माझीया मराठीचे बोलू कौतुके........

मराठी दिना निमित्त  दिव्यमराठीच्या  'रसिक' पुरवणीत 'गाळीव इतिहास' या सदरात  मागील वर्षी प्रकाशित  झालेला  लेख...........

माझीया मराठीचे बोलू कौतुके........

दोन हजार वर्षापासून मराठी भाषा काळाप्रमाणे अधिक प्रगल्भ आणि अधिक श्रीमंत होत गेली आहे.हजारो वर्षापासून या भुमीच्या अभिव्यक्तीचे साधन असणारी ही भाषा मायबोली असल्याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे ..........

दोन हजार वर्षांपूर्वीचा प्रसंग.सातवाहन राजघराण्यातील नवीन लग्न झालेले जोडपे प्रतिष्ठान म्हणजे, आजचे पैठण या राजधानीत गोदावरीच्या शांत प्रवाहामध्ये जलक्रीडा करत होते. नवपरिणीत राणी जवळ येण्यास लाजत होती. म्हणून सातवाहन राजाने, नावेत बसूनच पाण्याचा हबकारा राणीच्या तोंडावर गंमत म्हणून मारला! राणी सावरली आणि म्हणाली, ‘म उद्कोमा ताड्य’ सातवाहन राजाला संस्कृत येत नव्हते. तो म्हणाला, ‘इथे कुठे मोदक आहेत मारायला?’ राणी हसली. पाण्याने मारू नका, याचा अर्थ त्याने ‘मोदकाने मारू नका’ असा घेतला होता. मग रागावून त्याने संस्कृत भाषेवर बंदी आणली. सर्व ग्रंथ प्राकृत भाषेत लिहिण्याची आज्ञा दिली आणि पुढे सर्वच साहित्य प्राकृत भाषेत लिहिले जाऊ लागले. रा. श्री. मोरवंचीकर यांच्या ‘सातवाहनकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात वर्णन केलेली दंतकथा कितपत सत्य आहे, हे माहीत नाही. मात्र महाराष्ट्राचे आद्य सम्राट असणाऱ्या सातवाहन राज्यांची कारकिर्द हाच मराठी भाषेच्या जन्माचा कालखंड असल्याचे नवीन संशोधनानुसार समोर येत आहे.

सातवाहन कालखंड (इ.स.पू.२४० ते इ.स.२६०) हा महाराष्ट्राच्या इतिहासात अतिशय देदीप्यमान असा कालखंड. त्याच काळात रोम, इजिप्त, चीन या देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले गेले. संपूर्ण महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख निर्माण झाली. सातवाहन राजा हालच्या ‘गहासत्तसाई’ या ग्रंथातील गाथांनी महाराष्ट्री प्राकृत भाषा निर्माण होण्यास पोषक वातावरण तयार झाले. संस्कृत ही वेदप्रणीत भाषा टाळून, सातवाहन राज्यांनी मागधी, अर्ध-मागधी, पाली, पैशाची आणि महाराष्ट्री प्राकृत भाषेला उत्तेजन दिले. यातूनच पुढे मराठी भाषेचा जन्म झाला.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे सन २००४मध्ये १५०० वर्षांपूर्वीच्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे जाहीर करण्यात आले. संस्कृत, तामीळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्याच वर्षी ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली. समितीचे समन्वयक म्हणून हरी नरके यांची नियुक्ती केली गेली. या समितीतर्फे २०१३मध्ये दाखल केलेल्या अहवालानुसार, आजपासून २२१९ वर्षांपूर्वी मराठी ब्राह्मी लिपीत लिहिली जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. ब्राह्मी लिपीतील इ.स.पू. २०७मधील मराठी शिलालेख जुन्नर तालुक्यात आढळून आला. पुण्याच्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन केंद्रात याबाबतचे जवळपास १५०० पुरावे उपलब्ध असल्याचे नमूद केले. यावरून मराठी भाषेचा इतिहास २००० वर्षांपूर्वीचा असल्याचे समोर आले आहे. मराठी भाषेच्या जन्मासंबंधी या पूर्वी झालेल्या संशोधनानुसार बौद्ध धर्माचा उदय आणि संस्कृत भाषेचा बोलीभाषा म्हणून झालेला ऱ्हास हा कालखंड म्हणजे, इ.स.पू. ७०० ते ६०० असा आहे. या काळातच प्राकृत भाषांचा उदय झाला. या वेळी महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत, मध्यदेशात शौरसेनी, पूर्व देशात मागधी, अर्ध-मागधी, काश्मिरात पैशाची या भाषा निर्माण झाल्या. यातूनच पुढे महाराष्ट्रीतून मराठी, शौरसेनीतून हिंदी, मागधीतून बंगाली या भाषांनी जन्म घेतला असल्याचा निष्कर्ष संशोधक चिंतामण विनायक वैद्य यांनी मांडला होता. त्याचा प्रतिवाद करताना डॉ. पांडुरंग दामोदर गुणे यांनी शंकराचार्यांच्या कालखंडात हिंदू धर्माचे पुनर्गठन होऊन त्या नंतरच्या काळात प्राकृत भाषा निर्माण झाल्या म्हणून मराठी भाषेच्या जन्माचा कालखंड हा १०वे शतक असून १३व्या शतकातच मराठी भाषेतील साहित्य आढळते, असे मत मांडले होते.

