संसदीय लोकशाहीचे निर्माते नामदार गोपाल कृष्ण गोखले..

भारतीय मन हे पराक्रमाच्या आणि शौर्याच्या गाथेने भारावले जाणारे आहे. म्हणूनच भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या  नायकांचे कर्तृत्व हे शौर्य या अंगाने पहिले जाते. हा मध्ययुगीन संकल्पनांचा प्रभाव आधुनिक काळातही असल्याचा प्रत्यय वारंवार दिसून येतो. स्वाभाविकच सनदशीर मार्गाने जवाबदार राज्यपद्धतीचा आग्रह धरणारी व्यक्तिमत्वे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतर देखील उपेक्षितच राहिली. नामदार गोपाल कृष्ण गोखले हे असेच विद्वान आणि देशभक्त व्यक्तिमत्व !

गोखले यांचा जन्म सन १८६६ साली कोल्हापूर या शहरात झाला. विशाल हृदय आणि कुशाग्र बुद्धिमत्ता हे त्यांना निसर्गाने दिलेले वरदानच होते जणू ! विद्वत्ता आणि विनय याचा अपुर्व संगम होते गोखले!

गोखले, वयाच्या १८ व्या वर्षी पदवीधर, २० व्या वर्षी प्राध्यापक , २२ व्या वर्षी मुंबई विधी सभागृहाचे सदस्य आणि वयाच्या ३९ व्या वर्षी ते कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले ! अफाट वाचन,  विविध क्षेत्रातील व्यापक असे ज्ञान आणि यासाठी कष्ट करण्याची तयारी हे त्यांचे प्रमुख गुण ,त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मुत्सुदी राजकारणी आणि constructive statesman म्हणून प्रसिद्ध करण्यास कारणीभूत ठरले.

गोखलेंनी त्यांच्या राजकीय तथा सामाजीक कार्याची सुरुवात एक शिक्षक म्हणून केली!  मात्र ते स्वतःस सातत्याने न्यायमूर्ती रानडे यांचे अनुयायी मानत असत ,म्हणूनच त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडेंच्या विचारांचा प्रभाव होता. ते सन १८८६ साली प्राध्यापक झाल्यानंतर 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' मध्ये कार्यरत झाले आणि कांही काळातच ते फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपाल झाले. त्याच काळात त्यांनी 'पुणे सार्वजनिक सभा' या नियतकालीकाचे संपादक आणि डेक्कन सभेचे मानद सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले.

स्वातंत्र्य लढा आणि सामाजिक सुधारणा यांचा सर्वयोग्य संगम त्यांच्या कार्यात होता. सर्वसामान्य कष्टकरी, कामगार वर्ग हा त्यांच्या सामाजीक कार्याच्या चिंतनाचा केंद्रबिंदु होता. म्हणून त्यांनी पायाभूत सोईसुविधा तळागाळापर्यंत पोचल्या पाहीजेत याचा आग्रह धरला. सरकारने सर्वसामान्य कामगार, कष्टकरी समाजाच्या कल्याणासाठी कार्य करायला हवे, असे त्यांचे ठाम मत होते.  ब्रिटिशांनी त्याकाळी मिठावर लादलेला कर, गरीब, कष्टकरी, कामगारांच्या जीवनावर विपरीत प्रभाव टाकत होता. हा कर  कमी करण्यासठी त्यांनी ब्रिटन मध्ये जावून 'विल्बी कमिशन' समोर सर्वसामान्य, गरीब कामगारांची बाजू मांडली.

त्याकाळी भारतीय प्रशासकीय सेवेत भारतीयांची भारती उच्च पदावर केली जात नसे ,त्याविरोधात सर्वात मोठा संघर्ष गोखले यांनीच केला. भारतातील प्रशासनात स्थानिकांचा सहभाग आणि त्यातील सुधारणा यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

गोखले यांची भूमिका देशात जवाबदार राज्यपद्धतीच्या निर्मितीची होती आणि ब्रिटन जवाबदार राज्यपद्धती निर्माण करून ,जनतेच्या हितासाठी कार्य करत असेल तर ब्रिटीश सरकाराला सहकार्य केले जाईल अन्यथा नाही, अशी त्यांची भूमिका होती. पण गोखले हे नेमस्तांचे नेते होते आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याचा त्यांचा मार्ग पूर्णतः अंहिंसक तथा मावाळ होता. त्यांचे हेच असहकाराचे धोरण पुढे जहाळ गटातील टिळकांनी प्रखरपणे राबवले.

गोखले प्रसंगी कठोर भुमिकांही घेत असत.सन १९०५ साली बंगालच्या फाळणी नंतर मात्र त्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात थेट भूमिका घेवून सरकार जनभावना लक्षात घेत नसून अशावेळी जनतेने सरकारला सहकार्य करू नये अशी भुमिका घेतली.भारतीयांची बाजू जगासमोर मांडण्यासाठी म्हणून इंग्लंडला गेले आणि त्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जावून त्यांनी गांधीजींची भेट घेतली.

