भाजी ,समाजजीवन आणि संवाद
दै.प्रजापत्र च्या 'बहुरंग' पुरवणीत प्रकाशित झालेला माझा लेख..............
.
भाजी ,समाजजीवन आणि संवाद ...........
भाजी म्हणजे दैनंदिन जीवनात अत्यावशक अशी बाब ! घरात फ्रीज आल्यापासून दोन चार दिवसाच्या भाज्या एकदम आणल्या जाऊ लागल्या .मात्र पूर्वी दररोजची भाजी ही त्या त्या दिवशी खरेदी करावी लागत असायची. खेडेगावात तर शेतातून परत येताना शेतातील जी उपलब्ध असेल ती भाजी घेवून घरी यायची आणि तीच करायची असा शिरस्ता होता. आजही खेड्यात रोजंदारी करणाऱ्या महिला याच पद्धतीने विविध भाज्या घरामध्ये घेऊन य़ेतात आणि बनवतात. शहरात मात्र दारावर विक्रीस येणाऱ्या भाज्या आणि भाजी बाजारात जावून खरेदी केल्या जाणाऱ्या भाज्यांमुळे भाजी बाजार किंवा भाजी मार्केट किंवा सब्जी मंडी मुळे एक वेगळीच संस्कृती विकसित झालेली दिसून येते आणि प्रत्येक शहरातील राहणीमानानुसार त्यावर एक वेगळीच छाप दिसून येते.
महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात आजही आठवडी बाजार भरतो. अनेक विविध स्तरातील लोक बाजार या ठिकाणी एकत्र गोळा होत असल्यामुळे अनेक शब्दांची ,भाषेची रेलचेल अशा ठिकाणी पाहायला मिळते ,अनुभवायला मिळते, तिथल्या लोकांच्या आवडीनुसार आणि दैनंदिन गरजा नुसार भाज्या पहायला मिळतात. माझा मित्र नितीन वरळीकर याच्या वरळी या मुंबई शहराच्या मधोमध असणाऱ्या खेड्यात मला एक अशाच प्रकारचा परंतु वेगळा भाजी बाजार पाहायला मिळाला ,ज्यामध्ये भिजवून विक्रीस ठेवलेले अनेक प्रकारचे कडधान्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळाली ,तर नाशिक मध्ये प्रवेश केल्यावर एक मोठा भाजी बाजार पाहायला ज्यामध्ये खास चोखंदळ गिऱ्हाईक ताज्या भाज्या घेण्यासाठी आवर्जून येते. मुंबई-पुणे-नाशिक सारख्या मोठ्या शहरात अनेक मोठमोठे भाज्या विकणारे दिमाखदार मॉल असताना सुद्धा अशा बाजारांनी त्यांचे अस्तित्व उल्लेखनीय रित्या टिकवून ठेवले आहे. पण कोणत्याही गोंगाटा विना भाजी खरेदी करण्यात मजा नाही ! निरव शांतता असणाऱ्या वातानुकुलीत जागेत धीरगंभीर आणि सपक चेहऱ्यांनी विकत घेतलेल्या भाज्यात शारीरिक पोषक तत्व असतीलही कदाचित पण त्या भाज्यांचा आणि सहजीवनाशी संबधीत अशा सांस्कृतिक पोषणाचा कांहीही संबंध नाही,असेच म्हणावे वाटते !
समाजातील सर्व स्तरातील दैनंदिन मानवी जीवन जवळून अभ्यासायचे असेल तर भाजी मार्केट किंवा भाजी बाजार हे त्याचे अध्ययन केंद्र म्हणावे लागेल. या बाजारात आलेला प्रत्येक विक्रेता त्याच्या त्याच्या स्वतःच्या पद्धतीने त्याच्या भाजीची वा व्यापारी मालाची जाहिरात करत असतो आणि त्या जाहिरातीतून साधणाऱ्या परिणामकारकतेतून तो स्वतःचा व्यापार करत असतो. भाज्या विकणारे, धान्य विकणारे, अन्न पदार्थ,गाडगी मडकी,जिवंत प्राणी, भजे-चिवडा, तेल-तूप, नवे-जुनेकपडे,फळे,प्लास्टिक वस्तू पासून मोबाईल-घड्याळ स्पेअर पार्टस सह अनेक वस्तू विक्रीला असणा-या बाजारात आलेल्या लोकांचे संवाद जनजीवनाचे वास्तव चित्र डोळ्यासमोर मांडतात.
