सर्वधर्म 'येशू' भाव!

दै.दिव्यमराठीच्या 'रसिक' पुरवणीत 'गाळीव इतिहास' या पाक्षीक सदरात आज रोजी प्रकाशीत झालेला माझा लेख .
.
सर्वधर्म 'येशू' भाव! ..............
.
ख्रिस्ती धर्माचा संस्थापक येशू हा मुळात हिंदू असून तो तामीळ ब्राह्मण असल्याची मांडणी करणारे पुस्तक हिंदू महासभेचे नेते गणेश दामोदर सावरकर यांनी १९४६मध्ये लिहिले होते. हेच पुस्तक नव्या रूपात प्रकाशित होत असल्याची ताजी बातमी. ख्रिस्ती धर्म मुळात हिंदू धर्मातील एक संप्रदाय आहे, तसेच पॅलेस्टाईन तथा अाखाती देश हिंदू साम्राज्याचे भाग असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. यावर स्वाभाविकपणे प्रतिक्रिया उमटल्या. अनेक हिंदुत्ववादी विचारवंतांनीदेखील या पुस्तकातील निष्कर्ष हास्यास्पद ठरवला.

येशू हा आमच्या धर्माचा होता, असे सांगण्याचा प्रयत्न मात्र आजपर्यंत जगातील प्रत्येक धर्माने केला आहे. एका अर्थाने ही बाब म्हणजे, येशू ख्रिस्त याची लोकप्रियता अधोरेखित करणारी म्हणावी लागेल.

पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही देशांच्या सीमेवर वसलेल्या बेथेलहेम या शहरात इसवी सन चार वर्ष पूर्व एका ज्यू मेंढपाळाच्या घरात येशूचा जन्म झाला. ख्रिस्ती धर्म श्रद्धेनुसार जुन्या करारातील जेहोवाने दिलेल्या आश्वासनानुसार येशूने जन्म घेतला. ‘जॉन दी बाप्टिस्ट’ याने नाइल नदीत येशूला बाप्तिस्मा दिल्यानंतर प्रवचनाच्या माध्यमातून तत्कालीन ज्यू पुरोहितशाहीच्या विरोधात त्याने बंड उभारले. या काळात लोकांना जो शांततेचा, सद‌्भावनेचा संदेश त्याने प्रवचनामधून दिला, त्यातील पहिले प्रवचन म्हणजे, ‘सर्मन ऑन द माउंट’! ख्रिस्ती धर्मातील शांतता आणि विश्व मानवतावादाचा मुख्य स्रोत म्हणून या प्रवचनाकडे पहिले जाते, ज्यामधील शिकवण गौतम बुद्धाच्या प्रवचनाशी अतिशय मिळतीजुळती आहे. तिबेटियन बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी, येशूच्या या प्रवचनाची तुलना गौतम बुद्ध यांनी त्यांच्या शिष्यासमोर दिलेल्या प्रवचनाशी केली. येशू ख्रिस्ताची शांततेची शिकवण मूलतः बौद्ध प्रभावातून असल्याचे मत व्यक्त करून येशू हा एक बोधिसत्व असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले होते. निकोलस नोटोविट्झ या संशोधकाने १८९४मध्ये येशू हा त्याच्या वयाच्या तिशीत प्रवेश करण्यापूर्वी तिबेट आणि काश्मीर या परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती, लडाखमधील बौद्ध मठातील एका ग्रंथात आढळते, अशी मांडणी त्याच्या ग्रंथात केली होती.

