'दि बॉईज फ्रॉम ब्राझील'
'दि बॉईज फ्रॉम ब्राझील'
जर्मनी मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडात एक हत्या सत्र सुरु होते. एकापाठोपाठ होणा-या हत्या एखादे मोठे षडयंत्र असल्याचा संशय पोलिसांना तथा सरकारी गुप्तहेरांना येतो. तपास यंत्रणा कामाला लागतात आणि असे आढळून येते की ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कौटुंबिक जीवनात कमालीचा सारखेपणा आहे. एकतर त्यांचे वय सारखे असते आणि त्यांच्या सर्वांच्या पत्नी त्यांच्या पेक्षा तेवीस वर्षांनी लहान असतात. त्यांची आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती सुद्धा जवळजवळ एकसारखीच असते !
आश्चर्याची बाब अशी या सर्व दाम्पत्यांनी मुले दत्तक घेतलेली असतात आणि तीही एकाच अनाथालयातून ! सर्वात अधिक आश्चर्याची बाब अशी ती सर्व मुले एकसारखीच दिसत असतात ! या मुलांचे अनाथ असणे ,त्यांच्यात साम्य असणे आणि त्यांच्या जीवनातील घटना सारख्या असणे वा एकसारख्या घडवणे यातील गूढ मात्र आश्चर्यकारक नसते तर मानवजातीसाठी प्रचंड भयानक असे असते ! हे कथानक आहे , इरा लेविन यांच्या 'दि बॉईज फ्रॉम ब्राझील' या १९७६ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीचे ! त्यावर १९७८ साली याच नावाचा चित्रपट देखील आला.
जनुकीय विज्ञानातील संशोधन एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अत्युच्च अवस्थेला पोचले होते. जर्मनी मध्ये यावर खूप संशोधन झाले. हिटलरच्या छळछावणीत ठार मारण्यासाठी पकडलेल्या ज्यूंची अशा संशोधन केंद्रात प्रयोगासाठी गिनिपिग म्हणून रवानगी होत असे. हिटलरच्या राष्ट्रवादाने भरलेल्या विद्वान शास्त्रज्ञांनी अनेक औषधांचा परिणाम प्रत्यक्ष माणसांवर करून पहिला. जिवंत माणसांवर भूल न देता प्रयोग करण्याचा सुद्धा विकृत आनंद घेतला. सहाजीकच यामुळे जैविक विज्ञानातील संशोधनात जर्मनीने प्रचंड प्रगती केली. यातूनच मानवी क्लोनिंगचे प्रयोग केले गेले ! त्यात जर्मनीतील वैज्ञानिक कितपत यशस्वी झाले याचा तपशील हा प्रत्यक्ष या जैविक संशोधांचा इतिहास म्हणून स्वतंत्र पणे अभ्यासता येईल ! मात्र इरा लेविन यांनी याच विज्ञानातील क्लोनिंग तंत्राच्या आधारे या कादंबरीचे कथानक मांडले आहे आणि या कादंबरीतून जो संदेश दिला आहे तो बौद्धिक दृष्ट्या किमान डोळस असणाऱ्या जगातील सर्व मानवजातीतील सुज्ञ लोकांना मार्गदर्शक असा आहे.
हिटलर त्यांच्या नंतर ज्यूंचा नि:पात करून संपूर्ण पृथ्वी ज्यू विरहीत कशी होणार या चिंतेने व्यथित झाला होता. त्याच वेळी जनुक विज्ञान शास्त्रातील एक वैज्ञानिक त्यास येवून भेटतो आणि हिटलर चे रक्त, पेशी, वीर्य प्रयोगासाठी घेतो. या रक्ताच्या-पेशींच्या आधारे तो हिटलरचे क्लोनिंग करून १०० हिटलर जन्मास घालता येतील अशी कल्पना मांडतो. शिवाय असेही सांगतो की, हे मुले एकसारखीच म्हणजे हुबेहूब हिटलर सारखी दिसतील. पण त्यांच्यात हिटलर प्रमाणेच वंशवाद, ज्यू द्वेष, उन्मादी राष्ट्रवाद, अमानवी क्रूर वृत्ती आदी गुण निर्माण होण्यासाठी त्यांचा सांभाळ अशी पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबात व्हायला हवा ,जी पार्श्वभूमी हिटलरच्या कौटुंबिक जीवनात होती. हिटलरला ही कल्पना आवडते आणि त्याचे निष्ठावान गुप्तहेर तथा सहकारी या कामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तो नियुक्त करतो.यासाठी प्रचंड मोठ्या निधीची तरतूद करून, जर्मनीपासून दूर दक्षिण अमेरिकेतील ब्राझील या देशात गुप्तपणे प्रयोगशाळा बनवली जावून ,तिथे हा 'हिटलरचा कारखाना' निर्माण केला जातो. ही मुले ठराविक वयापर्यंत एखाद्या द्वेषाच्या ,हिंस्र राष्ट्रवादाच्या, उन्मादी क्रूर अमानवी वृत्तीच्या रोपट्या प्रमाणे प्रयोगशाळेत वाढवून, विशिष्ट वयात जर्मनीत पाठवली जातात. हिटलर ने दिलेल्या प्रचंड पैशाच्या जोरावर हिटलरच्या धोरणाचे समर्थन करणारी वंशवादी विद्वेषी मंडळी समाजकार्याच्या आवरणाखाली निष्ठेने हे हिटलरच्या मूळ गुणांसह १०० हिटलर निर्माण होण्यासाठी झटत असतात. पण कादंबरीच्या शेवटी हा मानवद्रोही कट उघडकीस येतो आणि हा प्रयोग अयशस्वी करण्यात कथेतील नायक यशस्वी होतो. ती १०० मुले म्हणजे हिटलर केवळ दिसयला हिटलर सारखे होतात पण ते हिटलरच्या वृत्तीचे होत नाहीत. ही कादंबरी इथेच संपते.
