Nehru frequently asked Questions 5

प्रश्न- नेहरूंनी स्वत:च स्वत:ला भारतरत्न मिळावा म्हणून शिफारस केली

उत्तर -

असंवैधानिक भारतरत्न जवाहरलाल नेहरू ............

नेहरूंनी स्वत:च स्वत:ला भारतरत्न दिला असे सांगून नेहरूंवर टिका करणारे लेख पसरविण्याचे काम अनेक लोक  करत आहेत.

नेहरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील, संसदीय लोकशाहीच्या यशस्वी कार्यन्वयनातील व राज्यघटनेवर आधारीत जवाबदार राज्यपद्धती निर्मितीतील , देशातील विविध उच्चशिक्षण संस्था, विज्ञानतंत्रज्ञान या क्षेत्रातील योगदान मोठे आहे. म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात. जवाहरलाल नेहरू भारतरत्न हा सन्मान मिळण्यास नक्कीच पात्र होते! पण तत्पुर्वीच ते जगासमोर निव्वळ भारतीय नेते म्हणून नव्हेतर सबंध आशियाचे म्हणून विख्यात झाले होते. पुढे तर जगातील दिडशे पेक्षा जास्त राष्ट्रांचे नेते बनले, त्यामुळे ते भारतरत्न होणे ही सहज स्वाभाविक बाब होती.

नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यात नऊ वर्षापेक्षा जास्त कालावधी कारागृहात व्यतित केला आहे, अशी व्यक्ती राष्ट्रपतींना, मला भारतरत्न प्रदान करा,अशी मागणी करेल काय? याचा विचार जाणकार करतीलच, नेहरूंचा मोठेपणा केवळ कारागृहात व्यतित कालावधीवरून ठरणारा कधीच नव्हता व नाहीसुद्धा!  वास्तविक नेहरूंनी स्वत:ला भारतरत्न देण्यात यावा अशी शिफारस वा मागणी  केंव्हाही केलेली नाही. या शिफारसीची कोणत्याही दस्ताऐवजात, कोणाच्या पत्रात, डायरीत अथवा अगदी कोणाच्या आठवणीतही याची नोंद नाही. कारण नेहरूंच्या नावाची अशी कोणती शिफारसच अस्तित्वात नाही, कारण ती कोणीच केलेली नव्हती!

जवाहरलाल नेहरूंना भारतरत्न देण्याचे घोषित झाल्यावर नेहरूंचे त्याकाळातील सर्वात मोठे राजकीय टिकाकार राम मनोहर लोहीया, जयप्रकाश नारायण, ई.एम.एस. नंबुद्रीपाद , एन.सी.चटर्जी यांनीही त्याविरोधात आवाज उठवलेला दिसून येत नाही. अगदी तत्कालीन हिंदुत्ववादी नेते जे कोणी  त्यावेळी विविध राजकीय घडामोडीवर लेख लिहीत असत, त्यांनी पण नेहरूंना स्वत:चा स्वत:ला भारतरत्न सन्मान दिला वा घेतला, असा आरोप करून एखादा लेख लिहून  वा एखादे पत्रक काढून निषेध केल्याचे आढळून येत नाही!

नेहरूंना भारतरत्न सन्मान का दिला गेला किंवा नेहरू भारतरत्न होऊच शकत नाहीत अशी वृत्ती बाळगणा-यांच्या मनात  नेहरूंबद्दल फक्त द्वेष आहे. नेहरूंंना भारतरत्न म्ह्णून गौरविल्याबद्दल आज टिका करणा-यांच्या सर्व वैचारिक पित्यांचे तोंडं त्यावेळी बंद होते. सुर्य मावळल्यानंतरच जसं कोल्हेकुंईला उधान येतं, तसं नेहरू वारल्यानंतरच्या काळात कांही असामाजीक तत्वांनी नेहरूविरोधी प्रचार-प्रसाराची मोहिम हाती घेतली.   

भारतरत्न हा सन्मान जानेवारी 1954 पासून सुरू करण्यात आला व नियमाप्रमाणे नेहरूंच्या शिफारशीनुसार पहिल्या वर्षी हा सन्मान  सी.राजगोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन व सी.व्ही.रमण यांना दिला गेला. हा सन्मान प्रदान करण्याची सुरूवात झाली तेंव्हा हा सन्मान मरणोत्तरांत दिला जात नव्हता. तो प्रथम मरणोपरांत दिला गेला 1966 साली शास्त्रीजींना! त्यानंतर हा सन्मान मरणोत्तर देण्यास सुरूवात झाली. नेहरूंना 15 जुलै  1955 रोजी भारतरत्न हा सन्मान तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी प्रदान केला ! त्या वर्षी म्हणजेच 1955 साली या सन्मानासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून केवळ सर मोक्षगुंडम विश्वेस्वरैया आणि भगवान दास या दोन नावाची शिफारस केली गेली होती! या दोन्ही महान व्यक्तींना हा सन्मान देण्यात आला! नेहरूंच्या नावाची मात्र शिफारसच नव्हती! 

