गणेशभक्त हुसेन अंबरखान आणि शहाजी राजे .

गणेशभक्त हुसेन अंबरखान आणि शहाजी राजे ......

संत हुसेन अंबरखानाचा जन्म इ.स. 1603 साली झाल्याचा उल्लेख तंजावर येथील एक ग्रंथकार वैद्यनाथ याच्या 'सिद्धांतचिदंबरी' या ग्रंथातील 'चिदंबरजयंतिस्तोत्र' या प्रकरणात केला गेला आहे. संत म्हणून मान्यता पावलेला  कालावधी साधारणपणे 1618  च्या आसपासचा आहे. सतराव्या शतकातील प्रसिद्ध संत रमावल्लभदास यांच्या चरित्रातही  त्याचा उल्लेख येतो. निजामशाहीमधे अंबरखान नोकरीस असल्याचा उल्लेख रमावल्लभदासाचा शिष्य राघवदास याच्या  'बिरूदावळी' या रचनेत येतो. निजामशाही मुघलांनी समाप्त करेपर्यंत (1633) हुसेन दौलताबादला होता. त्यानंतर काही काळ तो राजे शहाजी यांच्याकडेही नोकरीस होता. निजामशाहीचे पुनरूज्जीवन घडविण्याचा साहसी प्रयत्न शहाजी राजेंनी केला त्यावेळी अंबरखान सतत शहाजीराजे सोबत होता.

राजे शहाजी यांनी हुसेन अंबरखानाची गुणग्राहकता आणि त्याची धार्मिक विषयातील रूची ओळखून त्यास तंजावर येथे नेले. हुसेन अंबरखान शहाजी राजेंच्या सेवेत कर्नाटकांतही राहीला. संकल्पनेत असलेली मराठा सम्राज्याची पायाभरणी केवळ भुभाग संपादन करून नव्हे तर सांस्कृतीक दृष्ट्याही व्हावी, हा शहाजी राजेंचा प्रमुख हेतू होता. म्हणून त्यांनी अनेक मराठी संतकविंना उदार आश्रय दिला होता, त्यात अंबरखान हा प्रमुख म्हणावा लागेल. 

दौलताबादला हुसेन अंबरखान निजामाच्या पदरी अधिकारी म्हणून असताना त्याचा संपर्क चांद बोधले, जनार्दन स्वामी, रमावल्लभदासाचे वडिल आबाजी यांच्याशी येऊन त्यास परमार्थिक चिंतनाची ओढ लागली. अंबरखान धर्माने मुस्लिम परंतु अनेक हिंदुंना मुक्त धर्माचरण हे त्याच्या स्वतंत्र विचाराचे प्रतिक होते. तो अनेक हिंदु विद्वानांसोबत हिंदु धर्मातील विविध तत्वचिंतनपर चर्चा करत असे. भारतातील मुस्लिम धर्माची पायाभरणी या धार्मिक चिंतनाच्या सहसंगमातून झालेली आहे. पण हिंदुमधील कांही धर्मांध आणि मुस्लिमामधील कांही धर्मांध ही वस्तुस्थिती मान्य करत नाहीत, हे खेदजनक आहे.
 
हुसेन अंबरखानाने भगवदगीतेवर स्वतंत्र अध्ययन करून भावर्थ दिपिकेप्रमाणे टिका लिहीली. या टिकात्मक ग्रंथाचे नांव म्हणजे 'अंबरहुसेनी' ही टिका शके 1575 म्हणजेच इ.स.1653 साली लिहीली. हा ग्रंथ त्याने तंजावर इथं लिहीला असल्याचं मानलं जातं. या ग्रंथात 871 ओव्या आहेत. या लेखनाची प्रेरणा सांगताना तो म्हणतो...

अच्यूताश्रम-निवृतीनाथादिकी |
गीतेचिये प्रतिश्लोकी |
केली ओवी येकियेकी |
परि श्लोकार्थ संपुर्ण नसे ||1.11||

शब्दाच्या भावर्थाला त्याने खूप महत्व दिले आणि श्लोकाती तात्पर्यार्थ त्यांनी अत्यंत सोप्या व लाघवी शब्दांत मांडला आहे. गीतेचा भावर्थ त्याने सुगम शब्दात मांडला आहे. या ग्रंथाच्या आरंभीच तो गणेशवंदन करताना म्हणतो..

भेदाभेदाचा आग्रह उदंड |
तोचि विघ्नसमुह प्रचंड |
तयाचे नाशिता जो वक्रतुंड |
तया नमस्कार ||1.1||

भेदाभेदाचा समाजात उदंड पसरलेला आग्रह हा खरा विघ्नकारी लोकांचा समुह आहे. अशा विघ्नांचा, विघ्नसंतोषी, विघ्नकारी लोकांचा नाश करणारा वक्रतुंड तो गणेश आहे, त्याला मी नमस्कार करतो.

संत अंबरहुसेनीचे गणेशाला नमस्कार करून  भेदाभेदाच्या विघ्नांचा नाश करणारे हे तत्वज्ञान आणि विचार भारतीय समाजात  हिंदु मुस्लिम धर्मीयांत तेढ निर्माण करून सर्वधर्मसमभावाला संपवू इच्छिणा-या धर्मांध हिंदु मुस्लिमांच्या डोऴ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.

संदर्भ -
1) मुसलमान मराठी संतकवी- रा.चिं.ढेरे.
2) मराठी रियासत खंड पहिला.

© राज कुलकर्णी.

Comments