स्त्रीमुक्ती चळवळ जागतिक संदर्भ

स्त्रीमुक्ती चळवळ जागतिक संदर्भ ......

जगातील एकाही धर्माची संस्थापक ही स्त्री नाही. धर्माचे जे तत्वज्ञान म्हणून विकसित झाले, त्यात स्त्रियांची भूमिका ही खूप उशिराने सुरु झालेली आहे. एकंदर पाहता स्त्रियांना धर्म संकल्पनेत गौण स्थान देण्याचीच भूमिका प्रत्येक धर्मसंस्थपकाची दिसून येते.

धर्म हा सामाजिक सहजीवनातील व्यवस्थेचा एक महत्व पूर्ण भाग असल्यामुळे धर्माशिवाय स्वंतंत्रपणे समाजाची निर्मीती आणि चलन होऊ शकते, ही मांडणी समाजात होईपर्यंत ख-या सर्वंकष स्त्रीमुक्ती चळवळीला सुरूवात झालीच नाही. जगाचा प्राचीन, मध्ययुगीन इतिहासात  अनेक विद्वान, कर्तृत्ववान, शुर स्त्रींया व शासक होऊन गेल्या पण सर्वसामान्य स्त्रीयांच्या मुक्तीची सुरूवात आणि त्याचे चळवळीत रूपांतर हे आधुनिक कालखंडातच झालेले आहे. मध्ययुगाचा अंत आणि आधुनिक युगाची सुरूवात ज्या रेनेसन्सच्या कालखंडात झाली त्यात मानवतावाद ही संकल्पना मांडण्यात आली. स्त्री आणि पुरूष हे दोन्ही मानव अशी या मानवतावादाची व्याख्या होता. धर्माचा प्रभाव ओसरण्याचा हा कालखंड होता. विज्ञानयुगाच्या सुरूवातीमुळे त्यास वेग आला होता.

स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वासाठी १७९० मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. परंतु या स्वातंत्र्याच्या ,समतेच्या आणि बंधूतेच्या संकल्पनेत स्त्रियांच्या हक्काचा अजिबात विचारच केला गेला नव्हता. क्रांती नंतर आलेल्या नव्या सरकारने स्त्रियांच्या हक्कासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचा छळ सुरु केला. कांहींना तर देशाबाहेर देखील हाकलून  लावले.

युरोप मध्ये याच काळात मानवतावादाच्या संकल्पनेतून स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या हक्कासाठी चळवळ उभारून ,त्या चळवळीस  वैचारिक समर्थन देवून  स्वतंत्र पाने लेखन करणारे अनेक विचारवंत निर्माण झाले. त्यात कांही स्त्रिया होत्या. त्यापैकी मेरी वुल्सस्टोनक्राफ्ट हिने सर्वप्रथम १७९२ मध्ये स्त्रियांच्या हक्काचे समर्थन करणारे  'Vindication of the Rights of Woman ' हे  पुस्तक लिहिले आणि ते इंग्लंड मध्ये प्रकाशित झाले. पण या लेखिकेचा वयाच्या ३८व्य वर्षी मृत्यू झाला. पण या पुस्तकाने स्त्रींयाचे हक्क आणि स्त्री मुक्तीच्या चळवळीला प्रेरणा दिली.  नेपोलियन हा मालकी हक्काचा कडवा पुरस्कर्ता होता ,त्याने स्त्रियांच्या हक्काच्या विरोधात अनेक कायदे केले. पुढे युरोपातील अनेक राष्ट्रांनी पुरुषसत्ताक पद्धतीचा हाच 'नेपोलियन कोड' स्वीकारला. युरोपात सर्वच राष्ट्रांनी स्त्रियांच्या हक्कासाठी कार्य करणाऱ्या चळवळींचा १८१५ पर्यंत अावाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला.

नेपोलियनच्या १८१५ साली झालेल्या पाडावानंतर युरोपात सर्वत्र गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली होती. अशा वेळी जगातील सर्व लोकांना सुखी कसे करता येईल ,याची चिंता त्यावेळेसच्या तत्त्वज्ञांना लागली होती. रोबर्ट ओवेन यांसारखे तत्व्दन्य त्यावर चिंतन करत होते.  समाजवादाच्या उदयाच्या काळात  काळात अमेरिकेत गुलाममुक्तीचे विचार मनात मुळ  धरू पाहत होते . या गुलाममुक्तीच्या चळवळीमुळे स्त्रीमुक्तीच्या चळवळीला पुन्हा भरारी मिळाली.