वैज्ञानिक दृष्ट्या खरोखरच क्लोनिंग तंत्रज्ञानात असे कसे करणे शक्य आहे किंवा नाही हा येथे विषय नाही; कारण ही कादंबरी आहे, काल्पनिक आहे! ( कारण हिटलर बद्दल आपुलकी असणा-यांच्या या मुद्दयावर या अनुषंगाने उगाच खल पाडणा-या कांही प्रतिक्रीया येण्याची शक्यता असल्यामुळे हे आवर्जून नमुद केले )
युरोपात विज्ञानाच्या प्रचारामुळे अशा विषयाच्या अनुषंगाने कादंबरी लिहिताना लेखकांनी क्लोनिंग सारखे तंत्रज्ञान कल्पकतेने वापरले आणि समस्त मानवजातीला एक संदेश दिला की मानवजातीच्या शत्रूंची कार्यपद्धती कशी असू शकते. जगातील प्रत्येक नेतृत्व आपल्या विचारांचे अनुयायी निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत असतात पण अमानवी वृत्तीच्या नेत्याचा असा विचार समाजविघातक असतो.
भारतातील पुराणात, दंतकथात, महाकाव्यात अशा क्लोनिंग सदृष्य कल्पनांची कांही कमी नाही. अनेक देवतांना ,असुरंना अशा विद्या येत असल्याचा समज प्रचलित आहे. पण भारतात अशी कांदंबरी लिहीली गेली की नाही माहीत नाही. जी.ए. कुलकर्णींच्या कांही कथा अशा आहेत. पण वेगळ्या विषयावर आहेत.
वंशवादी हिंस्र राष्ट्रवाद युवकांच्या मनात पेरण्यासाठी क्लोनिंग चे तंत्र वापरून १०० क्रूर वृत्तीचे नरभक्षक तयार करण्यासाठी या कादंबरीतील खलनायकाला प्रयोगशाळा निर्माण करावी लागली होती आणि तीही देशापासून दूर ! गुप्तपणे !! मात्र आज जगात अनेक देशात हिटलर सारख्याच हिंस्र, अमानवी, नरभक्षक, क्रूर हुकुमशहांनी सत्तेत येऊन संबंध देशाचीच 'प्रयोगशाळा' करून अनेक भ्रामक गोष्टी समाजमनावर बिंबवून संमोहन कलेतून स्वत: सारखे करोडो नरभक्षक निर्माण करण्याची योजना कार्यान्वित केल्याचे दिसून येत आहे.
'दि बॉईज फ्रॉम ब्राझील' या कादंबरीत मानवजातीसाठी हाच धोका , काल्पनिक कथानकातून खूप एवढा चपखलपणे मांडला आहे की कादंबरीच्या अखेरीस वाचक स्तब्ध होतो. या कादंबरीचा मराठी अनुवाद ‘गुडबाय हिटलर’ या नावाने रवींद्र गुर्जर यांनी केला आहे. बारावीला असताना मी कादंबरी वाचली होती! कांही तपशील मागेपुढे होऊ शकतात, पण आशय विचारात घ्यावा ही विनंती. मागील दोन तीन दिवसापासून घडलेल्या घडामोडीमुळे या कादंबरीतील कथानक आठवणीत सतत घोळत होते. आज लिहीता झालो.
© राज कुलकर्णी.
Comments
Post a Comment