ऐतिहासिक संशोधनानुसार, येशू वयाच्या ३० वर्षापर्यंत नाझरथ या गावी राहात असे. सुतारकाम करणारा येशू म्हणजे, सर्वसामान्य व्यक्ती होता. त्याच्या जीवनातील हा कालावधी अज्ञात कालावधी आहे. याच अज्ञात काळाच्या अनुषंगाने येशूबद्दल अनेक सुरस कथा रचल्या गेल्या. लुईस जँकोलीओट या युरोपीय लेखकाने १९व्या शतकाच्या उत्तरार्धात ‘बायबल इन इंडिया’ नावाचा ग्रंथ लिहून यामध्ये भगवान कृष्ण आणि येशू ख्रिस्त यांच्यावर तुलनात्मक लेखन केले. येशू कृष्ण अनुयायी असल्यामुळे, ‘ख्रिस्त’ हे नाव त्यास मिळाले असल्याची मांडणी त्याने केली. बंगाली योगगुरू मुकुंदलाल घोष उपाख्य परमहंस योगानंद यांनीदेखील भगवद‌्गीता आणि बायबल यांचा तौलनिक अभ्यास करून येशू ख्रिस्त हा भगवान कृष्णाचा अनुयायी असल्याचे मत त्यांच्या ‘Second Coming of Christ : The Resurrection of the Christ Within You’ या ग्रंथात मांडले आहे. अनेक इतिहासकारांनी येशू त्या काळातच नव्हे तर केव्हाही भारतात आला नसल्याचे सप्रमाण सिद्ध करूनही येशूच्या भारतीय वास्तव्याबाबत विविध रंजक कथा प्रचलित झाल्या आहेत.

येशू वयाच्या ३४व्या वर्षी येरुशलेम या शहरात आला. आज जगभर मसीहा म्हणून असणारी त्याची प्रतिमा याच शहरात निर्माण झाली. त्याने अखेरचा श्वासदेखील याच शहरात घेतला. येशू येरुशलेम शहरात पोहोचला, तो ‘पास ओव्हर’च्या सणाच्या निमित्ताने! वेगवेगळ्या प्रदेशातून या सणासाठी लाखोंच्या संख्येने ज्यू लोक येरुशलेम येथील ‘टेम्पल ऑफ माउंट’ या मंदिरात गोळा होत असत. या मंदिरातील पुरोहित वर्ग गरीब देवभोळ्या श्रद्धाळूंकडून पैसे उकळत असल्याची घटना सहन न झाल्याने येशूने पुरोहिताच्या हाताला झटका देऊन त्याच्या हातातील पैसे खाली पाडले. येशूने पुरोहितशाहीवर थेटपणे केलेला हा पहिला हल्ला होता.

इतिहासकारदेखील हा प्रसंग घडल्याचे मान्य करतात. ‘पास ओव्हर’च्या सणानिमित्त असणाऱ्या यात्रेच्या वेळी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला येथे बोकडाचा बळी द्यावा लागत असे. बोकडांचा व्यापार, अन्नाच्या स्वरूपात मांस आणि कातडे विक्री, मंदिरातील दान यातून येरुशलेमची बाजारपेठ समृद्ध झाली होती. येशू या सर्व प्रथांना-अर्थकारणाला विरोध करत असल्यामुळे येरुशलेममध्ये त्याचे शत्रू निर्माण होण्यास वेळ लागला नाही. मात्र, त्याच वेळी  येशूला येथे अनेक नवीन अनुयायीदेखील मिळत होते. ज्यू धर्मातील पुरोहितशाहीने येशूचा विरोध म्हणजे, देवाचा विरोध ठरवला. त्याच्यावर ईशनिंदेचा आरोप ठेवून अटक केली. रोमन गवर्नरच्या आदेशानुसार, अनन्वित छळ करून, क्रुसावर चढवून त्याची हत्या करण्यात आली. ज्यू लोकांना येशूला मारणे तसे खूप सोपे होते; मात्र व्यवस्थेच्या विरोधात बंड केल्यावर काय शिक्षा होऊ शकते, हे लोकांना दाखविण्यासाठी त्यांनी येशूला क्रुसावर खिळ्यांनी ठोकून मारले. क्रुसावर खिळवून ठार मारणे, ही त्या काळातील अत्यंत क्रूर पद्धत होती.

येशूचे चरित्र त्याच्या सुरुवातीच्या काळातील मॅथ्यू, मार्क, लुकास यांच्या गॉस्पेल मधून जगासमोर येते. वयाच्या तिशीत पहिले प्रवचन देणाऱ्या येशूला क्रुसावर खिळले तेव्हा त्याचे वय ३६ ते ३८ वर्षांचे होते. म्हणजे अवघ्या ८ वर्षांच्या कालखंडात त्याने जनतेला केलेल्या भावनिक आवाहनामुळे आणि अात्मबलिदानामुळे अनेकांवर त्याचा प्रभाव पडला. लोक मोठ्या संख्येने त्याचे अनुयायी होऊ लागले. जगभरातील अनेक मानवी समूहांनी केवळ येशूबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीतून ख्रिस्त धर्म स्वीकारला, तर अनेकांनी येशू कसा आमच्या धर्मातील आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