रोबर्ट ओवेन याने समाज परिवर्तनाच्या प्रत्येक चळवळीत स्त्रियांच्या सहभागाची आवशकता नोंदवली. समाजवादाच्या प्रभावामुळे व स्वातंत्र्याच्या संकल्पनेमुळे नवेनवे विचार समाजात रुजू लागले. धर्माशिवाय स्वतंत्रपणे समाजाची निर्मिती आधुनिक मानवतावादी मुल्यांवर आधारित होवू शकते, हे या कालखंडाला जगाला दिलेली नवी देणगी होती. ख्रिस्ती महिलांची धर्माच्या जोखडातून मुक्ती ही स्त्री स्वातंत्र्याचं भान देणारी घटना होती. अनेक नवनवीन लेखक विचारवंत यांनी स्वातंत्र्य कल्पनेचे अनेक पैलू मांडले. चार्ल्स फोरीयर याने लग्नसंस्था हिचा खाजगी मालमत्तेची जननी आहे असे मत व्यक्त करून तिच्यावर हल्ला चढवला. शिवाय कोणतीही संस्कृती विकसित आहे हे म्हणायचे कशावरून तर ते सुशिक्षित स्त्रियांच्या प्रगतीवरून , असा निकष त्याने लावला होता आणि तो अतिशय समर्पक असा होता.

इंग्लंड मध्ये १७९५ साली जन्मलेल्या फँनी राईट या गुलामगिरी विरोधी महिलेने १८२४  साली अमेरिकेत २०० एकर जमीन आणि कांही गुलामांना विकत घेवून त्यांना मुक्त करून त्यांची वसाहत निर्माण केली. तिने 'Views of Society and Manners in America ' हे पुस्तक प्रकाशित करून त्याच वर्षी तीने  साली 'Free Inquirer' नावाचे एक वृत्तपत्र सुरु केले. त्यावेळी स्त्रियांनी फक्त स्त्रीयांसामोरच भाषणे द्यावीत अशी रूढ होती, पण फँनीने ती  झुगारून दिली. थॉमस जेफरसन आणि बेंजामिन फ्रँकलीन यांच्याशी तीने स्त्रीयांच्या हक्काबाबत सतत चर्चा केली. याच कालखंडात दक्षिण अमेरिकेतील करोलिना इथे जन्मलेल्या साराह ग्रीमिके या महिलेलेने अमेरीका, युरोप आणि इतर राष्ट्रातील  स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ उभारली. प पुढे  तिची बहिण अन्जोलीना यांनी गुलाममुक्तीच्या लढ्याच्या ऐवजी स्त्री मुक्ती चळवळीला वाहून घेतले. विल्यम गँरीसन हा एक स्त्रीवादी संपादक होता ,त्याने त्याच्या वृत्तपत्रात स्त्रियांच्या लेखनास परवानगी दिली.

लंडन मध्ये १८४० मध्ये गुलाममुक्तीची जागतिक परिषद ठरली होती मात्र त्यात स्त्रियांना प्रवेश नाकारण्यात आला. म्हणून अमेरिकन स्त्रियांनी 'फिलाडेल्फिया- फिमेल अँटी  स्लँवरी ग्रुप'  स्थापन केला. त्याच प्रमाणे 'बोस्टन फिमेल सोसायटी' ने गुलाममुक्तीची चळवळ पुरुषांच्या सहभागाशिवाय सुरु केली. या परिषदेला विल्यम गँरीसन सोबत महिलांना पाठविण्यात आले मात्र त्याला खूप विरोध झाला. विशेषतः धर्मगुरूंनी बायबलचा आधार घेत यास खूप विरोध केला आणि स्त्रियांना या  परिषदेत बोलू दिले नाही. त्यावर हेनरी स्टँटन आणि जॉर्ज ब्रॉडवार्न या स्त्री मुक्तीवादी लेखकांनी खूप आक्रामक भूमिका घेतली. याचा परीणाम होऊन त्यानंतरच्या कालखंडात मात्र गुलाममुक्तीच्या परिषदेत स्त्रियांना सहभाग दिला गेला आणि पाश्चात्य  देशात गुलाममुक्तीच्या लढ्याला संपुर्ण स्त्रीमुक्तीचे स्वरूप प्राप्त झाले.

