रशिया ,रामायण आणि नेहरू !!!!
दै. दिव्यमराठीच्या 'रसिक' पुरवणीत 'गाळीव इतिहास' या पाक्षिक सदरात आज प्रकाशित झालेला लेख..
रशिया ,रामायण आणि नेहरू !!!!
रामराज्य हे गांधीजींचे स्वप्न होते ! भारतीय परंपरेत सुशासनाचे प्रतिक म्हणून मानल्या गेलेल्या या रामराज्याची कल्पना जवाहरलाल नेहरूंच साकार करू शकतील असा विश्वास गांधीजींना होता आणि नेहरूंनीही भारताचा उल्लेख 'पाच हजार वर्षाचे सातत्य' असा करून प्राचीन भारतीय संस्कृतीतील सर्वसमावेषक सहिष्णू मुल्यांवर आधारीत धर्मनिरपेक्ष भारतीय प्रजासत्ताकाची निर्मिती करण्यासाठी गांधीजीच्या रामराज्य या संकल्पनेस साक्षी ठेऊन नियतीशी करार केला होता. परंतु गांधीजींच्या आणि नेहरूंच्या मनातील रामराज्य आणि अगदी रामही रथयात्रेतील रामापेक्षा खूप वेगळा होता. हा राम सर्वसमावेशक असा होता ! तो संत नरसी मेहतांच्या ‘रघुपती राघव राजा राम’ या रचनेतील ईश्वर अल्ला एक मानणारा राम होता, तो कबीराचा राम होता. तो सर्वसामान्यांचा रामकथेतील आणि रामलीलेतील राम होता !
‘भारताचा शोध’ या ग्रंथात नेहरूंनी लिहिले की, लहानपणी अलाहाबदेतील रामलीला पाहूनच रामायण आणि महाभारतातील कथामधून अद्भुतरम्य आणि साहस यांचा परिचय झाला होता. रामायणाची योग्यता ही महाभारतापेक्षा मोठी असून रामायणाने आणि महाभारताने भारतीयांतील बहुसंख्य लोकांच्या मनावर एवढा परिणाम केला आहे की, जगाचा इतिहासात तसा इतरत्र कुठेही आढळणार नाही.
रामायण व महाभारतातील भारतीय संस्कृती, इतिहास,सांस्कृतिक दर्शन ,त्यातील घटना यामुळे प्रत्येक भारतीयाला त्या अभिमानास्पद वाटतात. भारताचा शोध घेताना नेहरूंनी रामायण म्हणजे जगाच्या सांस्कृतिक विश्वाला प्रदान केलेली अनमोल अशी देणगी म्हटले आहे. नेहरूंनी स्वातंत्र्यासाठी भारत हक्कदार असल्याचे सांगत असताना भारतीय संस्कृतीचे मोठेपण जगासमोर मांडले. युरोपियन देशातील अनेक लोक भारताच्या संपन्न वारशाबद्दल अनभिज्ञ होते. प्राचीन भारतीय इतिहास हा जागतिक इतिहासाचा समृद्ध कालखंड असून प्राचीन ग्रीक आणि रोमन महाकाव्ये मुळात भारतीयांच्या प्रेरणेतूनच निर्माण झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा ग्रंथ १९४६ साली युरोपात प्रकाशित झाल्यावर युरोपातील सर्वच भाषांत त्याचे भाषांतर झाले, तसे ते रशियन भाषेत देखील झाले!
भारतातील प्राचीन साहित्यापैकी रामायण रशिया मध्ये १९ व्या शतकातच मंगोलिया मार्गे पोचले होते. मात्र अलेक्झांडर बार्निकोव या भारतीय संस्कृतीच्या रशियन अभ्यासकाने १९४८ साली रामायणाचे रशियन भाषांतर केले. हाच तो कालखंड होता ,ज्यावेळी भारतीय स्वातंत्र्यानंतर भारत रशिया मैत्रीची सुरूवात होत होती. मात्र या मैत्रीचा प्रमुख आधार सांस्कृतिक संबंध हाच होता, त्यास राजकीय परिमाणे निश्चित झालेली नव्हती. निकिता क्रुश्चेव यांच्या काळात १९५२ पासून रशिया भारत राजकीय मैत्रीपर्व सुरु झाले. तत्पूर्वी भारतीय परंपरेतील रामायणातील रामकथेने रशियन जनतेला आपलेसे केले होते. त्याचा समावेश बालसाहित्य आणि भारताच्या अभ्यासाचे प्रमुख साधन म्हणून अभ्यासक्रमात केला जाऊ लागला होता.