बाजारात स्वतःच्या शेतातील भाजी तथा धान्य विकणारे जसे असतात त्याच प्रमाणे शेतकऱ्यांकडून विकत घेवून विक्री करणारे विक्रेते सुद्धा असतात. कांही विशिष्ट आवाज कानी पडल्याशिवाय आपण बाजारात आल्याप्रमाणे वाटतच नाही.कारण बाजार म्हटले की आवाजाचा विशिष्ट ठेका कानावर पडतो. ‘रुपायला दोन ,रुपायला दोन’, ‘पाच रुपये पेंडी.पाच रुपये पेंडी’, ‘दहाला पावकिलो' ,'दहाला पावकिलो’, 'पंधरा रुपये डझन' असे अनेक विविध आवाज कानी कानी पडत असतात. एकदा सकाळी सकाळी बाजारात गेल्या ‘संपत आले ,संपत आले’ या आवाजाने माझ्या कानाचा वेध घेतला आणि मी ताबडतोब मागे वळून पहिले ,पोतेभारून गाजरे विक्रीस घेऊन आलेला तो व्यक्ती, 'गाजरे संपत आले आहेत' असे म्हणून लोकांचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेत होता. तेवढ्यात एखादा आवाज आपल्या कानी पडतो , “आज स्वस्त आहेत ,उद्या महागणार ,आज स्वस्त आहेत उद्या महागणार” बाजारात रताळे विकणाऱ्या शेतकऱ्याचा तो आवाज होता कारण दोनतीन दिवसांनी महाशिवरात्र असल्यामुळे ,उपासाचा पदार्थ म्हणून रताळे महागणार असल्याची पूर्वसूचना त्याच्या पुकारयातून देत होता.
बाजारातील विक्रीला असलेल्या भाज्यांचे किंवा वस्तूंची परिमाणे वेगवेगळी असतात. 'खुत्ता' हा शब्द महाराष्ट्रातील अनेक बाजारात ऐकायला मिळतो. 'खुत्ता' म्हणजे एखाद्या किंवा अनेक भाज्यांचा ढीग ! पाच रुपायला एक खुत्ता असतो,आणि त्या विक्रेत्याने पाच ते सात असे ढीग समोर ठेवलेले असतात ,त्यापैकी आपण कोणताही एक उचलायचा असतो. खुत्ता, पेंडी,जुडी हे शब्द देखील वापरले जातात. कांही ठिकाणी पालेभाज्या पेंडी अथवा जुडी च्या स्वरुपात न मिळता किलो-अर्धा किलो या स्वरुपात विक्री केल्या जातात.
सरकार हा शब्द मराठी भाषेत शासन या अर्थाने वापरला जात असला तरीही सरकारी हा शब्द भाजी बाजारात खूप वेगळ्या अर्थाने वापरला जातो. या ठिकाणी सरकारी याचा अर्थ हायब्रीड म्हणजेच संकरीत असा गृहीत धरलेला असतो. जे सरकारी ते निकृष्ट दर्जाचे आणि त्याविरुद्ध गावरान म्हणजे अतिशय उत्कृष्ट असे समजले जाते. टोमँटो,वांगी,गवार,भेंडी विकत विकताना गावरान वांगी ,गावरान टोमँटो, गावरान भेंडी असा आवर्जून नारा दिला जातो. कमी भावाची भाजी मात्र सरकारी भेंडी किंवा सरकारी वांगी म्हणून ओळखली जाते. अगदी कोंबडीचे अंडे किंवा कोंबडी घेताना सुद्धा सरकारी कोंबडी ,सरकारी अंडी असा शब्दप्रयोग केला जातो.
