मृत्यू ,दु:खाच्या अभिव्यक्तीची भाषा आणि समाज
दै. प्रजापत्रच्या 'बहुरंग' या पुरवणीत आजरोजी प्रकाशित झालेला माझा लेख......
.
मृत्यू ,दु:खाच्या अभिव्यक्तीची भाषा आणि समाज
.
मधुर भांडारकर यांच्या ‘पेज थ्री’ या चित्रपटातील एक प्रसंग ! दुकानात कपडे खरेदी करायला गेलेल्या ,एका उच्चभ्रू वर्तुळात वावरणाऱ्या स्त्रीला ,कोणीतरी मयत झाल्याचा फोन येतो आणि ती पूर्वी ज्या कुतूहलाने आणि जिज्ञासेने विविध कपडे पाहत असते ,तेवढ्याच वेगाने पटकन ती म्हणते ‘शो मी समथिंग व्हाईट ’ ! कारण अंत्यविधीला जायला पांढ-या कपड्यावीना कसे जायचे !
हिंदी चित्रपट पाहताना हे वारंवार जाणवते की,माणूस मयत झाल्यावर दु:खाच्या अभिव्यक्तीचे हे प्रदर्शन नेहमी पांढ-या वस्त्रातच होते आणि त्यास समाजात प्रतिष्ठितपणाचे म्हणून देखील ओळखले जाते.
एका मित्राच्या धाकट्या भावाचा अपघाती मृत्यू झाला होता, आणि त्याला भेटण्यासाठी गेलो होतो. जन्माने मागास वर्गीय समाजातील असणाऱ्या मित्राचे कुटुंब सध्या प्रचंड श्रीमंत आणि सुशिक्षित आहे. तीन चार मोटारी ,गावात चार पाच अलिशान बंगले देखील आहेत ! आम्ही मित्र त्याच्या घरी पोचलो ,तेंव्हा त्याच्या घरी सर्वांचा आक्रोश चालू होता आणि मोठ्या आवाजांत रडणे चालू होते ! सांत्वन करून झाल्यावर पंधरावीस मिनिटांनी आम्ही घराबाहेर पडले आणि त्याच घराजवळ असणाऱ्या एका घराच्या सावलीत थांबलो. दोन स्त्रिया त्याच मित्राच्या घरातून बाहेर पडत होत्या आणि त्यांची स्कुटी काढताना ,त्यांच्यापैकी एक स्त्री म्हणाली ‘एवढे श्रीमंत आहेत, शिकलेले आहेत ,पण रडतात कसले अशिक्षित लोकांसारखे!” या वाक्याने मी खरेतर एकदम चमकलो ,एकदम मनात विचार आला रडण्यातही सुशिक्षितपणा आणि अशिक्षितपणा असतो काय?
त्यानंतर कांही दिवसांनी आणखी असाच एक प्रसंग घडला आणि एका नातेवाईकाच्या अपघाती मृत्युच्या अशाच प्रसंगाच्या निम्मिताने, मी एका त्यांच्या गेलो. दु:ख होतेच परंतु कोणाचाही मोठ्याने रडण्याचा आवाज नाही. भेटून परत येत असताना, माझ्या मनात पूर्वीचा प्रसंग,त्या स्त्रीचे ते वाक्य आणि हा प्रसंग, यांची तुलना सुरु झाली. प्रत्येकाचे दु:ख मोठे होते ,त्या दु:खाला मोजमाप नाही ,मात्र त्या दु:खाच्या अभिव्यक्तीची भाषा मात्र वेगवेगळी होती आणि ती स्वतंत्र देखील होती.
माझ्या घराच्या शेजारी ,एक कुंभाराची म्हातारी आजी राहायची, आमच्याच दूरच्या नातेवाईकांच्या घरी ती भांडे घासायची ! त्या नातेवाईकाच्या घरात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर ,ती म्हातारी तिथे उपस्थित होती. तिथला वृतांत सांगताना ती म्हातारी माझ्या आईला म्हणाली “तुम्हा बामणाच्या लोकांना माया असती का नाय ओ ? कुनीबी रडलं नाही बघा , लई वेळानं ती बहिण म्हणणारी आली,डोळं लाल करून उगाच फुसफुस करत होती ”
या तिन्ही प्रसंगाचे विश्लेषण माझ्या मनात सतत चालू राहिले ! हे तिन्ही प्रसंग मृत्यू या दु:खाच्या परमोच्च अवस्थेशी निगडीत होते आणि दु:खाची ही अभिव्यक्ती अंत्यसंस्काराचा भाग होती.