रशियातील भारत विषयाच्या अभ्यासक नतालिया गुसेवा यांनी रामकथेवर आधारित नाटकाची संहिता रशियन नाट्यकलावंत गैनेडी पेचनिकोव यांना दिली आणि त्यांनी मास्को मधील बालनाट्य संस्थेत या रशियन रामकथेचा –रामलीलेचा प्रयोग केला जो खूप लोकप्रिय झाला. तो केवळ बालनाट्य रंगभूमीपुरता मर्यादित न राहता सर्व स्तरातील नाट्य रसिकांचा सर्वात आवडता नाट्यप्रयोग ठरू लागला. त्यानंतरच्या काळात या रामकथेची लोकप्रियता पाहून रशियातील भारतीय वकिलातीत १९५७ साली या नाटकाचा पहिला प्रयोग आयोजित केला. ज्यास खूप चंगला प्रतिसाद मिळाला. यानंतर १९६० साली गैनेडी पेचनिकोव यांनीच प्रभु रामाची प्रमुख भूमिका करून मोठा इतिहास घडवला. गैनेडी पेचनिकोव यांची रामाची भूमिका त्यावेळी रशियन आणि युरोपियन रंगभूमीवर कौतुकाचा विषय ठरली. मॉस्को मध्ये ८ सप्टेंबर १९६१ रोजी गैनेडी पेचनिकोव आणि इतर रशियन कलाकारांनी रामकथा सादर केली. या कार्यक्रमाला जवाहरलाल नेहरू स्वतः हजर होते. नेहरूंची ही आठवण सांगताना गैनेडी पेचनिकोव खूप भावूक होतात. एका वृत्तपत्रासाठी दिलेल्या २२ मे २०११ च्या मुलाखतीत ते सांगतात 'नाटकाच्या एका अंकानंतर नेहरू स्वताहून माझ्याकडे आले, माझा हात हातात घेवून हस्तांदोलन केले आणि म्हणाले ‘ You are our Rama’! पेचनिकोव म्हणतात ‘ ही माझ्यासाठी सर्वात मोठी शाबासकी होती’ मुळात नेहरू केवळ पहिल्या अंकापर्यंतच थांबणार होते, पण ते रामकथेत एवढे मंत्रमुग्ध झाले की, जेंव्हा त्यांना के.पी.एस. मेमन यांनी पुढील नियोजित कार्यक्रमाविषयी सांगितले असता त्यांनी ते सर्व रद्द करून पूर्ण प्रयोग पाहण्याचे ठरवले. प्रयोगानंतर नेहरूंनी या सर्व रशियन कलाकारांची भेट घेतली. सर्वांचे कौतुक करून आतिशय आनंदाने हस्तांदोलन केले. कार्यक्रम खूप आवडला, असे प्रकर्षाने सांगून ,भारतीय वकिलाती तर्फे या प्रयोगाचे आयोजन नियमितपणे केले जाईल अशी व्यवस्था देखील त्यांनी केली.
पेचनिकोव रामायणाचे वर्णन करताना म्हणतात 'रामायण ही भारतीच कल्पना आहे आणि जगाला दिलेली देणगी आहे. ती मनुष्यातील चांगुलपणाचे , सुहृदयतेचे प्रतिक आहे. यामुळेच यातील रामाच्या भूमिकेमुळे माझे आयुष्यच बदलून गेले'! आश्चर्याची बाब अशी कि १९६१ पासून ते केवळ प्रभु श्रीरामचंद्राचीच प्रमुख भूमिका करतात आणि ही भूमिका त्यांनी आतापर्यंत एकूण ४०० पेक्षा जास्त नाट्यप्रयोगांत केली आहे.
मॉस्को येथील या केंद्रीय बालनाट्य संस्थेने १९७१ मध्येच रामायणाचा १५० वा नाट्यप्रयोग सादर केला आणि १९७४ मध्ये त्यांनी भारत दौरा केला तेंव्हा भारतातील अनेक शहरातून त्यांचे प्रयोग झाले.
जवाहरलाल नेहरूंच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्त १९८९ साली मास्को मध्ये जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्राची स्थापना करण्यात आली, तेंव्हापासून वर्षभर या केंद्रात या राम कथेचे प्रयोग आयोजित केले जात आहेत. आज रशियाच्या अनेक भागात या रामकथेचे प्रयोग आयोजित केले जात असून रशियात २००१ साली रामनवमी उत्सवाच्या वेळी रामायणाच्या १०००० प्रती विकल्या गेल्या होत्या! रशिया मध्ये २०१० साली या रामकथेचे सुवर्ण महात्सवी वर्ष साजरे करण्यात आले.
