डबिंग केलेले चित्रपट-मालिका आणि त्यांची भाषा....

बीड येथून प्रसिद्ध होणा-या 'दै.प्रजापत्र'च्या  'बहुरंग' पुरवणीत 'भाषा आणि समाजजीवन' या पाक्षिक सदरात आज प्रकाशित झालेला लेख......

डबिंग केलेले चित्रपट-मालिका आणि त्यांची भाषा....

'जंगल बुक' या नुकत्याच आलेल्या चित्रपटाने लहानां सोबत मोठ्यांना देखील वेड लावले. लहान असताना दूरदर्शन वर 'जंगल बुक' नावाची एक कार्टून मालिका असायची आणि दर रविवारी ती मालिका आम्ही आवडीने पहात असू. या मालिकेतील पात्रांच्या ओठी असणारी हिंदी भाषा मात्र आम्ही हिंदी चित्रपटात ऐकलेल्या भाषेपेक्षा वेगळी होती. कार्टून पाहताना त्या भाषेकडे लक्ष द्यायला आम्हाला त्याकाळी समजत नव्हते, पण आता अशा मालिका पाहताना , त्यातील भाषा ऐकून खूप खूप गंमत वाटते.

महाविद्यालयात शिकत असताना सोनी टेलिव्हिजन वर ‘आय ड्रीम ऑफ जिनी’ नावाची एक अमेरिकन विनोदी मालिका होती. त्यातील पात्रांची हिंदी भाषा ,मला खूप आवडायची नव्हेतर आजही ती आवडते. मूळ इंग्रजी भाषेतील ही मालिका हिंदी भाषेत डब करताना त्या हिंदी भाषेला इंग्रजीप्रमाणे बोलण्याचा केलेला अट्टहास हीच मुळात एक प्रकारची विनोद निर्मिती होती.

हॉलीवूड  मधील अनेक चित्रपट हिंदी भाषेत डब होवू लागले आहेत. जुरासिक पार्क , अर्माजेडॉन , इंडीपेन्डन्स डे, द ममी, स्कोर्पियन किंग पासून आताच्या स्पायडरमँन पर्यंत अनेक चित्रपट हिंदी भाषेत प्रदर्शित होतात. भारतातील प्रेक्षकांची संख्या पाहून आता तर ते प्रादेशिक भाषांत देखील प्रदर्शित होवू लागले आहेत. कांही मालिका तर मराठी भाषेत देखील डब झाल्या आहेत. पण कोणत्याही भाषेत डब झाले तरी त्या डब केलेल्या भाषेवर मूळ इंग्रजी भाषेचा प्रभाव मात्र कायम राहिलेला आहे. आम्ही अशा भाषेला 'कंडीशनल लँग्वेज 'असे नाव ठेवले होते. म्हणजे बोलताना सतत कांहीना कांही अटी असल्याप्रमाणे बोलणे!
‘डेनिस द मेनेस’ या नावाची एक लहान मुलांची मालिका आहे, त्यातील डेनिस हा अतिशय खोडकर मुलगा आहे. त्याला समजून सांगत असताना जी हिंदी बोलली जायची ती म्हणजे अफलातून आहे. डेनिसला अभ्यास करायला सांगण्यासाठी त्याची आई त्याला काय म्हणते पहा “ डेनिस ,बेटे अगर मैं कह दुं कि, ये सही वक्त है ,तुम्हारी पढाई का ,तो मैं कुछ गलत नही बोल रही हू ”! एका अशाच डब केलेल्या चित्रपटातील एक मजेशीर संवाद तर माझ्या चांगला लक्षात आहे “ अगर तुम खुद को बहुत होशियार समज रहे हो ,तो तुम्हारी ये बहुत बडी भूल है ”! अशी हिंदी म्हणजे एकदम भारतीय स्त्रीला पाश्चिमात्य वेशात उभा केल्याप्रमाणे वाटते.

