पानाची रंगत

पानाची रंगत .........
"खैइके पान बनारसवाला , खुल जाये बंद अकल का ताला " हे डॉन या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याने लहानपणी अक्षरशः वेड लावले होते. त्यावरून बनारस पानाची चव कशी असते हे जाणून घ्यायची ओढ लागली होती . घरात पान असायचे पण साधे पान ,बनारस पान फक्त टपरीत मिळायचे आणि त्याकाळी शालेय मुलांनी पान टपरीवर जावून पान खाणे ; हे संस्कारात बसत नव्हते . म्हणून एकदा चोरून बनारस पान खाल्ले . त्याची लज्जत आजही ओठावर आहे . आयुष्यात एकदाही पान खाल्ले नाही ,अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही . पान आणि सुपारीने भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील सांकृतिक ,सामाजिक भावविश्व एवढे व्यापले कि आहे, कि त्याशिवाय सर्व सामाजिक व्यवहार बेरंग होवून जातील . पान खाणे हे भारतीयांचे प्रमुख वैशिष्ट्य ! पानाने केवळ भारतीय आणि पाकिस्तानी नह्वे तर ,म्यानमार, कंबोडिया , थाईलंड ,मलेशिया ,श्रीलंका या देशातील लोकांना देखील वेड लावले आहे , तोंडात पान ,रंगलेले ओठ हे भारतीयत्वाचे प्रतिक आहेत .
पानाचे पौराणिक आणि ऐतेहासिक संदर्भ पहायचे म्हटले तर ,भगवान शंकर आणि पार्वती यांनी मिळून पान खाल्ल्याचे अनेक संदर्भ पाहायला मिळतात . शंकर -पार्वती यांनी पान हे पती-पत्नी मधील प्रणय प्रसंगाचे द्योतक म्हणून मानले आहे . शिव आणि शाक्त संप्रदायात पान किंवा तांबुल सेवनाला अनन्य साधारण महत्व आहे . तुळजापूरची जगदंबा , कोल्हापूरची अंबाबाई , माहूर ची रेणुका या मातृदेवता म्हणजे प्रत्यक्ष पार्वती ची रूपे , म्हणून या शाक्त क्षेत्री देवतेला पानाचा नैवेद्य दाखवला जातो . शाक्त संप्रदायात पानाला एवढे महत्वपूर्ण मानले असले तरीही वैदिक -ब्राह्मणी आणि वैष्णव परंपरेत पान हे कामोत्तेजक , रक्तवर्णी असल्यामुळे निषिद्ध समजले गेले.म्हणून वैष्णव ,मध्व उपवासांना पान हे वनस्पती असून ही चालत नाही. निषिद्ध मानले तरीही लोक सेवन करतच असत, म्हणून निदान एकादशी दिवशी तरी टाळावे असे मानले गेले कारण एकादशी दिवशी पान खाणे म्हणजे गोहत्त्येचे पातक समजले गेले आहे . तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात …
पाने जो खाईल । बैसोनि कथेसी । घडेल तयासी । गोह्त्त्या ते ।।
( तुकाराम गाथा अभंग क्र. ३११४ )
याउलट नवरात्रातील घट स्थापना , ललिता पंचमी, विशेष म्हणजे दुर्गाष्टमी च्या उपासाला मात्र पान आवर्जून खाल्ले जाते . वैष्णव संप्रदायांनी पान निषिद्ध मानले तरीही , भगवान कृष्ण यांनी गोपिका सोबत पान सेवन केल्याच्या गाथा आपल्याला गवळणी ,भुलाई सारख्या लोकगीतातून आणि लोक कथांच्या माध्यमातून ऐकायला ,वाचायला मिळतात . "गोविंद विडा" हा तर श्रीकृष्णाच्या नावावरूनच ओळखला जातो .
