रामनवमी आणि मी

चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमीच्या शुभेच्छा.....

माझ्या बालपणातील बराच मोठा कालखंड राम आणि कृष्ण यांनी व्यापलेला होता. अन्नपुर्णा रामदासी म्हणजे माझी पणजी आम्ही तीला तेरची आई म्हणत असू! कारण ती आज्जीची आई आणि  तेरची राहणारी  होती, म्हणून ती तेरची आई!  केशवपन केलेली ही सोवळी म्हातारी खूप प्रेमळ होती. ती रामदासी पंथाची उपासक, राम तीचं कुलदैवत! आमच्या घरी तीच रोज स्वंयपाक आणि  पुजा करायची!  खूप कष्टाळू होती ती, आमच्या घरासाठी तीनं खूप कष्ट घेतले तीनं! तीच्या उपकारातून कधीही उत्तराई होऊ शकणार नाही आम्ही कुणीही!

रामाबद्दल तीच्या मनात खूप भक्तीभाव होता. पुजा करताना ती गुलाबाचं सर्वात मोठं फूल ती रामालाच वाहत असे, याउलट माझ्या वडीलांचे म्हणचे आण्णाचे असे, ते पुजा करायचे तेंव्हा मोठे फुल जगदंबेला वहायचे! कारण तुळजाभवानी हे आमचं कुलदैवत! मात्र कार्तिक महिन्यात रोज पहाटे तेरच्या आईने म्हटलेल्या रामाच्या काकड आरतीने प्रत्येक पहाट मंगलमय होत असे. रामाची ही काकडा आरती ऐकल्याशिवाय दिवाळी या सणाचा विचारही आम्ही करू शकत नव्हतो. "ओवाळू काकडा, आत्मारामा श्री रघुवीरा, राजा रामा श्री रघुवीरा " ही  काकड आरती आणि " कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम! " हे गाणे तीच्याकडूनच आम्ही शिकलो.

चौथीला असताना माझी  मुंज झाल्यावर मी घरात पुजा करायला सुरूवात केली पण देवतांच्याबाबत  माझ्याकडून नेहमी गफलत व्हायची. कधी याची वस्त्रे त्याला तर कधी त्याची वस्त्र याला व्हायची! बरं देवांची त्याबद्दल कांहीच तक्रार नसायची पण रामाचे कपडे बदललेले पणजीला आवडायच़े नाहीत. तीने आम्हांला माझ्या  वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत रामकृष्णाच्या अनेक  कथा सांगीतल्या. 'नाना देही देव एक विराजे ' ही  आत्मारामाची आरती, मनाचे श्लोक, करूणाष्टके  मला तेरच्या आईनेच शिकवली . यामुळे रामाने माझ्या मनात घर केलं! 

पाचवीसाठी उस्मानाबादला आल्यावर मी प्रथम आयाचितांच्या वाड्यात आणि नंतर  जिंतुरकरांच्या घरी रामरक्षा शिकण्यास जात असे.तत्कालीन संस्काराचा तो एक भाग होता.  'अस्य श्री रामरक्षास्तोत्र मंत्र जपे विनीयोग: " या ओळी आप्पा जिंतुरकरांनी माझ्याकडून पाठ करून घेतल्या होत्या ! आप्पा रोज संध्याकाळी आम्हा सात-आठ मुलांमुलींकडून रामरक्षा म्हणवून घेत असत. आम्ही आनंदानं म्हणत असू!