पेचनिकोव यांना नेहरूंनी रशियन नाट्यसंस्थेचा रामायणाचा पहिला प्रयोग पाहिला याची जिवंत आठवण प्रत्येक कार्यक्रमांच्या वेळी होते आणि भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू याही कार्यक्रमाला हजर आहेत, असाच भास त्यांना सदैव होत राहतो. रामायण या नाट्यप्रयोगात मध्यंतर झाले की, या सर्व रशियन कलाकारांना असेच वाटते की, पंडितजी आपल्या भेटीस येत आहेत. त्यांच्या कार्यालयात त्यांनी नेहरूंचा आणि त्यांचा मोठा फोटो लावलेला असून, त्यांना २००८ साली पद्मश्री हा सन्मान भारत सरकार तर्फे प्रदान करण्यात आला असून २००९ च्या नेहरू पारितोषिकाचे देखील ते मानकरी ठरले आहेत.
नेहरूंना असणारा प्राचीन भारतीय संस्कृतीचा, अभिमान, रामकथेचे प्रेम, भारतीय संस्कृतीचे सृजनात्मक रूप जगासमोर मांडण्याची त्यांची दृष्टी, त्यातील आपुलकीची भावना, रशिया देशातील जनतेशी भावबंध, स्नेह मैत्री, प्रेम, सौहार्द व एकरूपता अशी अशी विलक्षण आहे.
आज नेहरूंचा जन्म होवून १२५ वर्ष आणि त्यांना जावून ५० वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. नेहरूंच्या विचारांना मानणारा खूप मोठा वर्ग विदेशात असून आज त्यांची संख्या वाढत असताना असताना नेहरूंच्या जन्मावरून ,धर्मावरून आणि व्यक्तिगत चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे कार्य देशात नव्याने जन्मलेल्या हिंदुत्ववाद्यांनी केले. नेहरू हिंदू विरोधक म्हणून टीका करता करता, हिंदूच केवळ देशभक्त असतात ,या सिद्धांताला पुष्टी मिळण्यासाठी त्यांनी दतात्रय गोत्री काश्मिरी ब्राह्मण असणारे नेहरू चक्क मुस्लीम असल्याचे जाहीर केले !
रामाबद्दल बेगडी प्रेमाचे प्रदर्शन करणार्यांची त्यामागची मूळ भूमिका त्या प्रभूरामाच्या जीवनदृष्टीशी विसंगत अशी नव-हिंदुत्ववादाची आहे. ज्याचे रामराज्य ही संकल्पना रूढ करत एक प्रशासकीय आदर्श समोर ठेवू पाहणार्या हिंदुधर्मपरंपरेशी काही घेणेदेणे नाही, त्याचा पाया मुस्लिम द्वेषावर आधारलेला आहे. म्हणूनच नेहरूंचे मूर्तिभंजन करण्यासाठी त्यांना मुस्लिम ठरवण्याचा प्रयत्न होतो. काही वर्षांपूर्वी रामायणाच्या रंगमंचीय आविष्कारात पेचनिकोव सारखा विदेशातील रशियन ख्रिश्चन, राम म्हणून आक्षेपार्ह वाटत नव्हता. पण आज मात्र एतद्देशीय, मुस्लिम असलेल्या नवाजुद्दिन सिद्दिकीला त्याने सारे आयुष्या ज्या गावात काढले त्या गावातील रामलीलेत भाग घेण्यासही विरोध केला जात आहे. आजची रामराज्याची संकल्पना आणि ते आणण्याची घोषणा करणारे दोन्हीही बदललेले आहेत.
नेहरूंचा कालखंड अटल बिहारी वाजपेयी यांनी जवळून पाहिला आहे, अनुभवला आहे. नव्हेतर नेहरूंनीच अटल बिहारी वाजपेयींची ओळख उद्याचा पंतप्रधान अशी केली होती. त्यामुळे नेहरूंच्या व्यक्तीगत जीवनाबद्दल इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा अधिकारवाणीने अटलजीच सांगु शकतात. वाजपेयी म्हणतात “ In Panditji’s life , we get a glimpse of the noble sentiments to be found in the saga of Valmiki. like Ram, Nehru was the orchestrator of the impossible and inconceivable” .
वाजपेयी जेंव्हा नेहरूंना मर्यादा पुरूषोत्तम रामाची उपमा देतात, तेंव्हा त्याचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा.
© राज कुलकर्णी.
rajkulkarniji@gmail.com
Comments
Post a Comment