Nehru frequently asked Questions 4
प्रश्न- नेहरूंनी आझाद, भगतसिंग या सशस्त्र क्रांतीकारकांच्या विरोधात कार्य केले.
उत्तर -
चंद्रशेखर आझाद आणि नेहरू परीवार ....
अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्क मधे 27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद, सुखदेव यांना भेटायला आल्याची बातमी पोलिसांना खब-याकडून मिळाली आणि लवकरच पोलिसांनी त्यांना घेरले आणि गोळीबार सुरू केला. आझादांनी एका मोठ्या झाडाचा आडोसा घेतला आणि सुखदेव यांना तिथून निघून जायला सांगितले. जवळपास अर्धा तास एकट्याने गोळाबाराचा सामना केल्यानंतर आपण पकडले जाणार असे वाटू लागले तेंव्हा त्यांनी स्वत:वर गोळी मारून घेतली! आणि ते शहीद झाले! आझाद नावाप्रमाणे शेवटपर्यंत आझादच राहीले !
भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गांधीजी-पटेल-नेहरू यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला नाही , असा खोटा आरोप स्वातंत्र्यलढ्यात आजीबात सहभागी
नसणा-यांकडून नेहमी केला जातो. मध्यंतरी नेहरूंना बदनाम करण्यासाठी, चंद्रशेखर आझाद नेहरूंना भेटून परत आल्यावरच त्यांना पोलिसांनी कसे काय मारले? असा कुत्सित प्रश्न उपस्थित करून नेहरू आझादांना हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीने साठवलेले पैसे मागत होते ,असाही धादांत खोटा आरोप केला गेला !
जवाहरलाल नेहरूंच्या आत्मचरित्रात चंद्रशेखर आझाद यांच्या भेटीचा संदर्भ असून, गांधी आणि आयर्विन करारात सशस्त्र क्रांतीकारकांना कांही स्थान असेल काय यावर त्यांच्यात चर्चा झाली. नेहरू यावेळी म्हणतात ,भारताला सशस्त्र क्रांती शिवाय स्वतंत्र मिळू शकणार नाही ,अशी भूमिका आझाद यांची होती, जी नेहरूंना मान्य नव्हती! नेहरूंच्या आत्मचरित्रातील हा भाग अमेरिकन आवृत्तीतून काढून टाकण्यात आला. याचे कारण नेहरूंचे हे आत्मचरित्र 1936 साली प्रकाशित झाले आणि त्यावेळी भारताबाहेर कॉंग्रेस ही सशस्त्र क्रांतीकारकांना छुपी मदत करते हा आरोप केला जात होता, जो कांही अंशी खरा होता. पण तो जाहीर होवू नये याची काळजी घेतली जात होती.
प्रत्यक्ष चंद्रशेखर आझाद आणि मोतीलाल नेहरू यांचे जुने स्नेहसंबंध होते आणि मोतीलाल नेहरूंचे 6 फेब्रुवारी 1931 ला निधन झाल्यामुळेच आझाद नेहरूंना भेटायला साधारणपणे 7 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान आलेले होते. कारण ज्या काकोरी कटात आझाद आरोपी होते त्यातील आरोपींच्या बचावासाठी मोतीलाल नेहरूंनी बचाव समिती स्थापन केली होती, त्यात जवाहरलाल नेहरूही होते.
पंडीत मोतीलाल नेहरू आणि भगतसिंगचे सहकारी यांचा जवळचा सबंध होता. भगतसिंग आणि सहका-यांच्या विरोधातील खटल्या दरम्यान कोर्टात येऊन आरोपींसोबत बसून त्यांनी चर्चा केली. त्यांनी खटल्यात भुलाभाई देसाईंची मदत घ्यावी असा प्रस्ताव दिला होता. सॉण्डर्सच्या हत्येनंतर आझादांच्याच सल्ल्यानुसार भगतसिंग मोतीलाल नेहरूंना आर्थिक सहाय्यासाठी भेटले होते. मात्र त्यावेळी त्यांचा आणि भगतसिंगचा परीचय नसल्यामुळे त्यांनी मदत केली नाही परंतु त्यानंतर मात्र त्यांनी भगतसिंगला कायदेशीर बचावाच्या कामात नेहमी आर्थिक मदत केली! हीच बाब एस.के.मित्तल आणि इरफान हबीब यांनी त्यांच्या लेखनात मांडली आहे.