डिस्कव्हरी ,नँशनल जिओग्राफिक या वाहिन्यांचे प्रसारण जेंव्हा हिंदी मराठी भाषेत सुरु झाले, तेंव्हा या प्रकारची भाषा वारंवार ऐकायला मिळू लागली. डिस्कव्हरी वाहिनी वरील 'मगर' या प्राण्याबद्दल माहिती देणारा एक कार्यक्रम चालू होता आणि मी त्या अजस्त्र  मगरीचे  वर्णन ऐकत होतो, जे ऐकून मला खूप गम्मत वाटली. कार्यक्रमातील तो निवेदक 'मगर' या भितीदायक प्राण्याचे वर्णन करताना म्हणतो  “  देखिये ये जीव को ,ये बहुत फुर्तीला है, ये खुबसुरत मादा, फलन के लिए आज कल नर कि प्रतीक्षा कर रही है'.एका 'बेडूक' या प्राण्यावरील माहिती पटातील वाक्य तर खूपच रोमँटिक म्हणावे लागेल!  "सहवास  के लिये नर को ढूंढ रही इस मादा मेंढकी को बारीश के मौसम का बेहद इंतजार है”!  वर्गात जीवशास्त्र शिकत असताना इंग्रजी मधे ऐकलेले या आशयाचे इंग्रजी शब्द अशा शुद्ध हिंदीत ऐकताना खरोखरच अवघडल्या सारखे होते,पण आता त्याची सवय झाली.

हिस्ट्री वाहिनीवरील कांही कार्यक्रम मराठी भाषेत सुरु झाल्यावर केवळ या नव्या प्रकारच्या मराठी भाषेचा आनंद घ्यायचा म्हणून अनेक कार्यक्रम मी आजही पाहतो. एका कार्यक्रमातील मराठी भाषा अतिशय गमतीशीर होती. जुन्या वस्तू किंवा  गाड्यांच्या दुरुस्तीवर तो कार्यक्रम  होता, त्यातील निवेदक मराठी भाषेत सांगत होता , "आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत लॉसेल गावातील एका रिचर्डला!  , ज्याच्याकडे आहे १९२२ सालातील फोर्ड कंपनीची अतिशय दुर्मिळ अशी गाडी! आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे तो घरी असेल अशी आपण अशा करूया " या वाहिनीवरील मराठी भाषेत डब केलेले अनेक कार्यक्रम पाहून येणाऱ्या काळात मराठी भाषेचे रूप किती प्रमाणात बदलून जाईल हे सांगणे कठीण आहे!
आता प्रत्येकाच्या घरी स्वतंत्र डिश असते. ती  कोणत्याही कंपनीची असली तरीही प्रत्येक कंपनीचे एक जाहिरात चँनेल असते, त्यावर दिवसरात्र जाहिराती चालू असतात, त्यामधील भाषा तर अजब प्रकार आहे.
सोना बेल्ट, स्लीम मशीन, स्कीन व्हाईटनर यांच्या जाहिराती मधील मराठी भाषा ऐकणे म्हणजे मोठे दिव्यच असते. खास करून त्यातील कांही लोकांचे मराठी भाषेतील अनुभव कथन !
सोना बेल्ट च्या जाहिरातीतील पूर्वी प्रचंड जाडजूड, अवाढव्य शरीराची बाई ,एकदम नाजूक, शिडशिडीत आणि कोवळी झाल्यावर तिचा अनुभव मराठी भाषेत ज्याप्रकारे  सांगते,त्याला तोड नाही. "मी पूर्वी खूप जाड होते, माझा नवरा माझ्याकडे नेहमी दुर्लक्ष करायचा, माझे मित्र मैत्रिणी मला खूप चिडवत असत ,माझी खूप खिल्ली उडवायचे ,पण सोना बेल्ट मुले माझी फिगर अतिशय स्लीम बनली आहे, आता सर्व लोकांच्या नजरा माझ्याच फिगर कडे असतात! मी खूप आभारी आहे ,या सोना बेल्टची !" बायकांकडे अशा नजरेने पाहू नये म्हटलं जातं मात्र ही बाई आनंदानं सांगते की, सर्व लोकांच्या नजरा माझ्या फिगर कडे आहेत म्हणून! आणि ते आक्षेपार्ह वाटत नाही कोणाला! कमाल आहे ना!  गोरे होण्यासाठी जे औषध किंवा क्रिम विक्री केले जाते त्या जाहिरातीतील मराठी भाषेतून  आणि त्या गोऱ्यापान  मुलाचे किंवा मुलीचे अनुभवकथन ऐकून तर  प्रचंड हसायला येते! वाटतं ही असली मराठी ऐकण्यापेक्षा ही पोरगी काळीच राहिली असती तरीही चालले असते! 