गांधीजींनी गोखलेंचे शिष्यत्व पत्करले आणि गुरूंच्या म्हणण्यानुसार गांधीजी भारतात येवून कार्य त्यांनी सुरु केले. त्याच वर्षी गोखले यांनी "Servents of india society" स्थापन केली, ज्याचा मुख्य उद्देश देशातील प्रशासनात भारतीय लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रशिक्षण देणे हा होता. हे खूप महत्वपुर्ण कार्य होते.

गोखले हे नेमस्तांचे पुढारी होते, सैंवेधानिक मार्गाने जवाबदार राज्यपद्धतीची निर्मिती , लोकांचे प्रतिनिधिगृह आणि प्रतिनिधी गृहात जनतेच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या संस्थात्मक कार्याचा त्यांचा ध्यास हा त्यांचा मुख्य स्वातंत्र्य लढा होता. एका अर्थाने गोखले यांनीच देशात संसदीय लोकशाहीची पायाभरणी करण्याचे कार्य केले असे म्हणावे लागेल.

गोखले यांच्यावर त्याकाळी ते ब्रिटीश धार्जिणे असल्याचा आरोप वारंवार केला जात असे, जहाल गटाच्या पुढा-यांकडून त्यांची हेटाळणी केली जात असे! मात्र त्यांचे कार्य या आरोपांना उत्तर देण्याचे कार्य स्वत:हून करत असे.

गोखले क्रांतिकारी नव्हते तसे ते प्रतिक्रियावादी देखील नव्हते! टोकाची भूमिका घेणे त्यांना मान्य नव्हते ,मात्र ते जनतेच्या अडचणी सोडविणारे  'Constructive Statesman' होते. एका बाजूला जनतेच्या अडचणी सोडविताना  सरकारच्या अडचणींना समजून घेण्याचाही ते सकारत्मक विचार करत असत. हे त्यांचे वेगळेपण होते.

गोखले यांच्या कार्याबद्दल असे सांगितले जाते की, त्यांनी ब्रिटिशांसमोर भारतीयांच्या मागण्या मांडल्या आणि कॉंग्रेस समोर शासकीय अडचणी! ही व्यवहारीकता त्यांच्या अंगी होती. डॉ.व्ही.एच. रूदरफोर्ड म्हणतात  “ He interpreted populer aspirations to the viceroy and the governments difficulties to the congress”. त्यांची त्याकाळातील भूमिका ही सरकार व जनता यांच्यात एकोपा निर्माण करणारी आणि त्याचबरोबर समेटातून , चर्चेच्या मार्गाने समस्या सोडविण्याची असे.

देशात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली पाहिजे ,स्वातंत्र्य लढा असला तरीही एक सर्वसामान्य नागरिक( common civilian)  म्हणून लोकांना सर्व सोई सुविधा मिळायला हव्या. यासाठी सरकारकडे  अधिकार हवेत ,या मागणीला त्यांनी समर्थन दिले. विशेष म्हणजे १९१० साली Indian Press Act आला तेंव्हा त्यावर सर्वांनी टीका केली मात्र गोखले यांनी या कायद्याचे समर्थन केले आणि पुढे मोर्लो सुधारणांचा आग्रह धरून त्यांनी या सुधारणा ब्रिटीशांकडून मान्य करून घेतल्या. ज्या सुधारणा भारतीय राज्यघटनेसाठी आधारभूत ठरल्या!
भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीचे उद्दिष्ट केवळ सैंवेधानिक सुधारणा मधून होवू शकेल ही कल्पना कॉंग्रेस कार्यकर्त्यात रुजविण्याचे गोखले यांनी केलेले कार्य अतुलनीय असेच आहे. हाच विचार मनात घेवून गोखले यांनी १९०५ ते १९०८ असे सलग चार वर्ष देशाच्या कानाकोप-यांत जावून प्रबोधन केले.