जर्मनीमध्ये १८३० पासून मूलगामी स्त्रीवाद ही चळवळ सुरु झाली. सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी दावा करावा असा विचार मांडण्यात येवू लागला. पुढे ब्रिटन मध्ये १८३७  साली 'चर्चीस्ट चळवळ' सुरु होवून समान मताधिकार आणि समान प्रतिनिधित्व या गोष्टी समोर आल्या. त्याच वर्षी म्हणजे सन १८३७ मध्ये विक्टोरिया ही ब्रिटनची राणी झाली. यावेळी राणी सिंहासनावर बसू शकते मग सामान्य स्त्रियांना हक्कापासून कसे वंचित ठेवता येईल असा विचार समोर आला. पण खुद्द राणीच पुराणमतवादी होती , स्त्रियांनी राजकारण पाहून नये असे तिचे मत होते. पण हे मत सत्तेला असणा-या पाठींब्यासाठी असणारे राजकीय मत होते. कारण राणीने पुढे तिच्या दुस-या  बाळांतपणात  'अनेस्थेसिया' वापरून स्त्रीमुक्ती चळवळीतील एका मागणीस पाठींबा दिला. प्रसुतीच्या वेळी वेदना सहन कराव्या असा त्याकाळी धर्मादेश होता. राणीने हा धर्मादेश नाकारून एकप्रकारे स्त्रीवादी चळवळीला समर्थन दिले.

भारतासारख्या वसाहतीच्या देशात राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे, गोपाल गणेश आगरकर आदींनी आधुनिक कालखंडातील स्त्रीमुक्ती आणि स्त्री स्वतंत्रवादी चळवळींना पार्श्वभूमी तयार करून दिली.  ब्रिटन मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार खूप उशिरा देण्यात आला. मात्र भारतात १९२९ च्या लाहोर येथील पूर्ण स्वातंत्र्याच्या ठरवत स्त्री पुरुषांना प्रौढ मताधिकार देण्याची घोषणा करण्यात आली होती, ज्याचा समावेश पुढे भारतीय  राज्यघटनेत करण्यात आला! महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू या स्त्रीयांच्या हक्काबाबत सातत्याने आग्रही असणारे नेते होते.

भारतात स्त्रीमुक्ती चळवळ या अर्थाने खरी भुमिका पार पाडली ती गीता मुखर्जी यांनी! त्यांनी स्त्रीमुक्तीचा विचार हा राजकीय व्यासपीठावर मांडला. विमला फारूकी, तारा रेड्डी, प्रेमाताई पुरव, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर यांनी हे काम खूप समर्पन भावनेने हाती घेऊन हे कार्य पुढे नेले आहे. त्याचबरोबर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यामुळे भारतीय महिलांचा आत्मविश्वास जागृत झाला ही बाबही दुर्लक्षून चालणार नाही.

जागतिक स्त्रीमुक्ती चळवळीचा हा ओझरता आढावा पाहता,  स्त्रींयांना मानव म्हणून जे हक्क नाकारले होते,  ते धर्मातील प्रमुख भाग असणा-या पुरूषवर्चस्ववादी विचारांनी नाकारलेले होतं. त्यामुळे सहाजीकच स्त्रीमुक्तीची चळवळ ही धर्माच्या विरोधातील चळवळ म्हणून ओळखली गेली. धर्मकेंद्री  राजकारण आणि समाजकारण करणा-या संघटना, संस्था आणि अगदी कार्यकर्तेही या चळवळीपासून अलिप्त राहू लागले, नव्हेतर प्रसंगी स्त्रीमुक्तीची खिल्ली देखील उडवू लागले. हे युरोपातही घडलं, अमेरिकेतही घडलं!

फँनी राईटबद्दल अनेक अश्लाघ्य व्यंगचित्रे प्रकाशित झाली होती.तर लैंगिक संबंधाबाबत स्त्रीयांच्या हक्काबद्दल लिहीणा-या स्त्रीलेखकांच्या चारीत्र्यावर संशय घेणारे लेखही लिहीले गेले होते. आजही असा अनुभव येतो आहे.

आज महिलांना जे स्वातंत्र्य मिळालं आहे, त्याबद्दल ज्या महिलांनी व पुरूषांनीही जागतिक पातळीवर काय काय प्रयत्न केले आणि त्यांना कोणी विरोध केला हे महिलांना कळावे, या साठीचा हा एक छोटासा प्रयत्न! याचा अर्थ स्त्रियांऩी धार्मिक असू नये असा नव्हे तर धर्माचं राजकारण करून पुरूषवर्चस्ववाद मांडणा-या त्याचं समर्थन करणा-या राजकीय व सामाजीक विचारधारांना विरोध करावा हा आहे, असं घ्यायला काय हरकत आहे.

© राज कुलकर्णी.

Comments

Post a Comment