शाक्त संप्रदायातील तंत्रोपासनेमध्ये पान सेवनाला खूप महत्व आहे . मद्य ,मांस ,मत्स्य , मुद्रा आणि मैथुन या पाच मकाराना अंगिकारणाऱ्या वामाचारी पंथात पान हे कामुकतेचे प्रतिक मानले गेले . पानाने रंगलेले स्त्रीचे लाल ओठ पुरुषाला काम भावनेने आकर्षित करतात, हा संकेत आजही अस्तित्वात आहे . म्हणूनच कामुकता ज्यांच्या जीवनाचा मुख्य भाग असतो अशा कोठेवाल्या ,तवायफ , नायकिणी ह्या स्त्रिया भारतातील सर्वच चित्रपटात नेहमी पान खात असताना दाखवल्या जातात तर पान खावून ओठ लाल करणे हे स्त्रीत्वाचे लक्षण आहे म्हणून तृतीयपंथी नेहमी पान खातात.
पान सेवन म्हणजे जीवनातील आठ प्रमुख आनंदापैकी एक असून सोळा शृंगारापैकी एक शृंगार असल्याचे वात्सायन याने त्याच्या 'कामसूत्र' या ग्रंथात म्हटले आहे , चार्वाक दर्शनामध्ये 'आत्मा आणि चैतन्य' याचे स्पष्टीकरण देताना चार्वाकाने कात ,चुना ,पान ,सुपारी आणि मुखातील स्त्राव एकत्र आले तरच तोंड रंगते त्याप्रमाणे शरीरातील सर्व घटक एकत्र आल्यावर चैतन्य निर्माण होते , त्यालाच आपण आत्मा म्हणतो , असे नमूद केले आहे . आयुर्वेदात पान हे रक्तशुद्धी साठी ,पचनासाठी , आणि मुखशुद्धी साठी गुणकारी असल्याचे सांगितले आहे. कित्येक औषधे जसे झाडाच्या मुळ्या , औषधी पाने ही पानामधून देण्याची उपचार पद्धती संपूर्ण देशात पाहायला मिळते.
पानाने समस्त लोकांचे सामजिक ,राजकीय ,सांस्कृतिक भावविश्व व्यापून टाकले आहे . भारत आणि त्यातही महाराष्ट्रापुरते बोलायचे तर माणूस जन्मल्यापासून बारसे, जावळ , मुंज , साखरपुडा .लग्न , गर्भदान इत्यादी प्रसंगापासून ते चितेवर अग्नी देईपर्यंत आणि चिता शमल्यावर तिलांजली देवून रक्षा विसर्जन करेपर्यंत एकही विधी ,पूजा पानाशिवाय होत नाही. त्यामुळेच पान हे दैनदिन लोक जीवनातील मानवी स्नेह संबंध आणि इतर भाव भावनांचे प्रकटीकरणाचे साधन बनले आहे . घरात आलेल्या व्यक्तीला पान विचारणे , पान खायला देणे ,हे आदरातित्थ्याचे प्रतिक आहे . गावात, ,शेतात दोन शेतकऱ्यांचे भांडण झाले आणि दोघांपैकी कोणीतरी एक जन म्हटले " काढा बर पान ", या वाक्यावरून ते भांडण संपले असे समजण्यात येते.