मोतीलाल नेहरूंशी चंद्रशेखर आझादांचा जवळचा सबंध होता मात्र जवाहरलाल नेहरूंची भेट त्यांनी प्रथमत: मोतीलाल नेहरू वारल्यानंतरच घेतली. आझाद आणि जवाहरलाल नेहरूंच्या भेटीबद्दल यशपाल यांनी लिहिले आहे. पण ते म्हणतात की, या भेटीबद्दल आझाद नाराज होते कारण नेहरूना हिंसेचा मार्ग पसंत नव्हता.
आझादांच्या नि जवाहरलाल नेहरूंच्या या भेटीनंतर कांही दिवसांनी यशपाल देखील नेहरूंना भेटले. त्यानंतर आठवड्यात आल्फ्रेड पार्क मध्ये पोलिसांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार केला आणि त्यातच त्यांचा अंत झाला! यशपाल म्हणतात त्यावेळी आझांदांच्या खिशात सापडलेले पैसे हे जवाहरलाल नेहरूनींच त्यांना दिलेले होते ! यशपाल म्हणतात ही रक्कम रु.500 होती सशस्त्र क्रांतिकारकांचे नुकतेच दिवंगत झालेले संशोधक श्री. प्रमोद मांडे सर यांनी 1983 साली प्रत्यक्ष आलाहाबादला जाऊन आणि दिल्लीतील सशस्त्र क्रांतीकारकांच्या नातेवाईकांच्या मेळाव्यात आझादांच्या आप्तांकडून याबाबत माहिती घेतली होती. मांडे सरांच्या माहीती नुसार ही रक्कम रु 402/- होती आणि ती आझादांना पंडित नेहरू यांनी दिलेल्या रु 1200/-मधील शिल्लक राहीलेली होती !
पोलिस आझादांच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असल्याची बातमी समजताच कमला नेहरू यांनी शिवनारायण मिश्रा यांना बोलावून घेतले आणि नातेवाईक म्हणून प्रेत ताब्यात घेण्यासाठी सांगीतले. त्यानुसार अनेक अडचणीतून मार्ग काढून त्यांनी त्यांचा विधीवत अंत्यविधी केला. जवाहरलाल नेहरू स्वत:च कॉग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी ही जवाबदारी स्वत:तर्फे कमला नेहरूंवर सोपवली असा अंदाज करणे योग्य राहील. आझादांच्या अंत्यविधीसाठी प्रत्यक्ष कमला नेहरूंनी घरातील चंदनाची लाकडे दिली, अशीही माहीती मांडेसरांनी त्यांच्या 'आजादी के दिवाने' या कार्यक्रमात दिली होती. उपलब्ध असणा-या समकालीन लेखकांच्या पुराव्यानुसार गोविंद वल्लभ पंत यांच्यासह कमला नेहरू आझादांच्या अंत्यविधीसाठी हजर होत्या. याचा उल्लेख आर.के.कपूर यांनी त्यांच्या लेखनात केला आहे. मार्ग भिन्न असला तरीही आझादांचे बलिदान महान असल्याचे जाहीरपणे सांगून अलाहाबादचे कॉंग्रेस नेते पुरुषोत्तम दास टंडन यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या अस्थीची भव्य यात्रा आयोजित केली होती. यावेळीही कमला नेहरू आणि सचिंद्रनाथ संन्याल हजर होते. असा संदर्भ ब्रिटीशांच्या सन 1931 च्या 'सिव्हिल अँड मिलीटरी गँझेट' मधे आहे. यानंतर चमनलाल आणि शंकरलाल बन्सल यांनी नौजवान सभेमार्फत 'आझाद स्मृती निधी' गोळा करून तो कॉंग्रेस च्या कार्यासाठी म्हणून कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरूंच्या नावे कॉंग्रेसला स्वातंत्र्यलढ्यासाठी देण्याचे जाहीर केले!
हे पाहून मनात प्रश्न निर्माण होतो तो असा की, आज आझादांबद्दल दांभिक प्रेम दर्शवून गांधी नेहरूंवर टिका करणा-यांचे पुजनिय व वंदनिय नेते कुठे भुमिगत होते?
© राज कुलकर्णी
संदर्भ-
1) A revolutionary History of Interwar India – Kama Maclean Penguin Books page no. 144
2) 'Pandit Motilal Nehru-His life and Work' - U.C.Bhattachrya and Shovendu Chakraborty, Modern Book Agency CulCutta Page 107
3) An Autobiography _ J.Nehru
4) सिंहावलोकन - यशपाल
5) Nehru-Motilal and Jawaharlal- B.R.Nanda.
6) भगतसिंह से दोस्ती - जतींद्रनाथ संन्याल, संपादन- व्ही.एन.राय
7) शहीद भगतसिंग-वैचारीक बंदुकांचे शेत- डॉ. विवेक कोरडे.
Comments
Post a Comment