हणून सुपारीचा उल्लेख असून तमिळ संस्कृतीतील "शीलपद्दीकरम" या कथेत ,कथेतील नायिका स्वतःच्या नवऱ्यास प्रेमाने सुपारी खायला देत असल्याचा प्रसंग आहे . भगवान शंकर आणि पार्वती यांच्यातील पान आणि सुपारी खाण्याची अनेक वर्णने आहे. पान आणि सुपारीच्या नात्याला नवरा -बायकोचे नाते म्हणून पहिले जाते ,वियतनाम या देशात लग्न तेंव्हाच ठरते, जेंव्हा मुलगा मुलीच्या घरी पान आणि सुपारी नेहून देतो. नवराबायकोचे नाते म्हणजे पान सुपारीचे नाते अशी म्हण तिथे आढळून येते . असे म्हणतात कि , फार पूर्वी सारीपाटाचा डाव हा ,सुपाऱ्या ठेवूनच खेळला जायचा पण सुपारी जास्त काळ टिकणे अशक्य म्हणून पुढे लाकडी सोंगट्या वापरत आल्या.
सुपारी आणि लोकसंगीत यांचा जवळचा संबंध आहे. अद्कीत्याने कर कर आवाज करत सुपारी कातरत बैठकीची लावणी ऐकणे हे ,अस्सल रंगेल पणाचे प्रदर्शन असते . म्हणून तर सुपारी वर अनेक लावण्या आढळतात , "भर दुपारी फुटली सुपारी ,कात चुना तरी मागवा", " आजच दुपारी ,हिची सुपारी फोडायची" " रूपाने देखणी सुपारी चिकणी ,सोळावं सरल" अशा लावण्यांनी महाराष्ट्राला वेद लावले आहे . लोकभाषेत एखादी स्त्री अतिशय सुंदर आणि नाजूक असेल तर तिला "चिकणी " असे उच्चारले जाते ,ते सुपारीच्या अनुषंगानेच .त्याचे कारण सुपारी ही मुळातच शृंगाराचे प्रतिक आहे
आपल्याकडे सुपारी ही प्रामुख्याने पानासोबत खाल्ली जात असल्यामुळे , पानाचे सर्व संदर्भ सुपारीबाबातही सांगता येतील . ,जगभरात पान सुपारीचे हे असे घनिष्ठ नाते आहे . त्यामुळे स्वाभाविक पणे पान सेवन म्हणजे जीवनातील आठ प्रमुख आनंदापैकी एक असून सोळा शृंगारापैकी एक शृंगार असल्याचे वात्सायन याने त्याच्या 'कामसूत्र' या ग्रंथात म्हटले असल्यामुळे सुपारीही त्यात आलीच . "मनसोळसा" या ११ व्या शतकातील ग्रंथात सुपारी खाणे हे राजभोगाचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. १३ व्या शतकात चीन हून भारतात आलेला युरोपियन प्रवासी मार्को पोलो याने आणि १४ व्या शतकातील प्रवासी इब्न बतुता ने सुद्धा मुघल दरबारात, समाजात क्षणोक्षणी सुपारी खाल्ली जात असल्याचा उल्लेख त्याने त्याच्या प्रवास वर्णनामध्ये केला आहे. म्हणजे मानवी संस्कृती एवढाच जुना कालखंड सुपारीचा देखील सांगता येईल .
सुपारी मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत . सुपारीची पाने हि जखमेवर बांधल्याने जखम लवकर बरी होते काही औषधे , मुळ्या ह्या आवर्जून पान आणि सुपारी सोबत दिल्या जातात .
सुपारी कातरणे म्हणजे एक वैशिष्ट्य पूर्ण कला आहे,त्यात एक प्रकारचा रांगडेपणा आहे . त्यासाठी काहीजण खास अडकित्ता वापरतात ,खेडे गावात प्रत्येक व्यक्ती स्वतःचा स्वतंत्र अडकित्ता बाळगून असतो. पुण्यातल्या केळकर संग्रहालयात ,त्याच्या समोर आणि जुन्या बाजारात आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे ,आकाराचे ,नक्षीचे अडकित्ते पाहायला मिळतात आणि खरेदीही करता येतात. अडकित्त्याने सुपारी फोडायची ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते . काही जन त्याचे स्लाईस सुद्धा करतात ,काहीजण खडा सुपारी तर काहीजण अगदी लहान भुकटी करूनही खातात. ग्रामीण भागात सुपारीच्या तुकड्याला खांड म्हणतात. हल्ली सुपारी आणि कात यांचे मिश्रण करून तंबाखू घालून केलेल्या गुटख्या सोबत पान मसाला सुपारी खूप प्रसिद्ध झाली आहे . सुपारी खाणे यापेक्षा सुपारी चघळणे ,हा शब्द प्रयोग योग्य आहे ,कारण प्रत्यक्षात सुपारी मोठ्या प्रमाणावर फक्त चघळली जाते . हल्ली सर्वत्र चघळण्यासाठी चेविंग गम, बबल गम वापरला जातो पण आपल्या संस्कृतीत हे काम सुपारीने अनादी काळापासून केले आहे. परवा देशप्रेमी या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले 'खातून कि खिदमत में सलाम आपुनका ,ताने दिन तन्दाना' हे गीत ऐकताना यातील एका ओवीमध्ये हैदराबादी शैलीत म्हटले आहे " ये पाना में मेरे कलेजे के तुकडे ,सुपारी कि जगह राख्को ,छाबड छाबड छाबड्के छाबड जा " या गाण्यात व्यक्त केलेली सुपारी बद्दल ची भावना कि ,सुपारी म्हणजे काळजाचा तुकडा , एवढा उत्तुंग भाव प्रकट करणारी आहे!
राज कुलकर्णी .
Comments
Post a Comment