पान ,चुना ,कात आणि सुपारी ,या चार घटकांनी मिळून बनलेल्या पानाने जीवनातील अनेक घटकांना एकत्र धाग्यात बांधले . पान खाण्याची हिंदू भारतीय पद्धत मुस्लिमांनी स्वीकारली नव्हेतर ती वृद्धिंगत हि केली . सर्व मुघल शासक पानाचे शौकीन होते . असे म्हणतात कि , विजापूरच्या दरबारात शिवाजी महाराज यांना पकडून आणण्यासाठी ठेवलेला पैजेचा विडा अफझलखानाने उचलला होता , पुढे काय झाले हा इतिहास सर्वाना माहित आहे ,पण पान राजकीय वर्तुळात देखील जागा व्यापून आहे, हे स्पष्ट होते . पेशवे काळातील अनेक आकर्षक पान पुडे आणि अडकित्ते आपल्याला पुण्यातल्या केळकर संग्रहालयात पाहायला मिळतात , मस्तानीच्या सौंदर्याचे वर्णन करताना असे म्हटले जात असे कि , ती एवढी सुंदर आणि गौर वर्णीय होती कि ,तिने पान खताना तिचा गळा लालसर दिसायचा . आपल्याकडे  शुभ कार्याला जाताना "गोविंद विडा" देण्याची रूढी आहे , परवा माझे मित्र सुहास सरदेशमुख यांनी लोकसत्तेतील 'अनुवादाच्या वेणा' या लेखात ह . ना. आपटे यांच्या ' पण लक्षात कोण घेतो ?' या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद करताना "गोविंद विडयाला" इंग्रजीत काय म्हणायचे असा मोठा प्रसंग निर्माण झाल्याचा संदर्भ दिला आहे . शेवटी तो शब्द इंग्रजी भाषेतही गोविंद विडा म्हणूनच ठेवला गेला . कारण मराठी सांकृतिक भाव विश्वात रंगलेल्या गोविंद विड्याची रंगत इंग्रजी भाषेत कशी सांगणार? पु.ल.देशपांडे यांनी दूरदर्शन वरील मालिकेत"पानवाला" हा विषय अतिशय मिश्किल भाषेत मांडला.अनेक कथा,कादंबऱ्या नाटके,चित्रपट या मधील विशिष्ट पात्रांना ,नायकांना ,खलनायकांना पान खाताना दाखविल्यामुळे त्यांच्या भूमिका वलयांकित आणि अधिक उठावदार झाल्याच्या दिसून येतात. महाराष्ट्रातील लोक संगीतात - लोक नाट्यात तर पानाने विड्याने वेगळे स्थान निर्माण केले आहे . "पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा " " नटले तुमच्यासाठी ,राजसा विडा रंगला ओठी " या लावण्यांनी अक्षरशः वेड लावले . हिंदी भाषेत ही " पान खाये सैया हमारो " " खैके पान बनारस वाला " अशा गाण्यातून पान वेगवेगळ्या स्वरुपात सांस्कृतिक जीवन रंगवत राहिले.
भारतात पानाच्या जवळपास १२ प्रमुख जाती आहेत त्यालाच आपण बनारस ,कलकत्ता , साधे पान किंवा गावरान पान इ. नावाने ओळखतो .मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुरोरी या महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर असणाऱ्या गावी शेकडो पान मळे होते ,आजही आहेत ,पण संख्या खूप कमी झाली आहे . पूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील प्रमुख शहरांना पानाचा पुरवठा तुरोरी इथून व्हायचा . देशातील सर्वच छोट्या मोठ्या शहरात पान टपरी चा व्यवसाय प्रचंड तेजीत चालतो ,एक एका टपरीचा आर्थिक व्यवहार कोट्ट्यावधीच्या घरात आहे. मावा ,गुटखा यांच्या सेवनामुळे तरुण पिढीला पानाबद्दल आकर्षण राहिलेले नाही असे  असले तरीही विविध प्रसंगाची ,विविध रंगाची - ढंगाची , पाच रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत ची पाने आज उपलब्ध आहेत ,पण पानाची शेती करणाऱ्या पान उत्पादक शेतकऱ्याच्या आयुष्यात मात्र ही रंगत मात्र दिसून येत नाही.पानाच्या मोजक्या जाती असल्या तरीही बनवून खायच्या पानाचे शेकडो प्रकार आहेत . मसाला पान , गुलचंद पान , रिमझिम पान , फुलचंद पान , खुशबू पान , मगई पान, ठंडक पान अशी नावे आढळतात आणि तंबाखूच्या विविध प्रकारांनी ,इतर घटकांनी त्याचे शेकडो काय हजारो प्रकार असतील . ही झाली पान टपरीवरील पानांची यादी ,पण महाराष्ट्रातील प्रत्येक मध्यमवर्गीय सधन घरात पानपुडा हा असतोच असतो . पुरुष मंडळी पान खातात आणि स्त्रियांना पान लावून ,विडा करून देतात . बायकोला नवऱ्याने पान विडा लावून देणे ,यावर अनेक उखाणे ,ओव्या ,विहीन असे लोक साहित्य पाहायला मिळते. एवढेच नव्हेतर पुरुषाचे पान रंगले कि बायकोचे त्याच्या वर खूप प्रेम आहे ,असे समजले जायचे आणि त्याच प्रमाणे नवऱ्याने लावून दिलेले पान रंगले कि ,बायकोवर नवरोबाची मर्जी आहे, असे मानले जायचे , अशा थट्टेने जीवनात हलके हलके आनंदी  क्षण आपसूकच निर्माण व्हायचे आणि पानामुळे हे क्षण रंगीत देखील  व्हायचे .