नेहरूंना भारतरत्न हा सन्मान जाहीर करण्यात आला तेंव्हा ते युरोप तथा रशियाच्या दौ-यावर होते.  नेहरू 15 ते 25 एप्रिल 1955 या कालावधीत आफ्रो-एशियन परीषदेत बांडूग येथे होते, व त्यानंत  ते 'लाईट ऑफ एशिया' म्हणून जगात ओळखले जाऊ लागले होते. तत्पुर्वी रशियाच्या दौ-यावर असताना मॉस्को विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लॉ' ही सन्मान्य पदवी प्रदान केली होती!   विशेष म्हणजे ज्या कार्यक्रमात, नेहरूंना भारतरत्न प्रदान करण्यात आला तो कार्यक्रम नेहरूंचा स्वागत समारंभच होता. या वेळी केलेल्या भाषणात डॉ.राजेंद्र प्रसाद म्हणतात
“We have assembled this evening to express our joy at the safe return of our Prime Minister, Jawaharlal Nehru, from a strenuous tour in different countries of Europe…”

राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादांनी नेहरूंच्या नावाची या सन्मानासाठी कोणीही शिफारस केलेली नसताना, स्वत:हून  हा सन्मान नेहरूंना देण्याचे ठरवले! हा सन्मान देताना डॉ. राजेंद्र प्रसाद काय म्हणतात ते खूप स्वंयस्पष्ट आणि महत्वाचे आहे ....

"In doing so… for once, I may be said to be acting unconstitutionally , as I am taking this step on my own initiative and without any recommendation or advice from my Prime Minister; but I know that my action will be endorsed most enthusiastically"

पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना भारतरत्न प्रदान करायला हवा, ही सर्वौच्च संवैधानिक अधिकार असणा-या राष्ट्रपतींची ईच्छा होती म्हणजेच भारताचे प्रथम नागरिक तथा जनतेच्या सर्वाेच्च प्रतिनिधीची ईच्छा होती. एका अर्थाने ती समस्त भारतीय जनतेची ईच्छा होती आणि नेहरूंनी या इच्छेचा आदर पुर्वक स्विकार केला! 

आश्चर्याची बाब अशी की, नेहरूंचे व  राजेंद्रप्रसाद यांचे अनेक मुद्दयांवर वैचारिक  मतभेद होते. राष्ट्रपतीपदी प्रसादांच्या ऐवजी सी.राजगोपालचारी असावे असे जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, मात्र पुन्हा नेहरूंनीच राजेंद्रप्रसादाच्या राष्ट्रपतीपदाचे सुचक म्हणून स्वाक्षरी केली होती! पण सर्व हे माहीत असूनही नेहरूंवर डॉ.प्रसादांचे अत्यंत प्रेम होते! हिंदु कोड बील आणि सोरटी सोमनाथ जिर्णौद्धार याबद्दल दोघात मतभिन्नता होती. खरे तर  डॉ. राजेंद्र प्रसाद हिंदु कोड बीलाचे विरोधक होते व नेहरूंनी हेच बील 1954 ते 1956 या काळात चार स्वतंत्र कायद्याच्या स्वरूपात मंजूर करण्याची प्रक्रिया पुर्ण केली. या अशा अनेक मतभेदाच्या बाबी असतानाही त्यांना जेंव्हा राष्ट्रपतीपदावरून पंतप्रधानांच्या  शिफारसीशिवाय कांही निर्णय घ्यावा व स्वविवेक वापरून भारतरत्न कोणाला तरी प्रदान करावा असे वाटले तेंव्हा, त्यांच्या मनात असलेले भारतीय रत्न जवाहरलाल नेहरू हे होते! खरेतर राष्ट्रपती  डॉ. राजेंद्रप्रसाद, त्यावेळी स्वत:हून कोणासही भारतरत्न प्रदान करू शकले असते आणि तसे केल्यावर कोणी आक्षेपही घेतला नसता! पण त्यांनी नेहरूंचेच नाव निवडले हे खूप कांही सांगणारं आहे. तसे इतर अनेक स्वातंत्र्यसेनानी, योद्धे, सैनिक नेते आणि 'वीर' या देशात होते परंतु त्यांनी यापैकी कोणालाही न देता तो सन्मान नेहरूंना दिला! 

