नोटबंदी व बँकाचे नववसुलीअस्त्र!

नोटबंदी व बँकाचे नववसुलीअस्त्र!

परदेशात त्यातही स्वीस बँकेत कॉग्रेसच्या नेत्यांनी ठेवलेला काळा पैसा हा भारतीय राजकारणात दर निवडणूकीत सन 1989 पासून चर्चीला जाणारा विषय आहे. हा पैसे भारतात आणून प्रत्येक नागरीकाला 15 लाख रूपये देण्याची घोषणा करणा-या मोदींनी, परदेशातील ही मागणी पुर्ण होणे अशक्य आहे हे लक्षात येताच,  लोकांना स्वकर्तृत्वाच्या विराटरूपाचे दर्शन  देण्यासाठी नोटबंदी करून हीच ती काळ्या पैशाच्या विरोधात केलेली कारवाई! हीच ती  काळ्या पैशाच्या विरोधातील सर्जीकल स्ट्राईक! असे सांगण्याचा यशस्वी प्रयोग केला!

नोटबंदीमुळे काय काय घडलं, याचा तपशील हा एक स्वतंत्र विषय आहे. पण नोटबंदी आणि बँकाचे व्यवहार  याबाबत ज्या कांही  महत्वपुर्ण घटना घडल्या, त्याचे परीणाम आता समोर येत आहेत. 

नोटबंदीमुळं बँकात पैसे येण्यास वेळ लागला. आपल्याच खात्यातून पैसे काढण्यावर मर्यादा घातलेल्या होत्या. यामुळे  बँक खातेदारांचा पैसा या कारणांमुळं बँकाजवळ राहीला. अर्थात खातेदारांचा पैसा वास्तवात बँकाजवळ नव्हताच, त्यामुळे बँकाना हा पैसा वापरता आला नाही. पण तांत्रीक बाब अशी की, बँकांनी हा खातेदारांचा  पैसा वापरला! मग त्याचे व्याज द्यावे लागणारच!

एरवी नोटबंदी नसती तर बँकाना खातेदाराचे पैसे अडवून धरले नसते आणि त्याचे व्याजही द्यावे लागले नसते. समजा खातेदाराने पैसे बँकेतून काढलेच नसते तरीही ते इतरत्र वापरून बँकेला व्याजरूपी नफा मिळाला असता. बँकांना दोन्ही बाजूने फटका बसला खातेदाराचे बचतीचे पैसे वापरून,ते पैसे कर्जदारांना देऊन मिळणारे व्याजही बुडाले आणि त्यावर पुन्हा खातेदाराला व्याजही द्यावे लागणार!

मग हे बँकाचे नुकसान कसे भरून काढणार? म्हणून या नुकसान भरपाईच्या योजना आहेत. एवढी रक्कम खात्यात नसेल तर एवढा दंड, पाच व्यवहाराच्या पुढे व्यवहार केल्यास रू150 दंड! आता यातून बँका केवळ नुकसान भरपाई करतील असं नव्हे तर बँकांना एक कुरणच आंदण दिल्या सारखा प्रकार आहे. देशातील बँकांची संख्या पाहता बँकासाठी अमाप संपतीच्या संपादनाची सोय यातून झाली आहे.

विश्वाच्या निर्मतीनंतर, सुर्यमालेची निर्मीती आणि पृथ्वी थंड होऊन जीवांच्या उत्पत्ती नि उत्क्रांती नंतर मा. नरेद्र मोदी यांनी केलेली ही नोटबंदी म्हणजे सर्वश्रेष्ठ क्रांतीकारी घटना होती! याचा प्रत्यय अनेक साक्षात्कारी पुरूषांना अधून मधून येत असतो. अपस्माराच्या झटक्या प्रमाणं नोटबंदीच्या समर्थनाचा झटका दर दहा बारा दिवसाला येत असतो.

काळ्या पैशाच्या विरोधातील सर्जीकल स्ट्राईक असणा-या नोटबंदीच्या यशाने मोदीजी आनंदी, भाजपा आनंदी, मोदीसमर्थक सहनशीलता आणि समजूतदारपणामुळे आनंदी, भक्त सत्चिदानंदानंदी! आता बँकाही आनंदी!

सध्या मार्च सुरू झाला असून मार्च अखेर आर्थिक वर्ष संपल्यावर बँकाना जर नफ्यात राहायचं असेल तर असं कांही तरी एखादं 'वसुलीअस्त्र' त्यांच्याकडे असणं गरजेचं होतं! ते मिळालं! या अस्त्राने बँका आनंदी झाल्या ख-या पण हा आनंद कोणाच्या पैसातून आलेला आहे? बँकांच्या नुकसानाची भरपाई होईलही ती पण ही भरपाई केली जात आहे कोणाच्या पैशातून? आणि यांच्या खिशातून का ही भरपाई?

'वेलकम' चित्रपटात फिरोज खानचा मुलगा लकी मरतो असा एक प्रसंग आहे! 'लकी का मेला, कसा मेला ?' असे अनेक प्रश्न नाना पाटेकरला फिरोज खान विचारत असतो. त्याचे एकच उत्तर असते  ' ये राज भी उसीके साथ चला गया' तसं जून्या हजाराच्या-पाचशेच्या नोटा का  बंद झाल्या? का मारल्या? त्यावेळी, ' ये राज भी उसी के साथ चला गया' असंच ऐकावं लागणार बहुदा !

©राज कुलकर्णी.

Comments