पावसाचा कृत्रीम प्रयोग......
लहानपणी 'येरे येरे पावसा तुला देतो पैसा ' हे गाणे प्रत्येकाने म्हटले असेल! पावसाला बोलावण्यासाठी त्याला पैश्याचे आमिष दाखविण्याची बालसुलभ कल्पना गाणे म्हणताना खूप आनंद देणारी असली तरीही, भविष्यात खरोखर पैसे देवून आमंत्रण द्यावे लागेल किंवा पैसे खर्चुनच पावसाला बोलावता येईल असा विचार जुन्या पिढीने कधीही केला नव्हता.
आमच्या लहानपणी पाऊस पडेना झाला कि, गावातील म्हातारे कोतारे लोक आम्हा मुलांकडून ओल्या अंगाने महादेवाला अभिषेक करायला सांगायचे ,काहीवेळा महादेव मंदिराचा गाभारा पाण्याने भरून काढत काढत असू , कुठे बेडूक-बेड्कीन यांची लग्न लावली जायची ! शहरी भागात पर्जन्ययज्ञ, सामुहिक प्रार्थना ,नमाज वगैरे असले प्रकार मात्र आजही पाहायला मिळतात. असले प्रयत्न निरर्थक असले तरीही ते केले जायचे कारण लोक पावसासाठी एवढे आतुर असायचे की ,कशाने तर असुदे पण पाऊस आला पाहिजे हि त्यामागची अगतिकता असायची आणि आताही ती तशीच पाहायला मिळते ! आज पावसाला सुरु होवून जवळपास अडीच महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी, पावसाचा थेंब नसलेले अनेक जिल्हे महाराष्ट्रात आहेत. त्या खास करून विदर्भ ,मराठवाडा परिसरात तर पाऊस न पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची देखील समस्या उद्भवली आहे ,शेतीसाठीचा पाऊस हा तर खूप पुढचा प्रश्न म्हणावा लागेल.
उत्तर गोलार्धात असणाऱ्या भारतातील अर्थकारण मान्सून च्या पावसावर अवलंबून आहे .हिंदी महासागरात जन्म घेवून नैऋत्य मोसमी वाऱ्यावर स्वार होवून देशातील हजारो लोकांचे ,पशु ,पक्षांचे जीवन हिरवेगार गार करणाऱ्या आणि झाडाझुडपांना, दऱ्याखोऱ्यांना, पर्वतांना नवसंजीवनी देणाऱ्या मान्सून ची वाट संपूर्ण भारत देश आतुरतेने पाहत असतो. भारतीय संस्कृतीची निर्मिती ,जडण घडण ,अस्तित्व हे केवळ या मान्सूनच्या स्वरुपात असलेली निसर्गाची देणगी आहे. शेतीप्रधान असणारा भारत देश मान्सूनच्या भरवस्यावर दरवर्षी जुगार खेळतो ,आणि साहजिकच पावसाच्या लहरीवर लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न अवलंबून राहतो. अपुरा पाऊस, अवेळी पाऊस किंवा अतिपाऊस , अशा लहरीपणामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. शेतीवर उपजीविका असणारा शेतकरी पूर्णतः खचून जातो , कधी कधी जीवनाला कंटाळून आत्महत्या देखील करतो ,हे चित्र आज सर्रास दिसू लागले आहे ,म्हणूनच चिंता वाढली आहे. त्यामुळे वैज्ञानिक प्रयोगाद्वारे कृत्रिम पर्जन्याचा प्रयोग महाराष्ट्रात सध्या केला जात आहे. कृत्रीम पावसाचा प्रयोग महाराष्ट्राला नवा नाही, कारण महाराष्ट्र सरकारने यापूर्वी २००२ साली असा प्रयोग केला होता, मात्र तो यशस्वी होवू शकला नव्हता. सध्याच्या सरकारने या कृत्रिम पावसासाठी २७ करोड रुपये एवढ्या रकमेचा प्रकल्प जाहीर केला आहे. या प्रकल्पाचे रडार नियंत्रण केंद्र औरंगाबाद इथे स्थापन करण्याचे नियोजित असून या प्रकल्पांतर्गत २५० किमी त्रिज्येचा परिसर कृत्रिम पर्जन्यासाठी निर्धारित केला गेला आहे. सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यात प्रायोगीक चाचणी यशस्वी पार पाडल्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा परिसरात हा प्रयोग करण्यासाठी अमेरिकेहून खास विमाने आणि रासायनिक दृव्ये मागविण्यात आली असल्याची माहिती देखील राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे खरोखरच 'येरे येरे पावसा ,तुला देतो पैसा ' अशी अवस्था आज निर्माण झाली असली तरीही पैसे देवूनही पाऊस पडेल काय आणि पैशाच्या मोबदल्यात पाऊस खरेदी करणे परवडणारे आहे काय ? हे प्रश्न आहेतच, मात्र पावसाच्या आगमनाची अगतिकता एवढी प्रचंड आहे कि , कृत्रिम का असेना आता पाऊस पडायलाच हवा अशी अवस्था निर्माण झाली आहे. निदान महाराष्ट्राची तर अवस्था अशीच झाली आहे.