मानवाला जीवनात अनेक वेळा दु:खाला सामोरे जावे लागते, निराशा ,हताशा, दारिद्र्य, आजारपण,अपमान,अपयश अशा अनेक प्रसंगात माणसाला दु:ख होते. मात्र या सर्व प्रसंगावर कांही ना कांही पर्याय जरूर असतात. जिवलग व्यक्तीच्या मृत्यूने झालेल्या दु:खाला मात्र कोणताच पर्याय नसतो. रडणे आणि भावनांना मोकळी वाट करून देणे एवढाच एक पर्याय अशा प्रसंगात असतो. म्हणूनच जिवलग व्यक्तीच्या मृत्यू मुळे झालेले दु:ख ,हे दु:खाच्या सर्वोच्च अभिव्यक्तीच्या स्वरुपात प्रकट होते!
दु:खाच्या अभिव्यक्तीची भाषा म्हणजे रडणे ! या भाषेची भौतिक स्वरूपातील अभिव्यक्ती म्हणजे अश्रू ! सामाजिक जडण घडणीचा परिणाम दु:खाच्या अभिव्यक्तीवर झालेला दिसून येतो. भारतीय समाज हा आर्थिक आणि सामाजिक अंगाने वेगवेगळ्या स्तरात विभागला गेला आहे. जन्मजात उच्चनीचता ठासून भरलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारलेल्या आपल्या संस्कृतीत अनेक पिढ्या केवळ आर्थिक नव्हेतर सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा मागासलेल्या राहिल्या .त्यामुळे त्यांच्या अभिव्यक्तीचे सांस्कृतिक अर्थाने उन्नयन होवू शकले नाही. समाज बदलत गेला ,जुन्या प्रथा ,जातीव्यवस्था कायद्याने , कधी व्यवहाराच्या रेट्याने आणि प्रबोधनाने हळू हळू मोडीत निघाल्या. त्यामुळे निर्धन असणाऱ्या मागास जातीकडे आर्थिक सुबत्ता आली, परंतु सांस्कृतिक दृष्ट्या अनेक शतकांपासून कुपोषित राहील्यामुळे भावनांचच्या अभिव्यक्तीत मात्र बदल झालाच नाही. समाजातील प्रतिष्टीत वर्गाकडून अभिव्यक्तीचे देखील मापदंड ठरवून टाकले गेले आणि ठराविक पद्धतीने अभिव्यक्त होणे म्हणजे सुसंस्कृत आणि सुशिक्षित असणे ,असा सरसकट सपाटीकारणाचा प्रयत्न समाजात होत गेला. कित्येक जन आपल्या अभिव्यक्त होण्यास या व्याख्यांच्या चौकटीत बसवू लागले. असा प्रयत्न आनंदाच्या भावनेच्या अभिव्यक्त होण्यात यशस्वी झाला. दु:खाच्या अभिव्यक्तीच्या संदर्भात मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही ,आणि कधी यशस्वी होणार देखील नाही ! कारण दु:ख या भावनेच्या उस्फुर्त आवेगाला कुठल्या तरी मापदंडाच्या चौकटीत बसवण्याचे भान कुठे असणार!
जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर दु:खाच्या आवेगात धाय मोकलून रडणे, म्हणजे उस्फुर्त भावनातिरेक असतो. पण संवेदना बोथट असलेल्या कांही समाजात,जिथे रडणे शक्य होत नाही, मात्र दु:खाचे प्रदर्शन आवश्यक असते , अशा वेळी समाजात दु:खाला बाजारू मूल्य प्राप्त होते आणि दु:खाचा बाजार मांडला जातो. विकत घेणारा समाज अर्थातच उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय असतो आणि बाजारातील असे भावनांचे खरेदीदार स्वतःच्या आनंदासाठी इतरांच्या भावना विकत घेत असतात आणि मृत्यू झालेल्या व्यक्तीबद्दल आत्मीयता नसताना सुद्धा पोटासाठी दु:खाचे प्रदर्शन करावे लागते. महाविद्यालात शिकत असताना डिम्पल खन्ना या अभिनेत्रीचा 'रुदाली' नावाचा चित्रपट माझ्या पाहण्यात आला. राजस्थान सारख्या राजेमहाराजे आणि सरदार यांच्या प्रदेशात गावातील कोणी प्रतिष्ठीत व्यक्ती वारला कि रडण्यासाठी एका स्त्रीला बोलावले जाते. मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा आक्रोश आणि दु:ख यांचे प्रदर्शन करण्यासाठी रडणारी स्त्री पैसे देवून बोलावली जात असे. तिला रुदाली असे म्हणत! अशा रुदालीची ही कहाणी ! लग्नात आनंदाचे प्रदर्शन करण्यासाठी स्त्रिया नाचवतात ,तसेच शोकप्रसंगी रडण्यासाठी रुदाली ! पैश्याचा व्यवहार दोन्हीकडे आणि दोन्हीकडे ही स्त्रियांचा वापर ,आणि दोन्ही ठिकाणी ती एक उपभोग्य वस्तू ! स्वतःच्या चरितार्थासाठी ,इतरांचे दु:ख भरजरी दिसावे म्हणून रडणाऱ्या रुदालीच्या स्वतःच्या आयुष्यात जेंव्हा दुखाचा डोंगर कोसळतो,तेंव्हा तिची दु:ख ही भावना शुष्क झालेली असते आणि ती रडतच नाही, आणि व्यवस्थेला प्रश्न विचारते मी रडू तरी कशासाठी ! अर्थातच ही रुदाली समाजाच्या अत्यंत मागास अशा वर्गातून आलेली असते ,जी स्वतःच्या दु:खावर देखील अभिव्यक्त होण्याचा हक्क समाजाने तिला दु:खाची सतत सवय लावून, संवेदना बोथट करून नाकारलेला असतो. ही झाली रुदालीची गोष्ट ,मात्र भारताच्या प्रत्येक भागात कोणत्या न कोणत्या स्वरुपात मृत्यू आणि अंत्यसंस्कार याच प्रसंगावर आधारित दलित आणि अतिदलित समाजाची उपजीविका असल्याचे दिसून येते. त्यामुळे देखील उपेक्षित वर्गातील दु:खाच्या अभिव्यक्तीची भाषा आजही बदललेली नाही ! याला जवाबदार अर्थातच त्यांच्या दु:खाला ज्यांनी अभिव्यक्त होण्यापासून वंचित ठेवले तेच आहेत!
समाजातील कांही अपवाद वगळता स्त्रिया या शोषितच राहिलेल्या आहेत. त्यामुळे दु:ख हे स्त्रियांच्या वाटयाला पाचवीला पुजलेले. जगातील कोणतीही संस्कृती वा धर्म स्त्रियांच्या शोषणाचा धिक्कार करताना दिसून येत नाही. स्वाभाविकपणे जगभरात दु:खाच्या अभिव्यक्तीवर स्त्रियांना अग्रस्थान आहे, हे खेद जनक आहे पण वास्तव आहे. रडणे हे म्हणूनच स्त्रियांच्या स्वभावाचे प्रतिक मानून त्याकडे उपहासाच्या अर्थाने पहिले जाते. सहज बोलताना ‘पुरुषासारखा पुरुष तू ,रडायला काय झाले ?’ किंवा ‘बायकांसारखे रडू नकोस’ असे शब्द कानी पडतात. यातून खरेतर स्त्रियांच्या असहायतेची त्यांच्या दु:खाची कबुलीच समाज देत असतो. स्त्रीयांच्या दु:खाच्या अभिव्याक्तीवरच समाजातील सांस्कृतिक विकासाचे आणि प्रगल्भतेचे आकलन होवू शकते!
जिवलग व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर रडणे ही दु:खाच्या अभिव्यक्तीची भाषा ! ही भाषा समाजातील प्रत्येक स्तरात ,प्रत्येक प्रदेशात ,प्रत्येक जातीपातीत वेगवेगळी आढळून येते. ही अभिव्यक्ती ,ही भाषा समाजाचे वास्तव मांडणारी आहे. समाजात आता भेदभाव शिल्लक राहिलेला नाही असे म्हणनाऱ्या अनेकांना हे वास्तव निरुत्तर करणारे आहे असं वाटतं नाही काय?
© राज कुलकर्णी .
Comments
Post a Comment