'प्रेम के रंग में मोहे रंग डारो'
'प्रेम के रंग में मोहे रंग डारो'...
जीवन रंगी बेरंगी आहे, म्हणूनच जीवनात आनंद आहे. मानवी मेंदूचा रंग करडा आहे पण त्यात जन्म घेणारे भावनेचे रंगतरंग विविध रंगी आणि विविध ढंगी आहेत. म्हणूनच सर्व समाजाने एकत्रित येऊन, मुक्तपणे प्रेम आणि आनंद या दोन रंगांची उधळन म्हणजे होळी हा सण! कारण सर्व रंग कच्चे असू शकतात पण प्रेमरंग मात्र सच्चा असतो! शाश्वत असतो.
गोकुळातला तो मनोहारी शाम म्हणजे तर प्रेमाचं मुर्तिमंत प्रतिक! त्यामुळे होळी ते रंगपंचमी या कालावधीतील वसंतोत्सवाचं आणि श्रीकृष्णाचं जणू अद्वैतच आहे. ब्रिजभुमीचा हा श्रीहर, श्रीरंग सर्व धर्माच्या, सर्व पंथांच्या भारतीयांना आपल्या प्रेमरंगात रंगवतो! त्यातून हिंदु तर स्वाभिवकच पण मुस्लिम शासक आणि सुफी संत ही सुटले नाहीत. मुघल दरबारात होलिकोत्सव अकबराच्या काळात सुरू झाला. अकबर आणि जहांगीर स्वत: सहभागी होत असत! दुस-या बहाद्दुर शहा जफरने या उत्सवावर कांही रचना सुद्धा लिहील्या आहेत.
चौदाव्या शतकातील सुफी संत निजामुद्दीन औलिया यांच्याबाबत अशी कथा सांगीतली जातो की, त्यांना भगवान श्रीकृष्णाने स्वप्नात दर्शन दिले आणि ही बाब त्यांनी आपला शिष्य अमीर खुसरो यांना सांगीतली! त्या स्वप्न भेटीवर आनंदीत होऊन अमीर खुसरो यांना भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर एक पद्यसंच (दीवान) लिहीण्यास सांगीतले. त्यानुसार खुसरो ने ‘हालात ए कन्हैय्या' हा दीवान लिहीला. यात श्रीकृष्ण चरीत्रातील अनेक प्रसंगाचे वर्णन करणारी पदे आहेत,त्यातील कांही पदे ही गोकुळातील होळीचे अर्थात रंगोत्सवाचे वर्णन करणारे आहे. या रचनेत खुसरो यांनी कल्पना अशी केली आहे की , स्वत: ते आणि त्यांचे गुरु निजामुद्दीन औलिया रंगोत्सवात भिजून गेले आहेत! कारण होळीच्या शुभ मुहूर्तावरच खुसरोने निजामुद्दीन यांचे शिष्यत्व स्विकारलं होतं !
‘गंज शकर के लाल निजामुद्दीन चिश्त नगर में फाग रचायो,
ख्वाजा मुईनुद्दीन, ख्वाजा कुतबुद्दीन प्रेम के रंग में मोहे रंग डारो
सीस मुकुट हाथन पिचकारी, मोरे अंगना होरी खेलन आयो,
खेलो रे चिश्तियों होरी खेलो, ख्वाजा निजाम के भेस में आयो।
अपने रंगीले पे हूं मतवारी, जिनने मोहे लाल गुलाल लगायो
ख्वाजा निजामुद्दीन चतुर खिलाड़ी बईयां पकर मोपे रंग डारो,
धन धन भाग वाके मोरी सजनी, जिनोने ऐसो सुन्दर प्रीतम पायो।’
पंजाब मधील सतराव्या शतकातील प्रसिद्ध सू़फी संत बाबा बुल्लेशाह यांनी एक रचनेत स्वत:ला गोपिका मानून या रंगोत्सवाचं खूप उत्कट वर्णन केलं आहे,
होरी खेलूंगी कहकर बिस्मिल्लाह,
नाम नबी की रतन चढ़ी, बूंद पड़ी इल्लल्लाह,
रंग-रंगीली उही खिलावे, जो सखी होवे फना फी अल्लाह,
होरी खेलूंगी कहकर बिस्मिल्लाह.
सोळाव्या शतकातील सुप्रसिद्ध कृष्णभक्त रसखानाने सुद्धा त्याच्या रचनेत गोकुळातील होळीचे मनोहारी चित्र मांडले आहे. तो म्हणतो ...
फागुन लाग्यौ सखि जब तें तब तें ब्रजमंडल में धूम मच्यौ है,
नारि नवेली बचै नाहिं एक बिसेख मरै सब प्रेम अच्यौ है,
सांझ सकारे वही रसखानि सुरंग गुलालन खेल मच्यौ है,
को सजनी निलजी न भई अरु कौन भटु जिहिं मान बच्यौ है.
फाल्गुनी पौर्णिमेनंतर वद्य प्रतिपदेपासून सुरू झालेला वसंतोत्सव पाच दिवस म्हणजे वद्य पंचमी म्हणजेच रंगपंचमी पर्यंत चालतो. भारतातील सर्वांना प्रेमरंगात रंगवणारा हा उत्सव भारतातल्या गंगा जमीनी तहजीबचं अस्सल प्रतिक आहे!
© राज कुलकर्णी.
Comments
Post a Comment