डिस्कव्हरी वाहिनी वरील कार्यक्रमात जशी मराठी  अथवा हिंदी भाषा बोलली जाते , तशीच भाषा कार्टून मध्ये देखील असते.
आजकाल डब केलेल्या मराठी आणि हिंदी भाषेतील कार्टून मालिका पाहून लहान मुलांच्या मराठी आणि हिंदी भाषेवर त्याचा प्रभाव पडत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रभाव चुकीचा किंवा बरोबर असा माझा दावा नव्हे, मात्र छोटा भीम किंवा कृष्णा यामध्ये बोलली जाणारी हिंदी मिश्रित मराठी त्यांची बोली बनत आहे.

मुळात असे घडते कशामुळे हे ही पाहायला हवे. प्रत्येक भाषेचा एक स्वतंत्र असा बाज असतो आणि शक्यतो त्यानुसार ती भाषा बोलायला हवी. इंग्रजी भाषेतील एखाद्या  लांबलचक वाक्याचे भाषांतर अत्यंत कमी शब्दांत होते किंवा ज्या शैलीत ते इंग्रजी भाषेत बोलले आहे, त्याच शैलीत ते बोलण्याची आवश्यकता नसते. परंतु समोरील दृश्यात त्या पात्राचे ओठ हालचाल करत असतात ,म्हणून जो पर्यंत ती हालचाल चालू तो पर्यंत ते मराठी वाक्य खेचावे लागते आणि मग अशा मजेशीर भाषेचा जन्म होतो.
इंग्रजी भाषेत वारंवार ‘थँक गॉड’ ‘ थँक यु वेरी मच’ ‘ओ मय गॉड’ अशा शब्दांचा भरणा असतो. मराठी मध्ये आभारी आहे ,हा शब्द खरेतर आता पूर्ण रुळला आहे ,पण रांगड्या मराठी भाषेत  या प्रकारचे शब्द अवघडल्या सारखे वाटतात. माझ्या ओळखीतल्या एका शेतकरी गृहस्थाने महविद्यालयात शिकणाऱ्या त्याच्या  मुलाला बराच हट्ट  केल्यावर मोबाईल घेवून दिला, त्याला त्याचा खूप आनंद झाला, आणि आनंदाने वडिलांना ‘थँक यु आप्पा ’ असे म्हणाला. 'थँक यु' चा अर्थ त्यांना माहित होता ,पण ते हसून म्हणाले  ‘ मायला आमच पोरगं ,आई बापालाच थँक यु म्हणतंय!!!

आभार व्यक्त करणे ही चांगली सवय असली तरी  तिच्या अशा  वापरामुळे  गंमत होते.
बोलताना उस्फुर्तपणे ओठात येणारे इंग्रजी  शब्द त्यांच्या  डबिंग मुळे विचित्र वाटतात. कारण हे उस्फुर्त शब्द इंग्रजी भाषेतील उस्फुर्ततेचे भाषांतर केल्यामुळे, उस्फुर्त न राहता नाटकी वाटतात. डिस्कव्हरी चँनेल वरील एका कार्यक्रमात, 'विंचू' या प्राण्यावर कार्यक्रम होता. तो चावल्यावर काय अवस्था होते हे सांगताना, त्या निवेदकाचे मराठी संवाद ऐकून त्याला विंचू चावला आहे, असे अजिबात वाटत नव्हते. ‘ हे ईश्वरा ,या तीव्र वेदना मी सहन करू शकेन कि नाही ,याची मला खात्री वाटत नाही"  कारण इंग्रजी भाषेतील 'ओ गॉड' या उस्फुर्त शब्दाचे मराठी भाषांतर 'हे ईश्वरा' असे होते पण ते उस्फुर्त वाटत  नाही! उलट 'अरे देवा' अथवा 'आई गं' हा शब्द चपखल बसतो!

भाषा हे संवाद साधण्याचे माध्यम आहे, आज काल जग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने एकमेकांच्या झपाट्याने जवळ येत असल्यामुळे अनेक भाषेतील ज्ञान आपल्या मातृभाषेत मिळणे महत्वपूर्ण ठरले आहे, आणि भाषेच्या प्रवाहीपणासाठी देखील ही  आवश्यक बाब आहे. म्हणूनच इंग्रजी भाषेतील कार्यक्रमांचे, चित्रपटांचे डबींग भारतीय भाषांत होत आहे. यातून आपल्याच मातृभाषेच्या बोली भाषेतील शब्द आपल्याला नव्या आणि अनोख्या रुपात ऐकायला मिळत आहेत, यातही आपण आनंद घ्यायला हवा,नाही का! 
© राज कुलकर्णी.

Comments