अडकित्ता ..........

अडकित्ता ..........

जनजीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक वस्तूंचा प्रभाव एवढा जबरदस्त असतो की, ती वस्तू संस्कृती , कला, साहीत्य, गीत नि संगीत यावर देखील विविध अंगाने प्रभाव टाकते, अडकीत्ता ही पुर्वी वापरात असलेली आणि दुर्लक्षित झालेली अशीच एक वस्तू! 

पान आणि सुपारी यांनी केवळ भारताचे नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडाचे सामाजीक व सांस्कृतिक विश्व व्यापले आहे. हिंदुची एकही पुजा नि अर्चा पान आणि सुपारी शिवाय पुर्ण होत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व विधी आणि सुपारीच्या साथीनेच होतात. अगदी सुपारी म्हणजे तर प्रत्यक्ष गणपतीच समजतात.

पान आणि सुपारी यांनी कात आणि चुन्याच्या संगतीत रंगवलेले जीवन, ही आपल्या सर्वांच्या जीवनातील रसिकता स्पष्ट करणारे आहे. दैनंदिन जीवनात जेवण झाल्यावर पाचक, रेचक म्हणून ओळखल्या जाणा-या पानाबरोबर महत्वाची असते ती सुपारी आणि या सुपारीला खाण्यायोग्य बनविण्यासाठी असते ,ते सुपारी कातरणारे वा फोडण्याचे हत्यार म्हणजे अडकित्ता !

अडकित्ता या शब्दाची उत्पत्ती ही मुळातच  सुपारीवरून झालेली आहे. जुन्या काळी चलन म्हणून सुपाऱ्या सुद्धा वापरल्या जात असत असे म्हणतात! त्यामुळे अशा चलनास अडका वा अडकी म्हटले जात असे. अडकी हे नाव सुपारीस पडले ते यामुळेच ! आजही कन्नड भाषेत सुपारीला अडकी असेच नाव आहे तर इंग्रजी मध्ये देखील सुपारीला 'अरेका नट' असे म्हणतात. हे नाव अडकी शी साध्यर्म्य सांगणारे आहे. अडकीला म्हणजेच सुपारीला कातरणारे हत्यार म्हणजे अडकित्ता !

पान, सुपारी सह अडकित्ता ही वस्तु सुद्धा  शान ,शौक ,श्रीमंती सुखासीनेतेचे प्रतिक म्हणून प्रचलित आहे.पुण्याच्या केळकर वस्तू संग्रहालयात गेल्यावर मी अनेक विविध पद्धतीचे ,सुंदर नक्षीकाम केलेले अडकित्ते पाहीले होते. ते पाहून मी खूप हरखून गेलो होतो. तोच अनुभव हैद्राबादेतही आला. हैदराबादेत चार मिनार जवळील जुन्या वस्तूंच्या बाजारात १०० ते १५० वर्षापूर्वीचे अनेक सुंदर आणि कलाकुसरीचे अडकित्ते विक्रीस असतात. अडकित्ते पितळेचे तांब्याचे असतात पण पातं मात्र पोलादाचे असते. राजस्थानात गेल्यावर बिकानेर, जोधपुर, जयपुर राजवाड्यात असेच सुंदर अडकित्ते पहायला मिळाले. हे सर्व अडकित्ते तत्कालीन  राजघराण्यांचे दैनंदिन ऐषारामाचे प्रतिक तर समाजजीवनातील जीवनातील या वस्तूचे महत्व स्पष्ट करणारे होते.

महाराष्ट्रीय समाजात घराची बांधणी करतानाच दरवाज्यानंतर दोन 'ढाळज' असतात आणि या ढाळजेत पानपुडा आणि त्यात पान सुपारीसह अडकित्ता हे चित्र सर्रास पाहायला मिळत असे, ज्यात आजही जास्त प्रमाणात बदल झालेला नाही.

