हिटलरचे अखेरचे दिवस...
हिटलरचे अखेरचे दिवस
मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी !पण विज्ञानाबरोबरच इतिहासाची आवड निर्माण झाली! त्यातही दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास हा माझा अत्यंत आवडता विषय होता. बारावी ला गेल्यावर विज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणजे दिवस रात्र अभ्यास करणारा आणि डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याची मनात आस धरून असणारा ! पण माझे मन कधी त्यात रमले नाहीच ! याचा अर्थ विज्ञानाची आवड नव्हती असे नव्हे ! मुळात विज्ञानविषयक साहित्य वाचनातूनच मी इतिहासाच्या अभ्यासाकडे वळलो होतो.
सन १९९२-९३ साली दैनिक लोकमत मध्ये दुसऱ्या महायुद्धातील हेर कथांवर आधारित एका पुरवणीत एक सदर चालू होते ,ते मी नियमितपणे वाचत असे. त्याच काळात 'मार्मिक' मध्ये पंढरीनाथ सावंत यांचे हिटलर वरील लेखन क्रमश: प्रकाशित होत असे. वार्सा ते हिरोशिमा, नाझींचा उदयास्त , हिटलर, दुसरे महायुद्ध ही वि.स. वाळिंबे यांची पुस्तके दीड वर्षापूर्वीच वाचून झाली होती. त्यात ह.अ. भावे यांचे 'हिटलर' हे पुस्तक , वि.ग.कानिटकरांचे यांचे 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक देखील वाचले. 'बॉईज फ्रॉम ब्राझील'चे मराठी भाषांतर 'गुडबाय हिटलर' , आर्युविंग वँलेसची 'दि सेवंथ सिक्रेट' , विजय देवधरांची या कादंब-या मी त्याच वेळी अधाशीपणे वाचून काढल्या . वि.ग. कानिटकरांचेच 'हिटलरचे महायुद्ध' हे पुस्तक पुढे दोन तीन वर्षांनी वाचले!
मार्च १९९४ मध्ये बारावीची परीक्षा झाल्यावर हिटलर या विषयावरील वाचन खूप वाढले. वर्तमानपत्रात आलेला हिटलर वरील अगदी छोटाशा सुद्धा लेख वा माहिती मी आवर्जून वाचत असे. माझ्या वाचनालयातील ग्रंथपाल आणि कर्मचारी सुद्धा हिटलर वरचे नवीन कांही पुस्तक आले की मला आवर्जून सांगत असत. यातूनच मी हिटलरवर एक नाटक लिहिण्याचे ठरवले ते म्हणजे ‘अखेरचे दिवस’ ! साधरणपणे मे १९९४ या महिन्यात हे नाटक मी लिहिले, त्याला मी ढोबळ मनाने नाटक म्हणतो ,कारण ती नाटिका आहे की एकांकिका हे त्यावेळी मला समजत नव्हते! त्यावेळी हे नाटक रंगमंचावर अशी माझी खूप इच्छा होती. पण याबाबतची माहिती किंवा त्यासाठी काय करावे लागते ,याबद्दल कांहीच माहित नव्हते ! परंतु मी माझ्या नाटकात कोण कोणत्या भूमिका करणार हे पक्के ठरवले होते ! माझा वर्गमित्र वैभव श्रीकांत कुलकर्णी हा हिटलरची आणि माझी एक मैत्रीण गीता डिग्गीकर इव्हा ब्राऊन ची भूमिका करणार असे मी ठरवले होते ! गीताच्या घरी तर माझे नावच 'हिटलर' म्हणून ठेवले होते, आजही काकू भेटल्या की गमतीने मला हिटलर म्हणतात ! हे नाटक लिहील्यानंतर पहिल्यांदा वाचले वैभवने आणि त्यानंतर गीताने!
