श्रीगोंद्याचे वेदांती संत शेख महंमदबाबा
श्रीगोंद्याचे वेदांती संत शेख महंमदबाबा ...........
संतांच्या मांदियाळीत श्रीगोंद्याच्या शेख महंमद यांचे स्थान अतिशय उच्च आहे. अगदी शेख महंमद यांच्या पारंपारिक चरित्रकारांनी त्यांचा उल्लेख रामभक्त कबीराचा अवतार असा केलेला आहे !
कविवर्य मोरोपंतांनी शेख महंमदाचा गौरव करताना त्यांस विनम्रतेचा आदर्श म्हटले आहे ...
तारिती न कीर्तीच्या, जो न लवे ,त्या मुसल-मानवा नावा |
हर्षे सेख महमद भगवज्जन मुसलमान मानावा ||८०|| (सन्मणिमाला)
शेख महंमद यांचा जन्म सन १५४५ च्या सुमारास आजच्या बीड जिह्ल्यातील धारूर या गावी झाला. त्यावेळी त्यांचे वडील राजे महंमद धारूर च्या किल्ल्यावर निजामशाहीत हवालदार म्हणून नौकारीस होते. ते स्वतः कादरी पंथीय सुफी संप्रदायी आणि वेदांती तत्वज्ञ सिद्ध पुरूष म्हणून प्रसिद्ध होते. शेख महंमदाच्या जन्मानंतर ते दौलताबाद च्या किल्ल्यावर रुजू झाले आणि तिथेच त्यांचा परिचय चांद बोधले या हिंदू साधुशी झाला. चांद बोधले यांनी राजे महंमद यांचे शिष्यत्व स्वीकारून अनुग्रह प्राप्त केला. मलंग वेश धारण करणारे हेच चांद बोधले पुढे दत्तात्रयचा अवतार म्हणून मान्यता पावले. शेख महंमद म्हणजे चांद बोधले या सिद्ध पुरुषाचे शिष्य ! आपल्या 'योगसंग्राम' या ग्रंथात शेख महंमद यांनी गुरुचे स्तवन करताना चांद बोधले यांचा उल्लेख ‘ओम नमो सद्गुरू चांद बोधले’ असा केला आहे , तो उत्कट भक्तीभाव स्पष्ट करणारा आहे. या माहितीनुसार एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी आणि शेख महंमद दोघे गुरुबंधू होते , कारण जनार्दन स्वामी यांचे गुरु सुद्धा चांद बोधले हेच होते!
शेख महंमद यांच्यावर इस्लाम आणि वेदांती तत्वज्ञान यांचा एकत्रित प्रभाव असल्याचे स्पष्ट दिसून येते. नाथ परंपरेत चांद बोधल्यांना दत्ता अवतारी सिद्ध पुरुष म्हटले आहे आणि अगदी शेख महंमद यांनीही आपल्या गुरूचा उल्लेख करताना “तुम्ही महावारिष्ठ दिगंम्बरू’ आणि 'जय जय सद्गुरू दिगंबरा' असा केलेला आहे. चांद बोधले हे संस्कारांनी हिंदू आणि गुरु परंपरेने कादरी सुफी असल्यामुळे त्यांची परमार्थ दृष्टी व्यापक समन्वयवादी आणि उदार होती. त्यांनी शेख महंमदाला इस्लामचे मर्म हिंदू अध्यात्माच्या साधनामार्गातून सांगितले. हीच समन्वयता शेख महंमदाच्या 'योगसंग्राम' या ग्रंथात आहे.
अविंध यातीस निपजलो |कुराण पुराण बोलो लागलो|
वल्ली साधू सिद्धास मानलो| स्वहितपरीहिता गुणे || (१६.६६)
चांद बोधले साधरणपणे १५९० च्या सुमारास समाधिस्त झाल्यावर त्यांचे शिष्य शेख महंमद याची किर्ती शिखरास पोचली. योगसंग्रामची निर्मीती याच कालखंडात झाल्याचे संशोधक मानतात. त्याच सुमारस शहाजी राजे यांचे वडील मालोजी राजे निजामशाहीत नौकरीस होते. त्यांनी शेख महंमद यांची भेट घेतली आणि त्यांच्या साधनेने प्रभावित होवून शेख महंमद यांचे शिष्यत्व स्वीकारले, असा संदर्भ आढळून येतो. गुरूप्रति असणा-या श्रद्धेने मालोजी राजे यांनी सन १५९५ साली श्रीगोंदा येथे शेख महंमद यांना मठ बांधून देवून जमीन दान दिली. समाधिस्थ होई पर्यंत ( १६६०) शेख महंमद यांचे वास्तव्य श्रीगोंदा येथे होते. आजही श्रीगोंदा येथे शेख महंमद यांचा मठ असून त्यांचे वंशज या मठाची सेवा करतात.
शेख महंमद आणि संत तुकाराम यांची भेट झाल्याचीही माहीती आहे. दोघांचेही दैवत पंढरी म्हणजे पांडुरंग आहे. पंढरीची मूर्ती धर्मांध मुसलमानांनी फोडली म्हणून एकदा समज प्रसृत झाल्यावर शेख महंमद व्यथित होतात आणि ते धर्मांध मुसलमान आणि विलाप करणारे हिंदू ,या दोघानांही उपदेश करतात. तो विठ्ठल माझ्या अंतरत नांदतो आहे , हे सांगताना म्हणतात .....