भारतातील हवामान आणि ऋतुचक्र यांचा एकत्रीत अभ्यास केलातर जगभरातील ऋतुमान आणि भारतातील ऋतुमान यात कमालीचा फरक आहे ,कारण जगात उन्हाळा आणि हिवाळा असे दोनच ऋतू पाहायला मिळतात ,मात्र भारतात उन्हाळा या ऋतू मध्ये आपल्याकडे पाऊस पडत असल्यामुळे आपण त्यास पावसाला म्हणतो. एप्रिल मध्ये सुरु झालेला उन्हाळा खरे तर ऑक्टोबर पर्यंत असतो ,परंतु निसर्गाने याच काळात भारतला मान्सून देणगी दिल्यामुळे भारतीय उपखंड सुजलाम सुफलाम बनलेला आहे. सप्टेंबर मध्ये जेंव्हा पाऊस ओसरतो , आकाशातील ढग विरळ होतात ,आणि पुन्हा उन्हाळ्यासारखे उन अनुभवतो. यालाच आपण विश्वामित्राचा उन्हाळा म्हणतो, वैज्ञानिक भाषेत त्यास 'ऑक्टोबर हीट' म्हणतात . याचा अर्थ स्पष्ट आहे ,भारतीय उपखंडाचा उन्हाळा ,मान्सून मुळे पावसाळा बनलेला आहे.
आकाशामध्ये आपण जे ढग पाहतो ,ते सर्वच ढग पावसाळी ढग नसतात. विखुरलेल्या प्रमाणे दिसणारे सिरस, ढिगासारखे किंवा कापसाच्या पुंजक्यासारखे दिसणारे क्युमुलूस, एकावर एक थर असणारे स्ट्रेटस आणि काळ्या रंगाचे पावसाळी असणारे निम्बस असे ढगांचे प्रमुख चार प्रकार असून ,दोन प्रकारांच्या ढगांचे मिळून पुन्हा २० -२५ प्रकारचे ढग वातावरणात तयार होतात . ज्यांचे अस्तित्व भूपृष्ठापासून१ ते २ किमी उंचीपर्यंत असते. सर्वच ढगात पाणी हे बाष्प स्वरुपात अस्त्वित्वात असते ,परंतु पाऊस पडण्याची क्षमता प्रत्येक ढगात नसते. तसे आपल्याकडे वर्षभर अधून मधून पाऊस पडताच असतो. जून - सप्टेंबर या कालवधीत असणारे पावसाळी ढग हे क्युमुलोनिम्बस, क्युमुलोस्ट्रेटस, स्ट्रेटोनिम्बस इ. प्रकारात मोडतात. नैसर्गिकरीत्या पृथ्वीवरील जलसाठ्यातील पाण्याची वाफ होवून ती वाफ वातावरणात ठराविक अंतरावर गेल्यानंतर तिचे ढगात रुपांतर होते. छोट्या छोट्या पुंजक्यांच्या स्वरुपात निर्माण झालेले ढग एकालाएक जोडून भला मोठा ढग निर्माण होतो. मग अशा ढगांचे समूह निर्माण होतात, पृथ्वीवरील वातावरणात वाहणारे वारे या ढगांना त्यांचे बरोबर खेचून नेतात ,या प्रवासात त्यांच्यात आणखी बाष्प साठत राहते ,तसे तसे ढग अधिक जड होवून त्यांचा वेग मंदावतो. या वेळी तापमान कमी होवून बाष्पाचे रुपांतर द्रवात होते,आणि पाऊस पडतो ! ही झाली नैसर्गिकरीत्या पाऊस पडण्याच्या पद्धतीची माहती ,आता हाच पाऊस आपल्याला कृत्रिम पद्धतीने पाडण्यासाठी आवश्यक आहेत ढग आणि ढगातील वाफेचे रुपांतर पाण्यात करण्याचे तंत्र !