‘अखेरचे दिवस’ हे नाटक माझे पहिले साहित्य होते. शाळेत असताना माझा मामा धनंजय कुलकर्णी याच्या 'घरोघरी या एकांकिकेत मी त्याच्या मुलाची भुमीका केली होती. त्यामुळे मी त्यास हे नाटक वाचायला दिले. त्याला ते खूप आवडले आणि त्यात कांही दुरुस्त्या सांगितल्या. ज्या मला आजपर्यंत कधीच करणे झाले नाही आणि नंतरच्या काळात या नाटकाचे हस्तलिखित कुठे गहाळ झाले, हे मलाही समजले नाही. विशेष म्हणजे गहाळ झाले म्हणण्यापेक्षा ते कुठे आहे, हा विषयच माझ्या चिंतनात नव्हता आणि मी पुढच्या शिक्षणात व्यस्त झाल्यामुळे त्याचा कधी शोध देखील घेतला नाही. अचानक सन २०१६ च्या डिसेंबर महिन्यात घरातील खूप जुनी रद्दी भंगारवाल्याला देण्यासाठी काढली होती .त्यातील एका पोत्यात मला ही नाटकाची फाईल दिसली आणि मी ती तातडीने उचलून घेतली!
मला त्यावेळी खूप आनंद झाला ,कारण माझ्याच नाटकाचे हस्तलिखित मला तब्बल २२ वर्षांनी माझ्या हाती आले होते! नाटकाचे हस्तलिखित हाती लागल्यावर मी ते चाळले आणि त्यात दुरुस्त्या करून ते नाटक नव्याने लिहिण्याचे ठरवले आहे ,मात्र अजून त्या कामास सुरुवात केलेली नाही !
'अखेरचे दिवस' हे नाटक लिहिण्यापूर्वी , मी एकही नाटक वाचलेले नव्हते किंवा नाटक कसे लिहावे हे देखील माहित नव्हते. शालेय अभ्यासक्रमात कुमारभारती, युवकभारतीच्या पुस्तकात अभ्यासक्रमात जे नाटकाचे उतारे वाचले किंवा अभ्यासले तेवढेच! त्यामुळे या लेखनात असंख्य चुका असल्याची आणि लेखन विस्कळीत असल्याची जाणीव मला झाली. पण आपण आपल्या १७ व्या व्या वर्षी जे लिहिले ते तसेच आपल्याकडे असावे म्हणून याचे हस्तलिखित आता मात्र जपून ठेवले आहे! त्याकाळी आम्ही अशा लेखनासाठी स्वस्त आणि किलोवर मिळणारे कंम्प्यूटर पेपर वर हे नाटक लिहीले आहे.
‘अखेरचे दिवस’, हे नाटक, १६ जानेवारी १९४५ च्या बर्लिन मधील चँन्सलरीच्या जमिनीत असणाऱ्या बंकर मधील प्रसंगापासून सुरु होते आणि ३० एप्रिल १९४५ रोजी हिटलरच्या अत्महत्येनंतर संपते. या नाटकात एकूण ६ प्रसंग असून , पहिला प्रसंग १६ जानेवारी १९४५ चा , दुसरा १३ मार्च १९४५, तिसरा २२ एप्रिल १९४५ , चौथा २८ एप्रिल , पाचवा २९ एप्रिल आणि सहावा ३० एप्रिल असे आहेत. नाटकात हिटलर , इव्हा ब्राऊन ,मार्टिन बोरामन, जोसेफ गोबेल्स, ऑटो रीमर या प्रमुख भूमिका असून हिटलरचा मित्र ग्रीम, बर्लिनचा मँजीस्ट्रेट वाल्टर , हिटलरचा डॉक्टर कार्ल आणि जनरल बेंक या इतर भूमिका आहेत.
हे नाटक बंकर मधेच सुरु होते आणि बंकर मधेच संपते ! हिटलरचे वेगळे रूप यात दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. आजपर्यंत तो एक हुकुमशहा , क्रूरकर्मा असे चित्र असले तरी या संपूर्ण नाटकात तो खिन्न आणि हताश आहे. त्याचबरोबर तो उद्विग्न आहे. त्यामुळे तो विनाकारण खेकसतो, रागावतो आणि प्रसंगी रडतो सुद्धा !
हिटलरचा राष्ट्रवाद , त्यावरील त्याची अखेरच्या काळातील मते , दुसऱ्या महायुद्धातील त्याचे पूर्वेकडील राष्ट्र जिंकण्याचे उद्दिष्ट याबद्दल संवादातून मांडणी केली आहे. आजच्या दिवशीच हिटलरने आत्महत्या केली आणि युरोपात दुस-या महायुद्धाचा एक प्रकारे असा अंत झाला.
'अखेरचे दिवस' मुळ नाटक लिहून तयार आहेच, मात्र त्यात कांही सुधारणा करून लवकरच आपल्यासमोर घेवून येईन असा विश्वास वाटतो आहे.
© राज कुलकर्णी.
Comments
Post a Comment