वास्तवात नेहरू निव्वळ भारतीयांचे नेते नव्हते तर ते जगातील सर्व शोषित, पिडीत, साम्राज्यवाद्यांकडून भरडल्या गेलेल्या वसाहतीतील लोकांचे नेते होते. तसे तर ते जन्मताच जवाहर म्हणजे रत्न असल्याचं   महात्मा गांधी, गुरूदेव टागोरांनी अनेक वेळा म्हटलं होते. " Only, I know How much he toiled himself for freedom of India' अशी स्वत: सरदार पटेल यांचीही भावना होती. नेहरूंना भारतरत्न द्यावा अशी मागणी अनेकांनी यापुर्वीच केली मात्र ती त्यांनीच अमान्य केली होती. महत्वाची बाब म्हणजे त्यापुर्वी म्हणजे 1950 सालापासून 1955 साला पर्यंत नेहरूंचे नोबेल पुरस्कारासाठी तब्बल आकरा वेळा नामांकन केले गेले होते!  हे नामांकन करण्यात अनेक विद्वानांनी , शास्त्रज्ञांनी  आणि नोबेल विजेत्यांनी पुढाकार घेतला होता.  केंब्रीज विद्यापीठाच्या चँन्सलर पदासाठी तर बर्ट्रांड रस्सेल या बुद्धिवाद्यांने आणि क्लेमेंट अटली, माऊंटबँटन यांनी पुढाकार घेतला होता, हे विशेष! त्यांना नॉमिनेट केले गेले होते. पण नेहरूंनी स्वत:हून त्यास नकार दिला होता!

चर्चिल यांनी 21 फेब्रुवारी 1955 आणि 30 जून 1955 रोजी नेहरूंचा उल्लेख 'लाईट ऑफ एशिया' असा केला होता. स्वत: राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद नेहरूंबद्दल म्हणतात ..
" Jawaharlal is man of culture in widest and best sence of the expression. He is man with ideas born of study of books and widespread contact with men, Indian and foreign. All in all, here is a man the like whoom treads this earth but rarely and only in crisis. He has been born and has lived in a critical period in India's history, and played his part nobly and well."
त्यामुळे भारतीय जवाहर जगाचे रत्न म्हणून समोर येत असताना ते भारतीय रत्न असल्याचे जगासमोर सांगणे हे  भारतीयांसाठी अभिमानाचे प्रतिक होते! हा 'लाईट ऑफ एशिया' अधिकृतपणे भारताचा रत्न बनला होता! या समारंभात त्यांनी शुभ्र अचकन परीधान केली होती. कोटावर लाल गुलाब होता. राष्ट्रपती डॉ .राजेंद्रप्रसाद त्यांना हा सन्मान बहाल करताना ते संकोचून हसत आहेत. त्यावेळी ते सहासष्ठ वर्षाचे होते! राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय मंचावर भक्कमपणे उभे होते!

सामान्यपणे भारतरत्न किंवा इतर पुरस्कार देताना हा पुरस्कार वा सन्मान ज्यास दिला जातो, त्याचा परीचय आणि सन्मान का दिला जातो आहे याची माहीती सांगीतली जाते, परंतु नेहरूंना पुरस्कार देताना केवळ नाव उच्चारले गेले, ना परीचय करून दिला गेला ना योगदान सांगीतले गेले. जणू हे काम नियतीने  सभागृहातील टाळ्यांच्या गजराकडे सोपवले होते! 
© राज कुलकर्णी. 

संदर्भ-
1) Dr. Rajendra Prasad: Correspondence and Selected Documents: Volume Seventeen, Valmiki Choudhary (ed.), Allied Publishers Limited, pp.456.

2) A study of Nehru - Edited by Rafiq Zakeria, Times of India publication.page no.5

3) Jawaharal Nehru - Sarvpalli Gopal, Oxford University Press.

4) Gandhi on Nehru - Edited by Anand Hingorani, Navjivan Trust Ahmedabad page No. 655

5) जवाहरलाल नेहरू - आ.गोरेव, ब्ला.झिम्यानीन, प्रगती प्रकाशन मॉस्को
पान क्र.359

6) 'वल्लभभाई पटेल-चरित्र आणि काळ'- ले.त्र्य.रं.देवगिरीकर, भारत ग्रंथ माला प्रकाशन पान क्र.380.

7) Nehru the Invention of India- Shashi Tharur, Penguin Books.

8) नेहरू आणि नोबेल याबाबतची लिंक
http://m.indiatoday.in/story/Nehru+was+nominated+for+Nobel+peace+prize+11+times/1/17571.html

9) नेहरू आणि केंब्रिज विद्यापीठाचे  चँन्सलरपद याबाबतची लिंक
https://www.google.co.in/amp/www.firstpost.com/world/when-nehru-almost-became-chancellor-of-cambridge-108281.html/amp

[टिप- हा लेख बिगुल या सोशल मेडीया न्यूज पोर्टलवर प्रकाशित झाला आहे!
http://www.bigul.co.in/bigul/1809/sec/9/Jawaharlal%20Nehru]

Comments