अडकित्ता हे तसे पाहीले तर निव्वळ श्रीमंताची मक्तेदारी कधीच नव्हती.अडकित्याने गरीबांमध्ये  श्रीमंतीच्या भावनिक अवस्थेची पुर्तता केली. कारण ढाळजेच्या बैठकीतल्या या अडकित्त्या बरोबरच प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचा स्वतंत्र असा अडकित्ता असतोच असतो. पान आणि सुपारीचे शौकीन प्रत्येक स्तरात आढळतात तसे अडकित्त्याचेही शौकिन सर्व स्तरात आहेत. हल्ली जसा प्रत्येकाकडे मोबाईल असतो, तसाच अडकित्ता ही अनेकांकडे असतो. म्हणजे गरिबातला गरीब शेतकरी व्यक्तीसुद्धा स्वतःचा स्वतंत्र असा अडकित्ता बाळगून असतो ,शिवाय अडकित्ता त्यास शेतातील विविध कामाच्या वेळी अनेक प्रकारे उपयोगी पडतो!

पान आणि सुपारी ने ज्याप्रमाणे कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि अनेक शृंगार रसाच्या रचनांमध्ये स्थान मिळवले, तीच किमया अडकित्त्याने सुद्धा केली आहे. या रसिकपणाचा एक महत्वाचा घटक म्हणून अडकित्त्यास सुद्धा पान, सुपारी, कात आणि चुण्याबरोबर शृंगारिक रचनांमध्ये स्थान मिळाले. सुषमा शिरोमणी यांच्या 'भन्नाट भानू' या  चित्रपटात एक सुंदर अशी अवखळ लावणी आहे! “तुम्ही अडकित्ता मी हो सुपारी ” या गाण्यात नायिका स्वतःला सुपारी म्हणवून घेत असताना  तिचे आणि नायकाच्या प्रेमाचे प्रतिक असणाऱ्या घट्ट मिठीची तुलना ती  अडकीत्त्यातून प्रकट करते!  म्हणजे अडकीत्त्याच्या पकडीत सापडलेली सुपारी सहसा सुटत नाही. पण सुटका होवूनच नये अशी ही हवीहवीशी पकड ही या प्रेमाची वा  इष्काची आहे, हा भाव अडकित्त्यामुळे चपखलपणे गाण्यात उतरला आहे. मराठी भाषेत अडकित्त्यात सापडणे म्हणजे संकटात सापडणे अशा अर्थाची एक म्हण देखील आहे ! तीचा संदर्भ हा संकटाच्या पकडेशी आहे किंवा संकटाने कातरले जाण्याशीही आहे.

अडकित्ता प्रत्येकजन बाळगत असला म्हणजे प्रत्येकला सुपारी कातरता येईलच असे नाही. अनेक जन अडकित्याने सुपारी कातरताना कशी हवी आहे म्हणून विचारतात! म्हणजे कतरी हवी की खडा ! सुपारीचा नरमपणा लक्षात घेवून सुपारी  कापण्याची एक विशिष्ट पद्धत असते. अनेकजन सुपारी कातरताना अतिशय सुंदर अशा स्लाईस तयार करतात. जणू कांही त्यांना सुपारीचे 'चिप्स' च  म्हणावे लागतील. पानाच्या सजावटीसाठी असे सुपारीचे चिप्स खूप उपयुक्त असतात!