पान खाणारे लोक स्वतःच्या पान खाण्याची सोय मात्र खूप व्यवस्थित करतात . पानाची पिशवी म्हणजे चंची ,अडकित्ता आणि चुना डबी आवर्जून बाळगतात . .पानाला लावायचा चुण्यासाठी दोन प्रकारच्या डब्या आढळून येतात ,एक पसरट डबी जिच्यातून चुना अंगठ्याने काढता येतो आणि दुसरी उभी चिंचोळी रुपेरी डबी ,जीच्यामधून चुना काढण्यासाठी एक अगदी छोटा चमचा असतो .चमच्या असलेली चुना डबी आणि अडकित्ता हे एका साखळीत बांधले जाते. मराठवाड्यातील पान खाणाऱ्या लोकांची खूप वैशिष्ट्य पूर्ण आहे.खिसा असलेले बनियन म्हणजे " छाटण " , या छाटना च्या डाव्या खिशातून पाने काढून त्यातील दोन पानाची देठे खुडून काढून अर्धे चावून फेकायचे आणि पानाला लावायचा चुना डबीतून अंगठ्याने काढून किंवा छोट्या चमच्याने काढून पानावर लावायचा आणि तेवढेच पान दुमडून तोंडात टाकायचे . पुन्हा अडकित्त्याने ' कर्र कर्र कर्र' सुपारी कातरून तोंडात सुपारी टाकून असंख्य कप्पे असलेल्या मळकटलेल्या पिशवीतून काताचा खडा तोंडात टाकायचा आणि पुन्हा एक पान चुना लावून तोंडात टाकून वरून तंबाखू खायची . एखाद्या व्यक्तीने तोंडात मुखरस सांभाळत थोडेसे बोबडे बोलत बोलत अर्धे वाक्य म्हणून दोन उभी बोटे तोंडाला लावून 'पच्च' आवाजाची झकास पिचकारी मारून अर्धवट राहिलेले वाक्य पूर्ण करण्यातून त्या व्यक्तीचा दरारा , कुर्रेबाजपणा आणि रांगडेपणा दिसून येतो . लहान पणापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत पानाने जीवनातील प्रत्येक प्रसंग रंगविला आहे . अगदी दात पडले तरी स्वतंत्र खलबत्ता बाळगून त्यात पान कुटून खाणारे सुद्धा शौकीन आहेत. कारण " शौक बहुत बडी चीज होती है " हे वाक्य पान शौकिनासाठी चपखल पणे लागू पडते . बहु धार्मिक , बहु सांस्कृतिक , बहु भाषिक असलेल्या भारत देशात सर्व जाती धर्माच्या लोकांना , गावातल्या मजुरापासून ते गावच्या पाटलापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत , हिंदू पासून मुसलमाना पर्यंत , ढाक्यापासून कलकत्ता-बनारस आणि कराची पर्यंत , सर्वाना एका रंगात रंगविण्याची किमया फक्त पान करू शकते, म्हणूनच पान हे भारतातल्या सर्वसमावेशक ' गंगा जमनी तहजीब' चे अस्सल प्रतिक आहे .
@ राज कुलकर्णी ..

Comments