जिजामाता उद्यानासमोरील कोकीळ यांच्या घरी किरायाने राहत असताना घराच्या जवळच  राम मंदिर असल्यामुळे शाळेव्यतिरीक्त असणारा वेळ मंदिराच्याच परीसरात गोट्या किंवा लपाछपी खेळण्यात जायचा. पण प्रभू रामचंद्र  माझ्या मनावर बिंबविण्याचं काम केलं ते रामानंद सागर यांनीच ! "रामायण" आणि  "हि मँन द मास्टर ऑफ युनिवर्स" या दोन्ही मालिका मी तेवढ्याच उत्सुकतेने पाहात असे!  रामायणातील प्रसंग आतापर्यंत केवळ गोष्टी रूपात ऐकले होते, आता ते प्रत्यक्ष पहायला मिऴाले, याचा आनंद मोठा होता! रामाबद्दलचा  हा भक्तीभाव  खूप निरागस आणि निष्पाप होता. जिजामाता उद्यान मधे राम-रावण खेळताना मारूती होण्यासाठी मी  खूप धडपड करायचो. तोंड फुगऊन गाल दुखायचे पण आपण खेळताना रामभक्त हणुमान आहोत, याचं समाधान असायचं.

रामाबद्दलचा हा निखळ भक्तीभाव आठवी नववीपर्यंत कायम होता. नववीला गेल्यावर मात्र  रामाची ओळख नव्यानं होऊ लागली. पुर्वीचा राम कबीराचे शेले विणणारा होता किंवा कल्याणकरी रामराया या गीतातला होता किंवा रघुपती राघव या शाळेत गायलेल्या भजनातील होता. माझ्या पाहण्यात कुंटूंबवत्सल रामचंद्राची अनेक चित्रे होती, ज्यात राम सीता,  तीन भाऊ आणि मारूती होता. अगदी देवघरात असणारी रामाची मुर्ती सीतेला मांडीवर घेऊन बसलेल्या स्वरूपात होती. मात्र नववीत गेल्यावर प्रथमच धनुष्यधारी एकट्या प्रभुरामाचे फोटो घराघरात दिसू लागले, जे माझ्यासाठी नवीन होते.

एका जेष्ठ नातेवाईकाने आम्ही मुलांना रामाच्या वीटा, म्हणून कांही वीटा दिल्या आणि यांची पुजा करून राम मंदीरासाठी देणगी गोळा करायची जवाबदारी आमच्यावर दिली आणि ती आम्ही आनंदांने स्विकारली. रामभक्तीच्या भावनेने आम्हास दिलेल्या वीटा खरोखरच अयोध्येतील राम  मंदिरासाठी वापरल्या जाणार आहेत असे समजून, त्या  वीटा डोक्यावर घेऊन पैसे गोळा करत मी अनेक ठिकाणी फिरलो. हा काळ वेगळ्याच रामभक्तीचा होता. यात रामरक्षा नव्हती, मनाचे श्लोक नव्हते, करूणाष्टके नव्हती, केवळ 'मंदिर वही बनायेंगे ' आणि 'जय श्रीराम' या घोषणा होत्या.

पूढे दहावी सुरू झाली आणि देवधर्म यापेक्षा अभ्यास मागे लागला.वाचन जसं जसं वाढत गेले आणि समाजाचं भान आलं तेंव्हा विचारही बदलले. इतिहासाचं अध्ययन करताना रामकथेतील अलौकीत्वाच्या घटनांचा भौतिक अर्थ शोधून वस्तुनिष्ठ पद्धतीने रामायणाचा अभ्यास अजूनही मी करतो आहे. प्रभू रामराया हे श्रद्धाळूंच्या मनात विराजमान असणारे दैवत आहे. मात्र  रामायण या कथेतील नायक असणारा राम हा राजा तत्कालीन समाज व्यवस्थेचा समर्थकच आहे. ज्या व्यवस्थेमुळे स्वत: रामालाही अनेक वेळा दु:ख सोसावे लागले. वनवास, पितृवियोग, पत्नीवियोग, पुत्रवियोग या सा-या दु:खांना स्वत: सामोरे जाऊनही तो व्यवस्थेच्या विरोधात जात नाही. समाजव्यवस्थेतील नितीनियमांचं पालन राजावरही बंधनकारक असून अगदी इश्वरी अवतारी पुरूषानेही वर्णाश्रमधर्मप्रणित व्यवस्था अंगीकारावी, असा या कथेचा अर्थ आहे. पण मानवी नात्यातील भावनिक गुंतवणूक रंजकतेने रामायनात गुंफली असल्यामुळे समाज बदलला तरी रामाची समाज  नायक म्हणून प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांनी राम वेगवेगळ्या रूपात अनुभवला आहे. देशात अनेक रामकथा आज प्रचलित आहेत. रामाची सर्वस्वरूपी ओळख व्हावी म्हणून मी  रामकथेची विविध संस्करणे, लोकरामायणे,  द्रविडांच्या दृष्टीकोनातून लिहीलेले रामायण ते रिडल्स इन हिंदुझमही वाचले. या मुळे  कोणत्या ना कोणत्या स्वरूपात  इतर विषयाबरोबर राम हा विषय माझ्या अध्ययनात कायमस्वरूपी राहीला! 