सुपारी कातरून देणे, ही कृती संवादात आपुलकी आणते. निदान माझा अनुभव तर असाच आहे.  एखाद्या केसबद्दल पक्षकारांशी चर्चा करताना , पक्षकार स्वत:हून न मागताही हातावर सुपारी कातरून देतात किंवा 'काढा बर सुपारी' म्हटले त्यांना प्रचंड आनंद होतो आणि लगबगीनं त्यांचा हात त्यांच्या बनियनच्या म्हणजेच  छाटनाच्या विविध कप्पे असणा-या खिशाकडे जातो. मग अडकीत्ता आणि सुपारी काढून कातरायला सुरूवात होते.अडकित्ता बाळगणा-याने  स्वत:हून सुपारी कातरून देणे , हे खरंतर शिष्टाचाराचा भाग आहे. पण 'सुपारी द्या बरं'  म्हटल्यावर समोरचा व्यक्ती कधीही अडकित्ता आणि सुपारी तुम्हाला तुमच्या हातात देणार नाही, हे ही वास्तव आहे. तो स्वत:च कातरून देतो, त्यात जसा  एक प्रकारचा स्नेह असतो तशी काळजी देखील असते. कारण प्रत्येक अडकित्याच्या पाताच्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगवेगळ्या खोडी असतात. ठराविक पद्धतीने दाब बसला तरच सुपारी कापली जाते, नाही तर अपघातही होतात. सुपारी कातरताना पात्याची चाल माहीत नसल्यामुळे बोट कापले जाण्याची देखील शक्यता असते. हा अनुभव मी अनेकवेळा घेतला आहे. त्यामुळे इतरांचा अडकित्ता वापरण्याचा अट्टहास करूच नये!

पाना बरोबर अडकित्ता सुद्धा रांगड्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देतो आणि हे रांगडेपण महाराष्ट्राच्या ग्रामीण समाज जीवनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे! एखाद्या गावातील कर्तबगार कुर्रेबाज प्रभावशाली व्यक्तीची ओळख त्याच्या अडकीत्त्याने सुपारी कापण्याच्या विशिष्ट शैलीतून दिसून येते. शिवाय एखाद्या व्यक्तीच्या प्रचलित राजकीय स्थितीवर केल्या गेलेल्या टिप्पणीस 'कर्रकर्रकर्र' आवाजाचे अडकित्त्याचे पार्श्वसंगीत असले की ते वाक्य वा टिप्पणी खूप खुलते!

अडकित्ता हे तसे परस्पर संवादात सहकार्य करणारं शस्त्र! पण जुन्या मराठी चित्रपटांनी हा अडकित्ता मात्र खलनायकाच्या हातात देवून त्याच नाहक बदनाम केले. प्रसंग गावातील कुरघोडीचा असो की एखाद्या तमाशाच्या फडातील लावणीच्या नृत्याचा असो, अडकित्ता बाळगणा-या व्यक्तीच्या एकूनच सामाजीक, राजकीय व वैयक्तीक चारीत्र्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले गेले . त्यामुळे अडकित्ता मात्र वाईट वृत्तीचे प्रतिक होवून मनात बसला. सन १९८० पासून महाराष्ट्रात जसे शहरीकरण झाले तसा अडकित्ता ग्रामीण भागापुरताच मर्यादित राहिला आणि  समाज जीवनातून जसा हद्दपार झाला तसा तो चित्रपटातून देखील हद्दपार झाला.

पूर्वी आवर्जून अट्टहासाने पिठाच्या गिरणीच्या बाहेर ठेवलेल्या गुलाबी रंगाच्या जात्याच्या खडकावर अडकित्त्याला धार लावली जायची, मी हे स्वत: अनेकवेळा पाहीले आहे.  गावात धार लावणारा फिरस्ता आला तर आवर्जून अडकित्ते घेवून लोक जात असत, हे ही मी पाहीले आहे. पण पान आणि सुपारीची जागा मावा, गुटखा यांनी घेतली तसे अडकित्ते मुंडले गेले आणि असे आजीबात धार नसलेले झालेले अडकित्ते केवळ दस-याच्या दिवशीच्या शस्त्रपुजनात सजण्यासाठी दिसू लागले. त्यामुळे हल्ली अडकित्ते कोणीही वापरत नाही आणि त्याची विक्रीही फारशी होत नाही. पण तरीही ग्रामीण भागातील आणि आमच्या उस्मानाबाद सारख्या निम्न शहरी वा अर्ध ग्रामीण भागातील आठवडी बाजारात असे अडकित्त्याचे एखादे दुसरे दुकान आजही पाहायला मिळते.

