वैज्ञानिकांचा मोर्चा आणि विज्ञानवादाची उपेक्षा ..

'भारत छोडो' आंदोलनास ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लोकसभेपासून ते सर्वदूर देशात विविध समारोह साजरे केले जात असताना , देशातील समस्त वैज्ञानिक वर्गाचा देशाच्या इतिहासात प्रथमच मोर्चा पाहायला मिळाला. मुंबईत मराठा महामोर्चाच्या बातम्यांमुळे वैज्ञानिकांचा मोर्चा मराठी वर्तमानपत्रात अपेक्षित असे स्थान मिळवू शकला नाही मात्र ,देशातील अनेक मोठ्या शहरातून या मोर्चाने आपले अस्तित्व दाखवून दिले.

देशातील प्रमुख विज्ञान आणि संशोधन केंद्रातील निधीत करण्यात आलेली कपात, या मुख्य मुद्दयाबाबत जरी या मोर्चाचे आयोजन केले गेले असले तर एकंदरीत गेल्या तीन वर्षात धार्मिक तथा परंपरावादी शक्तींच्या सत्तेत येण्यामुळे आणि सरकारसमर्थक तथा सर्व धर्मातील धर्मसंरक्षक झुंडीमुळे विज्ञानवादाची उपेक्षा  झालेली आहे, हे वास्तव आहे!

भारतीय राज्य घटनेत नागरिकांची कर्तव्ये म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि संशोधक वृत्तीचा विकास आणि प्रचार प्रसार याचा अंतर्भाव केलेला आहे .विज्ञानाच्या सृष्टीने आपले जीवन अधिकाधिक सुखकर बनविणाऱ्या आजच्या उपभोक्तावादी समाजात विज्ञानवादाबद्दल मात्र  अजिबात आस्था दिसून येत नाही. नव्हेतर विज्ञानवादास विरोध करणा-यांचेच प्राबल्य दिसत आहे.  समाज उत्तरोत्तर प्रागतिक होण्याऐवजी तो प्रतिगामी बनत चालला आहे आणि तो तसाच राहण्यासाठी राजकीय स्वार्थातून आवर्जून प्रयत्न केले जात आहेत. सरकार देखील अशा प्रयत्नांनाच समर्थन देत असल्याचे दिसून येत आहे. 

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संदेशवहनात टूजी पासून फोरजी पर्यंत भरारी घेणाऱ्या समाजात गाईचे शेण हे चीनच्या सीमेवर बंकर निर्मिती साठी वापरले तर अण्वस्त्रापासून संरक्षण करता येईल याची चर्चा चालू असते! सरकार समर्थक कोणी मंत्री म्हणतो की, गाय हा एकमेव असा प्राणी आहे ,जो उच्छ्वासावाटेही ऑक्सीजन वायू वातावरणात सोडतो! एवढेच नव्हेतर गोमूत्रापासून सोन्याच्या निर्मितीचे कारखाने निर्माण करण्याचा घाट कोणी घालत असताना आणि  एका बाजूला जपान सरकारच्या सहकार्याने देशात बुलेट ट्रेन विकसित केली जात असताना,  देशात सोशल मेडियावर पुष्पक विमाने विहार करत असतात!  गणपतीच्या सोंडेच्या माध्यमातून देशातील नवीन पिढी प्लास्टिक सर्जरीचे तंत्र शिकत असते तर  ठराविक धार्मिक विचारधारेला मान्यता देणारी नवीन पिढी निर्माण व्हावी म्हणून कोणी 'अपत्यांचा कारखाना' या स्वरुपात संशोधन करत असतात. सरकार समर्थक कोणी याचे समर्थन करत असेल तर समजून ही घेता येईल मात्र प्रत्यक्ष सरकारात सहभागी असणारे ,मोठे मोठे नेते मंत्रीगण सुद्धा अशा वृत्तीचे दर्शन घडविताना दिसून येत आहेत. देशात गेल्या तीन वर्षात अशा छद्मविज्ञानाचा गौरव करणा-या वृत्तीस उधान आले आहे.

सरकारने 'मेक इन इंडिया' ची घोषणा, धोरणात्मक निर्णय म्हणून जाहीर केली असली तरीही  समाजात होणारी विज्ञानवादाची उपेक्षा आणि दुस-या बाजूला प्रसाकीय स्तरावर संशोधन संस्थानच्या निधीत केली जाणारी कपात, ही या धोरणातील दांभिकत्व स्पष्ट करणारी आहे. उच्च तंत्रज्ञान देशात विकसित व्हायचे असेल तर देशातील संशोधन संस्थांना निधीची कमतरता निर्माण होता कामा नये, मात्र सरकार गोशालेसाठी, कुंभ मेळ्यासाठी ,हज यात्रेसाठी जेवढ्या प्रमाणात निधीची तरतूद करते तेवढीही तरतुद विज्ञानाच्या मुलभुत संशोधनासाठी करताना दिसून येत नाही. हा आक्षेप केवळ या सरकारबद्दल नसून  पूर्वीच्या सरकाराबद्दल देखील हाच अनुभव होता! परंतु प्राचीन भारतात प्रगत विज्ञान असल्याच्या छद्मविज्ञानाला त्याकाळात एवढे उधान आले नव्हते हेही खरे आहे ! 

विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा उच्चार एकत्रित केला जात असला तरीही तंत्रज्ञानाचा जन्म विज्ञानच्या फार पूर्वी झालेला आहे. जगातील सर्वच संस्कृती मध्ये विकसित झालेले विज्ञान हे अनुभवजन्य ज्ञानातून,निरीक्षणातून आणि मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित झाले आहे. त्यामुळे प्रगतीचे प्रतिक म्हणून दिसणारी मोठ मोठी स्थापत्ये आज प्राचीन तंत्रज्ञानाची साक्ष देत असली तरीही भारतात  मुलभूत विज्ञान, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि संशोधनाचा पाया हा ब्रिटीश काळातच घातला गेला. ज्या देशात  आर्यभट्ट, भास्कराचार्य, चरक, सुश्रुत यांच्या सारखे संशोधक वैज्ञानिक निर्माण झाले त्या देशात विज्ञान समाजात रुजले नाही. मुलभूत विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव भारतीय समाजात सातत्याने राहिला. 

मुलभूत विज्ञानाची परवड होण्याचे मूळ कारण जसे समाजातील अवैज्ञानिक वृत्तीत आहे, तसेच प्रशासकीय स्तरावरील अनास्था सुद्धा आहे. युरोपात प्रस्थापित निसर्ग व्यवहार आणि त्यामधील सातत्य यांची वैज्ञानिक उकल करणाऱ्या विचारवंताची, संशोधकांची ऑरीस्टोटल पासून आईनस्टाईन पर्यंत एक साखळी आहे. तशी ती भारतात नाही हे खेदाने मान्य करावे लागते .भारतात प्रस्थापित ज्ञानाच्या विरोधात बंड करणारे हे कोणत्या न कोणत्या धर्माचे संस्थापक होवून बसले असल्याचे चित्र दिसते. एक चार्वाक सोडला तर मुलभूत विज्ञानाची कास धरून मानवी समाजातील व्यवहारांची , धार्मिक बाबींची चिकित्सा इतर कोणीही केली नाही . चरक , शुश्रुत या संशोधकांनी वनस्पतींचे वैद्यकीय गुणधर्म अभ्यासून लक्षणांच्या आधारावर अनुभव जन्य ज्ञानाधारे विकसित केलेली उपचार पद्धती जगात मान्य झाली. परंतु वैज्ञानिक दृष्टीकोन , मुलभूत विज्ञानाचे संशोधन आणि अध्ययन हे विषय उपेक्षितच राहिले. प्राचीन भारतात प्रगत विज्ञान अस्तित्वात होते असे मान्य केले तर जात ,धर्म , अस्पृश्यतेसारख्या अवैज्ञानिक गोष्टी समाजामध्ये हजारो वर्षापासून आजपर्यंत का टिकून राहिल्या, याचे उत्तर प्राचीन भारतीय विज्ञानाचे समर्थक देवू शकतील काय ? विदेशात अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक गोष्टी नाहीत असे नव्हे ,पण निदान आपण विज्ञान युगात आहोत ,याची जाणीव तरी त्यांना आहे. आज युरोप ,अमेरिका या राष्ट्रांत आम्ही फक्त विज्ञानावर विश्वास ठेवतो ,असे अभिमानाने सांगणाऱ्या लोकांची सख्या वाढत असताना , भारतीय उपखंडात मात्र धार्मिक तत्वज्ञानावर आधारित विचारांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. एक समाजघटक लोकांना वेदकाळात घेवून जाण्यास सज्ज झाला आहे तर दुसरा समाज अद्यापही सहाव्या-सातव्या  शतकातील अरबस्तानाच्या पुढे सरकायला तयार नाही.

भारतातील ज्येष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर त्यांच्या ‘विज्ञान गंगेची अवखळ वळणे’ या पुस्तकात म्हणतात “ आपल्याकडे ज्या कालखंडात ताजमहाल बांधला गेला त्याच काळात लंडन मध्ये सेंट पॉल कॅथीड्राल ची निर्मिती झाली, दोन्ही वास्तुकलेचे महान नमुने म्हणून प्रसिद्ध आहेत , पण युरोपात न्यूटन निर्माण झाला तसा भारतात झाला नाही. युरोपियन राजघराण्यानी वैज्ञानिकांना आश्रय दिला , परंतु संगीत ,साहित्य ,कला यांना आश्रय देणाऱ्या भारतीय राजे महाराजांनी विज्ञानाबद्दल थोडीही आस्था दाखवली नाही”

देशभरातील वैज्ञानिकांच्या मोर्च्यामुळे हे अधोरेखित होत आहे की, मध्ययुगीन कालखंडात विज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे जे काम युरोपात झाले ते २१ व्या शतकात भारतीय समाजात  व राजकीय व्यवस्थेत अद्यापही होवू शकत नाही.

भारतीय समाजात गुणवंताची, संशोधनवृत्तीची वाणवा आहे असे नव्हे, पण सरकारने या संशोधन वृत्तीस प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरंच 'मेन इन इंडिया' सारखी धोरणे यशस्वी होतील. अन्यथा प्राचीन वैभवाच्या तुता-यांनी वर्तमान गजबजून जाईल आणि भविष्य धुसर होण्यास वेळ लागणार नाही. 

© राज कुलकर्णी.

( हा लेख दै.प्रजापत्र,  बीड या दैनिकाच्या बहुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला आहे) 

Comments