गोखलेंनी देशातील संसदीय लोकशाहीचे प्रारूप त्यांच्या योजनेतून मांडले. मुंबईच्या गवर्नरच्या विनंतीवरून त्यांना १९०९ साली सत्तेच्या व प्रशासनाच्या विकेंद्रीकरणाच्या  योजनेची शिफारस केली. हाच दस्तऐवज पुढे 'Gokhale's Political Testament' म्हणून प्रसिद्ध झाला. या योजनेत त्यांनी गावपातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर तालुका बोर्ड आणि जिल्हापातळीवर जिल्हाधिकारी यांना सल्ला देणारी  'Advisery District Council' ची कल्पना मांडली आणि विषेश म्हणजे या सर्व संस्था स्वायत्त असतील आणि त्यांना जनतेच्या कल्याणासाठी शासकिय निधी वापरण्याचे पुर्ण अधिकार असतील. म्युनिसीपल कमिटी या प्रत्येक शहरात याच धर्तीवर निर्माण करून त्यातील तीनचतुर्थांस सदस्य लोकांमधून तर एकचतुर्थांश सदस्य हे नियुक्त असतील अशीही त्यांनी मांडणी केली. तळगाळातील जनतेला आपल्या मुलभुत सुविधाच्या मागणीसाठी आवाज देण्याची शिफारस त्यांनी केली.हे मांडताना ते म्हणतात ' The cry of the people everywhere is that, the car of administration should not merely roll over their bodies, but that they themselves should be permitted to pull at the ropes... we want an interest in the administration around us. the educated classes are only critics of the administration today because the government does not realise the wisdom of enlisting their coperation ' ते पुढे म्हणतात ' the educated classes are the brain of the country and what they think today, the rest of the people will think tomarrow'.

गोखले यांनी या योजनेत ग्रामपंचायत सर्वात तळाशी, कलेक्टरला सल्ला देणारी District Advisary Council मध्यवर्ती पातळीवर  आणि Legislative Council  सर्वात उच्च पातळीवर अशी त्रिस्तरीय संसदेची योजनाच त्यांनी भारतीयांसाठी मांडली.

देशातील मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विशेष प्रतिनिधीत्व दिले जावे असे त्यांनी ठामपणे मांडले कारण १८९२ च्या कायद्याने मुस्लिंमांना दिलेले प्रतिनिधीत्व पुरेसे नाही अशीही भुमिका त्यांनी मांडली. ब्रिटीशांनी भारतीय जनतेची पैसा हा सैनिकीकरणासाठी व बटालियनच्या हातातील शस्त्रांसाठी खर्च न करता भारतीयांना सोईसुविधा देण्यासाठी वापरायला हवा, असेही त्यांनी सरकारला सुनावले आणि सातत्याने यासाठी पाठपुरावा केला. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच उच्चशिक्षण भारतीयांना मिळायला हवं ही त्यांची प्रमुख मागणी होती.

गोखले हे मवाळ म्हणून टिका
करणा-यांना गोखलेंचे संसदीय लोकशाहीच्या व संविधानाच्या निर्मतीतील हे महत्वपुर्ण कार्य माहीतच नसते. वेळप्रसंगी शासनाला खडे बोल सुनावणे आणि प्रसंगी शासनाचे सहकार्यही मिळवणे, ही त्यांच्या कार्याची मुख्य हातोटी होती.

गोखले हे या आधुनिक व प्रागतिक अर्थाने खरेखुरे देशभक्त म्हणावे लागतील. विद्वत्ता, विनयता, नम्रता, ऋजुता, मृदू व मितभाषा हे त्यांच्या महान व्यक्तीमत्वाची ठळक वैशिष्टे होती. आज भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो, ती तळागाळापासून सर्वोच्च शिखरावर नेण्याचं स्वप्न त्यांनी शंभरवर्षापेक्षाही पुर्वी पाहीलं होतं, हे विस्मयकारक आहे! तसेच के या महान मुत्सुदी देशभक्ताबद्दल मनात अपार आदर निर्माण करणारंही आहे.

गोखलेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना लॉर्ड मोर्ले म्हणतात 'Gokhale had a politician's head and sence of executive respobsibility' तर लॉर्ड कर्झन म्हणतात ' God had endowed him with extraordinary abilities and he has placed them unreserved at the disposal of his country'

टिळक गोखलेंचे सर्वात मोठे टिकाकार मात्र गोखले वारल्यानंतर टिळक म्हणाले, गोखले म्हणजे भारताचा चमकणारा हिरा होते, महाराष्ट्राचे जवाहर आणि कामगारांचे राजकुमार होते (the diamond of India and jewel of maharashtra and prince of workers)

महात्मा गांधी आपल्या गुरूबद्दल लिहीतात, सर फिरोजशहा मेहता मला हिमलयासारखे उत्तुंग वाटतात, टिळक सागरासारखे अथांग आहेत पण गोखले म्हणजे माझ्याठायी  गंगेसमान आहेत.

आजच्या कालखंडात भारतीय लोकशाहीने अर्धशतक पुर्ण करूनही मृदू, मीतभाषी, नम्र, विनयशील विद्वान व्यक्तीचा उपहास करण्याची वृत्ती समाजात आढळून येते आणि हल्ली तर ती खूप वाढली आहे. अशावेळी शंभर वर्षापुर्वी पारतंत्र्यात असताना गोखलेंवर कोणत्या शब्दांत टिका होत असेल, याची कल्पना येऊ शकते. 'माझ्या योगदानाची नोंद इतिहास करेल' असं गोखले म्हणाले होते की माहीत नाही, पण भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्यही  नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांचे सदैव ऋणी असेल.

© राज कुलकर्णी.

Comments