इतिहासाच्या अभ्यासाबरोबर मानसशास्त्रही शिकले पाहीजे, या भुमिकेतून जनमानसाच्या मनातील रामाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची इच्छा झाली आणि या विषयाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू लागलो. यावेळी असे जाणवले की, रामायणाचे कथानक एवढे साधे व सरऴ आहे की जगात ते स्वतंत्रपणे कोणालाही सुचू शकते. एक नायक, एक नायीका! दोघांचे एकमेकांवर प्रेम बसते,आणि मधेच एक खलनायक येऊन नायिकेला पळवून घेऊन जातो. नायक त्याविरोधात कांही मित्र गोळा करतो, खलनायकाला मारतो आणि नायिकेची सुटका करतो.जगाच्या इतिहासात हे कथानक एवढे ढोबळ आहे की 21 व्या शतकात निर्माण झालेल्या चित्रपटांना, नाटकांना 99% हेच कथानक असते . त्यामुळे  रामायण आज ज्या स्वरूपात घडल्याचा दावा केला जातो, त्याच स्वरूपात ते  घडले तसे नसावे, असे वाटते.

देशाचा इतिहास आणि जगाचा इतिहास वाचताना प्रभू रामाची मोहीनी किती विश्वव्यापक आहे, याचा अंदाज येऊ लागला. लहानपणी मला माझ्या मनात भेटलेल्या रामरायाचे विश्वव्यापक रूप पाहून माझेच मन व्यापक झाल्याप्रमाणे वाटले.

इलियड आणि ओडीसी ही  ग्रीक महाकाव्ये वाचली तेंव्हा त्यांवर रामायणाच्या प्रभाव असल्याचं कांही संशोधकांचे मत खरं असल्याची जाणीव सातत्याने झाली. विविध देशातील रामकथा पाहून तर मी थक्क झालो. मलेशिया सारख्या इस्लामिक देशात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू  श्रीराम यांच्याविषयी अपार श्रद्धा दिसून येते .  मलेशियातील रामायण इस्लामिक आहे .इ.स. १६०७ ते १६३५ या कालखंडात राज्य करणारा इथला सुलतान इस्कंदर मुल्ला हा स्वतःला राम म्हणवून घेत असे . आजही इथे वीर पुरुषाला लक्ष्मण या नावाने संबोधतात . "हिकायत-ए-सिरीराम " हा पर्शियन भाषेतील ग्रंथ म्हणजेच इथले रामायण ! मलेशियन लोकांच्या श्रद्धेनुसार रामाचा जन्म मलेशियात झाला आणि राम हा पहिले पैगंबर हजरत आदम यांचा मुलगा आहे आणि म्हणून सर्वांच्या हृदयात आदराचे स्थान आणि श्रद्धा आहे .