ढगातील वाफेचे पाण्यात रुपांतर करण्यासाठी कृत्रिमरीत्या ढगाचे तापमान कमी केले जाते, याचे तंत्र १९४६ साली विन्सेंट शेफर या शास्त्रज्ञाने शोधून काढले ,त्याने यासाठी ढगावर सिल्वर आयोडाईड या द्रव्यांची फवारणी केली. पुढे पोट्याशियम आयोडाईड , स्थायू रूपातील कार्बन डाय ऑक्साईड चा फवारा मारण्याचे तंत्र शोधले गेले. सिल्वर आयोडाईड हे महागडे असल्यामुळे अगदी सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि अगदी सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ वापरूनही देखील परिणामकारकरीत्या वाफेचे सांद्रीभवन करून पाऊस पाडता येतो, परंतु जास्तीत जास्त परिणामकारक द्रव्यांचा वापर करून पाऊस पडण्याची प्रक्रिया करावी लागते . सुरवातीच्या काळात असा पाऊस पाडण्याचे प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यावर अधिक संशोधन सुरु झाले. या तंत्राने पाऊस पाडण्यासाठी पावसाळी ढग आकाशात असणे आवश्यक असतात. अशा ढगावर या द्रव्यांचा मारा करण्यासाठी दोन पद्धतीचा अवलंब केला जातो . एक म्हणजे जमिनीवरून विमानभेदी तोफांच्या साह्याने किंवा अग्निबाणाच्या साह्याने ही द्रव्ये ढगात फवारली जातात. परवा २ ऑगस्टला नाशिक जिल्ह्यातील सायगाव येथे आठ अग्निबाणाच्या साह्याने 'International School of Professional Studies' (ISPS) या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेली कृत्रिम पावसाची चाचणी याच पद्धतीची होती! मात्र ती अयशस्वी ठरली. दुसऱ्या पद्धतीत शीतकरण परिणाम साधणारी द्रव्ये विमानातून ढगांवर फवारली जातात. यासाठी खास पद्धतीची लष्करी विमानासारखी विमाने आवश्यक असतात. हा खर्चिक कार्यक्रम असतो . याच पद्धतीची चाचणी औरंगाबाद मध्ये ७ ऑगस्ट रोजी घेण्यात आली, मात्र ही चाचणी देखील अयशस्वी झाली असल्याचे वृत्त आहे. नाशिक जिल्ह्यातील आणि औरंगाबाद येथील दोन्ही चाचण्या अयशस्वी झाल्या! नाशिक जिल्ह्यात चाचणीच्या वेळी ढगांचा वेग प्रचंड होता ,शिवाय ढग खूप विखुरलेले असल्याची माहिती ISPS च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे ,तर औरंगाबाद येथील प्रयोगाच्या वेळी विमाने आकाशात गेल्यावर पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असणारे ढगच आकाशात नव्हते अशी माहिती ,या विमानातील परदेशी तंत्रज्ञांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे. याचाच अर्थ असा की, कृत्रिम पाऊस पाडून , त्या पाण्यातून शेतीचे उत्पन्न निर्धारित करण्याचा प्रयत्न हा निव्वळ प्रयोग आहे ,कारण जगात अजूनही असे प्रयोग पूर्णपणे यशस्वी होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे . ढग उपलब्ध नसल्यामुळे प्रयोग यशस्वी होण्याचा प्रसंग अनेक वेळा निर्माण झाले आहेत. रशिया मध्ये १९६० साली कृत्रिमरीत्या ढगांची निर्मिती करता येईल काय ,यावरही संशोधन करण्यात आले, परंतु हे प्रयोग पृथ्वीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या अध्ययनातून केले गेले होते ,पाऊस आणणाऱ्या ढगांची निर्मिती म्हणजे खरोखरच हवेतल्या गप्पा अशी अवस्था निदान आज तरी आहे.
मानवाने निसर्गात केलेला हस्तक्षेप हा ऋतुचक्र बिघडण्याचे प्रमुख कारण आहे, त्यात कृत्रीम पाऊस सुद्धा हस्तक्षेपाचाच प्रकार म्हणावा लागेल. प्रचंड पैसे खर्चून केले जाणारे हे प्रयोग नवीन संशोधनासाठी चांगलेच आहेत, मात्र शेतक-यांसाठी हा केवळ लटका दिलासा असणार आहे. टँकर लॉबी प्रमाणे कृत्रीम पावसाचेही कंत्राटदार निर्माण झाले तर भविष्यात पैसा दिला तरच पाऊस पडेल अशी भिती सध्याच्या वातावरणात निर्माण झाली आहे.
© राज कुलकर्णी.
Comments
Post a Comment