बाजारातील प्रत्येक विक्रेत्यासोबत चा संवाद हा मोठा गमतीशीर असतो. प्रत्येक जन आपल्यासाठी एकतर मामा असतो किंवा मावशी असते. तसे पहिले तर मामा आणि मावशी असे नामकरण आपण कोणत्याही व्यक्तीचे सर्सामान्य ठिकाणी करत असतो,पण बाजारात याचा वापर जास्त होतो. कारण वस्तूच्या दराबाबत घासाघीस करणे या क्रियेसाठी या नात्याचा खूप चपखल वापर होत असतो. दहा रुपायला पाच लिंबू असताना दहा रुपयात कोणी आठ लिंबू मागत असतात. तर कोणी पाच रुपायची मेथीची पेंडी तीन रुपयास मागत असतात. परवडत नसल्यामुळे निघून जाणाऱ्या ग्राहकाला हाक मारून परत बोलावणारे विक्रेते सुद्धा असतात आणि त्याच ठिकाणी भाजी खरेदी करायची असताना सुद्धा दुसऱ्या विक्रेत्याकडे निघून जाण्याचा नाटकीपणा करणारे सुद्धा खूप असतात. सौंदर्य प्रसाधने आहे त्या किमतीत बिनदिक्कत खरेदी करणाऱ्या अनेक स्त्रिया भाजी विकणाऱ्या म्हाताऱ्याकोताऱ्या विक्रेत्या समोर दोन-पाच रुपयासाठी हुज्जत घालताना दिसतात.
मॉल मधे कधीही न आढळणाऱ्या भाज्या फक्त अशा बाजारातच पहायला मिळतात. पाथ्ररंची पालेभाजी, घोळ, राजगीरा, नाय, नळाची भाजी, पटडीच्या शेंगा, चंदनबटवा, तांदूळकुंद्रा,चिघळ, हादगा, पावटा, कवठे अशा दुर्लक्षित व उपेक्षीत पालेभाज्या वा फळ भाज्या केवळ अशा बाजाराच्या ठिकाणी पाहायला मिळतात. हरभरा पानाची भाजी , करडीच्या पानाची भाजी या सारख्या मुख्य पिकाच्या हंगामी पालेभाज्यासुद्धा अशाच ठिकाणी मिळतात. कांही भाज्यांची नावे ठिकठिकाणी बदलतात ! अळूच्या पानाला कांही भागात चिमकुरयाची पाने म्हणून ओळखतात तर घोसावळा या फळ भाजीस कांहीजन पारसा दोडका म्हणतात. मुळ्याच्या शेंगाला डीन्ग्र्या म्हणून देखील ओळखले जाते.
भाजी दैनंदिन गरजेची बाब म्हणून दैनंदिन जीवनात प्रत्येकाचा प्रत्येकाशी संवाद घडवते भाजी बाजारातील भाजीची खरेदी गरीब श्रीमंत अशा सर्वांना एकत्र आणते. एवढेच काय मुंबई मध्ये ऑफिस मधून घरी जाताना कित्येक स्त्रिया एकत्रीत भाज्या खरेदी करतात आणि या भाज्या प्रवासादरम्यान लोकल मधे बसून निवडतात. भाज्या निवडत असताना ,भाज्या निवडणाऱ्या दोन अनोळखी स्त्रियात संवाद केंव्हा सुरु होतो हे त्यांचे त्यांनाही समजत नाही. वारकरी संप्रदायातील एक संतश्रेष्ठ सावता माळी भाजी ला प्रत्यक्ष सर्वांना कडेवर घेणा-या लेकुरवाळ्या विठ्ठलाची-श्रीहरीची अतिशय सार्थ अशी उपमा देताना म्हणतात........
कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाबाई माझी ॥१॥
लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरीं ॥२॥............
आहारशास्त्रात व पोषणशास्त्रात फळभाज्यांचे महत्व हा एक स्वतंत्र विषय आहे .परंतु भाज्या आणि फळे, त्यांची खरेदी विक्री, त्यातील संवाद यामधून भाषेचे आणि एकूणच सर्वसमावेशक समाज जीवनाचे देखील सांस्कृतिक पोषण होते, हे मान्यच करावे लागेल.
© राज कुलकर्णी.
कुठे कुठे बाजार भरतो त्याची लिस्ट मिळेल का
ReplyDelete