अनिवार पंढरी | अविनाश श्रीहरी |
वाहीन अंतरी | व्यापुनी अलिप्त ||
धर्मांध मुसलमान आणि धर्मांध हिंदू या दोघांनीही शेख महंमद यांच्यावर टीका केली , त्यावेळी त्यांनी त्यांच्या मनातील खंत खूप प्रांजळपणे अनेक रचनांतून मांडली आहे.
शेख महंमद यांनी मराठी ,उर्दू ,फारसी या भाषांत रचना केल्या असून ,त्यांनी योगसंग्राम ( प्रसंग १७ आणि २३१९ ओव्या ), पवनविजय, निष्कलंकप्रबोध हे ग्रंथ रचले. अनेक रूपके ,भारुडे आणि अभंग लिहिले आहेत.
'योगसंग्राम' हा त्यांचा प्रमुख ग्रंथ! या ग्रंथावरील भावार्थ दिपिकेचा प्रभाव पदोपदी जाणवतो. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ शेख महंमदाचे गुरु चांद बोधले, गुरुबंधू जनार्दन स्वामी आणि गुरुबंधूंचे शिष्य एकनाथ यांचा अतिशय प्रिय ग्रंथ आहे! शेख महंमद ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणजे आपल्यावर कृपा केली आहे ,असे म्हणतात. ‘कृपा केली ज्ञानदेवे’ असा उल्लेख त्यांनी 'योगसंग्राम' मध्ये केला आहे.
पवनविजय हा त्यांचा ग्रंथ म्हणजे शिव आणि कार्तिक यांचा संवाद आहे. या ग्रंथात शेख महंमद यांनी चार वेदांचा आणि उपनिषदांचा गौरव करून त्यातील सार आणि सत्व मांडत असल्याचे म्हटले आहे ...
चतुर वेदांचे सत्व काढिले |उपनिषदांचे सार घेतले |
शेक महंमद बोलिले | विजयो मंथन करोनिया|| ( पवन विजय १.८४ )
मुस्लीम धर्मीय असल्यामुळे आणि त्यांच्यावर कुराण या धर्मग्रंथातील मूर्तीपूजा विरोधी प्रभावामुळे शेख महंमद स्वाभाविकपणे सगुणोपासनेऐवजी निर्गुनोपासनेतील अध्यात्म्य मांडतात. मात्र त्यांना मूर्तीपूजा विरोधाचे अवडंबर देखील मान्य नाही.
‘ज्यासी रूप नाही रेखा | तो अव्यक्त माझा सखा|’
हे निर्गुण रूप सांगत असताना ते,
‘भावभाक्ताचीया सुखा| साकारला ||’
हे सांगायला विसरत नाहीत हे खूप विलक्षण आहे.
साकार रूपाचे महत्व सांगताना ते म्हणतात .....
साकारला हरी |गोकुळंभीतीरी |
गौळणी सुंदरी| मोहियेल्या||
पांडुरंगाच्या मूर्तीचे शेख महंमद यांनी केलेले वर्णन हे शंकराचार्याच्या पांडुरंग स्वरूपाविषयीच्या कल्पनेचे विस्तारित रूप आहे आणि त्यांनी ते खूप उत्कटतेने वर्णन केले आहे
कटावरी कर |चंद्रभागा ठाणा |
दावितसे खुणा | भावसिंधुच्या ||
“हा भक्तीचा सागर आहे ,मात्र सागर आहे म्हणून कोणी त्यापासून दूर जावू नये तर हा भक्तीचा भवसागर कंबरे एवढाच खोल आहे! हे सांगण्यासाठी मी दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत , तेंव्हा तुम्ही या सागरात उतारा आणि भक्तीत भिजून माझ्याशी एकरूपतेचा आनंद घ्या” हा उत्कट अद्वैती संदेश या रचनेत आहे.
उदारता ,सात्विक समन्वयता, विनम्रता आणि इस्लाम आणि वैदिक तत्वज्ञान यांचा सर्वयोग्य नितांत संगम म्हणून शेख महंमद यांच्या तत्वज्ञानाकडे पाहावे लागते. वेदांती तत्वज्ञानाच्या साच्यात इस्लामचा अंगीकार हा आजच्या सर्वभारतीयांसाठी सर्वात मार्गदर्शक ठरणारा संदेश त्यांनी दिला आहे. मनात प्रेम आणि भक्तीभाव असेल तर काबा-पंढरी एक होते! आब-ए-जमजम चंद्रभागेच्या प्रवाहात केंव्हा मिसळते समजतही नाही! हेच शेख महंमदानी सांगीतले आहे.
वेदांती जीव-शिव ऐक्य या अद्वैत तत्वज्ञानाचा एक महान उपासक तथा दार्शनिक म्हणून शेख महंमदाकडे पाहावे लागते . ईश्वराचे त्यांच्याशी असणारे अद्वैत त्यांनी खूप समर्पक शब्दांत सांगितले आहे. ते म्हणतात ..
शेख महंमद | हृदयी गरोदर |
गर्भी सर्वेश्वर | सामावला ||
चराचर सृष्टी व्यापून ,त्रैलोक्यात सामावलेल्या सर्वेश्वराच्या गर्भाने गरोदर असणारा संत शेख महंमदबाबा आजच्या काळातील सर्व मुलतत्ववादी मुस्लिमांनी आणि सर्व सनातनी हिंदूंत्ववाद्यांनी मनाची आणि हृदयाची दारे उघडे ठेवून आवर्जून वाचायला हवा आणि अंगीकारायला हवा!
© राज कुलकर्णी.
संदर्भ:-
१) मुसलमान मराठी संतकवी - रा.चिं.ढेरे
२) सुफी संप्रदाय - सेतु माधवराव पगडी.
Comments
Post a Comment