मराठी भाषेचा शिलालेख स्वरूपातील सर्वात प्राचीन पुरावा म्हणून शके ४१० मधील मंगळवेढ्याचा शिलालेख मानला जायचा. मात्र, हा शक शालिवाहन शक नसून तो शिलहार शक आहे, ज्याचा प्रारंभ शालिवाहन शक ७१५चा आहे. याचाच अर्थ या शिलालेखाचा कालखंड शके ११२५ म्हणजे, इ.स.वी.सन १२०३ असा येतो. परळ येथे शके ११०९ सालातील शिलाहारांचा, चाळीसगाव जवळ पाटण येथे इ.स. ११७२मधील आणि शके ११९५ म्हणजेच इ.स. १२७३मधील पंढरपूरचा शिलालेख आहे. मात्र कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबलीच्या मूर्तीच्या पायथ्यास ‘चामुण्ड राये करवियले, गंगराये सुत्ताले करवियले’ असा देवनागरी लिपीतील उल्लेख आहे. याचा कालावधी इ.स. १११६ आहे. हा आजपर्यंतचा सर्वात प्राचीन शिलालेख मानला जातो. मराठी साहित्याची सुरुवात ११व्या शतकापासून झालेली दिसून येते. कारण इ.स. १०३९मध्ये निलोपख्यान, रुख्मिणी स्वयंवर, ज्योतीष्यरत्नमाला या ग्रंथांची निर्मिती झाली. आद्यकवी मुकुंदराज यांनी त्यांच्या विवेकसिंधू या ग्रंथाची निर्मितीदेखील याच कालखंडात झाली. मराठीतील पहिले चरित्र म्हाइंमभट याने चक्रधरस्वामींचे ‘लीळाचरित्र’ म्हणून इ.स. १२३८मध्ये लिहिले.याच काळात भक्ती संप्रदायातील प्रमुख दोन संप्रदाय उदयास आले.

अद्वैत तत्त्वज्ञानावर आधारलेला वारकरी संप्रदाय आणि द्वैतमताचा महानुभाव संप्रदाय! या दोन्ही संप्रदायातील उत्कट भक्तीपर साहित्याने मराठी भाषेला अत्युच्च उंची प्रदान केली. ज्ञानेश्वर यांनी ‘भावार्थ दीपिका’ या ग्रंथात गीतेचे तत्त्वज्ञान आणि ‘अमृतानुभव’ या ग्रंथातून नाथ संप्रदायाचे अाध्यात्मिक तत्त्वज्ञान मराठी भाषेत जनसामान्य लोकापर्यंत पोहोचवले. त्याच काळात संत निवृत्ती, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत गोरोबा यांच्या अभंगांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली. सोळाव्या शतकात संत एकनाथांनी अभंग, भारुड, गवळणी या स्वरूपात प्रचंड साहित्य निर्माण केले, तर सतराव्या शतकात संत तुकाराम यांनी मराठी भाषेत एकूण ३००० पेक्षा जास्त अभंग लिहिले.

भक्ती संप्रदायातील सामाजिक समतेचा संदेश मराठी भाषेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचला. आपसूकच मराठी भाषा सामाजिक समतेचा आधार बनली. यामुळेच समतेच्या विरोधी असणाऱ्या धार्मिक क्षेत्रात तिची उपेक्षाच केली जात होती. म्हणून तर ज्ञानेश्वरांना तिचे वर्णन करताना, आवर्जून ती अमृताशीही पैजा जिंकू शकते, असे सांगावे लागले आणि एकनाथांना म्हणावे लागले की, संस्कृत देवांनी निर्मिली, तर प्राकृत काय चोरांपासून आली? मराठी भाषेचा हा समतेचा जागर केवळ वारकरी नव्हे तर ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मविचारांनादेखील आकर्षित करणारा ठरला. जन्माने पोर्तुगीज असणाऱ्या ख्रिस्ती संत कवी फादर स्टिफन्स यांनी १६१४मध्ये ‘ख्रिस्त पुराण’ हा मराठी ग्रंथ लिहिला. ज्यामध्ये त्यांनी ,

जैसी पुस्पामाजी पुष्पमोगरी। की परिमळामाजी कस्तुरी।
तैसी भासांमाजी साजिरी। मराठीया।।
असे मराठी भाषेचे वर्णन केले आहे.

चांद बोधले आणि जनार्दन स्वामी यांचा शिष्य असणाऱ्या शेख महम्मद याने ‘योगसंग्राम’ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात तो म्हणतो
‘याति मुसलमान। मऱ्हाष्ट्री वचने।
ऐकती आवडीने। विप्रशुद्र।।’

मराठी भाषेचे हे सर्वव्यापक चित्र पाहून अहमदनगरच्या निजामशाहीने आणि विजापूरच्या आदिलशाहीने त्यांच्या प्रशासनाची भाषा मराठी ठेवली. संत साहित्याच्या सामाजिक समतेच्या आश्वासक वातावरणामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या साम्राज्य स्थापनेला बळ मिळाले. पुढे या  मराठी भाषिक साम्राज्याच्या विस्ताराबरोबर मोडी लिपीतील मराठी भाषा दक्षिणेत तंजावर आणि उत्तरेकडे दिल्ली तथा अटकेपार अशी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचत गेली.

[ब्रिटीशांच्या कालखंडात विल्यम केरी या ख्रिस्ती धर्मगुरूने मराठी भाषेच्या व्याकरण दुरुस्तीचे कार्य केले. तर जेम्स थोमस मोल्स्वर्थ ने १८३१ साली पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश तयार केला. त्यानंतर एक वर्षांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले. वि. दा. सावरकर यांनी टंकलेखन ,परिपत्रक , ध्वनिमुद्रण या सारखे इंग्रजी शब्दांचे प्रतीशब्द मराठीत आणले आहेत] 

© राज कुलकर्णी.

Comments