विशेष म्हणजे भारतीय उपखंडातील प्रत्येक देशातील राम आणि रामकथा वेगवेगळी आहे . तिबेट मधील रामायणाची कथा लंकेपासून सुरु होते. मंगोलियातील रामायणाचा नायक हा हनुमान आहे. म्यानमार मधील इ .स .१०८४ ते १११२ या काळातील राजा" क्यशिन्थि" हा स्वतःला रामाचा वंशज समजत असे. रामवथ्ठू , महारामा ,राम्थोक्यो,थाई राम , पोटयाव रामा एंड लछ्ना अशा अनेक साहित्य कृती म्यानमार मध्ये आहेत. 

श्रीलंकेतील रामायण अगदी आपल्यासारखे आहे, मात्र लंकन रामायणात सीतेला तीन मुले आहेत आणि  लंकन रामायणातील रामाचा जन्म लंकेतच झालेला आहे . फिलिपिन्स या देशात सुद्धा रामायणाची कथा लोकप्रिय असून या देशातील नायक "रादियामांगदिवी" हाच प्रत्यक्ष राम असून त्याची पत्नी "मालानो तिहाईचा" ही प्रत्यक्ष सीता आहे , अशी त्यांची श्रध्दा आहे . फिलिपिन्स मध्ये लक्ष्मणाचा उल्लेख" लछमन" असा असून रावणाला "महादियालवना" म्हणून ओळखतात. 

थाईलंड मधील राजांची नावे रामा म्हणून असतात.सध्या रामा-९ या राजाचे राज्य चालू आहे. रामा पहिला,रामा दुसरा ,अशी येथे क्रमांकानुसार राजाची नावे आहेत . थाईलंड मध्ये रामाची राजधानी अयोध्या असून तिथेच रामाचा जन्म झाला अशी थाई लोकांची श्रद्धा आहे . विशेष म्हणजे  थाईलंड मधील  राम हा गौतम बुद्ध यांचा शिष्य आहे. या सर्व देशातील लोक असे मानतात कि, रामायण त्यांच्या  देशात घडले आणि रामाचा जन्म त्यांच्या देशात झाला. कारण थाईलंडमध्येही अयोध्यानगरी आहे!  मलेशियातील  इस्लामिक रामायणाची हकीकत आणि  श्रीरामाबद्दल तिबेट, थाईलंड, श्रीलंका ई. देशात आढळणारी  विश्वव्यापी  श्रद्धा , आपल्या देशात रामजन्मभूमी आंदोलनावरून हिंदू मुस्लिमात द्वेष पसरवणाऱ्या दोन्ही धर्मातील  धर्मांध लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.

एकदा खेड्यात राहणारा माझा एक पक्षकार कोर्टाच्या तारखेला आल्यावर तो मला अदबीने 'राम राम वकिलसाहेब ' असं म्हणाला! मी ही त्याला 'राम राम, भाऊ राम राम ' असे म्हणालो. त्यावर माझ्याशी विविध राजकीय मुद्द्यावर सतत वाद घालणारा माझा एक राजकीय हिंदुत्ववादी मित्र मला म्हणाला, तुला राम केंव्हापासून प्रिय झाला बाबा? मी म्हणलो " अरे राम तर बालपणापासून मनात आहे, म्हणून त्याच्या नि माझ्या परस्पर स्नेहाचं प्रतिक म्हणून 'राम राम' हा शब्द उच्चारला! "राम राम" या शब्दात निखळ प्रेम आणि स्नेह आहे, म्हणून मला 'राम राम' म्हणायला आवडतं आणि इथून पुढेही म्हणेन, तुझ्या 'जय श्रीराम' मधे जो उन्माद आणि द्वेष आहे, तो या गरीब धर्मश्रद्ध व्यक्तीच्या 'राम राम'मधे आजीबातच नाही"

रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा!!!!!!!!

© राज कुलकर्णी .
संदर्भ - 
1)संचित- संजीवनी खेर
2)भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार - डॉ.शरद    हेबाळकर
3) Glimpeses over world History- J.Nehru.
छायाचित्रात प्रभूरामाच्या वेषात ..तनिष्क राज कुलकर्णी.

Comments