इस्लाम धर्मातील प्रेषित मोहम्मद यांनीदेखील, येशूला प्रेषित म्हणून मान्यता दिली. कुराणामध्ये येशूचा उल्लेख ‘इसा-ले-सलाम’ असा केला  गेला आहे. १९व्या शतकाच्या अखेरीस अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम मोहम्मद यांनी ‘जिझस इन इंडिया’(१८९९) हे पुस्तक लिहिले. क्रुसावरून सुटका करून घेऊन येशू वाचला, त्याने भारतात काश्मीरमध्ये आश्रय घेतला होता, काश्मीरमधील श्रीनगरजवळ ‘रोजबाल’ येथे असणारी कबर ही येशूची कबर असल्याची मांडणी त्यांनी या ग्रंथात केली.

आज रोमन कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट या पंथात ख्रिस्ती अनुयायांची संख्या विभागली असली तरी, येशूला मानव मानून त्याचे मानवतावादी विचार स्वीकारणारे लोक प्रत्यक्ष येशूच्या काळातदेखील होते, आजही आहेत. येशूने मेरी माग्दालिन या स्त्रीशी विवाह केला होता. त्यांना एक मुलगीदेखील झाली होती. या गोष्टीवर विश्वास ठेवणारा एक पंथ इसवी सनाच्या चौथ्या शतकापर्यंत अस्तित्वात होता. रोमन सम्राटांनी स्वतःच्या राजकीय सोयीसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारून चर्चची उभारणी केली. येशूचे दैवतीकरण करण्यासाठी येशूला मानव मानणाऱ्या या पंथाचे साहित्य जाळून टाकण्यात आले. जे काही शिल्लक राहिले त्यास ‘सँग्रीयल डॉक्युमेंट’ म्हणून ओळखतात. या पंथाच्या अनुयायांत लिओनार्दो दा विंची, आयझॅक न्यूटनसारख्या महान व्यक्ती होत्या. येरुशलेम येथे येशूने सर्व अनुयायांसोबत जे शेवटचे सहभोजन घेतले, त्यावर आधारित ‘द लास्ट सपर’ या लिओनार्दोच्या चित्रात येशूच्या डाव्या बाजूस बसलेली स्त्री त्याची पत्नी मेरी माग्दालिन असल्याचे मत या पंथाच्या अनुयायांचे आहे. याच विषयावर आधारित ‘दा विन्ची कोड’ नावाची डॅन ब्राऊन यांची कादंबरी आणि याच नावाचा चित्रपटदेखील काही वर्षांपूर्वी येऊन गेला. मध्य पूर्व देशात जन्मलेल्या ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या तीन धर्मांचे तत्त्वज्ञान भारतीय भूमीतील धर्माच्या तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे आहे, मात्र येशूचे जीवन चरित्र आणि त्याचे आत्मबलिदान, हे भारतीय परंपरेतील योगी अथवा साधू यांच्या चरित्राशी साधर्म्य असणारे असल्यामुळे अनेक भारतीय तत्त्वचिंतकांना येशू भारतीय असल्याचे भासले. येशूच्या मानवतावादी विचारांचे साधेपण हेच त्याची जगातील सर्व धर्मियांत स्वीकृती वाढण्यास आणि त्याबद्दल आपुलकी वाटण्यास कारणीभूत ठरले असावे.
© राज कुलकर्णी.
rajkulkarniji@gmail.com

[ येशू ख्रिस्त तामीळ ब्राह्मण होता. येशू हा एक बोधीसत्व होता.येशू कृष्णाचा अनुयायी होता. पवित्र कुराणने त्यांचा उल्लेख इसा-ले-सलाम केला होता. हे येशूच्या सर्वधर्मियांत असलेल्या आपुलकीचे प्रतिक होते..........]

[अनेक इतिहासकारांनी येशू त्या काळातच नव्हे तर केव्हाही भारतात आला नसल्याचे सप्रमाण सिद्ध करूनही येशूच्या भारतीय वास्तव्याबाबत विविध रंजक कथा प्रचलित झाल्या आहेत......]

Comments