उस्मानाबादच्या रविवारच्या आठवडी बाजारात असाच नित्य नियमाने अडकित्त्यांचे दुकान थाटणारे उस्मानाबाद तालुक्यातील जागजीचे भारत दामोदर पंडित हे गेली अनेक वर्ष हा अडकित्ता विक्रीचा व्यवसाय करतात. उस्मानाबादच्या शेजारीच पण लातूर जिल्ह्यातअसणा-या मुरुड या गावात बनवलेले अडकित्ते ते विकतात. मुरूडचे हे अडकित्ते सुप्रसिद्ध असून ते आज मराठवाडा तसेच तेलंगणातील हैदराबादसह कर्नाटकातही  लोकप्रिय आहेत. मुरुड येथूनच हे अडकित्ते तेलंगाना आणि कर्नाटक मध्ये जातात!

मुरूडच्या अडकित्त्यावर "जी आर मुरुड" अथवा "के बी मुरूड" असे लिहिलेले असते .याचा अर्थ  'गोरख शंकर लोहार' आणि 'किसन बाबू लोहार' असा आहे. गोरख शंकर लोहार हा व्यक्ती म्हणजे ज्याने हा मुळ व्यवसाय अंदाजे साठ सत्तर वर्षापूर्वी सुरु केला होता म्हणे! आज त्याच्या कुटुंबातील आणि भावकीची म्हणून सात आठ घरे आहेत. या अडकीत्त्यासोबत चांदी सारख्या दिसणा-या बिदरीची चुन्याची डबी देखील ते बनवतात आणि त्याची विक्री ठिकठिकाणच्या आठवडी बाजारात केली जाते.

उस्मानाबादच्या बाजारात अडकित्ते
विकणा-या भारत दामोदर पंडित यांच्याकडे ५० रुपयापासून सुमारे ३५० रुपयापर्यंतच्या किंमतीचे अडकित्ते आहेत. पंडित सांगतात की  आता पूर्वी सारखी आता अडकीत्त्याला मागणी राहिलेली नाही. म्हणून अडकित्त्यासोबत इतरही वस्तु विकाव्या लागतात. एखाद्या बाजारात त्यांची तीनशे ते चारशे रुपयापर्यंत विक्री होते. जी प्रामुख्याने अडकित्ता सोडून इतर वस्तूंचीच असते! 

अडकित्ता हे खरंतर एक सुपारी कापणारं हत्यार किंवा संस्कृत भाषेत शस्त्र म्हणुया! हत्यार वा शस्त्र हे खरंतर युद्धाशी, संघर्षाशी आणि हिंसेशी संबधीत असते. पण स्नेहपुर्ण संवादास प्रेमाने वृद्धींगत करणारं अडकित्ता हे असे एकमेव शस्त्र आहे म्हणावे लागेल. हिंदु मुस्लिम असा भेदभाव या शस्त्रात कधीच नसतो. कारण गावतल्या महमंद-बशीर कडे  काय आणि रामभाऊ-गंगाधर कडे काय सर्वांकडे अडकित्ता असतोच! पण हिंदु मुस्लिमांकडे शस्त्र असूनही हे शस्त्र दंगली घडवत नाही!  तसं पाहीलं तर  धार विळीलाही असते आणि  धार अडकित्त्यालाही असते.

विळीप्रमाणेच अडकित्याची धार मानवी मुल्यांना सांधणारी आहे. विळी स्वंयपाक घरात असते तर अडकित्ता ढाळजेत किंवा दिवाणखान्यात असतो ! तेही आदिरातिथ्य, प्रेम, स्नेह, शिष्टाचार आणि रसिकतेचं आणि अस्सल भारतीयत्वाचं प्रतिक म्हणून! 

© राज कुलकर्णी.

Comments